इतर

स्मृतीगंध…..ट्रेक नंबर ५……खिंडवाडी…सूर्यपाठ मार्गे…. अजिंक्यतारा

स्मृतीगंध प्रवास आयुष्याचा जरी असे खडतर तरी दुःखास तुडवून पायी व्हावे वरचढ ट्रेक नंबर ५ खिंडवाडी....सूर्यपाठ....उंटाच्या मानेचा डोंगर.....दक्षिण दरवाजा मार्गे अजिंक्यतारा काहीतरी नवीन करू ....यापेक्षा काहीतरी जुने अनुभवू.....असा विचार केला ना की बऱ्याच नव्या गोष्टी पण सापडत जातात. लहानपापासूनच चंद्राला मामा आणि सूर्याला देव..असे म्हणत आलो.या आधी देखील हा मामा आणि देव एकावेळी पाहिले आहेत.पण क्षणचित्रात कैद करण्याचा योग काल आला. परवा असणारी पौर्णिमा यामुळे काल देखील सकाळी चंद्राचे पूर्ण शीतल रूप पाहायला मिळाले....दक्षिणेकडे तोंड करून सूर्यपाठ डोंगरावर उभे राहून... मान पूर्वेकडे वळवली की उगवता सूर्य आणि पश्चिमेकडे मावळता चंद्र पाहिला. ते दृश्य फारच विलोभनीय वाटले... जस जशी सूर्याची दाहकता वाढत गेली....चंद्राचं अस्तित्व मिटत गेलं......हे खर नवीन नाही....ह्यात काही मोठं विज्ञान मी सांगणं... हे पण शोभत नाही......पण मी जरा वेगळा विचार करत गेलो.....काही जण म्हणत असतात आपलं हे नश्वर शरीर पंच महाभूते आहेत त्यांनी बनले आहे..ह्यात विलीन तर होणार ....पण निसर्गात असणाऱ्या ह्या शक्ती बराच बदल शरीरावर घडवत असतात..... काही माहित नाही... ह्यात किती तथ्य आहे....कारण तेवढा माझा काही अभ्यास नाही....पण ह्यातून मला जे काही वाटले ते तुमच्या सोबत बोलून मन मोकळे करू वाटले एवढच काय ते आजच्या लेखाचे निम्मित.... माणसाच्या आयुष्यात तरी काय वेगळे आहे. सूर्यासारखं तेज असावं म्हणले जाते.....चंद्राची शीतलता अंगी असावी असं देखील बोलतात....पण बघा ना ह्या दोघांचं कधी पटत का..? कारण सूर्याचे तेज हे ठराविक काळचं सहन केले जावू शकते...नाहीतर वाढणारा पारा चंद्राचं अस्तित्व संपवूनच...गप्प बसतो. खुल्या आसमंतात मग हा एकटाच राजा आपली हुकूमत दिवसभर गाजवून....सांज वेळेला परतीचा प्रवास करतो....दिवसभर डोळे भिडवू न शकणारे आपण मग त्याचे मावळते रूप आनंदाने कैद करतो... शेवटी काय तर त्याचा तापटपणा.....संसाराचा पसारा सावरायला.....जीवांना ऊर्जा द्यायला असेल गरजेचा....पण सोबत कोणाला हवी असते ह्या तप्त भास्कराची....? तेच उलट पाहिले तर बघा ना...भले जीवनात अंधार असेल....भले एकटेपणाचा काळोख दाटला असेल....त्यात थोडासा प्रकाश घेवून येणारा चंद्र....आपल्या शितलतेमुळे....असंख्य तारकांना आपलासा वाटतो.....कारण फक्त एकच त्याच्यात तेज असते....पण दाहकता काहीच नसते.... जीवनाच्या प्रवासात ह्यातून एक गोष्ट नक्की शिकावी.....आपल्या नोकरीचा भाग.....आपल्या कर्तव्याची जाण.....ह्यात वरून अगदी रुश्ठ रहावं लागतं असेल......काही पदांवर काम करताना ..... खूप काही गोष्टी ह्या आपल्या जवळच्या व्यक्तीला पण न सांगता.....जीवन जगावं लागत असेल.....पण जसे सूर्य त्याची दाहकता देवून धरतीचे जीवन सुखमय करत असतो....तसेच आपण देखील जबाबदारी पार पाडावी.....पण सांजवेळ येईल तेव्हा नक्कीच आपल्या परीजणांना.....आपल्या आतून असणाऱ्या रंग छटांनी...त्यांचे जीवन कसे मोहक बनवता येईल हे पहावे. आणि ज्यांच्या जीवनात कधीही वरुन रागाने वागणे....हे कधी गरजेचे नसेल... त्यांनी....नक्कीच त्या चंद्राचा विचार करावा....त्याचे अस्तित्व तरी काय...जो रोज एका अवस्थेत दिसू शकत नाही...कलेकलेने वाढणे....आणि पुन्हा... ढळणे.....हेच ज्याच्या नशिबी...असा हा चंद्र...आपल्या आतील असणाऱ्या शांत ऊर्जेने....साऱ्या तारकांना मोहून सोडतो.....असेच तर असावे आपले जीवन.... भले सुखाच्या काही गोष्टी आज कमी पडतील....उद्या मिळतील....रोज भले.....जीवनात करावी लागत असेल अस्तित्वाची लढाई....पण मनाचं स्थैर्य ढळू नाही दिले पाहिजे..... असा जर जगण्याचा आनंद घ्यायला जमला तर...? तर कशाला होईल जीवनाची फरफट.....फक्त स्वत्व शोधता यायला हवं....नाहीतर ... दूनियेने आखलेल्या मार्गावर चालत बसून सुख शोधत असाल तर लक्षात ठेवा....त्या मार्गावरून जाताना हिरवळ सापडणे जरा अवघडच असते... कारण आपल्या पुढे असणारे.....ते सारे लुटत निघून गेलेले असतात....मागे राहते ती फक्त एक पायवाट....जी तुम्हाला जीवनाच्या अंतापर्यंत घेवून जाते...मग मागे वळून पहाल तेव्हा जाणवेल....अंत तर जवळ आला पण जीवन जगणे राहून गेले. म्हणून आमचा आजचा हा वेगळा प्रवास खूप काही शिकवून गेला.....खिंडवाडी....सूर्यपाठ....मार्गे अजिंक्यतारा करताना एक विलक्षण अनुभव आला....रोज डोळ्या समोर दिसणारी टेकडी....त्यावर फडकणारं...भगवे निशाण....सारे पाहून जरी असलो तरी...वाट कधी वाकडी पडली नाही....हायवे वरून ये जा करत सुरू असणारा रोजचा प्रवास...फक्त दिवस ढकलणे...हेच काय ते शिकवत होता....सुख शोधायला....मग कुठं हॉटेल मध्ये जेवण..तर कधी....नावाजलेल्या ठिकाणी क्षणचित्रे गोळा करणे....ह्या पलीकडे काही घडतं न्हवते.... पण ह्या मार्गे प्रवास करत अजिंक्यतारा गाठला त्यात वेगळाच अनुभव आला.....काही ठिकाणी धडकी भरवणारी चढण....तर काळजाचा ठोका चुकवणारी उतरण...पण ओढ होती ती पटकन दक्षिण दरवाजा गाठून...राजधानी वर मनाला विसावा द्यावा.... मग प्रवासात सापडले बिबट्याच्या पावलाचे निशाण.... मोर...लांडोर...आणि एक सुखाचा प्रवास. अजिंक्यतारा आपण सर्वांनी अनुभवला आहेच....त्याबद्दल काय वेगळे सांगणार......पण त्याच्या सभोवती पसरलेल्या ह्या रांगातून स्वच्छंदी फिरण्याचा आनंद आपण नक्कीच घ्यावा अशी एक प्रेमळ अपेक्षा. निलेश बाबर शब्दसारथी

या मनांवर शतदा प्रेम करावे:डॉ. अनिल कुलकर्णी

या मनांवर शतदा प्रेम करावे... डॉ.अनिल कुलकर्णी. मनाचा खेळ कधी कुणाला समजलेंत. स्वतःच्या मनाचे खेळ सुद्धा स्वतःला समजत नाहीत. आत्महत्या करणाऱ्या च्या हातातच असतो मनाचे खेळ थांबवण्याचा लगाम. कधी कधी परिस्थिती प्रवृत्त करते, कधी कधी मनंच मनांला प्रवृत्त करतं. कॅनव्हास वर मनसोक्त रंगाची उधळण करत सुंदर चित्र काढता येतं. सुंदर क्षणांची उधळण करुन वेगळे वेगळे क्षण सभोवताली गोळा करता येतात. क्षणांची रांगोळी काढून, मनासारखे रंग भरता यायला हवेंत. चित्र पुसता येतें, रांगोळी ही पुसता येतें. क्षणांना पुसलं कीआयुष्य संपतं. सुखाचा इंद्रधनू पाहायचा असतो, अनुभवायचा असतो, बघायचा असतो, तो ओरबडायचां नसतो. सुख ही अनेकरंगी असतं. प्रत्येक रंग माणसाला ओरबाडून हवां आहे. सत्ता, कीर्ती, पैसा वासना, प्रेम,समाधान, यश हे सगळं यशाच्या इंद्रधनूंत असतं. एका वेळेस एकच मिळेल व ते भोगावं. आत्महत्या करणारे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यशस्वी असतांतच. यशानंतर दोन रस्ते असतात,समाधान व नैराश्य. नैराश्याच्या रस्त्यावर आत्महत्या भेटतें. यशोशिखरावर असणारे जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा खरंच समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण होते. मन ही आवाक्यात न राहाणारी गोष्ट आहे. माणसे उन्मत्त होई पर्यंत मनाचं ऐकत राहतात. मनाच्या खेळावर ज्याचं नियंत्रण आहे, तोच उत्तम आणि यशस्वी जीवन जगू शकतो. मन आवाक्यात नसलें की मनात अनेक समस्या घर करतात. मनाला कळणं आणि वळणं याचा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. कुणाचं मन कुणावर जडेल याचे काही ठोकताळे नाहीत.प्रत्येक क्षण विविध रंगात न्हाऊन निघालेला असतों आणि तोच मनाचं अस्तित्व टिकवून ठेवतो. 'दुखी मन मेरे जहा नही चैना वहा नही रहेना' असं म्हणलंच आहे. क्षणांना जिंकलं की आयुष्य आपलंच असतं.क्षणांना जिंकता यायला हवं. तुमचा अखेरचा श्वास ठरवतो क्षणंच. मनातल्या तरंगावर आपलं नियंत्रण नसतं. तरंग आपले नसले तरीही अंतरंग आपलंच असतं.आपल्या अंतरंगात आपण कधी डोकावतंच नाही, आपण नेहमी दुसऱ्याच्या अंतरंगात डोकावून तुलना करत बसतो. तुलना तुमच्या मनाला जाळतें तुमच्या मनाची राख करतें. सारखंआरशात पाहून चित्र बदलत नाही. वारसा आणि कर्तुत्व हातात हात घालून आले तर तरच आरसा दखल घेतो.मनाचा थांगपत्ता लागू न देण्यात माणसा सारखा माणसाचा हात कोणीच धरू शकत नाही.चेहरे व मुखवट यांचे नियोजन कधीच एकमेकांना पूरक नसतं. मुखवट्याची ब्लु प्रिंट चेहरा कधीही बदलू शकतो. चेहऱ्याचा नियोजन मुखवट्या शिवाय अंमलात येऊच शकत नाही. खरा चेहरा उघडकीला येऊ नये म्हणून मुखवटे तारे वरची कसरत करतात. माणसं सगळं उघड़ करतील, पण मन उघड करण्याची लक्ष्मण रेषा कधीच ओलांडत नाहीत. मृत्यूनंतरही माणसाच्या मनातलं कळत नाही. शरीराने जवळ येणारे मनाने रत होतांतच असं नाही. मन खुंटीला टांगलं की माणसं मनां सारखं वागायला लागतात. मनाला विसावण्यासाठी आश्वासक खांद्याची गरज असतें. पाय धरणारे व्यक्तिमत्व व विश्वासाने विसावणारे खांदे आज दुर्मिळ झाले आहेत. मानवी संबंधाचा सगळा इतिहास मनातलं ओठावर न आल्यामुळे झाला आहे. मनानें ठरवलं तर काही होऊ शकतं.आपल्याच मनाचं विश्लेषण आपल्याला करता येत नाही. आपण दुसऱ्याच्या मनातलें विश्लेष,ण करू शकतों कां?माणसे स्वतःच्या मनावर प्रेम करतच नाहीत, स्वतःच्या मनाला गोंजारततच नाहीत. स्वतःच्या मनाला वेळ देत नाहीत नेहमी उपेक्षेने, तिरस्काराने मनाचे खच्चिकरण झाल्यावर नैराश्य येणार नाही तर काय? मनाला वेळ देण्यासाठी स्वतःला वेळ काढला पाहिजे. सगळ्यांना जगाची चिंता, मालिकेतल्या पात्रांची चिंता पण घरातल्यांची व स्वतःच्या मनाची चिंता नाही.आई कुठे काय करते ऐवजी स्वतः आपण काय करतो, स्वतःसाठी, मित्रांसाठी हे मनात डोकावून पाहणे गरजेचे आहे. जगायला माणसांना वेळ नाहीच. कुटुंबासाठी ते नाही नाही ते करतील, नको नको त्या गोष्टी घरात आणून ठेवतील. भौतिक समृद्धता आणण्यासाठी स्वतःच्या मनाचा कोंडमारा करतील.घरच्या माणसांना वेळ हवा, संवाद हवा आणि तेच नेमकं चुकतय. मुलांना खेळणी घेऊन देणारें पालक मुलांच्या मनाशी व मुलांशी किती खेळतात? बायकोला फ्लॅट घेण्याच्या नादात स्वतः फ्लॅट होतात. बायकोला हवा असतो फक्त गजरा व संवाद. मनं जिंकायची आयुधं फार वेगळी असतांत. मन प्रसन्न करां हे ठिक आहे, पण सभोवताली तसां निसर्ग हवां, तसं सौंदर्य हवं, तसं समाधान हवं. मन चांगलं ठेवां व चांगल्या मनाच्या माणसाच्या सोबत रहा, मनाचे काहीच प्रश्न राहणार नाहीत. कुणाचे मनाने वाईट चिंतू नका. माणसांची बरीच शक्ती जळण्यात जातें जळणं स्वतःला संपवतं ईतरा वर जळण्यांत स्वतःच्या मनाची स्मशानभूमी कधी होते हे माणसाच्या लक्षातंच येत नाही. मन पतंगासारखं भर करटतं, त्याला नियंत्रणात ठेवणें महत्त्वाचं असत. मनासारखे खांदे मिळणं हेच आयुष्याच संचित.शेवटचे चार खांदे तरी आपल्या कुठें हातातअसतात?्र््र्््र््र््र््र््र्र्र््र्््र््र््र््र््र्

नविन पसायदान कोरोना

*New Version of "पसायदान"* आता सर्वात्मके जीवे । विनाकारण न फिरावे । घरीच बैसोनि रहावे । निवांतपणे ॥ 1॥ एकमेका कर न मिळवावे । दुरुनीच नमस्कारावे । अंतर सुरक्षित राखावे । परस्परांमाजी ॥ 2॥ सदासर्वदा हात धुवावे । रुमालाविणा न शिंकावे । कोमट जल प्राशावे । थंड वर्जावे सर्वथा ॥ 3॥ घरी येता जरी कंटाळा । मदत करावी गृहिणीला । पुण्य लागे जीवाला। पत्नीव्रताचे॥ 4॥ करा स्वच्छता सदनाची । त्याच बरोबर तनाची । काढा जळमटे मनाची । शुचिर्भूत व्हावया ॥ 5॥ करा मनन आणि चिंतन । थोडा वेळ नामस्मरण । चुकविता येईल मरण । स्वतःसहित इतरांचे ॥ 6॥ आजपावेतो खूप पळाला। आता विश्रांती शरीराला । सादर व्हावे समयाला । संत वचन हे असे ॥ 7॥ आहे विषाणू चे संकट । करा मनाला बळकट । ध्यानयोगाचा वज्र तट । उभारावा भवताली॥ 8॥ समय नव्हता म्हणोन । केले नसेल वाचन । ज्ञानेश्वरी ग्रंथ पावन । आता तरी वाचावा ॥ 9॥ आयुष्याला पुरेल । पुरोनिया उरेल । ग्रंथांची ऐसी रेलचेल । आहे संतकृपेने ॥ 10॥ आवाहन करती वारंवार । दिल्ली आणि मुंबईकर । धोका वाढेल फार । बेफिकीर राहता ॥ 11॥ शासन,पोलिस,डॉक्टर । स्वच्छतेचेही शूरवीर। सेवा देती अहोरात्र । स्मरण त्यांचे असावे॥ 12॥ हेही जातील दुःखदिन। येतील पुढे सुखाचे क्षण । तोवर संयमाचे पालन । मनापासोन करावे ॥ 13॥ येथ म्हणे श्री निसर्गरावो । कोरोना ना पसरावो । हाच हेतू मनी ध्यावो । जनकल्याणहेतूने ॥ 14॥ *🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*

जिंकलंस नेहा

*जिंकलंस नेहा* किशोर बोराटे @ ३० सप्टेंबर १८७० साली भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. *१९१३ साली त्यांनी भारतातील पहिला चित्रपट प्रदर्शित केला त्याचे नाव होते राजा हरिश्चंद्र.* आज भारतीय जनतेसाठी भारतीय चित्रपटसृष्टी म्हणजे जीवनाचा अविभाज्य घटक झालेली आपण पाहतो. पण सुरुवातीच्या काळात याच चित्रपटसृष्टीकडे उच्चभ्रू वर्गाने पाठ फिरवली होती. ते आणि त्यांच्या घरातील मुलं-बाळं, स्त्रिया यांना काम करणे तर दूरच, पण चित्रपट पाहण्यास देखिल मज्जाव केला जात असे. भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या याच दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटसृष्टीने आज इंडस्ट्रीचा दर्जा प्राप्त केला. पडद्यावरील आणि पडद्यामागील अनेक हिरे घडवले. त्यातीलच काळाच्या पडद्याआड गेलेल्या एका हिऱ्याला इंडियन आयडॉलने त्यांच्या व्यासपीठावर आणले आणि त्यांना पाहून भारतीय जनतेचे मन फक्त हेलावलेच नाही, तर त्यांनी आश्चर्याने तोंडात बोट घातले. चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव, तर डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, त्या एका गीतकारासाठी आणि त्यांचे नाव होते संतोष आनंद. *होय, तेच संतोष आनंद, ज्यांनी एक प्यार का नगमा हैं, तेरा साथ हैं तो, मेघा रे मेघा रे, मोहब्बत हैं क्या चीज अशी गाणी लिहिली.* आपण लहानपणापासून ही गाणी ऐकत, गुणगुणत आलो. पण याचे बोल कुणी लिहिले हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. त्या संतोष आनंद यांना टीव्हीच्या स्क्रीनवर एकदम थकलेल्या, गलितगात्र झालेल्या अवस्थेत पाहिले तेंव्हा, तिथे उपस्थित असणारे आणि टीव्हीसमोर बसून कार्यक्रम पाहणारे या सर्वांच्याच डोळ्यातून अश्रूंच्या धारा चालू झाल्या. इंडियन आयडॉलचे सर्व स्पर्धक, अँकर, आणि जजेस् आणि संतोष आनंद यांच्या गीतांना ज्यांनी संगीताचा साज चढवला ते प्यारेलाल सगळेच भावनाविवश झाले. *सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने. ती संतोष आनंद यांची सद्यस्थिती पाहून हमसून रडत होती. नेहाने संतोष आनंद यांना पाच लाख रुपये भेट, मदत म्हणून देऊ केले. पण सूर्य अस्ताकडे झुकलेला असताना देखिल, आपलं अस्तित्त्व जपणाऱ्या या स्वाभिमानी कलाकाराने ती नम्रपणे नाकारली. तरीही नेहाने मला तुमची नात समजा आणि कृपया ही भेट स्विकारा अशी गळ घातली, तेंव्हा त्यांनी ती स्विकारली.* खरंतर केवळ टाईमपास म्हणून चित्रपट बघणाऱ्या आणि बाथरूम सिंगर असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाने जुन्या जमान्यातील गीतकार संतोष आनंद यांना तरी का ओळखावे आणि इंडियन आयडॉलचा प्रत्येक कार्यक्रम आपल्या अश्रूंनी ओला करणाऱ्या नेहा कक्करची तरी दखल का घ्यावी? तिचे गायिका असणे आणि तिचे रडणे मला कधीच भावले नाही. एक गायिका आहे एवढीच काय ती मला तिच्याबाबतची माहिती. बाकी तिचे रडणे वगैरे मला नेहमीच कृत्रिम वाटत आले होते. *पण कालच्या प्रकाराने नेहाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आणि आपसूकच माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले नेहा जिंकलंस.* पडद्यावर भावना दाखवणाऱ्या आणि प्रत्यक्ष हीन भावना बाळगणाऱ्या या चित्रपटसृष्टीत एवढ्या कोमल मनाची ही कळी अद्याप कोमेजून कशी गेली नाही हेच विचार परवापासून माझ्या मनात घोळत आहे. असो, नेहाला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ज्यांना या चित्रपटसृष्टीचे जनक म्हंटले जाते ते दादासाहेब फाळके तसेच लक्ष्मी-प्यारे असतील, संतोष आनंद असतील, नावं घ्यायची म्हटले तर खूप घेता येतील. पण अशा या मोठ्या लोकांची, कलाकारांची जाण या पिढीने ठेवावी आणि त्यांच्याबाबत काय दृष्टीकोन असावा हे नेहाने दाखवून दिले आहे. त्याबद्दल तिचे अभिनंदन तर करावेच लागेल. पण तिच्याकडून बाकीच्यांनी पण हे शिकावे. धन्यवाद -किशोर बोराटे

माझा स्वाभिमान

मी कधीच न विकला माझा स्वाभिमान मी कधीच न दुखावला कोणाचाच स्वाभिमान माझे जीवन अन् जपतो मी सदैव माझा स्वाभिमान ठेच लागता वाहते रक्त, मला माझ्या रक्ताचा अभिमान गल्ली-बोळात नाही मिरवत मी रिकामी शान मला माझा, माझ्या अस्तित्वाचाच आहे स्वाभिमान आज-काल पैसाच झाला आहे प्रत्येकाचा अभिमान पैशानीच विक्री-खरेदी होतो प्रत्येकाचा स्वाभिमान जे स्वातंत्र्य म्हणून करतात चाकरी आजही जे स्वातंत्र्य मिळवून खातात लाचारीची भाकरी आजही जिथे नाही भेटत मान आणि खाली घालावी लागते मान.. तिथे का कोणी करावी चाकरी? आणि का विकावा पुन्हा पुन्हा स्वाभिमान। कवी -क.दि.रेगे नाशिक

स्मृतीगंध…..ट्रेक नंबर ४….खिंडवाडी …. जानाई मळाई डोंगर

स्मृतीगंध खुणावती पाऊलखुणा....करता प्रवास हा जुना.....आठवे त्या निरागस बालपणा.... ट्रेक नंबर ४ खिंडवाडी... जानाई मळाई डोंगर. रविवार म्हणजे कुठेतरी निसर्गाच्या सोबती घालवू वाटणारा दिवस.....मित्र परिवार सोबत असेल तर त्या दिवसाची मजाच न्यारी...पण सगळेच कामात व्यस्त असल्याने....लांब कुठे जाणे शक्य नाही हे जाणवले.....पण थोड्याच वेळात पूर्ण होईल....आणि मनाला आनंद देईल....असं आठवणीत येणारं ठिकाण म्हणजे माझ्या गावचे दैवत.... जानाई मळाई देवस्थान....पण मग जर फिरायचे आहे....तर नेहमीच्या पाऊलवाटा कशाला हे ठरवून.....प्रवास केला... खिंडवाडी गावातून सुरू होणाऱ्या डोंगर रांगातुन.... अशाच भटकंतीला सध्या आपण ट्रेक म्हणतो... काही क्षणचित्रे आहेत ज्यातून प्रवास मार्ग कळेलच....पण चालताना मनात विचार आला.....ह्याच त्या वाटा....हाच तो मार्ग जिथे आज बॅग...पाणी....शूज...मोबाईल....हा सारा लवाजमा....सोबत घेवून निघालो. त्याच वाटांवर मित्रांसोबत...पायात साधी चप्पल... हाप चड्डी....शर्ट...हातात लगोर.....असा शिकारी बाणा...घेवून...मधाची पोळी शोधणे.....आणि उगाच जास्त मोठे शिकारी असल्याची ऐट आणत... पक्ष्यांची शिकार करायला निघणे.... हा सुट्टीचा रोजचा क्रम...शाळांना दिवाळी...उन्हाळा सुट्टी लागली....आणि दिवसा घरी थांबलो असेल ते फक्त शक्तिमान पाहायला.....ते संपले...की त्याच्या सारख्या घिरक्या घेत...घरातून काढता पाय घ्यायचा...ते संध्याकाळीच माघारी......मग रानात......बोरे ,जांभळे,करवंदे,कैऱ्या....आणि गोड मध खावून पोट भरायचे.... आणि ह्याच डोंगरात स्वतःला हरवून द्यायचे....आज त्याला ट्रेक म्हणतोय.... हरवले ते दिवस.....जिथे मोबाईल न्हवते.....पण मित्र कायम जवळ होते....कोणालाच नियोजन माहित नसायचे....पण कधी दिवस खराब जायचा नाही.....रोज नव्या आठवणी साठवल्या जायच्या....मग रात्री त्या गप्पा...मला आधी दिसले म्हव..म्हणजे मधाचे पोळे बरका....मग ते काढले कसे....मध किती मिळाला.....ह्याला लय... गोड बोर घावली...माझी आंबट होती...आज वाचलो आंबे काढताना घावलो असतो...बर झाल...ह्याला राखणीला ठेवलेला...आता असे करू...उद्या ह्यापेक्षा जास्त म्हवं काढू...लय करवंदे गोळा करू...असल्या त्या गप्पा...मधून एखादा म्हणणार....सुट्टीचा दिलेला घरपाट(गृहपाठ...होमवर्क बरका.) झाला का...मग त्यावर चर्चा....असा काय तो दिनक्रम..... खोराडी,दिवाणमाळ,भक्तिन जाळी,वाघाची खोरी,हत्तीचा पाय, गोवळ झरा, भोसल्याची ताल, बाबराची खोरी,अमल्याचा माळ ही असली आमची हिंडायची ठिकाणे....आणि आमचा स्विमिंग पूल म्हणजे पाझर तलाव...जिथे आमच्या सोबती असायच्या म्हैशी....मग ते गढूळ पाणी कसे स्वच्छ वाटायचे देव जाणे....पण आता मिनरल पाण्यात पण बारीक नजर पडते....काही घान तर नाही ना हे पाहायला.... पण आज हे सगळे आठवणीतच राहिले....कधी...कसे....आणि का मोठे झालो....कळलेच नाही.....वय वाढले....मित्रांच्या आवडी बदलल्या....आणि ह्या जुन्या वाटा...कायमच्या मनातच बंद झाल्या...आज आपण सगळे फिरतो....वेगवेगळे....पिकनिक स्पॉट शोधतो..... भले तिथं गर्दी असेल....पण त्या गर्दी मध्ये एकांत शोधतो....कारण....मनात असते ना....आज सुट्टी...मग आज एंजॉय....आज दूर फिरायला जायचे....पण अशी दूरची ठिकाणे...आपल्याला कधी जवळची वाटू लागतात....कळतच नाही...कारण...कोणतरी तिथे गेलेला असतो...काही क्षणचित्रे पाहिली असतात....मग त्यानुसार...आपसूक आपण देखील तिकडेच खेचले जातो.... पण आज असे झाले नाही....आज प्रत्येक पाऊल मला माझ्या बालपणात घेवून जात होता....अरे इथे.... मसाले भाताची पार्टी केली होती...इथे पोहे बनवले होते....इथे ह्याची त्याची हाणामारी झाली होती...ती भांडणे पण क्षणिक असायची....कारण तेव्हा मने साफ होती... सांगायचं फक्त एकच आहे.....कधीतरी तुम्हीही हरवून बघा ना...अशाच काही क्षणांमध्ये.....जिथे जगाला दाखवावी अशी सुंदर दृश्य नाहीत....काही कोणती कलाकुसर नाही.....तिथे काय सांगणार ह्या ट्रेक बद्दल....पण असा ट्रेक असावा..जिथे आपले बालपण गेलेलं असते..कारण तिथे कोणती...कलाकुसर नाही मिळत पाहायला....पण आपण कसे घडलो....कसे बिघडलो....कसे वाढलो....ह्या आठवणी आपसूक जाग्या होतात....आणि आठवतात आपली ती जुनी सारी मित्रमंडळी...जी ह्या जगाच्या स्पर्धेत....स्वतःला सिद्ध करायला वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली.....पैसा कमवून भविष्य सुरक्षित करायला गेलेली....ह्याच भविष्याच्या विचारात....कधी हा गोड भूतकाळ....मनाच्या खोल कप्यात दबला जातो कळतच नाही. त्या आठवणी विकत नाहीत मिळत...त्या अनुभवणे हाच असतो एक विलक्षण आनंद....आता विकत मिळतातं त्या वस्तू असतात....आणि त्या सोबत असतो तो फक्त मोजेलेल्या नोटांचा तपशील.... निलेश बाबर शब्दसारथी.

अस्तित्वाच्या पाऊलखुणा: डॉ.अनिल कुलकर्णी

अस्तित्वाच्या पाउलखुणा: डॉ अनिल कुलकर्णी. प्रत्येकाला वाटतं आपल्या अस्तित्वाची कोणीतरी नोंद घ्यावी. जाणीव झाल्यापासून माणसं स्वतःला इतकी जपतात की आपल्याच विश्वात जगतात. अस्तित्व टिकवण्यासाठी व दाखवण्यासाठी माणसें काही ही करतात. अस्तित्वाला हादरें बसल्याशिवाय माणसें सुधारत नाहीत. पाण्याला सुद्धा वाटतं आपल्या तरंगाची दखल घ्यावी, तसंच मनाला ही वाटतं आपल्या विचारांची दखल कुणीतरी घ्यावी. बेदखल नैराश्य घेऊन येतं आणि दखल आशा घेऊन येतं.अस्तित्वं ठरवतं आपलं व्यक्तिमत्वं. नोंद नसेल तर अस्तित्वाला अर्थ नाहीं. रानफुलांची नोंद कोण घेतं? केवळ निर्माल्यां साठीच फुलायचं नसतं. निर्माल्य पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर चा प्रवास ठरवतों अस्तित्व. फुलणं ते निर्माल्य होणें यामधील प्रवास म्हणजेच जीवन.फुलालां कुठे माहित असतं फुलल्यानंतर त्याला चुरगाळलं जातं कां एखाद्या सौंदर्यवतिच्या केसात माळलं जातं, कां चितेवर रवानगी केलं जातं. प्रत्येक टप्प्याचा अनुभव वेगळां पण तो घेण्यासाठीच फुल निर्माल्य होईपर्यंत तग धरतंच. आपल्या अस्तित्वाचं वलय विस्तारलं जावं असं प्रत्येकाला वाटतं. बिंदूला ही वाटतं वर्तुळ ही मोठं व्हावं,विशालव्हावं. अस्तित्वाचा प्रत्येक टप्पा सुखद करण्यासाठी माणूस धडपडत असतो. अस्तित्व श्वासाबरोबर येतं आणि श्वासाबरोबर जातं, पण अस्तित्वाच्या खुणा मृत्यूनंतर ही शिल्लकराहतात. पृथ्वीवरच्या माणसांना चंद्राच्या साक्षीचं अप्रूप असतं आणि म्हणून पृथ्वीवरच्या माणसांनी चंद्रावर आपल्या पाऊलखुणा उमटवल्या. माणसें जिवंतपणीच अस्तित्वा साठीच धडपडत नाहीत तर मृत्यूनंतरही आपलं अस्तित्व कायम राहावं म्हणून धडपडत असतात. प्रत्येकाचं अस्तित्व ठरलेलं असतं, तेवढ्या काळात जगायचं आणि जगवायचं. प्रत्येक क्षणाला अस्तित्व असतं. प्रत्येक क्षण माणूस अस्तित्वासाठी जगतो.क्षणांची मालिका ठरवते अस्तित्व. आपलं अस्तित्व तर केवळ आपल्या हातात असतं असं नाही तर ते दुसऱ्यांच्या ही हातात असतं. अस्तित्वाला आव्हान दिलं की अस्तित्व तावून सुलाखून निघतं. कुणाच्या तरी मनात आपल्याला, आपल्या अस्तित्वाला स्थान असावं असं प्रत्येकाला वाटतं. आपल्याच अस्तित्त्वाची आपल्याला जाणीव नसतें. प्रसंगानुरुप काही गोष्टी अस्तित्व सिद्ध करतात. अस्तित्व हे अनुवंशिकतेंच देणंआहेच, पण अंगावरच्या दागिन्या प्रमाणे स्वतःचं अस्तित्व समृद्ध ही करायचं असतं. आनुवंशिकतेतून गोड गळा मिळेल पण रियाज करून अस्तित्व टिकवावं लागतं. संधी मिळाली की अस्तित्व बहरतं. कापलेल्या वृक्षातूनही अंकुर आपले अस्तित्व दाखवंत. खडकातही बिज अंकुरतं. अस्तित्वाच्या पाऊलखुणांची पाऊलवाटच ठरवतें तुमचंं अस्तित्व. डॉ.अनिल कुलकर्णी.

तुझ्या या निसर्ग मित्राला

आणि अवकाळीचे सत्य उलगडले सृष्टीचे नव-नवीन खेळ पुन्हा चालू झाले गारपीटीने डाव साधून बळीराजाला नाचवले अरे मानवा तुज पुन्हा एकदा पावसाने या धोबीपछाडले तुझीया बुद्धी चातुर्याने तू नव विश्व निर्मिले ज्ञान-विज्ञान वापरून तू एक युद्धच पेटवले निसर्गाच्या नासधूसीस तू तुझे विजय मिरविले पंचतत्वावर स्वार होऊनी तू स्वतःला गर्वात बुडविले आज वेळ आली मानवा सावर तू स्वतःला युद्ध तुझे तू थांबून आवर घाल तू स्वतःला तुझ्या भविष्याचा साथी मान तू निसर्गाला अन् दे मैत्रीचा हात सदैव तुझ्या या निसर्ग मित्राला। ..................................तुझ्या या निसर्ग मित्राला।

अरविंद त्रिवेदी (रावण) यांची गोची

त्याचं झालं काय की, अरविंद त्रिवेदी साहेब एकदा हनुमानाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. अयोध्येतील हनुमान गढी मंदिर म्हणजे सुविख्यात मंदिर. रामायण सिरीयल सुरू असावी किंवा नुकतीच दूरदर्शन वर प्रसारित झाली असावी तो काळ. त्यामुळे त्रिवेदी साहेब लोकप्रियतेवर आरूढ असावेत. त्यांच्या लोकप्रियतेच्या फुग्याला हनुमान मंदिराच्या रेवती बाबा नामक पुजारी बुवांनी मोठीच टाचणी लावली त्या दिवशी. अरविंद त्रिवेदी स्वतः मोठे रामभक्त. जरी त्यांनी पडद्यावर खणखणीत रावण साकारला असला तरी त्यांच्या मनात मात्र राम वसलेला! अर्थातच हे पुजारी बुवांना माहीत असण्याचे कारण नव्हते. त्यांनी यांना टीव्हीवर रावणाच्या भूमिकेत बघितलेला, त्यात प्रत्यक्ष हनुमानाला आणि श्रीरामाला काहीबाही बोललेला हा माणूस हे एवढेच माहीत! आणि असे असताना हा चक्क मंदिरात घुसतोय म्हणजे काय! त्रिवेदी साहेब मंदिरात जाऊ लागले तर त्यांना आत जाऊच देईना तो. कारण काय तर, अशा व्यक्तीला जर मंदिरात सोडले तर ते मंदिराचे पावित्र्य भंग करणारे ठरेल. मोठा पेचप्रसंग उभा ठाकला! मंदिराचे ट्रस्टी वगैरे आले पण भटजीबुवा काय मानायला तयार नव्हते. ट्रस्टी त्रस्त झाले. इकडे त्रिवेदी साहेब ताटकळत उभे... शेवटी पुजारी बुवांच्या पुढे त्यांना मान तुकवावी लागली आणि रामाचे दर्शन न घेताच ते परतले. पुजारी बुवांचे पुढे काय झाले माहीत नाही, परंतु त्रिवेदींवर नाही म्हटलं तरी मोठाच प्रभाव पडला या प्रसंगाचा, इतका की त्यांचे शूटिंगमध्ये मन लागेना! मनाने कुठे दुसरीकडेच असायचे ते. खरं तर अरविंद त्रिवेदी स्वतः मोठे रामभक्त होते, त्यामुळे आपण सिरीयल मध्ये डायलॉग म्हणून काय काय बोलतोय याची टोचणी मनाला लागली असावी त्यांच्या. प्रायश्चित्त म्हणून त्रिवेदी साहेबांनी आपल्या घराच्या सगळ्या भिंतींवर दोहे, चौपाई वगैरे लिहून घेतले, घराचे नाव बदलून "श्रीराम दरबार" केले... दरवर्षी घरामध्ये रामायणाचे पाठ सुरू केले...तेव्हा कुठे मनाला शांतता मिळाली त्यांच्या. गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये प्रक्षेपित झालेली रामायण सिरीयल बघताना त्यांचा व्हिडीओ देखील सर्वत्र बघितला गेला. रावणाचे पात्र म्हणजे प्रचंड खल वृत्तीचे पात्र. त्याला त्रिवेदिनी आपल्या ठळक अभिनयाने उत्तम रंग भरले आणि भारतीय चित्रपट इतिहासातील कदाचित सर्वश्रेष्ठ रावण साकारला. त्यामागे त्यांची अभिनयक्षमता होतीच पण एक रामभक्ताला (भूमिकेत राहताना) होणाऱ्या अनंत यातना देखील होत्या! अरविंद त्रिवेदी द लेजंड! #रामभक्त © Ashutosh Ratnaparkhi. श्रीकृष्णार्पणमस्तू

मोठी घरं, छोटी माणसं आणि कोती मनं

*मोठी घरं, छोटी माणसं आणि कोती मनं* किशोर बोराटे @ सर्वसामान्य माणूस कोणतीही गोष्ट करताना प्रथम समाज काय म्हणेल, लोग क्या कहेंगे? याचा जास्त विचार करतो. ग्रामीण भागात आपण ज्या वास्तूत राहतो त्याला घर म्हणतात. शहरी भागात प्लॅट, बंगलो अशी नावं असतात. पण घर या शब्दात जो ओलावा, जे सुख आणि जी माया आहे, ती इतर कशात नाही. आपण लहानपणापासून काही पारंपरिक रिती-रिवाज पाहत आलो आहोत. उदा. द्यायचेच झाले तर एखाद्या घरातील व्यक्ती मृत पावली, तर पूर्ण भावकी त्याचे सुतक पाळते. हे सुतक पाळणे म्हणजे तरी काय असते? सुतक पाळणे म्हणजे मृत व्यक्तीच्या कुटुंबाच्या प्रति संवेदना बाळगणे. दुःख वाटून घेतलं, की दुःख हलकं होतं असे म्हणतात आणि हे खरे आहे. एखादी व्यक्ती मृत पावली की त्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो. संबंधित कुटुंब त्या खाली दबू नये, म्हणून समाज त्यांचा मानसिक आधार बनून पुढं येतो आणि त्यांचे दुःख वाटून घेतो. त्या कुटुंबासोबतच समाज सुद्धा १०-१२ दिवसांचा दुखवटा पाळतो आणि तुम्ही एकटे नाहीत. आम्हीही तुमच्या दुःखात सहभागी आहोत असा संदेश समाज देतो आणि त्या दुःखातून संबंधित कुटुंबाला बाहेर पडण्यासाठी मदत करतो. या दुखवट्याच्या कालावधीत समाजात कोणतेही आनंदाचे कार्यक्रम होत नाहीत. उदा. वाढदिवस, लग्न, पूजा, पार्ट्या कोणतेही धार्मिक कार्य, सण या सर्व सुखाच्या गोष्टींना फाटा दिला जातो. लोकं आपल्या घरून भाजी-भाकरी घेऊन त्या कुटुंबाच्या घरी जातात, त्यांचे सांत्वन करत त्यांना खाऊ घालतात आणि स्वतःही खातात. काळाच्या ओघात संबंधित कुटुंब हळूहळू दुःखातून सावरते आणि त्यांचे जीवन पूर्वपदावर येते. या संपूर्ण कालावधीत एक समाज म्हणून लोकं त्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभी राहतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज हा विषय घेण्याचे कारण काय? तर सांगतो की अभिनेते राजीव कपूर यांच्या निधनाला अजून एक आठवडा सुद्धा झाला नाही, तोपर्यंत कपूर कुटुंबाने रणधीर कपूर यांच्या ७५ व्या वाढदिवसाची जंगी पार्टी साजरी केली. चित्रपटसृष्टीतल्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी हजेरी लावली. त्याचे फोटो व्हायरल झाल्यावर संवेदनशील लोकांनी कपूर कुटुंबावर आणि पार्टीला हजर राहणाऱ्या सेलिब्रिटींच्यावर टीकेची झोड उठवली. राजीव कपूर गेल्यावर, रणधीर कपूरला किती मोठे दुःख झाले याचे रसरशीत वर्णन करून बातम्या देणाऱ्या वृत्त वाहिन्या कशा तोंडावर पडल्या हे कालच्या पार्टीने दिसून आले. सख्खा भाऊ जाऊन आठवडा झाला नाही, तरीसुद्धा रणधीर कपूर आणि त्याचे कुटुंब जर वाढदिवसाची पार्टी करत असेल आणि त्या पार्टीला चित्रपटसृष्टीसह इतर क्षेत्रातील काही सेलिब्रिटी हजेरी लावत असतील तर यांच्या कुटुंबात एकमेकांबद्दल किती प्रेम, आदरभाव आहे याचा विचार आपण करायला हवा. त्यामुळेच मला या लेखाला मोठी घरं, छोटी माणसं आणि कोती मनं हे नाव द्यावे वाटले. यांची घरं मोठी आहेत, पैशा-पाण्याने ही लोकं दिसायला मोठी आहेत. पण यांची मनं मात्र कोती आहेत आणि या अशा लोकांना ज्यांना स्वतःच्या घरातल्या व्यक्तीविषयी प्रेम नाही ही अशी लोकं जर आमच्या तरुण पिढीचे आयडॉल असतील तर हे आमच्या पिढीचे दुर्दैव आहे. आयडॉल कुणाला म्हणावे? आपल्या डोळ्यात पाणी बघून, ज्याच्या डोळ्यात पाणी येते ना, तो खरा आपला आयडॉल असतो. ज्यांना आपण आयडॉल मानतो ना, त्यांचा अभिनय जिवंत असला, तरी त्यांच्यातला माणूस केंव्हाच मेलेला असतो. ही असली लोकं त्यांच्या घरच्यांचे कधी आयडॉल होऊ शकत नाहीत , ते आपले कधी होणार? मित्रांनो आपले खरे आयडॉल हे आपले कुटुंब आहे हे लक्षात घ्या. या कागदी हिरोंना आजिबात महत्त्व देऊ नका. हे पैसा, शराब, कबाब आणि शबाब मध्ये बुडालेले आयडॉल आहेत. यांना भावना नाहीत. यांचे आयुष्य एकदम प्रॅक्टिकल आहे. यांचा मोठेपणा, हिरोगीरी सगळे कृत्रिम आहे. वरून जरी हे चांगले दिसत असले, तरी आतून हे पूर्ण तुटून गेलेले आहेत. मित्रांनो, आपण खूप सुखी आहोत. आपली काळजी करणारं, प्रेमाचा ओलावा देणारे, जेवणासाठी आपली वाट पाहणारं आपलं कुणी आहे. त्यामुळे यांच्यापेक्षा आपण नशीबवान आहोत. भल्या सकाळी आपल्या घरात देवपूजा होते. अगरबत्तीचा सुगंध घरात दरवळतो. यांच्या घरात सकाळी उठल्या उठल्या सिगारेटचा धूर पसरतो. तिन्ही सांजेला आपल्या घरात देवासमोर तेलाचा दिवा जळत असतो. यांच्या घरात दारूच्या बाटल्या फुटत असतात. मग सांगा, कोण श्रीमंत? कोण सुखी? दिवसभर काम करून घरी आल्यानंतर दमला असशील, हात-पाय तोंड धुवून घे म्हणणारे आपले आई-वडील, हसतमुखाने चहा आणून देणारी आपली बायको आणि पप्पा, पप्पा म्हणत पळत येऊन गळ्यात पडणारे आपले चिमुकले चिमणा-चिमणी. मित्रांनो, हेच खरं आपलं घर आहे आणि हाच आपला स्वर्ग आहे. तुम्ही ज्यांना आयडॉल मानता ना ती त्यांची घरं नसतात. त्या त्यांच्या कोठ्या असतात. तिथे कोणतीही सात्विकता नसते. आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, माया काहीही नसते. तिथे राहतात फक्त अतृप्त आत्मे, जे सत्तेचे, दारूचे आणि शरीराचे भुकेलेले असतात. जे रात्रंदिवस तिथे इतरांचे दमन करत असतात. तेथील निर्जिव भिंतींना कोणकोणते अत्याचार पाहावे लागत असतील ना हे त्यांचे तेच जाणोत. हे असले भुकेले आत्मे कुणाचेही आयडॉल होऊ शकत नाहीत. धन्यवाद -किशोर बोराटे https://www.lokmat.com/bollywood/kareena-kapoor-ranbir-kapoor-get-trolled-attending-randhir-kapoors-birthday-dinner-5-days-after-a590/

दिल-विल,प्यार-व्यार मैं क्या जानूँ रे?

दिल-विल, प्यार-व्यार मैं क्या जानूँ रे? का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे? उमलती कश्या धुंद भावना, अल्लड वाटे कसे? 'प्रेम' ही अशी भावना आहे की कोणत्या क्षणी मन हरवून जाईल हे सांगता येत नाही. आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर प्रेमाची धुंद भावना मनाला भुरळ घालतच असते. पण आजकालचे प्रेम 'दिल-विल, प्यार-व्यार मैं क्या जानूँ रे'? अश्या स्वरूपात पहावयास मिळते कारण इश्क, मोहब्बतची शायरी करत करत, एकतर्फी प्रेमाच्या नशेत देवदास बनणारी जनरेशन "तूम मेरी नहीं तो और किसीं की भी नहीं" म्हणत 'लव-लोचा' पर्यंत कधी पोहचली हे लक्षात ही आले नाही. एक काळ असा होता की नुसत्या नजरेनं फुलणाऱ्या गुलाबी प्रेमातही मजा वाटत होती. नुसत्या नजरेच्या इशाऱ्याने तिला चोरून खुणवणे, त्याच्याशी नजरानजर होताच तिचं ते चोरून लाजणं किंवा मनातल्या मनातच तिच्यावर प्रेम करणे, हे सारचं प्रत्येकाला सुखावणार वाटायचं. पण काळ बदलला आणि प्रेम व्यक्त करण्याची भाषा ही बदलली. गुलाबी प्रेमाच्या नजरेची भाषा आता मोबाईलमधल्या स्माईलज् व ईमोजीने तर घेतलीच आहे शिवाय नकळत फुलणाऱ्या प्रेमाचे अनेक नवीन प्रकार ही सध्या पाहायला मिळतायत जसे- जस्ट फ्रेंडस्, हेल्दी फ्लर्टिंग, ऑनलाईन डेटिंग, कमिटेड रिलेशनशिप, लाँगडिस्टन्स रिलेशनशिप, फ्रेंडस् विथ बेनिफिट्स, हूकअपस्, वन नाईट स्टँड, लिव-इन रिलेशनशिप अशी भली मोठी न संपणारी लिस्ट ऐकूनच चकित व्हायला होते. सतत व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिंडर सारख्या डेंटिग एपच्या माध्यमातून स्माईलीज् , ईमोजी, मीम्स् पाठवत, आजकालच्या प्रेमाच्या भावना कृत्रिम तर झाल्या नाहीत ना? पण ह्या सगळ्या प्रकारातून खरं प्रेम अनुभवायला मिळते का? प्रेम म्हणजे फक्त दिवस-रात्र संपर्कात राहणं, सतत मेसेजेस्, फोन कॉल्स, व्हिडीओ कॉल्स. सतत सरप्राईज-गिफ्ट देणं, कुठेतरी फिरायला जाण हे म्हणजे प्रेम आणि समजा असं काही झालं नाही तर एका क्षणात ब्रेकअप. प्रेम म्हणजे विश्वास, त्याग, सहनशीलता, संयम! प्रेम म्हणजे आनंद देणं, जोडीदाराला सुखात ठेवणं, त्याची काळजी घेणं, प्रसंगी त्याला मानसिक आधार देणं, ह्याची जाणीव ह्या न्यू जनरेशनला करून दिली जाते का? शिक्षण, करियर, पैसा एवढीच स्वप्नं लहानपणापासून दाखवण म्हणजेच पालकत्व समजल जात का? मग आजकालच्या पिढीला आदर, माया, प्रेम उरलच नाही म्हणत, त्यांना दोष देत, त्यांच्यावर खापर फोडण्यातच तर आपण धन्यता मानत नाही ना? इंटरनेटच्या मायापाशात नव्या पिढीचं आयुष्य गुरफटत चाललं आहे मग बाकीची नाती, मैत्री, प्रेम ह्या भावना जपायला त्यांना वेळ तरी आहे का? सतत आभासी दुनियेत राहायची सवय लागल्यावर नवरा-बायकोच्या नात्यातले प्रेमाचे रंग तरी किती दिवस टिकतात? पण म्हणून काही प्रेम संपत नाही. मनात साचलेल प्रेम कधी फ्लर्टिंग, फ्रेंडशिप, तर कधी रिलेशनशिपच्या माध्यमातून उफाळून येतेच. कारण किती ही व्यस्त आयुष्य असले तरी प्रेम फुलायला वेळ काढायला हवा. नकळत हळूवार फुलत जाणार प्रेम आज सोशल मीडियाच्या वलयात, सेल्फी काढत-काढत सेल्फीश कधी झाल हे समजलच नाही. कारण सध्या वाढलेले घटस्फोटाचे प्रमाण, लिव्ह-इनची वाढती क्रेज, तसेच सिंगल राहणाऱ्यांच वाढलेले प्रमाण हे सगळे कशाचे परिणाम आहेत? आजकाल लग्नाचा निर्णय लांबवताना सतत दिली जाणारी करियरची कारणं हे कश्याच घोतक आहे? सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेली आत्ताची जनरेशन ऑनलाईन प्रेमाच्या रंगीन दुनियेत हरवलेली असते ह्या बद्दल फ़क्त ताशेरे ओढत मुलांना दोष देऊन समस्या सुटणार आहे का? खरं तर टाईमपास करत करत इंटरनेटच्या जाळ्यात फसलेल त्यांचं प्रेम किती सुख देत, हा प्रश्नच आहे. ह्या जनरेशनला सहवासात फुलत गेलेलं खरं प्रेम कधी अनुभवायला मिळेल का, याचीच खंत वाटते. मग व्हॅलेंटाईन-डे च्या निमित्ताने ऑनलाईन प्रेमाच्या मृगजळात गुरफटलेल्या न्यू जनरेशनला आपला अमूल्य वेळ देऊन संयम व सहवासाने फुलणाऱ्या प्रेमाचं गुपीत सांगूयात. सायली दिवाकर,

स्मृतीगंध……ट्रेक नंबर ३……चकदेव.

स्मृतीगंध… प्रवास नेहमीच नवी ऊर्जा देत असतो….जगण्याची…आणि आयुष्य पुन्हा नव्याने बघण्याची. ट्रेक नंबर ३ चकदेव.. नमस्कार आज पुन्हा आपल्या सगळ्यांशी काही नवीन अनुभव सांगण्याचा योग आला.काल रविवार ….म्हणजे सुट्टीचा दिवस….सुट्टीचा दिवस…आणि निसर्गाच्या प्रेमात पडलो म्हणजे त्यासोबत वेळ घालवणे हे आलेच…. दीड महिन्यापूर्वी जेव्हा वासोटा पाहणे ठरले….आणि घडले.तेव्हाच एक वेगळी ऊर्जा मनाला मिळाली होती.त्याच कोयनेच्या पाण्यातून बोटीने जेव्हा परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हाच चकदेव ने मनाला साद घातली होती. त्या सादेला प्रतिसाद देण्याचा योग काल आला……मग असा सुंदर अनुभव अनुभवता यावा हे स्वप्न थोडी माझ्या एकट्याचे असणार…….सोबतीला असणारे निसर्ग वेडे….त्यांनी कालचा दिवस अगदी अविस्मरणीय बनवला….. एखादी गोष्ट करायची म्हणजे…नियोजन आलेच….पण फसलेल्या नियोजनातून देखील जेव्हा तुम्ही तुमचा हेतू साध्य करता तेव्हा चेहऱ्यावर उमटणाऱ्या आनंदाला शब्दात बांधणे म्हणजे कठीणच. सोबती कोण येणार …..कोण नाही येणार ….ह्याचे येणे रद्द….तो येवू इच्छितो…. अशा सगळ्या घडामोडीत ठरलेले नियोजन कसे बिघडत होते कसे ठरत होते हे सांगणे अवघडच….पण जेव्हा काही अविस्मरणीय गोष्टी आयुष्यात सुख आणि समाधान घेवून येणार असतील तर अशा गोष्टी त्यापुढे अगदी नगण्य होवून जातात. चकदेव…..ह्या ठिकाणी जायचे म्हणजे आधी एक दिवस तुम्हाला बामणोली बोटिंग जवळ सांगावे लागते.कारण सकाळी ७ वाजता तिथून बोट निघणार असते.वासोटा जाणाऱ्या बोटी ८ नंतर सुरू होत असतात……मग काय आधी न कळवणे थोडे महागात पडले होते.काही जाणकार तर म्हणाले जर ८ ना नंतर जाणार म्हणजे होवूच शकत नाही……नियोजन रद्द करा…आणि पुन्हा कधी तरी जाण्याचे ठरवू…..पण ज्या प्रकारे म्हणतो ना आपण एखादी भेटीची वेळ आणि दिवस ठरवतो…मग तो कामासाठी दिलेला वेळ असो नाहीतर प्रेयसीला दिलेला….तो पाळणे हेच त्या नात्यातील गोडवा वाढवायला पूरक असते…..मग काय तर काही झाले तरी जायचे आणि जो १- २ तासाचा उशिरा जाण्याचा फरक पडतो तो फरक गतीने चालून पूर्ण करायचा हेच सर्वांनी मनाशी ठरवून सकाळी ८ वाजून १०मिनिटांनी बोटीने प्रवासाला सुरुवात झाली. चकदेव बद्दल जे थोडे बहुत वाचले होते त्यातून एकच समज होता मनात की खूप मोठा प्रवास आहे…चालावे खूप लागते….. बस एवढीच माहिती डोक्यात घेवून निघालो होतो. बोट चे चालक हेच गाईड म्हणून सोबत येणार पण त्यांना देखील जास्त माहिती न्हवती.पण आमचे नशीब पण एवढे चांगले की आरव मध्ये बोट थांबल्या नंतर तिथे वास्तव्यास असणारे श्री कोंडीबा माने यांनी आम्हाला सोबत द्यायचे ठरवले.मग काय तर त्याच मातीत लहानाचा मोठा झालेला ५६ वर्षाचा हा तरुण आमच्या सोबत चालू लागला.त्यांनी तिथल्या अगदी लहान लहान गोष्टींपासून सारे सांगायला सुरुवात केली.त्यांचे वडील वयाची शंभरी पार केली तरी अजुन ही ठणठणीत बरे आहेत.गेल्या कित्येक वर्षात तिथे जेवढ्या बाळांनी जन्म घेतला त्यांच्या आईची अगदी नॉर्मल डिलिव्हरी झाली आहेत.ना कसली औषधे ना कसले डाएट……क्वचित तसा प्रसंग आलाच तर त्या पेशंटला पायी चालत घेवून ४०किमी प्रवास करत खेड गाठणे…हे ऐकल्यावर मन सुन्न झाले. खरे…..आपण आज म्हणत आहोत २१ वे शतक…..एवढी प्रगती केली….. पण ह्या लोकांना आजही ४० वर्ष मागे असणारी सगळी परिस्थिती जगत दिवस काढावे लागत आहेत…..पण एक विशेष असे पण की…..ह्यांना त्याचे वाईट ही वाटत नसावे हेच नवल…..अगदी मजेत…. हसत जगणारी ह्या लोकांची जीवनशैली पाहिली की आपलीच आपल्याला लाज वाटल्या शिवाय राहत नाही……माझ्याजवळ हे नाही …ते नाही…ह्याने हे घेतले….ते घेतले…मलाच देव त्रास देतो…..मला कसले सुख नाही….एवढे कष्ट करून नशिबी निराशा…..ह्या सगळ्या भ्रमातून क्षणात बाहेर काढणारा हा प्रवास नक्कीच जीवनाला वेगळी कलाटणी देवून गेला. मनात प्रश्न आला आणि त्यांना विचारले……तात्या…आम्ही त्यांना तात्या हेच नाव दिले आणि तशी बोलायला सुरुवात केली….तुम्ही सगळे ह्या गोष्टी स्वीकारून जगत आहात मान्य आहे….पण नव्या पिढीचे…मुलांचे काय…त्यांची शिक्षणं…..तेव्हा त्यांनी सांगितले गावात शाळा होती पण बंद पडली…..मग लगेच त्यांना पुढचा प्रश्न केला… मग आता…? अगदी रांगड्या भाषेत त्यांनी सांगितले ….. आणला की एक गुरजी धरून…..तो काय करतो इथली पोरं शिकवतो….आणि ती मोठी पोरं….पुन्हा बारक्या पोरांना शिकावत्यात…..मग आम्हाला पण नक्की हे जाणून घ्यायचं होत नक्की काय आहे हे गणित…. तेव्हा समजले तिथे शाळा बंद पडली…..तेव्हा तिथल्या वलवण, शिंदी,चकदेव,आरव,मोरणी,म्हाळुंगे ह्या सहा गावांनी एकत्र येवून विचार केला आत्ता जर इथून शाळा गेल्या तर पुन्हा आपल्या पोरांना शिकण्याचे मार्ग बंद होतील…आणि बघा ना…गावांची एकी….आणि त्यांच्या मदतीला धावून आलेले एक वेगळेच व्यक्तिमत्त्व…..महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद शाळांना ज्यांनी सेमी इंग्लिश प्रोजेक्ट जोडून दिला…..आणि तब्बल ५२८ शाळांमध्ये तो सुरू ही करण्यात आला….सर्वात जास्त पदव्या (१२ पदव्या त्यात वकिलीची सनद देखील समाविष्ट) असणारे एकमेव प्राथमिक शिक्षक…..ज्यांनी २८००० शिक्षकांना इंग्लिश आणि गणित कशाप्रकारे ह्या शाळांमधून शिकवावे…ह्याचे प्रशिक्षण मोफत दिले…..ज्यांनी आय कॅन स्पीक इंग्लिश नावाचे पुस्तक लिहून ग्रामीण भागातील मुलांमध्ये इंग्लिशची भीती घालवून त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल हे प्रयत्न केले…कसल्या ही फायद्याचा विचार न करता करणारे….श्री विजय सावंत सर ह्यांचे अगदी मनापासून आभार….. खरचं त्यांनी फक्त शाळा उभीच केली नाही तर….तिथे सोबत काम करणारे…श्री मनोज सावंत आणि श्री राजेन्द्र जाधव…..ही फक्त २१ -२२ वयाची मुलं….अगदी मनापासून तिथं ज्ञानदानाचे काम करत आहेत….त्यांना थोडा मासिक भत्ता हा देखील ह्याच ६ गावातील ग्रामस्थ मिळून देत आहेत……मिळणारे वेतन तुटपुंजे असेल तरी दिवस रात्र मेहनत करण्याची ह्या सर्वांची तयारी जर बघितली तर लक्षात येत आपण साधे गूगल पेमेंट केले तरी किती बक्षीस मिळालं हे जेवढ्या उत्सुकतेनं पाहतो….मिळालं तर खुश नाहीतर तेवढेच नाराज होणारे आपण….काय लायकी आपली ह्या लोकांपुढे…ह्या ३ शिक्षकांसोबत… माळी मॅडम देखील आहेत….काल आम्ही गेलो तो वार रविवार….म्हणजे शाळेच्या सुट्टीचा दिवस….पण तरीही शाळा सुरू…..पाहून आश्चर्य वाटलं….अगदी उघड्यावर….९ विद्यार्थी…आणि शिक्षक शिकवत होते….तसे ५ वी ते ९वी ची आणि ही १०ची मुलं असे एकूण २९ विद्यार्थी आहेत. ही १०वी ची मुलं आहेत…ह्यांच्या परीक्षा होणार बीड ला…मी उत्सुकतेने राजेंद्र सरांना विचारले…. जर खेड जवळ आहे….सातारा जवळ आहे….मग बीड कडे का न्यायचे ह्यांना…..?तेव्हा जे उत्तर मिळाले त्यावरून दूरदृष्टी काय असते ह्याचा परिचय आला….. त्यांनी सांगितले….ह्यांना बीड कडे परीक्षेला घेवून गेलो की तिथली लोकं १ – २ महिने पूर्ण काळजी घेतात मुलांची…राहणे खाणे…सर्व….आणि तिथं जी ऊस तोडी करणारी….आणि इतर गरीब लोकं आहेत…जी शिक्षण आणि सुविधा ह्यापासून वंचित आहेत…..त्यांना ह्या मुलांना पाहून आनंद होईल…आत्मविश्वास निर्माण होईल आणि ती त्यांची मुलं….अगदी विश्वासाने आमच्याकडे पाठवतील…. पुन्हा बाहेर आलो तर भाज्यांची शेती केलेली पाहिली…त्यावर विचारले हे कशासाठी…? ही मुलं तर इथचं राहणारी मग ह्या भाजी कोणासाठी…? त्यावर ते बोलले …आमचं नियोजन हे आहे की बीड ची मुलं इथे आता शिकायला येणार…इथे राहणार…मग त्यांच्या जेवणाला लागणाऱ्या भाज्या आपण स्वतः इथेच पिकवणार आहोत…खरंच ते ऐकून आठवण आली ती कर्मवीर भाऊराव पाटील यांची….माझे शिकणं साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालय इथेच झाले…..तेव्हा तिथेच समाधी परिसर पाहताना विचार यायचा….त्याकाळी मुले कशी काम करून शिकली असतील….काम करा आणि वर मार खा… शिका….कशाला एवढे व्याप केले असतील….?पण खरच आता कळतेय…कर्मवीर अण्णांनी किती प्रेमाने शिकवून किती सुरेख संस्कार दिले असतील..तरच आणि त्यामुळेच आज रयतचा हा वटवृक्ष एवढा बहरलेला दिसतो…. आपण कायम ह्याच कथा वाचत राहतो…की मोठ्या लोकांनी काय केलं…कसे मोठे झाले..पण मी असे म्हणेन की अशा धाडसी आणि वयाने कमी असणाऱ्या व्यक्तींना भेटून पण जो आत्मविश्वास तुमच्या मध्ये येईल तो इतर स्फूर्तिस्थान आणि मोठ्या व्यक्तींना वाचून… भेटून मिळेल तेवढाच किंवा त्याहून नक्कीच जास्त असेल… खरं तर हेच ते सुख जे अनपेक्षितपणे आम्हा सर्वांना मिळाले.ह्याच आठवणी आणि विचार घेवून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला.मनात हाच विचार येतोय ह्या ध्येयवेड्या शिक्षक,अडाणी गावकरी,उद्याची स्वप्न पाहणारी मुलं,ह्यांच्यात आणि आपल्यात काय तुलना….कायम साऱ्या सुविधा मिळून असमाधानी आपण…आणि कसल्याही सुखसुविधा शिवाय आनंदी आयुष्य जगणारी ही सारी मंडळी… पुढचा प्रवास करत आम्ही गाठले श्री शैल्य चौकेश्वर मंदिर…साधरण २ ते ३ किमी डोंगर प्रवास करुन त्या मंदिरात प्रवेश केल्यावर मनाचा आणि शरीराचा थकवा कसा क्षणात दूर झाला कळले नाही.तिथे पुजारी असणारे श्री शंकर जंगम काका …. वय ६६ पण पाहून वाटणार नाही असे तेज होते त्यांच्या चेहऱ्यावर…..त्यांनी पुढे खेड कडे उतरणारा शिडी मार्ग पाहायला मिळेल हे सांगितले…. आणि तो पाहायला आणि अनुभव घ्यायला आम्ही पुढे गेलो.तेव्हा पाहिले एका खाली एक अशा ३ शिड्या होत्या तिथे पहिली शिडी थोडी लहान आहे ….पण त्यांनतर असणाऱ्या २ शिड्या काळजाचा ठोका चुकावतात.साधारण १०० फूट दरी मध्ये उतरत जाण्याचा हा अनुभव नक्कीच मनाला आनंद आणि थरार देवून गेला. आज एवढे सांगण्याचं कारण म्हणजे एकच….ज्या गोष्टीची, ठिकाणची माहिती असते तिथेच लोकांचे जाणे होत असते….आज मितीला पाहिले तर एकाच ठिकाणाहून सकाळी १०० पेक्षा जास्त बोटी वासोटा जातात तर फक्त आमची १ बोट चकदेव कडे जाते…..ह्याचा अर्थ हा नाही की लोकांना तिकडे जाणे आवडणार नाही…..याचा अर्थ एकच की कोणत्याही मीडिया वरून…ह्याची जास्त माहिती प्रसिद्ध झालेली दिसत नाही. पण माझे मत हेच राहील की….जर ट्रेक चा एक वेगळा अनुभव आणि मनात काही अविस्मरणीय आठवणी साठवून घ्यायच्या असतील तर नक्कीच हा प्रवास करावा….. आम्ही निवडलेला मार्ग हा बोटीतून होता..पण त्यातून हे पण समजले जर कमी वेळात…हा ट्रेक करावा वाटत असेल तर सातारा ते तेटले मार्गे जावून तिथून तरफ्यातून तुमची वाहने पलीकडे तापोळ्यात घेवून जावू शकता….तिथून सरळ…आरव…आणि मग वलवण…तिथे गाडी लावून ट्रेक ला सुरुवात करू शकता….. जर राहण्याचे नियोजन असेल तर आरव मध्ये श्री कोंडीबा माने उर्फ तात्या (आमचे सर्वात मनमिळावू मार्गदर्शक मोबाईल – ९४२३९३६७८२) चकदेव चे पुजारी श्री शंकर जंगम काका(मोबाइल -९९६९६१३८०२ / ९१३६५६४८७८) सरते शेवटी आम्ही ही परतीचा प्रवास केला आणि वाटेत दिसली ती नागाची कात….मग काय आयुष्यात पुढे जाण्यासाठी….जसे जुनी मरगळ सोडून उमेदीने साप देखील प्रवास करतात…तसेच काही नकारात्मक विचारांना मनातून काढून आम्ही नव्या उमेदीने माघारी परतलो. शब्दसारथी निलेश बाबर

स्मुतीगंध…..ट्रेक नंबर ४……चकदेव.

स्मृतीगंध... प्रवास नेहमीच नवी ऊर्जा देत असतो....जगण्याची...आणि आयुष्य पुन्हा नव्याने बघण्याची. ट्रेक नंबर ४ चकदेव.. नमस्कार आज पुन्हा आपल्या सगळ्यांशी काही नवीन अनुभव सांगण्याचा योग आला.काल रविवार ....म्हणजे सुट्टीचा दिवस....सुट्टीचा दिवस...आणि निसर्गाच्या प्रेमात पडलो म्हणजे त्यासोबत वेळ घालवणे हे आलेच.... दीड महिन्यापूर्वी जेव्हा वासोटा पाहणे ठरले....आणि घडले.तेव्हाच एक वेगळी ऊर्जा मनाला मिळाली होती.त्याच कोयनेच्या पाण्यातून बोटीने जेव्हा परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हाच चकदेव ने मनाला साद घातली होती. त्या सादेला प्रतिसाद देण्याचा योग काल आला......मग असा सुंदर अनुभव अनुभवता यावा हे स्वप्न थोडी माझ्या एकट्याचे असणार.......सोबतीला असणारे निसर्ग वेडे....त्यांनी कालचा दिवस अगदी अविस्मरणीय बनवला..... एखादी गोष्ट करायची म्हणजे...नियोजन आलेच....पण फसलेल्या नियोजनातून देखील जेव्हा तुम्ही तुमचा हेतू साध्य करता तेव्हा चेहऱ्यावर उमटणाऱ्या आनंदाला शब्दात बांधणे म्हणजे कठीणच. सोबती कोण येणार .....कोण नाही येणार ....ह्याचे येणे रद्द....तो येवू इच्छितो.... अशा सगळ्या घडामोडीत ठरलेले नियोजन कसे बिघडत होते कसे ठरत होते हे सांगणे अवघडच....पण जेव्हा काही अविस्मरणीय गोष्टी आयुष्यात सुख आणि समाधान घेवून येणार असतील तर अशा गोष्टी त्यापुढे अगदी नगण्य होवून जातात. चकदेव.....ह्या ठिकाणी जायचे म्हणजे आधी एक दिवस तुम्हाला बामणोली बोटिंग जवळ सांगावे लागते.कारण सकाळी ७ वाजता तिथून बोट निघणार असते.वासोटा जाणाऱ्या बोटी ८ नंतर सुरू होत असतात......मग काय आधी न कळवणे थोडे महागात पडले होते.काही जाणकार तर म्हणाले जर ८ ना नंतर जाणार म्हणजे होवूच शकत नाही......नियोजन रद्द करा...आणि पुन्हा कधी तरी जाण्याचे ठरवू.....पण ज्या प्रकारे म्हणतो ना आपण एखादी भेटीची वेळ आणि दिवस ठरवतो...मग तो कामासाठी दिलेला वेळ असो नाहीतर प्रेयसीला दिलेला....तो पाळणे हेच त्या नात्यातील गोडवा वाढवायला पूरक असते.....मग काय तर काही झाले तरी जायचे आणि जो १- २ तासाचा उशिरा जाण्याचा फरक पडतो तो फरक गतीने चालून पूर्ण करायचा हेच सर्वांनी मनाशी ठरवून सकाळी ८ वाजून १०मिनिटांनी बोटीने प्रवासाला सुरुवात झाली. चकदेव बद्दल जे थोडे बहुत वाचले होते त्यातून एकच समज होता मनात की खूप मोठा प्रवास आहे...चालावे खूप लागते..... बस एवढीच माहिती डोक्यात घेवून निघालो होतो. बोट चे चालक हेच गाईड म्हणून सोबत येणार पण त्यांना देखील जास्त माहिती न्हवती.पण आमचे नशीब पण एवढे चांगले की आरव मध्ये बोट थांबल्या नंतर तिथे वास्तव्यास असणारे श्री कोंडीबा माने यांनी आम्हाला सोबत द्यायचे ठरवले.मग काय तर त्याच मातीत लहानाचा मोठा झालेला ५६ वर्षाचा हा तरुण आमच्या सोबत चालू लागला.त्यांनी तिथल्या अगदी लहान लहान गोष्टींपासून सारे सांगायला सुरुवात केली.त्यांचे वडील वयाची शंभरी पार केली तरी अजुन ही ठणठणीत बरे आहेत.गेल्या कित्येक वर्षात तिथे जेवढ्या बाळांनी जन्म घेतला त्यांच्या आईची अगदी नॉर्मल डिलिव्हरी झाली आहेत.ना कसली औषधे ना कसले डाएट......क्वचित तसा प्रसंग आलाच तर त्या पेशंटला पायी चालत घेवून ४०किमी प्रवास करत खेड गाठणे...हे ऐकल्यावर मन सुन्न झाले. खरे.....आपण आज म्हणत आहोत २१ वे शतक.....एवढी प्रगती केली..... पण ह्या लोकांना आजही ४० वर्ष मागे असणारी सगळी परिस्थिती जगत दिवस काढावे लागत आहेत.....पण एक विशेष असे पण की.....ह्यांना त्याचे वाईट ही वाटत नसावे हेच नवल.....अगदी मजेत.... हसत जगणारी ह्या लोकांची जीवनशैली पाहिली की आपलीच आपल्याला लाज वाटल्या शिवाय राहत नाही......माझ्याजवळ हे नाही ...ते नाही...ह्याने हे घेतले....ते घेतले...मलाच देव त्रास देतो.....मला कसले सुख नाही....एवढे कष्ट करून नशिबी निराशा.....ह्या सगळ्या भ्रमातून क्षणात बाहेर काढणारा हा प्रवास नक्कीच जीवनाला वेगळी कलाटणी देवून गेला. मनात प्रश्न आला आणि त्यांना विचारले......तात्या...आम्ही त्यांना तात्या हेच नाव दिले आणि तशी बोलायला सुरुवात केली....तुम्ही सगळे ह्या गोष्टी स्वीकारून जगत आहात मान्य आहे....पण नव्या पिढीचे...मुलांचे काय...त्यांची शिक्षणं.....तेव्हा त्यांनी सांगितले गावात शाळा होती पण बंद पडली.....मग लगेच त्यांना पुढचा प्रश्न केला... मग आता...? अगदी रांगड्या भाषेत त्यांनी सांगितले ..... आणला की एक गुरजी धरून.....तो काय करतो इथली पोरं शिकवतो....आणि ती मोठी पोरं....पुन्हा बारक्या पोरांना शिकावत्यात.....मग आम्हाला पण नक्की हे जाणून घ्यायचं होत नक्की काय आहे हे गणित.... तेव्हा समजले तिथे शाळा बंद पडली.....तेव्हा तिथल्या वलवण, शिंदी,चकदेव,आरव,मोरणी,म्हाळुंगे ह्या सहा गावांनी एकत्र येवून विचार केला आत्ता जर इथून शाळा गेल्या तर पुन्हा आपल्या पोरांना शिकण्याचे मार्ग बंद होतील...आणि बघा ना...गावांची एकी....आणि त्यांच्या मदतीला धावून आलेले एक वेगळेच व्यक्तिमत्त्व.....महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद शाळांना ज्यांनी सेमी इंग्लिश प्रोजेक्ट जोडून दिला.....आणि तब्बल ५२८ शाळांमध्ये तो सुरू ही करण्यात आला....सर्वात जास्त पदव्या (१२ पदव्या त्यात वकिलीची सनद देखील समाविष्ट) असणारे एकमेव प्राथमिक शिक्षक.....ज्यांनी २८००० शिक्षकांना इंग्लिश आणि गणित कशाप्रकारे ह्या शाळांमधून शिकवावे...ह्याचे प्रशिक्षण मोफत दिले.....ज्यांनी आय कॅन स्पीक इंग्लिश नावाचे पुस्तक लिहून ग्रामीण भागातील मुलांमध्ये इंग्लिशची भीती घालवून त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल हे प्रयत्न केले...कसल्या ही फायद्याचा विचार न करता करणारे....श्री विजय सावंत सर ह्यांचे अगदी मनापासून आभार..... खरचं त्यांनी फक्त शाळा उभीच केली नाही तर....तिथे सोबत काम करणारे...श्री मनोज सावंत आणि श्री राजेन्द्र जाधव.....ही फक्त २१ -२२ वयाची मुलं....अगदी मनापासून तिथं ज्ञानदानाचे काम करत आहेत....त्यांना थोडा मासिक भत्ता हा देखील ह्याच ६ गावातील ग्रामस्थ मिळून देत आहेत......मिळणारे वेतन तुटपुंजे असेल तरी दिवस रात्र मेहनत करण्याची ह्या सर्वांची तयारी जर बघितली तर लक्षात येत आपण साधे गूगल पेमेंट केले तरी किती बक्षीस मिळालं हे जेवढ्या उत्सुकतेनं पाहतो....मिळालं तर खुश नाहीतर तेवढेच नाराज होणारे आपण....काय लायकी आपली ह्या लोकांपुढे...ह्या ३ शिक्षकांसोबत... माळी मॅडम देखील आहेत....काल आम्ही गेलो तो वार रविवार....म्हणजे शाळेच्या सुट्टीचा दिवस....पण तरीही शाळा सुरू.....पाहून आश्चर्य वाटलं....अगदी उघड्यावर....९ विद्यार्थी...आणि शिक्षक शिकवत होते....तसे ५ वी ते ९वी ची आणि ही १०ची मुलं असे एकूण २९ विद्यार्थी आहेत. ही १०वी ची मुलं आहेत...ह्यांच्या परीक्षा होणार बीड ला...मी उत्सुकतेने राजेंद्र सरांना विचारले.... जर खेड जवळ आहे....सातारा जवळ आहे....मग बीड कडे का न्यायचे ह्यांना.....?तेव्हा जे उत्तर मिळाले त्यावरून दूरदृष्टी काय असते ह्याचा परिचय आला..... त्यांनी सांगितले....ह्यांना बीड कडे परीक्षेला घेवून गेलो की तिथली लोकं १ - २ महिने पूर्ण काळजी घेतात मुलांची...राहणे खाणे...सर्व....आणि तिथं जी ऊस तोडी करणारी....आणि इतर गरीब लोकं आहेत...जी शिक्षण आणि सुविधा ह्यापासून वंचित आहेत.....त्यांना ह्या मुलांना पाहून आनंद होईल...आत्मविश्वास निर्माण होईल आणि ती त्यांची मुलं....अगदी विश्वासाने आमच्याकडे पाठवतील.... पुन्हा बाहेर आलो तर भाज्यांची शेती केलेली पाहिली...त्यावर विचारले हे कशासाठी...? ही मुलं तर इथचं राहणारी मग ह्या भाजी कोणासाठी...? त्यावर ते बोलले ...आमचं नियोजन हे आहे की बीड ची मुलं इथे आता शिकायला येणार...इथे राहणार...मग त्यांच्या जेवणाला लागणाऱ्या भाज्या आपण स्वतः इथेच पिकवणार आहोत...खरंच ते ऐकून आठवण आली ती कर्मवीर भाऊराव पाटील यांची....माझे शिकणं साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालय इथेच झाले.....तेव्हा तिथेच समाधी परिसर पाहताना विचार यायचा....त्याकाळी मुले कशी काम करून शिकली असतील....काम करा आणि वर मार खा... शिका....कशाला एवढे व्याप केले असतील....?पण खरच आता कळतेय...कर्मवीर अण्णांनी किती प्रेमाने शिकवून किती सुरेख संस्कार दिले असतील..तरच आणि त्यामुळेच आज रयतचा हा वटवृक्ष एवढा बहरलेला दिसतो.... आपण कायम ह्याच कथा वाचत राहतो...की मोठ्या लोकांनी काय केलं...कसे मोठे झाले..पण मी असे म्हणेन की अशा धाडसी आणि वयाने कमी असणाऱ्या व्यक्तींना भेटून पण जो आत्मविश्वास तुमच्या मध्ये येईल तो इतर स्फूर्तिस्थान आणि मोठ्या व्यक्तींना वाचून... भेटून मिळेल तेवढाच किंवा त्याहून नक्कीच जास्त असेल... खरं तर हेच ते सुख जे अनपेक्षितपणे आम्हा सर्वांना मिळाले.ह्याच आठवणी आणि विचार घेवून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला.मनात हाच विचार येतोय ह्या ध्येयवेड्या शिक्षक,अडाणी गावकरी,उद्याची स्वप्न पाहणारी मुलं,ह्यांच्यात आणि आपल्यात काय तुलना....कायम साऱ्या सुविधा मिळून असमाधानी आपण...आणि कसल्याही सुखसुविधा शिवाय आनंदी आयुष्य जगणारी ही सारी मंडळी... पुढचा प्रवास करत आम्ही गाठले श्री शैल्य चौकेश्वर मंदिर...साधरण २ ते ३ किमी डोंगर प्रवास करुन त्या मंदिरात प्रवेश केल्यावर मनाचा आणि शरीराचा थकवा कसा क्षणात दूर झाला कळले नाही.तिथे पुजारी असणारे श्री शंकर जंगम काका .... वय ६६ पण पाहून वाटणार नाही असे तेज होते त्यांच्या चेहऱ्यावर.....त्यांनी पुढे खेड कडे उतरणारा शिडी मार्ग पाहायला मिळेल हे सांगितले.... आणि तो पाहायला आणि अनुभव घ्यायला आम्ही पुढे गेलो.तेव्हा पाहिले एका खाली एक अशा ३ शिड्या होत्या तिथे पहिली शिडी थोडी लहान आहे ....पण त्यांनतर असणाऱ्या २ शिड्या काळजाचा ठोका चुकावतात.साधारण १०० फूट दरी मध्ये उतरत जाण्याचा हा अनुभव नक्कीच मनाला आनंद आणि थरार देवून गेला. आज एवढे सांगण्याचं कारण म्हणजे एकच....ज्या गोष्टीची, ठिकाणची माहिती असते तिथेच लोकांचे जाणे होत असते....आज मितीला पाहिले तर एकाच ठिकाणाहून सकाळी १०० पेक्षा जास्त बोटी वासोटा जातात तर फक्त आमची १ बोट चकदेव कडे जाते.....ह्याचा अर्थ हा नाही की लोकांना तिकडे जाणे आवडणार नाही.....याचा अर्थ एकच की कोणत्याही मीडिया वरून...ह्याची जास्त माहिती प्रसिद्ध झालेली दिसत नाही. पण माझे मत हेच राहील की....जर ट्रेक चा एक वेगळा अनुभव आणि मनात काही अविस्मरणीय आठवणी साठवून घ्यायच्या असतील तर नक्कीच हा प्रवास करावा..... आम्ही निवडलेला मार्ग हा बोटीतून होता..पण त्यातून हे पण समजले जर कमी वेळात...हा ट्रेक करावा वाटत असेल तर सातारा ते तेटले मार्गे जावून तिथून तरफ्यातून तुमची वाहने पलीकडे तापोळ्यात घेवून जावू शकता....तिथून सरळ...आरव...आणि मग वलवण...तिथे गाडी लावून ट्रेक ला सुरुवात करू शकता..... जर राहण्याचे नियोजन असेल तर आरव मध्ये श्री कोंडीबा माने उर्फ तात्या (आमचे सर्वात मनमिळावू मार्गदर्शक मोबाईल - ९४२३९३६७८२) चकदेव चे पुजारी श्री शंकर जंगम काका(मोबाइल -९९६९६१३८०२ / ९१३६५६४८७८) सरते शेवटी आम्ही ही परतीचा प्रवास केला आणि वाटेत दिसली ती नागाची कात....मग काय आयुष्यात पुढे जाण्यासाठी....जसे जुनी मरगळ सोडून उमेदीने साप देखील प्रवास करतात...तसेच काही नकारात्मक विचारांना मनातून काढून आम्ही नव्या उमेदीने माघारी परतलो. शब्दसारथी निलेश बाबर

मैत्री पर्यावरणाशी

*मैत्री पर्यावरणाशी* आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री ही अगदी सहजतेने होत असते. मैत्रीत कोणतीही गोष्ट ओढून ताणून करावी लागत नाही. दृढ होत गेलेली मैत्री जीवनात कायमच आनंदाच आणि विश्वासाचं नाते निर्माण करते. म्हणूनच माणसाच्या आयुष्यात मैत्री एक सुगंधित फुला सारखी असते.एखाद्या फुलाला ज्या प्रमाणे आजूबाजूच्या वातावरणात जाणून-बुजून सुगंध पसरविण्याची आवश्यकता भासत नाही त्याच प्रमाणे आपला हा परिसर अगदी सहज ,साधा आणि सोपा आहे.त्यासाठी जाणून-बुजून वेगळं काही करण्याची आवश्यकता भासत नाही. निसर्गातील प्रत्येक गोष्ट अगदी सहजतेने घडत असते. जसे कालचक्राच्या गतीप्रमाणे चंद्र,सूर्य, तारे आपले कार्य सहजगत्या करत असतात. त्याच जमिनीत एखादे बीज रुजते आणि त्याचे रोपटे बनून त्याला आपोआपच पाने,फुले व फळे येतात. निसर्गातील प्रत्येक घटकांनी हा परिसर तयार होतो आणि याच परिसरात ह्या सृष्टीतील प्रत्येक जीव फुलत असतो. ह्या संपूर्ण विश्वातील कुठल्याही घटकाला, जीविताला जगण्यासाठी जाणून-बुजून कोणतेही कार्य करावे लागत नाही.निसर्ग नियमाने तो घटक,तो जीव उत्पन्न होतो व तो आपले कार्य निर्विकारपणे करत राहतो. हाच सृष्टीचा साधा -सोपा नियम आहे आणि ह्या भूमंडळावर जो परिसर आहे, जो निसर्ग आहे ते म्हणजेच पर्यावरण. आपल्या ग्रह मालेतील एकमेव ग्रह ज्याच्यावर जीवन अस्तित्वात आहे. फक्त आणि फक्त पृथ्वीवरच जीव सृष्टीची निर्मिती होऊ शकते हे सत्य सर्वानाच ज्ञात आहे. निसर्ग जर सहज आहे आजूबाजूचा परिसर सहजतेने जर मार्गक्रमण करीत असतो तर मग आज पर्यावरणाच्या इतक्या समस्या का निर्माण झाल्या आहेत? पृथ्वीवरील जे वातावरण आहे त्या वातावरणातील नैसर्गिक साधन सामग्री, हवामान,भौगोलिक सुगमता इत्यादी अनेक घटकांनी मिळून मनुष्यप्राण्याची जडणघडण सुलभतेने होत असते. मग पर्यावरणाचा प्रश्न का निर्माण होतो? हवामानाचे कोडे का नाही उलगडता येत? ह्या सृष्टीने इतके सुंदर आयुष्य जे बहाल केले आहे ते इतके जटिल आणि दिवसेंदिवस कटकटीचे का बनत चालले आह? ह्या प्रश्नांचे एकच मूळ आहे ते म्हणजे एकीकडे वरदहस्ताने भरभरून देणारा निसर्ग आहे आणि दुसरीकडे भरभरून आणि मुक्तहस्ताने निसर्गाला ओरबडणारा मनुष्यप्राणी आहे. मग सहजतेने चालणारे निसर्गचक्र ह्या मनुष्यामुळेच बिघडू लागते आणि असंतुलित पर्यावरणाच्या समस्या निर्माण होऊ लागतात मग ह्याच पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी पर्यावरणशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. 'पर्यावरण संवर्धन', 'पर्यावरण संगोपन' हे सारे अवघड शब्द आपल्याला पर्यावरण जागरूकते पासून दूर घेऊन जातात आणि सर्व सामान्य माणसाला हे सारं क्लिष्ट आणि आपल्या आवाक्याबाहेरचे वाटू लागते कारण साधी गोष्ट आहे जेंव्हा मनुष्य ह्या ज्या वातावरणात श्वास घेतो, जगतो,उठतो-बसतो.त्या पर्यावरणचा अभ्यास करावयाची वेळ त्याच्यावर येते तेंव्हा मात्र ते जीवन त्याला जटिल वाटू लागते मग मात्र ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता घेता मनुष्याची दमछाक होते आणि त्याला हे जीवन कटकटीचे वाटू लागते. म्हणजे उदा:एखाद्या माणसाला सामोसा खायला आवडतो. मग लहर आली की तो त्याच्या वर मनसोक्त ताव मारतो आणि आनंद घेतो कारण खाणं ही प्रक्रिया अगदी सहज आणि सोपी आहे पण तेच खाताना मनुष्य असा नाही विचार करत की आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन कसे होते?आपला जठराग्नी कसा काम करतो?अन्नाचे रक्तात रूपांतर कसे होते? पण मनुष्याने चुकीच्या पद्धतीने जर अन्न खाल्ले तर मात्र पचनसंस्थेत बिघाड होतो आणि मग त्याचा उपाय शोधण्यासाठी मग शरीरशास्त्राकडे त्याला वळावे लागते.मग त्या शरीरशास्त्राचा अभ्यास करताना जीवन जटिल आणि कटकटीचे वाटू लागते. सृष्टीवरील ह्या निसर्गाचे देखिल हेच तत्त्व आहे. निसर्गक्रमाने अगदी सहजतेने सर्व घटना घडत असताना त्या वातावरणात काही ढवळा-ढवळ केली तर काही समस्या उद्भवतात मग अश्या समस्या सोडवण्यासाठी मनुष्य आपल्या बुद्धीच्या जोरावर अजून लुडबूड करू लागतो आणि हळूहळू आपल्या लहरीप्रमाणे जीवन सुखकर बनविण्याचा अट्टाहास करत राहतो. खरतर आयुष्य हे खूप जटिल नसते तर मनुष्य आपल्या वर्तुवणुकीमुळे जास्त गुंतागुंतीचे करून ठेवतो व पचतावतो. म्हणूनच हा गुंता सोडवण्यासाठी निसर्गाशी मैत्री हा सर्वात सोपा उपाय आहे. सहजते जगूयात, सहजतेने निसर्गाला आपला सखा, जिवलग मानुयात आणि त्याच्या सानिध्यात आपले जीवन सुखकर करूयात. लेखिका: सायली दिवाकर,पुणे (10 वी व 12 वी च्या बोर्डाच्या मुलांसाठी काम)

स्मृतीगंध …..ट्रेक नंबर २……कमळगड

स्मृतीगंध... हरण्याची भीती सोडून.....थोडं स्वतःला निसर्गात हरवणं जमलं ना की .... यशाचे नवे मार्ग शोधायला नव्याने प्रयत्न नाहीत करावे लागत...एकांत आपोआपच स्वतःचे विचार एका वेगळ्या उंचीवर नक्कीच घेवून जातो..... ट्रेक नंबर २ कमळगड नमस्कार... रविवार एक सुट्टीचा दिवस....आणि.... त्यात संकष्टी चतुर्थी..... मग काय दिवसाची सुरुवात पण तशी छानच झाली....ती म्हणजे वाईच्या श्रीगणेशाचे दर्शन घेवूनच..... मग पुढे ठरल्या नियोजनानुसार कमळगड चा प्रवास सुरू झाला....कमळगड.....सह्याद्रीला सुशोभित करणारा अजुन एक विशाल दुर्ग...ह्या गड मोहिमेचे थोडे विश्लेषण करण्यापूर्वी काही गोष्टी सांगू वाटत आहेत..... हा गड बांधला गेला नाही त्यामुळे चढाई थोडी अवघड वाटते.... पण येणारा अनुभव हा नक्कीच सुखद आहे.....मग मनात थोडा विचार आला.राजांनी किती विचार करून.. किती कुशाग्रतेने...शत्रूला पोहोचण्यास अवघड....त्यास रोखण्यास सोपे....आणि चौफेर असणारा प्रदेश पाहता येईल असेच दुर्ग बांधले.....म्हणजे आज आपण सहज चढून जाणारा रायगड असो...सिंहगड असो किंवा राजगड....हे दुर्ग बांधण्यापूर्वी किती रुद्र असतील हे आज कमळगड चढताना जाणवले....हा दुर्ग बांधला नाही....त्यामुळे चढाई करताना होणारी दमछाक सांगून जाते की त्या काळी मावळ्यांना किती मेहनत घ्यावी लागली असेल.....किती प्राणपणाने कामे केली असतील.....एवढे भव्य दुर्ग उभारले.... ते सांभाळले....ते जपले....ते आजही दिमाखात उभे आहेत....आजही त्यांच्या गौरवाची....त्यांच्या कीर्तीची साक्ष देत आहेत. राजे खरंच तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत...तुम्ही जे निर्माण केले ते साधे फिरून पाहताना एवढी दमछाक व्हावी ह्यावरून एक गोष्ट कळतेय की ह्या निसर्गापुढे आम्ही किती खुजे आहोत.... आणि ह्याच निसर्गाला योग्य हाताळून तुम्ही किती दूरदृष्टीने सगळे बघत होता...सगळे घडवत होता.... आणि आपल्या कीर्तीचा अथांग सागर तुम्ही देवून गेलात. राजे तुम्हाला जेवढे जाणुन घ्यायचा प्रयत्न करतोय...जेवढं ह्या निसर्गात त्या पावलांची चाहूल घ्यायचं ठरवतोय तेवढे अनेक प्रश्न उभे राहत आहेत.....नक्की काय असेल ती प्रेरणा....? काय असेल ती जिद्द....? कसे असेल एवढे निसर्ग हाताळण्याचे ज्ञान....? हे कोडे न उलघडणारेच. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांसोबत शपथ घेतलेल्या रायरेश्वरावरून जेव्हा ह्या कमळगडाकडे पाहिले तेव्हाच मनाने ठरवले की इथे जायचेच.धोम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धोम धरणाच्या बाजूने जाणारी वाट ही देखणीच. कमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत...अवघड असा तुपेवाडी कडून जाणारा मार्ग....सोपे असे परतवाडी आणि वासोळे मार्ग...आणि एक म्हणजे नांदगणे मार्ग.....नांदगणे मार्गाने जाताना एक पायवाट असणारा रस्ता आहे जिथून तुम्ही सहज गडावर जावू शकता.....पण खरंच ट्रेक चा विलक्षण आणि हटके आनंद घ्यायचा असेल तर मी सांगेन नेहमीच्या रस्त्याने न जाता दोन टेकडी पलीकडून चढाईला सुरुवात करावी. पायथ्याला असणाऱ्या विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेतले की एक भक्कम अशी काठी पहिली शोधावी....सुरुवातीलाच तिचा वापर प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावणाऱ्या श्वान महाशयांना रोखण्यास होईल...मग पुढे असणारे चढण हे खूपच अवघड आहे....म्हणजे ३ ते ५ फुटापर्यंत वाढलेले गवत...आत्ता ते सुकले असल्याने त्यावरून पाय घसरत आहेत...आणि त्यावर त्यांना निसर्गाने दिलेले शस्त्र (कुसळं) हल्ला करणार नाही हे शक्य आहे का...? मग त्यातून मार्ग काढताना येणारी मजा ही वेगळीच... जर अवघड असा वाटणारा वासोटा....चढाई मार्गाने केलेला सिंहगड...असे तुम्ही केले असेल तर ह्या मार्गाने जाताना खूप सुंदर अनुभव नक्कीच येईल.स्वतःच्या पायावर उभे आहात असे वाटत असेल तर इथून जाताना हाताने रांगावे लागते की नाही ते नक्की अनुभवा.गड चढाईच्या साधारण २५% प्रवास हा असा असेल जिथे तुम्ही चालाल तीच पायवाट असे स्वतः निर्माण केलेल्या वाटांवरून चालण्याचा अनुभव येईल.पुढे पायवाट आहे...तिथून मग अगदी सोपा आहे मार्ग.....मध्ये गोरक्षनाथांचे मंदिर...मग छोटेसे पाण्याचे टाके....आणि मग येतो पुन्हा पठारी भाग.... तिथे पाहून जर आश्चर्य नाही झाले तर नवलच....तिथे आजही ४ कुटुंब राहत आहेत.पठारावर गहू ,तांदूळाची शेती केली जातेय....हीच ती अजब माणसे आहेत जी रोज गड चढ उतार करत आहेत.त्यांच्याबद्दल काही सांगायचं आहेच पण त्याआधी आपण गडाच्या पुढील चढाई बद्दल बोलू. तिथून पुढे साधारण १५ मिनिटांची चढाई आहे.जी पार केल्यावर दिसते ते सुंदर पठार आणि त्यावर दिसते एक अशी जागा जी पाहताना नक्कीच डोळे विस्फारले जातील.साधारण ५० -६० फूट खोल अशी घळ आहे.ज्यात उतरताना पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहोत असाच अनुभव येतो....घामाने ऊफाळलेलं शरीर त्या गर्भात कसे थंड होवून जातं...आणि दिसू लागतात आपल्या अंगातून निघणाऱ्या वाफा.... मग पठारावरून खाली पाहताना दिसणारी दाठ झाडी.... केंजळगड...रायरेश्वर...हे दुर्ग पाहून मनाला जे समाधान मिळेल ते तुम्ही स्वतः अनुभवा. आता पुन्हा विषय येतो त्या तिथे शेती करून राहणाऱ्या कुटुंबांचा....तिथे तुम्हाला भेटतील शंकर विठोबा कचरे नावाचे वयाची पन्नाशी पार केलेले तरुण....अगदी आदराने,आपुलकीने बोलणे....आणि काय खाणार का हा त्यांचा मृदू स्वर....खरंच जी आपुलकी त्या व्यक्तीकडे पाहून वाटायला लागते त्यातून ते कोणी परके आहेत अनोळखी आहेत असे वाटतच नाही.आम्ही स्वतःचे डबे घेवून गेलो होतो.तरी तिथलं पिठले ,भात आणि ताक घेतलेच....मग आम्ही पैशाचं विचारले.....तर उत्तर काय...? द्या तुम्हाला वाटेल तेवढे....! मनात विचार आला एक रुपयाचा देखील हिशोब ठेवणारे आणि मागणारे आपण....कायम व्यवहार प्रथम असे समजून जगणारे आपण....ह्या व्यक्तीपुढे किती छोटे होवून जातो. अगदी रोज गड उतरून दुधाचा व्यवसाय करणारे.....गडावर येणाऱ्यांची जेवणाची सोय करणारे...अगदी शाकाहार ,मांसाहार दोन्ही.अशा ह्या कचरे आणि डोईफोडे कुटुंबाचे कौतुक करावे तेवढे कमीच. जे गेले असतील त्यांनी हा अनुभव घेतला असेलच.पण जे गेले नाहीत आणि जाण्याचा विचार करत आहेत त्यांना सांगणे एकच.जाताना फक्त पाणी घेवून जावे सोबत.तुमच्या भरपेट जेवणाची सोय करणारी आपलीच माणसे आहेत तिथे.माहितीसाठी त्यांचा नंबर मी इथे देत आहेच. मोबाईल नंबर - ९८३४८८५३५४ / ९४०४८७८१६३. काहींना असेही वाटत असेल ना की जर ना कसली वाट.... ना कसल्या प्राचीन इमारती.....ना प्रत्यक्ष त्या गडावर राजांचा काही इतिहास....मग का करावी अशी सफर....मला त्यासाठी फक्त एकच सांगू वाटते की.....कधी वाट सापडली....तर कधी वाट तर लागली नाही ना येवून अशा संमिश्र प्रवासाच्या ह्या ट्रेक मध्ये स्वतःची परीक्षा घ्यायला काय हरकत आहे...? साधारण २.३० ते ३तास क्षणचित्रे काढत चढाई...आणि मग येताना १.३० ते २ तासाचा उतरणीचा प्रवास...एकूण ४.३० ते ५किमी चढाई असणारा हा कमळगड... ह्या मोहिमेच्या आधी बरेच जण येतील हेच ठरवून केलेलं नियोजन.... शेवटी दोघांना जावे लागले....पण कायम पाठीशी उभा असणारा भाऊ....अशा मोहिमेत भक्कम भिंत बनून पुढे उभा होता....मग कशाची भीती...आणि कशाची चिंता..... ठरवलं.....सुरुवात केली....आणि गोळा केल्या काही अविस्मरणीय अशा आठवणी. शब्दसारथी निलेश बाबर

आई होणार मी

मज डोहाळे लागले चिमुकल्याच्या आगमनाचे मज डोहाळे लागले स्त्रीत्वाची ओळख खरी माझी मला पटली मातृत्वाची सुंदर देणगी निसर्गाने मला दिली नऊ महिने नऊ दिवस वाट मी पाहते मज बाळाची वेदना संवेदना भावना माझ्या जपते, होणार आई मी बाळाची बाळाच्या बाबांनी दिली मज ही भेट प्रेमाने बाबा बाळाचे मिरवतात फुशारकी अभिमानाने डोहाळे आजी-आजोबांनाही लागले म्हातारपनीची काठी अन् बोबडे बोल ऐकू येऊ लागले नवनवीन नाते घेऊन येणार बाळ माझे मज डोहाळे लागले चिमुकल्याच्या आगमनाचे मज डोहाळे लागले। कवी - क.दि.रेगे नाशिक

तक्रार ( कविता)

कोणाची करावी आणि का करावी तक्रार? कोणाकडे करावी आणि किती वेळेस करावी तक्रार? स्वतःचीच स्वतःकडे करावी का तक्रार? सगळ्यांचीच सगळ्यांकडे करावी तक्रार? किती किती असतात तक्रारी ! संपता संपत नाही या तक्रारी ! प्रत्येक नात्यात असतात एकमेकांविषयी तक्रारी छोट्या छोट्या किंवा मोठ मोठ्या असतात तक्रारी समुहा समुहात आमच्या तुमच्यात गावा गावात शहरा शहरात माणसा माणसात फक्त एकच सूर तक्रार.. स्वभावच झाला आहे आमचा.., आम्ही काम कमी आणि तक्रारी जास्त, प्रेम कमी आणि तक्रारी जास्त विश्वास कमी आणि तक्रारी जास्त बंद करा जीवनातल्या तक्रारींवर चर्चा काम करा, प्रेम करा.. हसत खेळत जगत तक्रार शून्य आयुष्य जगा...!!! कवी - क.दि.रेगे

स्थानमः महात्म्य प्रमानमः

मृत्यूपूर्वी वडिल आपल्या मुलाला म्हणाले, "माझ्या आजोबांनी मला दिलेले हे *घड्याळ* आहे. हे जवळजवळ *२०० वर्षे जुने* आहे. मी ते तुला देतो, तु *दागिन्यांच्या दुकानात* जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे आणि ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पहा. "मुलगा दागिन्याचा दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला, आणि म्हणाला, "त्यांनी *१५० रू* ऑफर केले कारण, ते फारच जुने आहे." वडिल म्हणाले, "आता *भंगाराच्या दुकानात* जा." मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येवून म्हणाला, "त्यांनी *२० रू* अॉफर केले कारण, ते खूप खराब आहे."वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन *संग्रहालयात* जायला सांगितलं. तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला. "बाबा, क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्याच्या *मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात* समाविष्ट करण्यासाठी *५ लाख* ची ऑफर दिली." *वडिल शांतपणे स्मितहास्य* करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचे होते की *योग्य ठिकाणीच* तुमच *योग्य मूल्य* आहे. स्वतःला *चूकीच्या जागी शोधू* नका आणि तुमचे *मूल्य* नसल्यास रागावू नका. ज्यांना आपले *मूल्य* माहित आहे, तेच आपली प्रशंसा करतात.आपली *किंमत जाणून घ्या..* म्हणजे अशा व्यक्ती पासून दुर रहा, ज्याना आपली *किंमत नाही....!* सर्व मित्रांना समर्पित... 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

स्मुतीगंध…. ट्रेक क्रमांक १ रायरेश्वर

स्मृतीगंध.... वाट भूतकाळाची....प्रवास भविष्याचा......स्वप्न उद्याची....पण...नाद इतिहासाचा... ट्रेक नंबर १ रायरेश्वर आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली इतिहासाच्या वाटांवर चालण्याची...गेली २ आठवडे केलेलं नियोजन ह्या ना त्या कारणाने मोडत होते.म्हणतात ना बऱ्याचदा चांगल्या कामाला विघ्न ही येतातच.अगदी तसेच झालं असं समजा.....आज मंगळवार .....कामाला सुट्टी न्हवतीच.पण माझे बंधू गुरुनाथ(भाऊ), आमचे मेणवली गावचे मित्र सागर आणि नव्याने ओळख झालेला मित्र अथर्व आम्ही अचानक नियोजन केले की रायरेश्वर पहायचाच. मग काय तर सोबत यायला माझा ८ वर्षाचा पुतण्या पण लगेच तयार. म्हणतात ना आपण ज्या प्रकारे संस्कार करू तशीच ओढ लहानग्यांना लागणार.नियोजन पूर्ण झालेच न्हवतेच तोपर्यंत पुतण्याने म्हणजेच आमच्या दिव्यांशने इतिहास सांगायला केली ना सुरुवात.....काका मला माहितेय तिथे शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती.त्यांनी तिथे बोट कापून घेतले होते....मला त्याचं रक्त बघायच आहे....मला पण न्या... क्षणभर थोडा विचारात पडलो ह्याला अजुन स्वतःचे सगळे पाहुणे ओळखताना गोंधळ होतो.पण आपल्या आराध्य दैवताने काय शपथ घेतली ...कसे तिथे गेले...काय ठरवले... हे तो असं सांगत होता जणू हा त्या घटनेचा समक्ष साक्षीदार होता. बघा ना हेच ते वय ह्याच वयात जर आपल्या इतिहासाची बीजं बाल मनात रुजवता आली तर इतिहास पण किती बोलका होतो. आज पण हा लिखाणाचा प्रपंच इतिहास सांगण्यासाठी नाहीच...आपल्या राजांचा इतिहास....स्वराज्याची शपथ....आणि पुढे गाजवलेला पराक्रम ह्यावर मी काय सांगणार....आपल्या नसानसांत भिनलेलं हे स्वराज्याचं वारं .......आपोआपच आपल्याला बोलक करत असतं‌ की. पण मनात आलेलं थोड लिखाणातून उतरवू वाटलं....खरंच किती विलक्षण गोष्ट आहे ना...किती भाग्यवान आहोत आपण की आपल्या सभोवती विस्तारलेला हा सह्याद्री नुसता भक्कम उभाच नाही तर तो आपल्या राजांनी आणि मावळ्यांनी कित्तेक वर्षापूर्वी केलेला पराक्रम... अतुल्य धाडस...शौर्य...त्याग...निष्ठा....आणि... बलिदान सारं कसं जसेच्या तसे नजरेसमोर उभं करत आहे. थोडा इतिहास डोळ्यापुढे आणून बघा....आपल्या छत्रपती शिवाजी राजांनी जो इतिहास घडवला आहे...जेवढे किल्ले जिंकले...आयुष्यात जेवढा प्रवास केला जेवढं स्वराज्य निर्माण केलं.हा इतिहास नक्कीच प्रेरणादायी आहे....पण त्याचा भूगोल पण बघा ना ओ जरा.....आज प्रवासाची एवढी साधने आहेत की क्षणात मैलांचा प्रवास शक्य आहे.मग असे काहीच नसताना फक्त घोडे आणि पायी चालत कसे उभारले असेल हे स्वराज्य...? काय असेल ती जिद्द......? कसा असेल तो स्वतःवरील आणि सवंगड्यांवरील विश्वास.....? धण्यावरील निष्ठेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे ते मावळे आणि अशी निष्ठा जपून सर्वांशी आपुलकीने वागणारे राजे हे वेगळंच समीकरण होतं.... यापुढे मोघलशाहीला पण झुकावे लागलेच. साताऱ्यातून फक्त ६०किमी अंतरावर असणाऱ्या ह्या रायरेश्वराच्या जवळ जायला आयुष्याची तिशी ओलांडली.त्याच मनाला थोड दुःख वाटत असलं तरी आज आलेला अनुभव हा खूप काही शिकवून गेला. आज कार्याचा शुभारंभ झाला तो वाई गणपतीच्या दर्शनाने.आणि खऱ्या अर्थाने ह्या नवीन स्वप्नांचा श्रीगणेशा झाला. शंभू महादेवाच्या ज्या पिंडीवर स्वतः शिवाजी राजांनी आणि मावळ्यांनी स्वतःच रक्त सांडून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली त्याच पिंडीसमोर बसून अभिषेक करण्याचा योग आणि भाग्य आज माझ्या नशिबी आले याहून वेगळं सुख काय असू शकतं. गडावर ज्या शिवा जंगम ह्या पुजाऱ्यानी राजांना शपथ दिली त्यांचीच पिढी ...वंशावळ..आजही गडावर वास्तव्य करत आहे.गडावर ३५-४० कुटुंब आजही छान सुखात जगत आहेत.आजही त्याच भक्तिभावाने रायरेश्वराची रोज पुजा होत आहे. राजांना भेटले ते शिवा जंगम आणि आज त्यांचेच वंशज असणारे श्री आबाजी जंगम (पुजारी) ह्यांनी आमच्या जीवनात तोच क्षण जागा केला.आज आमच्या कडून त्याच पिंडीचा अभिषेक करण्याचं भाग्य आम्हाला लाभल. त्यांच्याकडून समजलं ते ऐकून छान वाटलं की प्रत्येक शनिवार - रविवार भेट देणारे एवढे येतात की रांगा दिवसभर संपत नाहीत.पण मी म्हणेन जर ह्या ठिकाणी जाण्याचं ठरवत असाल तर हे दिवस सोडून नियोजन केलं तर मंदिराचं छान दर्शन आणि पुन्हा पांडवलेणी हे खूप आरामात पाहू शकाल. गडाच्या पायथ्या पर्यंत गाडी जात असल्याने चढण जास्त नाही.त्यामुळे कोणीही आरामात तिथे जावू शकतं.जे गेले आहेत त्यांनी हा विलक्षण अनुभव घेतला असेलच पण जे गेले नाहीत त्यांना सांगणे एकच की जवळ असणारा केंजळगड हा देखील एकाच दिवसात पाहून होवू शकतो. शेवटी काय तर इतिहासाच्या वाटांवरून प्रवास करायचा असेल तर मनात फक्त एकच ध्यास हवा की राजांनी आणि मावळ्यांनी उभारलेलं हे स्वराज्य पाहताना स्मरणात कायम तोच इतिहास आणि तेच संस्कार असावेत.भले वाडे पडले असतील... पण ते भक्कम विचार आजही प्रेरणा देतात...भले बुरुज ढासळले असतील....पण ते पाहिले की नक्कीच तुमचा ढासळलेला विश्वास भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही....तुटलेल्या दारांकडे पाहिले तरी...तुटलेली स्वप्ने पुन्हा नव्याने पाहण्याची नक्कीच उमेद तयार होईल....भले चढाईच्या वाटा बदलल्या असतील....पण गडांवर घेवून जाणाऱ्या वाटा ह्या आयुष्याला नक्कीच चांगली दिशा देणाऱ्या ठरतील......भले पाण्याची टाके शेवाळलेली असतील....पण तुमच्या मनावरील शेळपट विचार निघाल्याशिवाय राहणार नाहीत.......कारण फक्त एकच..... हा इतिहास एका राजाचा नाही......हा इतिहास आहे माणूस रुपात जगलेल्या.....आराध्य दैवताचा. ......छत्रपती शिवाजी राजांचा......छत्रपती संभाजी राजांचा.....जिजाऊ मासाहेबांचा....आणि जीवाची पर्वा न करणाऱ्या निष्ठावान मावळ्यांचा... निलेश बाबर शब्दसारथी

गोडवा तिळगुळाचा

#गोडवा_तिळगुळचा संध्याकाळी ऑफिस मधून येतानाच तिला राधाताईंचा फोन आला . आईंचा फोन!! मला? स्वतःलाच प्रश्न विचारत तिनं तो उचलला . हॅलो नेहा.. आई बोलतेय गं बोला आई एक काम होतं गं तुझ्याकडे! आई… किती वेळा त्या विषयावर बोलणं झालंय आपलं!! तुम्हाला वाटतं तसं नाही होऊ शकत. अगं मी काय म्हणतेय उद्या संक्रांत आहे गं! खूप हौसेनं तुझ्यासाठी काळी पैठणी घेऊन ठेवली होती. हलव्याचे दागिने मी स्वतः घडवलेत!! फक्त उद्याचा एक दिवस येशील का गं? ती पैठणी नेसलेलं दागिने घातलेलं तुझं ते रूप मला बघायची फार इच्छा आहे गं!! मागच्या वर्षी तुमचा पहिलाच सण संक्रांत आला म्हणून नाही करता आला ना? आणि पुढच्या चार महिन्यात तुम्ही वेगळे झालात. आता काही दिवसांत तुम्ही कायद्यानेच वेगळे व्हाल. पण तो पर्यंत तू अजूनही माझी सून आहेस ना?? आईsss बाळा मी वाट बघते हं. आणि फोन बंद झाला. ती विचारात पडली यांना कसं समजवायचं? दुसऱ्या दिवशी सकाळी इच्छा नसताना ती गेली खरी. ती येताच राधाताईंचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. ये ये ,बस तुझ्या आवडीचा खास मसाला चहा केलाय घे. तिची नजर घरभर फिरत होती. तिची शोधक नजर राधताईंना कळली आणि त्या म्हणाल्या अगं तो नाहीये , सकाळी लवकरच गेलाय ऑफिस ला. चहा घेऊन झाल्यावर राधाताई तिला खोलीत घेऊन आल्या आणि म्हणल्या हे घे पैठणी!! आणि हे दागिने! रूम मध्ये येताच तिला रूमचे पालटलेले रूप जाणवल्याशिवाय राहिले नाही. तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत राधाताई म्हणाल्या तू गेल्यापासून खूप बदल झालाय गं त्याच्यात , सगळ्या वस्तू जगच्या जागी असतात , बेडवरचा ओला टॉवेल उचलायला हल्ली त्याला सांगावं लागत नाही बरका!! आणि त्या मित्रांसोबत लागलेल्या वाईट सवयी पण आता बंद झाल्यात बरं!! घरी तर लवकर येतोच पण मला घरकामात मदत देखील करतो!! तू गेल्यावर खरी किंमत कळली गं तुझी त्याला ,पण कुठल्या तोंडाने येणार आता परत तुझ्याकडे? ती साडी नेसून दागिने घालून राधाताईंसमोर आली , राधाताईंनी तिला देवासमोर तिळगुळ आणि वाणवसा ठेऊन सुगडांची पूजा करायला सांगितली. तीही त्या सांगतील तसं करत गेली. पूजा झाल्यावर तिला स्वतःच्या हातानी तिळगुळ भरवत म्हणाल्या तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. आईsss तुमच्या हातचा तिळगुळ जगात भारी!! मला पण शिकवा ना!! अगं विशेष काही नाही गं सगळे करतात तसाच मी पण करते.काय लागतं माहितीय का मनातला गोडवा , आणि आपल्या माणसासाठी प्रेमानं करण्याची असलेली इच्छा. तो गोडवा गूळात आणि मायेची ऊब तीळात उतरते आणि ही चव तयार होते. किती छान दिसतीयस गं तू !! थांब हं दृष्टच काढते तुझी!! आई निघू मी ऑफिस ला उशीर होतोय हो हो नीघ नीघ! हा घे डबा गूळ पोळी दिलीय . आणि आता तो बदललाय गं!! तू ही तुझा विचार बदललास तर??? नातं घट्ट होण्यासाठी त्याचे धागे विखुरू द्यायचे नसतात गं!! एकाने तरी त्याची वीण बांधावी लागते ना!! एक संधी त्याला देशील का गं? माझ्यासाठी?? आई मी नीघू? बरं.. दार उघडून ती बाहेर पडताच तो समोर उभा होता. दोघांची नजरा नजर झाली आणि त्याच्या मनातले भाव तिने त्याच्या डोळ्यात वाचले. त्याची नजर सांगत होती तिला तू गेल्यापासून तुझ्या मनाप्रमाणेच वागतोय बरं मी. त्यादिवशी रागाच्या भरात बोललो तुला मी नको ते ,त्याचा खूप पश्चाताप होतोय गं आता मला! माझी चूक कळली गं! ती देखील नजरेतून बोलत होती मी ही जरा जास्तच राग केला रे एवढ्या तेवढ्या गोष्टींचा!! आणि सारख्याच सूचना करत होते मी तुला, ते तुला आवडत नव्हतं ना? म्हणून तू बाहेर बाहेर राहत होतास सारखा ,माझंही चुकलंच जरा!! मागे उभ्या राहिलेल्या राधाताई तिला म्हणाल्या आगं उशीर होतोय ना ऑफिस ला ? आणि तू गेला नाहीस ऑफिस ला? बरं असेच दारात उभे राहून एकमेकांना बघत बसणार आहात का? हो आई निघालेच , ती म्हणाली. बरं बरं उशीर झालाय ना तुला? त्यावर तो म्हणाला चाल मी सोडतो. तीही पटकन तयार झाली आणि म्हणाली आई संध्याकाळी लवकरच येते हं, हळदी कुंकाची तयारी करायला!! ते ऐकून तीळगुळाचा गोडवा राधाताईंच्या चेहऱ्यावर उतरला. ©अपर्णा...(ADP)

‘चिमुकलं’ जीवन

आगीच्या धुरा मध्ये गुदमरला श्वास नवा, सरकारी दवाखान्यात 'कधीतरी' बदल हवा, दहा नवजात जग हे सोडून गेले ढिसाळ सारी यंत्रणा त्यांनी हे दाखवून दिले, बाप धावत होता जन्माच्या दाखल्यासाठी, बाळ कधीच पोहोचले होते मरणाच्या काठी, आमची यंत्रणा इतकी आहे महान की, सटवाई देवी नशीब न लिहीताच परतली, दहा चिमुकल्यांच्या जीवन प्रवासाची कहाणी, सरकारी दवाखान्याच्या खोलीतच पुसटली, निरागस जीवांनी देवाला विचारले, सरकारी सुविधा कधी होतील 'पंचतारांकित'? 'देव' ही निरुत्तर झाले, बोलले निष्फळ आहे याबद्दल चे 'भाकित'

*****आणि लोखंडे काका ढसा ढसा रडले.

*.......आणि लोखंडे काका ढसा ढसा रडले* सकाळी जेवण करून ११ वाजता ऑफिसमध्ये आलो. केबिनचा दरवाजा उघडला, तर आत लोखंडे काका बसलेले दिसले. मी नमस्कार केला. काय काका, बऱ्याच दिवसांनी आलात. तर बोलले मी नेहमीच येतो रे, पण तुझे पाय कुठं एका जागेवर असतात. अगोदर सगळा महाराष्ट्र फिरायचास आणि आता मुंबईत जाऊन राहिलास. मी म्हटलं कधी आलात? निरोप पाठवला असता, तर मग मी लवकर खाली आलो असतो. अर्धा तास झाले तुझ्या ऑफिसमध्ये बसलोय. बाकी श्रीमंतांच्या घरातली आणि हातातली घड्याळं शोभेसाठीच असतात म्हणा. असू दे, असू दे मला तरी कुठं काय काम आहे? एवढं बोलून सकाळी सकाळी काकांनी मला क्लिन बोल्ड केले. मी म्हटलं काय काका, काय बोलता? मी आणि श्रीमंत? काका बोलले ते जाऊ दे, मी काय म्हणतो ते ऐक, म्हटलं बोला काका. तसा काकांना हुंदका आला आणि काका चक्क रडायला लागले. हे असे अचानक घडल्याने मी हडबडून गेलो. काका नक्की का रडताहेत काहीच कळेना. मनात नको नको त्या शंका यायला लागल्या. पण बोलणार कसे? मी म्हटलं काका, काका काय झालं काका? हुंदका आवरत, डोळे पुसत काका बोलले. सकाळी सकाळी ती भंडाऱ्याची दुर्घटना बातम्यांतून समजली. १० तान्ही बालकं, नुकतीच जन्मलेली, गुदमरून......पुढचं वाक्यही त्यांच्या तोंडून बाहेर पडले नाही. देव तरी किती निष्ठुर असेल रे, मारायचेच होते, तर जन्माला का घातले? मी म्हटलं काका, आता दोष तरी कुणाला द्यायचा? देवाला, व्यवस्थेला की नशिबाला? काका बोलले मानवाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. यात कोण दोषी आहे, कोण नाही, याची चौकशी होईल. कुणावर तरी जबाबदारी ढकलून कुणाला काही काळासाठी सस्पेंड केले जाईल, ते सगळे सोड. आपल्याला आज समजले आपण अजून दोन दिवस अश्रू गाळत बसू. पण त्या, त्या आई-बापांचे काय रे? अरे घरच्या दावणीवरील कालवड जन्माला आल्यानंतर थोडे दिवसांत गेली, तर तुझ्या काकीला आणि मला अन्न गोड लागत नव्हतं. आजही आठवलं तरी तुझ्या काकीच्या आणि माझ्या डोळ्यात पाणी येते. मग त्या तान्हुल्यांच्या आई-बापाचे काय होत असेल रे? कसं हे दुःख ते सहन करीत असतील? आईने ९ महिने पोटात वाढवलं. सगळी काळजी घेतली. चांगलं-चुंगल खाल्लं. स्वतःसाठी नाही रे, मी खाल्लं तर माझ्या बाळाला चांगलं पोषक दूध मिळेल. काय करायचं काय रे, तिने त्या दुधाचे? छाती पिळून ते दूध काढून रस्त्यावर ओतून द्यायचे? अरे तिला किती यातना होत असतील रे? बाळाचे ते मऊ लुसलुशीत ओठ कधी छातीला स्पर्श करतेत असे तिला झाले असेल आणि काळाने तिच्यावर असा आघात करावा? बातमी पाहिली आणि नाही राहवलं बघ. काकीला काही बोललो नाही, डोळे आणि उर भरून आला म्हणून थेट तुझ्याकडे आलो. एवढा वेळ मी फक्त शांत बसून काकांचे ऐकत होतो. निःशब्द झालो होतो. काय बोलावे तेच कळत नव्हते. काका बोलत होते, तसे प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते. जगात कोण कुणाचे दुःख हलके करतो? बातमी मी पण वाचली होती. मलाही दुःख झाले होते. पण ज्या भावनिकतेने काकांनी ती बातमी घेतली, त्यामुळे मी निःशब्द झालो होतो. काकांची अगतिकता मला कळत होती. पण मी ही अगतिक झालो होतो. काय बोलावे तेच समजत नव्हते. मी म्हटलं काका, सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात. काळ सगळ्या जखमा भरून काढतो. आपण काय करू शकतो? संवेदना प्रकट करणे आणि देवापुढे हात जोडणे. यापेक्षा आपल्या हातात काही नाही. काकाही बोलले परमेश्वराची इच्छा. मग मी कॉफी सांगितली. काकांनी आणि मी कॉफी घेतली आणि काका निघून गेले. पण मी मात्र अजूनही हळहळतच आहे. त्या १० माता-पित्यांच्या किंकाळ्या ऐकू येताहेत आणि हतबलता दिसून येतेय. हे खंडेराया त्या बालकांच्या आत्म्याला शांती दे आणि त्या अभागी माता-पित्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती दे. तसेच लवकरात लवकर त्या बालकांना परत त्यांच्या पोटी जन्म दे. एवढी प्रार्थना करून मी पुढील कामासाठी निघून गेलो. -किशोर बोराटे

गरज नसतांना..

गरज नसतांना का कोसळावा? पाऊस हा अवकाळी गरज नसतांना का कोसळाव्या? अश्रूधारा ह्या अवेळी अश्रू असो वा पाऊस अती झाला की चिखलच होतो नासधूस पिकांची अन् भावनांचा उद्रेक होतो.. अवकाळी हा पाऊस, होते सर्दी अन् ताप अंगात अवेळी ह्या अश्रूधारा, होते विचारांची गर्दी संताप अंगात बळीराजा 'तोल' साधून निसर्ग नियमांचे करतो पालन ते मन, आभाळाएवढे दुःखाश्रू गिळतो रोजच आपण निसर्गाचा समतोल न साधावा आपण, प्रत्येक कौल मानावा आपलाच,'अवकाळीचे' ही करावे स्वागत.. मन तसेच किती धरावा धीर आपण भावनांना द्यावी करुन वाट मोकळी, अवेळी अश्रूंचेही गावे नव गीत

जेव्हा कोणी तिला विचारते…

जेव्हा कोणी तिला विचारते काय ग आता तुला काय वाटते तेव्हा हलकेच तिच्या मनात विचार डोकावून जातात आणि सासर माहेर यांची जुगलबंदी सुरू होते.. जेव्हा घरात ती काही बनवते ते सगळ्यांसाठी असते ... त्यातही तिला तिचा वाटा तळालाच कुठंतरी मिळतो.. दुसरे कोणी केले तर मात्र कधी रिकाम भांडेच तिच्या वाट्याला येते..तेव्हा तिला ते सासर वाटते आणि माहेर आठवते.. जेव्हा ती दुसऱ्यांना हसताना ,खेळताना,बागडताना बघते आणि तिच्या हसण्यावर, बसण्यावर,खेळण्यावर आणि कधीकाळी झोपण्यावर सून असल्याचा शिक्का लागतो आणि तिचे मोकळे हसू तिथेच खुंटते तेव्हा तिला ते सासर वाटते आणि माहेर आठवते... जेव्हा तिला आवडीचे काही खाण्याची इच्छा होते पण वेळेची आणि खायच्या सामानाच्या किमितींची जाणीव करू दिली जाते तेव्हा ते सासर वाटते आणि माहेर आठवते... जेव्हा आईने शिकवलेला स्वयंपाक ती करते पण त्या नाही याच पद्धतीने कर तरच चांगले होते असे वारंवर सांगितले जाते तेव्हा तिला ते सासर वाटते आणि माहेर आठवते.. जेव्हा घरात तिला न आवडणाऱ्या च भाज्या बनतात आणि आत्तापर्यंत नाक तोंड मुरडणारी ती गुमान ताटात आलेले (स्वतःच वाढून घेतलेले ) उसने हसू आणून संपवते.. आपले लाड पुरवायला, हट्ट करायला इथे आपले आई वडील नाही याची जाणीव त्यावेळी तिला होते तेव्हा ते सासर वाटते आणि माहेर आठवते... जेव्हा आई वडिलांनी रक्ताचे पाणी करुन शिकवलेली ती पण तिच्या पेश्यावर शिक्षणावर तीच्या कर्तृत्वावर नवीन आलेले कोणी प्रश्नचिन्ह उभे करते आणि बोलायचे असते पण आईवडिलांचे संस्कार आठवून मूग गिळून गप्प बसते तेव्हा ते सासर वाटते आणि माहेर आठवते... तिच्यासमोर जेव्हा तिच्या आयुष्याच्या जोडीदाराला आणि भावंडाना आवडीचे खाण्यासाठी आग्रह केला जातो .. त्यांना आवडते म्हणून ते राखून ठेवले जाते पण तिला मात्र फक्त गृहीत धरले जाते .. तेव्हा ते सासर वाटते आणि सतत खाण्यासाठी आग्रह करणारी हवे आवडीचे करून खायला घालणारी आई आठवते.... एखादी गोष्ट आवडल्या वर अग तू घे चल मी तुला गिफ्ट करतो.. अजून काही हवंय का असे विचारणारे कोणी नसते तेव्हा ते सासर वाटते आणि माहेरतला भाऊ आठवतो.. जेव्हा रुसून बसल्यावर थोड तरी खा अस म्हणायला कोणीच नसते .. काही त्रास झाल्यावर बाळा तुला बरं वाटतं नाही का अस विचारायला कुणीच नसते .. कोणी काही बोलले का अस म्हणून दुःखी मूड गेलेला चेहरा ओळखणारे कोणीच नसते तेव्हा ते सासर वाटते आणि स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपणारा ..तोंड भरून कौतुक करणारा .. वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणारा आणि आईवडील गेले तरी डोळ्यातले पाणी न दाखवणारा मात्र लेकीच्या लग्नात तिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडणारा बाप आठवतो... अश्या या माहेर आणि सासर ची सांगड घालून ती चालत राहते ..लोक म्हणतात की स्त्रीने माहेरचे नाव जास्त घेऊ नये पण त्यांना काय माहित..तिच्या नवीन आयुष्याच्या वाटेवर जेव्हा तिचा मार्ग शोधायचा प्रयत्न करत असते तेव्हा तिला तोच आधार वाटत असतो.. त्याच आठवणी मनाला ओलावा देत असतात आणि म्हणून मुलींना माहेरचा हव्यास असतो.... -Sunshine(Kirti)

यशोदय..

यशोदय... दिवस सुखाचे जातात उलटून जशी कॅलेंडर ची पानेच जणू.. रात्री खेळतात अमावस्या- पौर्णिमेचा खेळ पृथ्वी,सूर्य,चंद्र,तारे यांचा असतो का कधी मेळ.? मग माणसेच का करतात नात्यांची दहिमिसळ आणि विचारांची भेळ ? वर्ष सुद्धा थांबत नाही कोणासाठी, मग आपणच का वाट पहात बसावे गेलेल्यांसाठी..? जे घडून गेले ते तेव्हाच संपले तरी का लागतात आशेचे पाणावलेले डोळे वाटेकडे.? ज्या वाटेवर वर्षानुवर्षे चपला झिजवून उमटलेल्या पाऊलखुणांमध्ये आयुष्याची वाट तुडवण्यासाठी केलेला संघर्ष डोकावतो.. तोच संघर्ष करण्यासाठी आपणही कोणाची, हवे ते न मिळालेल्या गोष्टीची वाट बघणे सोडून,दिसते ती वाट धरून प्रवास का चालू करू नये.? कदाचित पुढे गेल्यावर असा एखादा चौक लागेल जिथे कधी आठवणही येणार नाही गेलेल्या लोकांची,मेलेल्या इच्छांची कारण त्या भूतकाळातील मळलेल्या वाटांपेक्षा कष्टाने तुडवलेला हा राजमार्ग कितीतरी सुखाचा वाटेल.. आणि आपल्या विधात्याने नियोजल्यामुळेच ते आता सोबत नाहीत,त्यांचा स्वार्थ आणि त्या स्वार्थामुळे आपल्या आयुष्यातील त्यांचे अस्तित्व य सगळ्याला तेव्हाच फाटा दिला असेल याची अनुभूती व्हावी.. पण आपल्याला कुठे आलीय एवढी दूरदृष्टी क्षणिक सुखाचे दुःख कुरवाळत बसणारे आपण ..? कशाला पहावे भूतकाळातील अंधाराकडे, जेव्हा भविष्यातील उजेडाचा झगमगाट समोर खुणावतो आहे.. जिथे गरज आहे फक्त कष्टाचा प्रवास पूर्ण करण्याची.. द्यावे सोडून सगळे हेवे दावे गेलेल्या माणसांना, आठवणींना बगल देऊन करू सुरुवात नवीन वाट तुडवायला जिथे वर्षाने पुन्हा एकदा उघडी होतील नवीन कवाड ,चमचमणारे यश दाखवायला देतील वाट जायला तेच यश कवेत घ्यायला.. आपणही खेळ खेळू जरा दुःखाचे ऊन आणि सुखाच्या सावल्यांचा.. आणि थकल्यावर घेऊ विसावा एका मोठ्या सावलीचा , आयुष्याच्या संध्याकाळी....😊 - Sunshine (डॉ. किर्ती)

प्रेम

या मनांवर शतदा प्रेम करावे:डॉ. अनिल कुलकर्णी

या मनांवर शतदा प्रेम करावे... डॉ.अनिल कुलकर्णी. मनाचा खेळ कधी कुणाला समजलेंत. स्वतःच्या मनाचे खेळ सुद्धा स्वतःला समजत नाहीत. आत्महत्या करणाऱ्या च्या हातातच असतो मनाचे खेळ थांबवण्याचा लगाम. कधी कधी परिस्थिती प्रवृत्त करते, कधी कधी मनंच मनांला प्रवृत्त करतं. कॅनव्हास वर मनसोक्त रंगाची उधळण करत सुंदर चित्र काढता येतं. सुंदर क्षणांची उधळण करुन वेगळे वेगळे क्षण सभोवताली गोळा करता येतात. क्षणांची रांगोळी काढून, मनासारखे रंग भरता यायला हवेंत. चित्र पुसता येतें, रांगोळी ही पुसता येतें. क्षणांना पुसलं कीआयुष्य संपतं. सुखाचा इंद्रधनू पाहायचा असतो, अनुभवायचा असतो, बघायचा असतो, तो ओरबडायचां नसतो. सुख ही अनेकरंगी असतं. प्रत्येक रंग माणसाला ओरबाडून हवां आहे. सत्ता, कीर्ती, पैसा वासना, प्रेम,समाधान, यश हे सगळं यशाच्या इंद्रधनूंत असतं. एका वेळेस एकच मिळेल व ते भोगावं. आत्महत्या करणारे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यशस्वी असतांतच. यशानंतर दोन रस्ते असतात,समाधान व नैराश्य. नैराश्याच्या रस्त्यावर आत्महत्या भेटतें. यशोशिखरावर असणारे जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा खरंच समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण होते. मन ही आवाक्यात न राहाणारी गोष्ट आहे. माणसे उन्मत्त होई पर्यंत मनाचं ऐकत राहतात. मनाच्या खेळावर ज्याचं नियंत्रण आहे, तोच उत्तम आणि यशस्वी जीवन जगू शकतो. मन आवाक्यात नसलें की मनात अनेक समस्या घर करतात. मनाला कळणं आणि वळणं याचा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. कुणाचं मन कुणावर जडेल याचे काही ठोकताळे नाहीत.प्रत्येक क्षण विविध रंगात न्हाऊन निघालेला असतों आणि तोच मनाचं अस्तित्व टिकवून ठेवतो. 'दुखी मन मेरे जहा नही चैना वहा नही रहेना' असं म्हणलंच आहे. क्षणांना जिंकलं की आयुष्य आपलंच असतं.क्षणांना जिंकता यायला हवं. तुमचा अखेरचा श्वास ठरवतो क्षणंच. मनातल्या तरंगावर आपलं नियंत्रण नसतं. तरंग आपले नसले तरीही अंतरंग आपलंच असतं.आपल्या अंतरंगात आपण कधी डोकावतंच नाही, आपण नेहमी दुसऱ्याच्या अंतरंगात डोकावून तुलना करत बसतो. तुलना तुमच्या मनाला जाळतें तुमच्या मनाची राख करतें. सारखंआरशात पाहून चित्र बदलत नाही. वारसा आणि कर्तुत्व हातात हात घालून आले तर तरच आरसा दखल घेतो.मनाचा थांगपत्ता लागू न देण्यात माणसा सारखा माणसाचा हात कोणीच धरू शकत नाही.चेहरे व मुखवट यांचे नियोजन कधीच एकमेकांना पूरक नसतं. मुखवट्याची ब्लु प्रिंट चेहरा कधीही बदलू शकतो. चेहऱ्याचा नियोजन मुखवट्या शिवाय अंमलात येऊच शकत नाही. खरा चेहरा उघडकीला येऊ नये म्हणून मुखवटे तारे वरची कसरत करतात. माणसं सगळं उघड़ करतील, पण मन उघड करण्याची लक्ष्मण रेषा कधीच ओलांडत नाहीत. मृत्यूनंतरही माणसाच्या मनातलं कळत नाही. शरीराने जवळ येणारे मनाने रत होतांतच असं नाही. मन खुंटीला टांगलं की माणसं मनां सारखं वागायला लागतात. मनाला विसावण्यासाठी आश्वासक खांद्याची गरज असतें. पाय धरणारे व्यक्तिमत्व व विश्वासाने विसावणारे खांदे आज दुर्मिळ झाले आहेत. मानवी संबंधाचा सगळा इतिहास मनातलं ओठावर न आल्यामुळे झाला आहे. मनानें ठरवलं तर काही होऊ शकतं.आपल्याच मनाचं विश्लेषण आपल्याला करता येत नाही. आपण दुसऱ्याच्या मनातलें विश्लेष,ण करू शकतों कां?माणसे स्वतःच्या मनावर प्रेम करतच नाहीत, स्वतःच्या मनाला गोंजारततच नाहीत. स्वतःच्या मनाला वेळ देत नाहीत नेहमी उपेक्षेने, तिरस्काराने मनाचे खच्चिकरण झाल्यावर नैराश्य येणार नाही तर काय? मनाला वेळ देण्यासाठी स्वतःला वेळ काढला पाहिजे. सगळ्यांना जगाची चिंता, मालिकेतल्या पात्रांची चिंता पण घरातल्यांची व स्वतःच्या मनाची चिंता नाही.आई कुठे काय करते ऐवजी स्वतः आपण काय करतो, स्वतःसाठी, मित्रांसाठी हे मनात डोकावून पाहणे गरजेचे आहे. जगायला माणसांना वेळ नाहीच. कुटुंबासाठी ते नाही नाही ते करतील, नको नको त्या गोष्टी घरात आणून ठेवतील. भौतिक समृद्धता आणण्यासाठी स्वतःच्या मनाचा कोंडमारा करतील.घरच्या माणसांना वेळ हवा, संवाद हवा आणि तेच नेमकं चुकतय. मुलांना खेळणी घेऊन देणारें पालक मुलांच्या मनाशी व मुलांशी किती खेळतात? बायकोला फ्लॅट घेण्याच्या नादात स्वतः फ्लॅट होतात. बायकोला हवा असतो फक्त गजरा व संवाद. मनं जिंकायची आयुधं फार वेगळी असतांत. मन प्रसन्न करां हे ठिक आहे, पण सभोवताली तसां निसर्ग हवां, तसं सौंदर्य हवं, तसं समाधान हवं. मन चांगलं ठेवां व चांगल्या मनाच्या माणसाच्या सोबत रहा, मनाचे काहीच प्रश्न राहणार नाहीत. कुणाचे मनाने वाईट चिंतू नका. माणसांची बरीच शक्ती जळण्यात जातें जळणं स्वतःला संपवतं ईतरा वर जळण्यांत स्वतःच्या मनाची स्मशानभूमी कधी होते हे माणसाच्या लक्षातंच येत नाही. मन पतंगासारखं भर करटतं, त्याला नियंत्रणात ठेवणें महत्त्वाचं असत. मनासारखे खांदे मिळणं हेच आयुष्याच संचित.शेवटचे चार खांदे तरी आपल्या कुठें हातातअसतात?्र््र्््र््र््र््र््र्र्र््र्््र््र््र््र््र्

माझा स्वाभिमान

मी कधीच न विकला माझा स्वाभिमान मी कधीच न दुखावला कोणाचाच स्वाभिमान माझे जीवन अन् जपतो मी सदैव माझा स्वाभिमान ठेच लागता वाहते रक्त, मला माझ्या रक्ताचा अभिमान गल्ली-बोळात नाही मिरवत मी रिकामी शान मला माझा, माझ्या अस्तित्वाचाच आहे स्वाभिमान आज-काल पैसाच झाला आहे प्रत्येकाचा अभिमान पैशानीच विक्री-खरेदी होतो प्रत्येकाचा स्वाभिमान जे स्वातंत्र्य म्हणून करतात चाकरी आजही जे स्वातंत्र्य मिळवून खातात लाचारीची भाकरी आजही जिथे नाही भेटत मान आणि खाली घालावी लागते मान.. तिथे का कोणी करावी चाकरी? आणि का विकावा पुन्हा पुन्हा स्वाभिमान। कवी -क.दि.रेगे नाशिक

अस्तित्वाच्या पाऊलखुणा: डॉ.अनिल कुलकर्णी

अस्तित्वाच्या पाउलखुणा: डॉ अनिल कुलकर्णी. प्रत्येकाला वाटतं आपल्या अस्तित्वाची कोणीतरी नोंद घ्यावी. जाणीव झाल्यापासून माणसं स्वतःला इतकी जपतात की आपल्याच विश्वात जगतात. अस्तित्व टिकवण्यासाठी व दाखवण्यासाठी माणसें काही ही करतात. अस्तित्वाला हादरें बसल्याशिवाय माणसें सुधारत नाहीत. पाण्याला सुद्धा वाटतं आपल्या तरंगाची दखल घ्यावी, तसंच मनाला ही वाटतं आपल्या विचारांची दखल कुणीतरी घ्यावी. बेदखल नैराश्य घेऊन येतं आणि दखल आशा घेऊन येतं.अस्तित्वं ठरवतं आपलं व्यक्तिमत्वं. नोंद नसेल तर अस्तित्वाला अर्थ नाहीं. रानफुलांची नोंद कोण घेतं? केवळ निर्माल्यां साठीच फुलायचं नसतं. निर्माल्य पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर चा प्रवास ठरवतों अस्तित्व. फुलणं ते निर्माल्य होणें यामधील प्रवास म्हणजेच जीवन.फुलालां कुठे माहित असतं फुलल्यानंतर त्याला चुरगाळलं जातं कां एखाद्या सौंदर्यवतिच्या केसात माळलं जातं, कां चितेवर रवानगी केलं जातं. प्रत्येक टप्प्याचा अनुभव वेगळां पण तो घेण्यासाठीच फुल निर्माल्य होईपर्यंत तग धरतंच. आपल्या अस्तित्वाचं वलय विस्तारलं जावं असं प्रत्येकाला वाटतं. बिंदूला ही वाटतं वर्तुळ ही मोठं व्हावं,विशालव्हावं. अस्तित्वाचा प्रत्येक टप्पा सुखद करण्यासाठी माणूस धडपडत असतो. अस्तित्व श्वासाबरोबर येतं आणि श्वासाबरोबर जातं, पण अस्तित्वाच्या खुणा मृत्यूनंतर ही शिल्लकराहतात. पृथ्वीवरच्या माणसांना चंद्राच्या साक्षीचं अप्रूप असतं आणि म्हणून पृथ्वीवरच्या माणसांनी चंद्रावर आपल्या पाऊलखुणा उमटवल्या. माणसें जिवंतपणीच अस्तित्वा साठीच धडपडत नाहीत तर मृत्यूनंतरही आपलं अस्तित्व कायम राहावं म्हणून धडपडत असतात. प्रत्येकाचं अस्तित्व ठरलेलं असतं, तेवढ्या काळात जगायचं आणि जगवायचं. प्रत्येक क्षणाला अस्तित्व असतं. प्रत्येक क्षण माणूस अस्तित्वासाठी जगतो.क्षणांची मालिका ठरवते अस्तित्व. आपलं अस्तित्व तर केवळ आपल्या हातात असतं असं नाही तर ते दुसऱ्यांच्या ही हातात असतं. अस्तित्वाला आव्हान दिलं की अस्तित्व तावून सुलाखून निघतं. कुणाच्या तरी मनात आपल्याला, आपल्या अस्तित्वाला स्थान असावं असं प्रत्येकाला वाटतं. आपल्याच अस्तित्त्वाची आपल्याला जाणीव नसतें. प्रसंगानुरुप काही गोष्टी अस्तित्व सिद्ध करतात. अस्तित्व हे अनुवंशिकतेंच देणंआहेच, पण अंगावरच्या दागिन्या प्रमाणे स्वतःचं अस्तित्व समृद्ध ही करायचं असतं. आनुवंशिकतेतून गोड गळा मिळेल पण रियाज करून अस्तित्व टिकवावं लागतं. संधी मिळाली की अस्तित्व बहरतं. कापलेल्या वृक्षातूनही अंकुर आपले अस्तित्व दाखवंत. खडकातही बिज अंकुरतं. अस्तित्वाच्या पाऊलखुणांची पाऊलवाटच ठरवतें तुमचंं अस्तित्व. डॉ.अनिल कुलकर्णी.

दिल-विल,प्यार-व्यार मैं क्या जानूँ रे?

दिल-विल, प्यार-व्यार मैं क्या जानूँ रे? का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे? उमलती कश्या धुंद भावना, अल्लड वाटे कसे? 'प्रेम' ही अशी भावना आहे की कोणत्या क्षणी मन हरवून जाईल हे सांगता येत नाही. आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर प्रेमाची धुंद भावना मनाला भुरळ घालतच असते. पण आजकालचे प्रेम 'दिल-विल, प्यार-व्यार मैं क्या जानूँ रे'? अश्या स्वरूपात पहावयास मिळते कारण इश्क, मोहब्बतची शायरी करत करत, एकतर्फी प्रेमाच्या नशेत देवदास बनणारी जनरेशन "तूम मेरी नहीं तो और किसीं की भी नहीं" म्हणत 'लव-लोचा' पर्यंत कधी पोहचली हे लक्षात ही आले नाही. एक काळ असा होता की नुसत्या नजरेनं फुलणाऱ्या गुलाबी प्रेमातही मजा वाटत होती. नुसत्या नजरेच्या इशाऱ्याने तिला चोरून खुणवणे, त्याच्याशी नजरानजर होताच तिचं ते चोरून लाजणं किंवा मनातल्या मनातच तिच्यावर प्रेम करणे, हे सारचं प्रत्येकाला सुखावणार वाटायचं. पण काळ बदलला आणि प्रेम व्यक्त करण्याची भाषा ही बदलली. गुलाबी प्रेमाच्या नजरेची भाषा आता मोबाईलमधल्या स्माईलज् व ईमोजीने तर घेतलीच आहे शिवाय नकळत फुलणाऱ्या प्रेमाचे अनेक नवीन प्रकार ही सध्या पाहायला मिळतायत जसे- जस्ट फ्रेंडस्, हेल्दी फ्लर्टिंग, ऑनलाईन डेटिंग, कमिटेड रिलेशनशिप, लाँगडिस्टन्स रिलेशनशिप, फ्रेंडस् विथ बेनिफिट्स, हूकअपस्, वन नाईट स्टँड, लिव-इन रिलेशनशिप अशी भली मोठी न संपणारी लिस्ट ऐकूनच चकित व्हायला होते. सतत व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिंडर सारख्या डेंटिग एपच्या माध्यमातून स्माईलीज् , ईमोजी, मीम्स् पाठवत, आजकालच्या प्रेमाच्या भावना कृत्रिम तर झाल्या नाहीत ना? पण ह्या सगळ्या प्रकारातून खरं प्रेम अनुभवायला मिळते का? प्रेम म्हणजे फक्त दिवस-रात्र संपर्कात राहणं, सतत मेसेजेस्, फोन कॉल्स, व्हिडीओ कॉल्स. सतत सरप्राईज-गिफ्ट देणं, कुठेतरी फिरायला जाण हे म्हणजे प्रेम आणि समजा असं काही झालं नाही तर एका क्षणात ब्रेकअप. प्रेम म्हणजे विश्वास, त्याग, सहनशीलता, संयम! प्रेम म्हणजे आनंद देणं, जोडीदाराला सुखात ठेवणं, त्याची काळजी घेणं, प्रसंगी त्याला मानसिक आधार देणं, ह्याची जाणीव ह्या न्यू जनरेशनला करून दिली जाते का? शिक्षण, करियर, पैसा एवढीच स्वप्नं लहानपणापासून दाखवण म्हणजेच पालकत्व समजल जात का? मग आजकालच्या पिढीला आदर, माया, प्रेम उरलच नाही म्हणत, त्यांना दोष देत, त्यांच्यावर खापर फोडण्यातच तर आपण धन्यता मानत नाही ना? इंटरनेटच्या मायापाशात नव्या पिढीचं आयुष्य गुरफटत चाललं आहे मग बाकीची नाती, मैत्री, प्रेम ह्या भावना जपायला त्यांना वेळ तरी आहे का? सतत आभासी दुनियेत राहायची सवय लागल्यावर नवरा-बायकोच्या नात्यातले प्रेमाचे रंग तरी किती दिवस टिकतात? पण म्हणून काही प्रेम संपत नाही. मनात साचलेल प्रेम कधी फ्लर्टिंग, फ्रेंडशिप, तर कधी रिलेशनशिपच्या माध्यमातून उफाळून येतेच. कारण किती ही व्यस्त आयुष्य असले तरी प्रेम फुलायला वेळ काढायला हवा. नकळत हळूवार फुलत जाणार प्रेम आज सोशल मीडियाच्या वलयात, सेल्फी काढत-काढत सेल्फीश कधी झाल हे समजलच नाही. कारण सध्या वाढलेले घटस्फोटाचे प्रमाण, लिव्ह-इनची वाढती क्रेज, तसेच सिंगल राहणाऱ्यांच वाढलेले प्रमाण हे सगळे कशाचे परिणाम आहेत? आजकाल लग्नाचा निर्णय लांबवताना सतत दिली जाणारी करियरची कारणं हे कश्याच घोतक आहे? सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेली आत्ताची जनरेशन ऑनलाईन प्रेमाच्या रंगीन दुनियेत हरवलेली असते ह्या बद्दल फ़क्त ताशेरे ओढत मुलांना दोष देऊन समस्या सुटणार आहे का? खरं तर टाईमपास करत करत इंटरनेटच्या जाळ्यात फसलेल त्यांचं प्रेम किती सुख देत, हा प्रश्नच आहे. ह्या जनरेशनला सहवासात फुलत गेलेलं खरं प्रेम कधी अनुभवायला मिळेल का, याचीच खंत वाटते. मग व्हॅलेंटाईन-डे च्या निमित्ताने ऑनलाईन प्रेमाच्या मृगजळात गुरफटलेल्या न्यू जनरेशनला आपला अमूल्य वेळ देऊन संयम व सहवासाने फुलणाऱ्या प्रेमाचं गुपीत सांगूयात. सायली दिवाकर,

आई होणार मी

मज डोहाळे लागले चिमुकल्याच्या आगमनाचे मज डोहाळे लागले स्त्रीत्वाची ओळख खरी माझी मला पटली मातृत्वाची सुंदर देणगी निसर्गाने मला दिली नऊ महिने नऊ दिवस वाट मी पाहते मज बाळाची वेदना संवेदना भावना माझ्या जपते, होणार आई मी बाळाची बाळाच्या बाबांनी दिली मज ही भेट प्रेमाने बाबा बाळाचे मिरवतात फुशारकी अभिमानाने डोहाळे आजी-आजोबांनाही लागले म्हातारपनीची काठी अन् बोबडे बोल ऐकू येऊ लागले नवनवीन नाते घेऊन येणार बाळ माझे मज डोहाळे लागले चिमुकल्याच्या आगमनाचे मज डोहाळे लागले। कवी - क.दि.रेगे नाशिक

तक्रार ( कविता)

कोणाची करावी आणि का करावी तक्रार? कोणाकडे करावी आणि किती वेळेस करावी तक्रार? स्वतःचीच स्वतःकडे करावी का तक्रार? सगळ्यांचीच सगळ्यांकडे करावी तक्रार? किती किती असतात तक्रारी ! संपता संपत नाही या तक्रारी ! प्रत्येक नात्यात असतात एकमेकांविषयी तक्रारी छोट्या छोट्या किंवा मोठ मोठ्या असतात तक्रारी समुहा समुहात आमच्या तुमच्यात गावा गावात शहरा शहरात माणसा माणसात फक्त एकच सूर तक्रार.. स्वभावच झाला आहे आमचा.., आम्ही काम कमी आणि तक्रारी जास्त, प्रेम कमी आणि तक्रारी जास्त विश्वास कमी आणि तक्रारी जास्त बंद करा जीवनातल्या तक्रारींवर चर्चा काम करा, प्रेम करा.. हसत खेळत जगत तक्रार शून्य आयुष्य जगा...!!! कवी - क.दि.रेगे

प्रेमाची व्याख्या

प्रेमाची व्याख्या प्रेम हे एका शब्दापुरती मर्यादित नसतं तर प्रेमाची व्याख्या ही अमर्यादित असते.प्रेम म्हणजे फक्त प्रियकर आणि प्रेयसीमधलच नसतं.प्रेम हे सगळ्याच नात्यांचा आधार असतो.प्रेम हे साय्राच नात्यांची सुरूवात असते.प्रेमामुळे नाती घडतातही आणि टिकतातही.प्रेम म्हणजे जिव्हाळा,आपुलकी,विश्वास आणि माणुसकी असते.माणुसकी ही तर प्रेमाची अनुभुती असते.प्रेमामुळे मन जिंकता येतं,ह्रदय जिंकता येतं आणि सारं जगही जिंकता येतं.प्रेम हे फक्त माणसांपुरतीच मर्यादित नसतं.प्रेम हे प्रत्येक प्राणिमात्रांवरचं,निसर्गावरचं,गोष्टींवरचं,वस्तूंवरचं पण तितकच महत्वाचं असतं.प्रेम हे चिरकाल असतं.प्रेमाला मर्यादा नसते.प्रेम हे अमर्याद असते.जीवनात प्रेम हे महत्वाचे असते.प्रत्येकाने प्रत्येकाने प्रेमाने वागले पाहिजे. प्रेमाने मन फुलते आणि जीवन बहरते. -सुप्रिया तेंडुलकर-

मन

"मन"... माणसाचं माणूसपण जपणारं मनं,भावनांनी ओथंबून वाहणारं मनं,भावनेच्या आहारी जाऊन वेडेपणा करायला लावणारं मनं,आणि एखाद्या निवांतक्षणी त्या वेडेपणावर हसणारही मनचं. का हे मन असे करतं....? का या मनाला एवढे कंगोरे असतात....?,मन एवढं गोड का असतं....? खरंच प्रश्न विचारणारही मन आणि त्याचं उत्तर शोधणारही मनचं. आज हे मन एकाला शोधतयं अगदी स्वतःला हरवून तो चेहरा खूप जुनी ओळख सांगतोय,ते डोळे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध जपणारे,ते ओठांवरील हास्य तू माझाच आहेस हे पटवून देणारं... का आज असं मन भरकटतेय....?कुठं चाललयं आज मन....? काय आहे आज मनाच्या मनात....? खरचं ह्या तुफानात स्वतःची ओळख हरवणारही मन,आणि स्वतःची ओळख जपण्यासाठी धडपडणारही मनचं...! आज एक स्वप्न पाहिलं त्या स्वप्नातही फक्त तूच माझ्याजवळ असल्यासारखी वाटलीस.पण स्वप्नच ते ....कधी तरी भंगणारच....तरीही अवतीभवती कुठेतरी तू आहेस हे सांगणारही मनचं ,का हे मन अशी स्वप्न दाखवत....? का ह्या स्वप्नांच्या मागे मागे पळतं....? आणि का हे मन त्या स्वप्नांचे तुकडे तुकडे करतं....? खरंच मन तोडणारही मन आणि मनाचे तुकडे झाल्यावर मनाची समजूत घालणारही मनचं..! खूप काही सांगायचं आहे तुला पण हे बोल ओठांवर येतच नाहीत.छळत राहतात मनातल्या मनात...उगाचच...या वेड्या मनाला...!मला माहित आहे माझीच आहेस तू.पण का कोणास ठाऊक दोघांमध्ये एक अंतर आहे कधीही पार न करता येण्यासारखं.का भास निर्माण होतात हे...? का ह्या मृगजळामागे धावतं हे मन....? तु माझी आहेस हा भास निर्माण करणारही मन आणि त्या भासातून भानावर आणणारं देखील मनचं.....! शब्दसारथी निलेश बाबर

आई कुठे काय करते..!

"आई कुठे काय करते"..! "माझं बाळ माझं बाळ म्हणत हाडाची काड करते., लेकराबाळांच्या सुखासाठी रात्रंदिन मरमर मरते..! उठल्यापासुन झोपे पर्यंत सर्व कामे आई करते.., आणि जन्म दिला म्हणून आपले संगोपन करते. बसं एवढचं ना..! अगदी बरोबर..मग जावून का नाही विचारत एखाद्या आई विना अनाथ मुलाला..? की,जीवनात.. "आई कुठे काय करते"..? पण मित्रांनो,आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आईच आपल्या घराचा,जीवनाचा,परिवाराचा खरा आधारवड असते. आईच आपल्या सुखाचं पहिलं आणि शेवटचं पानं असते.आईच आपल्या आयुष्यातील सकाळच्या व संध्याकाळच्या अडीच इंच भुकेतील पोटाचा अग्नी शांत करणारी चूल असते.आईच घरातल्या प्रत्येकासाठी निर्वीवादपणे केलेली प्रार्थना स्वकीयांसाठी समर्पीत करणारी निस्वार्थी गृहीणी असते.आईच नवरा आणि सासू यांंच्यातील जोडणार्या सेतूवर अगदी तारेवरील कसरत करण्याईतपत कठोर प्रवास असूनही त्यातही अगदी सहजतेने समतोल राखत आपला संसार सर्वांच्या आपुलकीने फुलवणारी राणी असते.आईच कुरूपता धारण करून प्रत्येक क्षणाला विचार बुद्धीने सौंदर्य प्राप्ती करणारी युनिव्हर्स असते.आईच पहाटे समयी धरणी मातेला सडा घालून तृप्त करणारी गृहदेवता असते.आईच धरणीमातेला रांगोळी घालून सौंदर्याचा एक पवित्र ठेवा बहाल करून पहाटेच्या कोवळ्या काळोखात लुप्त जाणारी चांदणी असते.आईच प्रत्येक लेकराच्या मनातलं ओठांवर येण्याआधी मायाळू नजरेन हेरलेलं मुखात घालवणारी वात्सल्य मूर्ती असते. हो..खरचं तिच्यामुळेच आपल्या सिमेंटच्या,पत्राच्या,मातीच्या गोकुळाला प्राण असतो. तुमच्या मते,भलेही सकाळचा सूर्य आकाशात उजडत असेल.परंतु आपल्यासाठी तीच आनंदाने प्रत्येक सकाळ उजाडणारी,तळपणारी सूर्यदायिनी असते. जसं खाण्याच्या प्रत्येक पदार्थाला मिठाची सोबत दिल्यावर तो पदार्थ खातांना परिपूर्ण चव देतो ना..मग तशीच चव आपली आई आपल्या जीवनाला देत असते. खरतरं,आईशिवाय,आईच्या प्रेमाशिवाय सगळी सृष्टी अपूर्ण आहे,शुन्य आहे. कदाचीत तुम्हाला माहीत आहे की नाही,मला माहीत नाही..,पण जसं शनिदेवाची आई संध्याचं प्रतिरूप छाया होती.कृष्णाची माता देवकी होती,पालनपोषण करणारी यशोदा देखील आईच होती.तशी आपली आई ही आपल्यालाच जीव लावणारी आपली आई असते.तुम्हाला सांगू..,अगदी पैसे देऊन तुम्ही बाजारात कुठेही जरी गेलात ना..तरी तुम्हाला आईसारखं निस्सीम प्रेम,ममता आणि वात्सल्य हुडकूनही मिळणार नाही.खरतरं,आईची सेवाशुश्रूषा करणारा धन्यच असतो..पण या जमान्यात तरी सगळेच श्रावणबाळ होऊ शकत नाही.म्हणूनच म्हणतो,आईची अंगाई,आईची आपल्याविषयी असलेली काळजी हे आपल्यासाठी खुप मोठे लाखमोलाचे साम्राज्य असते.खरतरं,आईचे महत्व हे प्रत्येकाला लग्नानंतर कळते. ( मुलाला,बायकोच्या स्वरूपात आणि मुलीला सासूच्या स्वरूपात ) तिला नकळत आपण किती त्रास द्यायचो,कामाचा ताण द्यायचो.पण मित्रांनो,आई आपल्यासाठी जेवढं करते ना तेवढं आपण तिच्यासाठी किंवा तिच्याएवढं कधीच करू शकणार नाही.ती नेहमीच कामाला आपल्या हातात घेऊन आपल्यावरच संस्कारांची बीजे रोवत असते.ती एक गृहीणी असून देखील आयुष्यातल्या कुठल्याही कामाला कधीच सुट्टी घेत नसते.ती कधीच थकत नसते.ती कधीच कुठल्याही कामाचा मोबदला मागत नसते.किंवा ती कधीच एखाद्या किनार्यावर,सूर्यास्ताची संध्याकाळ साजरी करत नसते.ती कधीच सेल्फीच फ्याडही मानत नसते.या उलट ती सणा-सुदीच्या काळात एकत्र जमून आपल्या नात्यात जर एकोपा निर्माण होत असेल तर कोणताही भेदभाव न करता समान भावनेने या सर्वात सामील होते आणि मग आपल्या कुटूंबाला आनंदाने पोट भरून जेवतांना बघून तीचे पोटं गच्च भरून जाते. आता तुम्ही म्हणाल., हे सगळं जुन्या विचाराचं आहे. जुन्या परंपरेचं आहे. कलियुगात तर आता सगळं डिजीटल झालं आहे,सगळं फिंगरटिपवर मिळते आहे.पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा..यात आईचे प्रेम,आईची माया नाही. शेवटी 'आई ही आईचं' असते. ती आपल्यासाठी जीवनात खुप काही करते..तिच्यामुळेच आपण हे जग पाहू शकतो..! खरचं..मला तर अजूनही विशेष वाटते.. आपुलकीची उब देणारी आणि दिवस रात्र आपल्यासाठी चूल पेटवणारी "आई खुप काही करते"..! आकाश दिपक महालपूरे मो.नं..7588397772

प्रेम

सुरवात झाली की किती उत्साह असतो , मग ती कसली का असू द्या.. प्रेम खरे प्रत्येक माणसाच्या वाट्याला येते हे खरे आहे असे मानून आपण पुढे जात असतो. प्रेम म्हणजे तरी काय हो? जिथे आपला एकटेपणा वाटला जातो आणि एक हक्काच माणूस भेटते, अशा वेळेस आपण हजारदा विचार करत करत त्या प्रेमात पडतो का? नाही ते शक्य नाही , मानवी स्वभाव आणि त्याच्या मानसिक आणि शारीरिक गरजा जिथे पुर्ण होतात कदाचित ते प्रेम आहे असेच आपण धरुन पुढे चालत राहतो. असो प्रेम होने,करने आणि मिळवने सगळ्या निरनिराळ्या गोष्टी आहेत. मी सुखी आहे किंबहुना होणार आहे हा आत्मविश्वास प्रेमाने मिळतो हे जरी खरे असले तरी प्रेम मात्र प्रत्येक जोडप्याला हे वेगवेगळ्या कारणांमुळे बांधून ठेवते असे म्हटले तर गैर होईल का?

अपेक्षित मी, तरीही उपेक्षित मी

*अपेक्षित मी, तरीही उपेक्षित मी* किशोर बोराटे@ *शरद पवार* या सहा अक्षरी शब्दाची जादू फक्त महाराष्ट्रच नाही तर, संपूर्ण भारतभर गेली *५९ वर्षे* पसरली आहे. आतापर्यंत अनेक लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाच्या इच्छुक यादीत पवारसाहेबांचे नाव १००% असायचेच. तशी राजकीय परिस्थिती त्यांच्या बाजूने कधी नव्हती किंवा त्यांना पंतप्रधान करावे अशी परिस्थितीही कधी निर्माण झाली नाही. मुत्सद्दीपणा दाखवून तशी परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी कायम पडद्यामागे राहून प्रयत्न केले असतील पण त्यात त्यांना यश आले नाही. पवारसाहेबांनी काँग्रेस सोडल्यानंतर तर ही शक्यता तशी धुसरच झाली. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचा आवाका पाहता हे कदापि शक्य नव्हते आणि इथून पुढेही नसेल. *तरीही आपल्या भारत या देशाचा इतिहास चमत्कारांनी भरलेला आहे आणि इथली जनताही चमत्काराला नमस्कार करणारी आहे.* तसे शरद पवारसाहेब पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा बाळगणारे लोकंही प्रचंड संख्येने आहेत. तरीही पात्रता असूनही त्यांना पंतप्रधान पद काही मिळाले नाही. देवेगौडा यांना पंतप्रधान पदाची तशी लॉटरीच लागली असे म्हणावे लागेल. देवेगौडा पंतप्रधान होऊ शकतात तर मग शरद पवार का नाही? त्यानंतर शरद पवार समर्थकांच्या आशा वाढल्या होत्या. खुद्द पवारसाहेबांनाही तसे वाटत होते. पण तसे काही घडले नाही. म्हणूनच दुर्दैवाने का होईना पण *अपेक्षित मी, तरीही उपेक्षित मी* असेच त्यांच्याबाबतीत झालेले आपल्याला पाहायला मिळते. पवारसाहेबांचे कट्टर राजकीय विरोधक आणि त्यांचे वैयक्तिक जीवनातील मित्र मा. बाळासाहेब ठाकरे हे ही त्यांच्या पंतप्रधान पदाचे समर्थक होते. त्यांनी अनेकदा शरद पवारांनी पंतप्रधान व्हावे ही इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी गरज पडली तर शिवसेना त्यांना पाठिंबा ही देईल असे ही बोलायला ते विसरले नव्हते. त्याला कारण ही तसेच होते ते म्हणजे बाळासाहेबांचे महाराष्ट्र प्रेम. मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर मा. बाळासाहेब राजकीय वैर आणि आपली तत्त्वे बाजूला सारून त्यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा द्यायला तयार होते. बाळासाहेब म्हणजे शब्दाचे पक्के, त्यांनी प्रतिभाताई पाटील यांनाही भाजपाच्या विरोधात जाऊन राष्ट्रपतीपदासाठी मदत केली. *स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यानंतर दिल्लीत महाराष्ट्र जिवंत राहिला, तो फक्त शरद पवारसाहेबांच्या मुळेच हे बाळासाहेब ही मान्य करत होते आणि पवारसाहेबांचे इतर राजकीय विरोधक ही मान्य करतात.* पवारसाहेब जरी काँग्रेसी विचारसरणीचे असले तरी त्यांच्या घरातील वातावरण हे शेकापच्या बाजूने होते. पवारसाहेबांचे वडील शेकापचे समर्थक होते. त्यांचे थोरले भाऊ वसंतराव यांनी वकीलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्ण वेळ शेकापचे काम केले. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे काँग्रेसमध्ये आलेल्या शरद पवार यांनी काँग्रेस मध्ये येण्या अगोदर काँग्रेसच्या विरोधात काम करून बारामतीत काँग्रेसला पराभूत केले होते. *१९५३ साली फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली. पंडित नेहरू यांनी सौराष्ट्रसह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र आणि स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली आणि पंडित नेहरू व राज्य पुनर्रचना आयोगाच्या विरोधात त्यावेळी महाराष्ट्रात प्रचंड भडका उडाला. त्यावेळी पवारसाहेबांच्या घरातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठबळ मिळाले व शेकापच्या माध्यमातून त्यांनी नेहरू आणि काँग्रेसला उघडपणे विरोध केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पवारसाहेबांनी सायकलवर फिरून काँग्रेस विरोधी प्रचार करून बारामतीत काँग्रेसचा पराभव केला.* त्यांची जडण-घडण जरी काँग्रेसी विचारांची असली तरी जशी वेळ येईल, तसे त्यांनी आपले विचार आणि आचार बदलले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे तसे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. त्याचा अनुभव वेळोवेळी देशाने घेतला आहे. *समस्या कोणतीही असो तिच्याकडे तटस्थपणे पाहून तिच्या मुळाशी जाऊन चौफेर विचार करून त्यातील फायदे-तोटे जाणून घेऊन मग निर्णय घेणे आणि घेतलेला निर्णय लोकांच्या गळी उतरवणे ही हातोटी त्यांच्याकडे उत्तम आहे.* सुरुवातीच्या काळात ते राजकारणात उतरले त्यावेळी पासून त्यांनी आपला दृष्टिकोन व्यापक ठेवला. बाळासाहेबांच्या सारखी फक्त हिंदूत्वाचीं कास धरली नाही. त्यापलीकडे त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन बहुजन वर्गाला साद घातली. ते करत असताना आपली *मराठा नेता* इमेज ही सांभाळली. त्याबरोबरच ब्राम्हण समाज दूर जाऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेतली. धार्मिक विचारांचा पगडा त्यांचेवर कधीच नव्हता. शरद पवारसाहेबांची राजकीय कारकीर्द तशी उतार-चढावांची राहिली आहे. त्यांना जेवढे समर्थन मिळत गेले, तेवढाच त्यांना विरोधही झाला. *भ्रष्टाचाराचे, जमिनी खरेदीचे, दाऊद बरोबर संबंध असल्याचे शेकडो आरोप त्यांच्यावर झाले. पण यासंदर्भात आजपर्यंत त्यांच्यावर एकही आरोप सिद्ध झाला नाही किंवा साधा गुन्हा सुद्धा दाखल झाला नाही.* एवढा मोठा आवाका ज्याला राजकारण, शिक्षण, कृषी, सहकार, खेळ, प्रशासन, उद्योगधंदे, शेती सर्व बाजूचे ज्ञान असताना प्रचंड जनसंपर्क असताना गाढा राजकीय अभ्यास महाराष्ट्राची इत्यंभूत माहिती असताना देखील या सर्व यशाला एक अपयशाची किनार होती ती म्हणजे त्यांना राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून कधीही महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता आली नाही. *जे चंद्राबाबूंनी आंध्रमध्ये, मनोहर पर्रिकरांनी गोव्यात, जयललिता आणि करुणानिधी यांनी तामिळनाडूत, मोदींनी गुजरातमध्ये, माया-मुलायम यांनी उत्तरप्रदेशात तर लालू-नितीश यांनी बिहारमध्ये केले ते पवारसाहेबांना महाराष्ट्रात करता आले नाही.* पवारसाहेबांनी राजकीय मित्र कमावले त्यापेक्षा जास्त त्यांना राजकीय विरोधक मिळाले. *काँग्रेसमध्ये असतानाही दिल्लीच्या दरबारी पवार विरोधी लॉबी सक्रिय होती त्याचे नेतृत्त्व वेळोवेळी विठ्ठलराव गाडगीळ, शंकरराव चव्हाण, प्रतापराव भोसले, बाळासाहेब विखे, विलासराव, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव यांनी केले. हयात गेली यांची शरद पवारांच्या पायात पाय घालण्यात.* तसे पहिले तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शरद पवारांना ५-१० अशा संख्येने प्रबळ विरोधक आहेत. जे फक्त त्या जिल्ह्याच्याच नाहीतर राज्याच्याही राजकारणावर प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेस मर्यादा पडत गेल्या. राजकीय वर्तुळात मा. पवारसाहेबांचे व्यक्तिमत्त्व कालही विश्वासू नव्हते आणि आजही नाही. बेभरवशी आणि उपद्रवी राजकारणाचा शिक्का त्यामुळेच त्यांच्यावर बसला आहे. कालपर्यंत जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला पण आपल्या राजकीय वर्तुळातील लोकांचा विश्वास ते संपादन करू शकले नाहीत. त्यांच्या विश्वासघातकी राजकारणामुळे सर्वजण त्यांच्यापासून चार हात दूर राहणेच पसंद करत होते आजही तेच चालू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते भुजबळ यांच्यापर्यंत पवारांनी पाठीत *खंजीर* खुपसला असे म्हणणाऱ्यांची यादी मोठी आहे. *राज ठाकरे यांना एकदा पत्रकारांनी विचारले की अलीकडे पवारसाहेब तुमची सारखी स्तुती का करत असतात? त्यावेळी त्यांनी अतिशय मार्मिक पण गंभीर उत्तर दिले की त्यांनी एकवेळ टीका केली तर समजू शकतो पण स्तुती केली की समजावे काहीतरी घोळ आहे.* मा. शरद पवारसाहेबांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात सर्वसामान्य माणसाशी नाळ जी जोडली होती ती कधी तुटून दिली नाही. प्रशासनावर वचक, अफाट स्मरणशक्ती तसेच त्यांचा गाढा प्रशासकीय अभ्यास, नाविन्याची ओढ याचा त्यांना त्यांच्या राजकीय जीवनात नेहमीच फायदा झाला. त्यांचे संबंध राजकारणापुरतेच मर्यादित नव्हते. राजकारणा बरोबरच ते खेळ, कला, साहित्य, शिक्षण, उद्योग, शेती, समाजकारण, पाणी, सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला. महाराष्ट्रात सहकार खऱ्या अर्थाने त्यांनी रुजवला. विकासाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्र जो आज एवढा विकसित दिसतोय त्यात पवारसाहेबांचे योगदान मोठे आहे हे अजून माझ्या वयाच्या तरुण पिढीला किंवा माझ्यानंतरच्या पिढीला अजून माहित नाही. सतत अभ्यास करून, महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरणे, शेतकऱ्यांच्या, व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेणे, जगात होणारे बदल त्याची माहिती करून घेणे अशाप्रकारे त्यांनी आपले नॉलेज वाढवले. जे ज्ञान मिळेल ते घेत गेले. त्यामुळेच आज दिल्लीत किंवा राज्यात सरकार कोणाचेही सत्तेत असो अचानक काही समस्या निर्माण झाली ते सरकारला लगेच पवारसाहेबांची आठवण येते. पवारसाहेबांच्या तुलनेत विचार केला तर आताच्या राजकीय नेत्यांचा अभ्यास कमी पडतोय. ही खंत त्यांनीही अनेकदा बोलून दाखवली आहे. याचा विचार व्हायला हवा. मा. शरद पवारसाहेबांनी कुणी कितीही आरोप केले तरी कुणाविषयीही मनात द्वेष ठेवला नाही. जे येईल त्याला आपले करत गेले. जे अगदीच नडले त्यांना त्यांनी तितक्याच संयमाने योग्य वेळ पाहून कात्रजचा घाट दाखवला. आता काळ बदलला, नेते बदलले, पण देशापुढचे व राज्यापुढचे प्रश्न पूर्वीचे आहेत काही नवीन निर्माण होत आहेत. आताची तरुण पिढी शिकली, सुशिक्षित झाली. आधुनिकीकरण झाले इंटरनेट आले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आज लोकांना घरबसल्या जगाची माहिती समजू लागली. तरुण पिढीचा तरुण देश म्हणून भारताची गणना होऊ लागली. *आताच्या पिढीला आक्रमक राजकीय नेते आवडू लागले. एवढ्या वर्षाच्या काँग्रेस भ्रष्टाचारी राजवटीला जनता किकली होती. त्यांना काँग्रेसच्या दरबारी आणि बोटचेप्या राजकारणाचा वीट आला होता. त्यामुळे त्यांनी भाजपाकडे मोर्चा वळवला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच त्यांच्या सहकारी पक्षांचे मुस्लिम प्रेम आणि हिंदुविरोधी धोरण याचा फटकाही काँग्रेसला तसेच त्यांच्या धोरणावर चालणाऱ्या पवारसाहेबांना बसला. आताची पिढी आणि पवारसाहेब यांच्यात एक मोठी वैचारिक दरी निर्माण झाली आहे.* ती दूर करणे तसेच स्वतःवर असलेले बेभरवशी, विश्वासघाती, उपद्रवी, भांडवलदारांना, भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालणार नेता, गरजेनुसार माणसं वापरणे आणि काम झाले की त्यांना कात्रजचा घाट दाखवणे हे जे आरोप त्यांच्यावर सातत्याने होत आहेत त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेला धोका पोहोचत आहे. जेवढी त्यांच्या गुणांविषयी चर्चा झाली तेवढीच कथित अवगुणांविषयीही झालीय आणि आजही होत आहे. कुणीही व्यक्ती परिपूर्ण नसते. पवारसाहेबांचे विरोधक सुद्धा त्यांना मान देतात तो त्यांच्या बुद्धिमतेला आहे. कुणी काही म्हणो मा. शरद पवारांना तुम्ही नावं ठेवली तरी त्यांचे नाव घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जात येणार नाही. त्यांच्या मुत्सद्दीपणाची झलक आपण आत्ता १०५ आमदार असूनही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवून सेना आणि काँग्रेसला बरोबर घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना पाहिली आहे. आज महाराष्ट्रातल्या खेडी-पाड्यातल्या, वाडी-वस्तीवरील सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते नावानिशी ओळखतात. कोणती व्यक्ती कुठे फिट होऊ शकते हे त्यांना बरोबर माहिती असते. *शरद पवारांना वजा करून तुम्ही दिल्लीत महाराष्ट्र शोधा नाही सापडणार. महाराष्ट्रात तुम्ही त्यांना वजा करूच शकत नाही केलं तर तुमचे गणित चुकलेच म्हणून समजा. हा पवारसाहेबांच्या धोरणांचाच परिणाम आहे.* आज अशा या मोठ्या थोर नेत्याचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या हातून महाराष्ट्र हिताचे राजकारण घडो आणि त्यात त्यांना ईश्वरी साथ मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. ते ईश्वराला मानत नसले तरीही... धन्यवाद -किशोर बोराटे

कोरोना आणि अर्थचक्र

कोरोनानामक महामारीने जगासमोर पुन्हा एकदा काही गोष्टी सिद्ध़ केल्या आहेत. विकसित राष्ट्र आणि अविकसित राष्ट्र, श्रीमंत आणि गरीब ह्या दऱ्या अधिकाअधिक खोल होत चालल्या आहेत. पण महामारीला कसलाच भेदभाव ठाऊक नसतो, ती फक्त विद्ध़ंसक असते. खरंतर संकट गरीबी-श्रीमंती बघून येत नसतात पण पैसा असला की संकटांशी लढाई लढायला एक प्लस पॉईन्ट मात्र असतो. स्वच्छता, हाईजीन, सोशिअल डिस्टन्सिंग अशा बऱ्याच गोष्टी उच्चभ्रू लोक आणि विकसित देशातील उच्चभ्रूंना अंगवळणी पाडायला फारसे जड गेले नाही आणि खूप कमी वेळात ह्या सवयी अशा लोकांची लाईफस्टाईलच झाली असे म्हणता येईल. प्रश्न आहे तो एका मोठ्या लोकसंख्येचा जी विकसित किंवा उच्चभ्रू मधे मोडत नाही आणि तीच 90% आहे. याचा अर्थ असाच आहे की जगाचे मास पॉप्युलेशन हे मध्यम आणि दारिद्र्य रषेखाली आहे आणि हेच मास पॉप्युलेशन मोठ- मोठ्या कंपन्यांंचे ग्राहक आहेत. आता सगळ्यांना प्रश्न आहे बेसिक नीडस् चा, पण जेव्हा ह्या नीडस् मध्ये वाढ होते म्हणजे ती नीडस् निर्माण केली जाते आणि हळूहळू आपल्या बेसिक नीडस् ची लिस्ट नकळत वाढत जाते विकासाच्या आणि अर्बनायझेशनच्या नावाखाली तेव्हा निश्चितच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते खरी पण अनावश्यक अशा गरजा निर्माण होतात आणि पुन्हा सगळे भांडवलशाहीचे गुलाम होतात. किंबहुना हे 10% विकसित आणि उच्चभ्रू देश लोक 90% पॉप्युलेशनला कन्ट्रोल करतात. आणि अशा भयंकर महामारीमध्ये तर भांडवलशाही खूप वेगाने डोके वर काढत आपले साम्राज्य प्रस्थापित करून पूर्ण जगात इकोनॉमिक इन्स्टँबिलिटीस कारणीभूत ठरते. थोडक्यात जर हे टाळायचे असेल तर 'सहकार' धर्तीवर नवीन उद्योग खूप मोठ्या प्रमाणात उभारले गेले पाहिजे. क.दि.रेगे नाशिक

जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर…?

आर्मेनिया आणि अजहर बैजान या देशांमध्ये अलीकडेच झालेला प्रत्यक्ष युद्धसंघर्ष भयंकर स्वरुपाचा होता. शीतयुद्धानंतर एवढे भयानक आणि अमानुष युद्ध जगाने कधीही पाहिले नव्हते. हा संघर्ष संपतो न संपतो तोच इथियोपिया आणि इरीट्रिया या दोन देशांत संघर्ष सुरू झाला आहे. कोरोना संकटाचा एकजुटीने सामना करण्याची गरज असताना जग परस्पर संघर्षामध्ये, वर्चस्ववादामध्ये, धार्मिक ध्रुवीकरणामध्ये विभागले आहे. बहुराष्ट्रीय संघटना, चर्र्चेची जागतिक व्यासपीठे क्षीण झाली आहेत. अशा अराजक परिस्थितीत एखाद्या संघर्षाप्रसंगी अण्वस्रांचा वापर केला जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. ती लक्षात घेता मोठ्या राष्ट्रांनी परिपक्व भूमिका पार पाडणे गरजेचे आहे. गेल्या जवळपास 10 महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या विळख्यात संपूर्ण जग अडकले आहे. या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी आणि कोरोनाच्या तीव्र आर्थिक झळांतून उभारी घेण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. संपूर्ण जगाने एकजुटीने या आव्हानावर मात करण्याची गरज असताना राष्ट्राराष्ट्रांमधील संघर्ष वाढताना दिसत आहेत. हे संघर्ष इतके वाढले आहेत की, पहिले महायुद्ध ते दुसरे महायुद्ध यांच्या दरम्यानच्या काळासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली दिसत आहे. आजवर ज्या वादांवर तोडगा निघत नव्हता किंवा जे जुनाट वाद निवलेले होते, शांत होते ते आता नव्याने उफाळून वर येताहेत. दुसरीकडे पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांदरम्यान ज्याप्रमाणे लहान-लहान संघर्षांमध्ये महासत्ता सामील होत होत्या आणि त्यामुळे त्याचे स्वरूप व्यापक बनत होते असे प्रकारही घडताना दिसत आहेत. अलीकडेच आर्मेनिया आणि अजहर बैजान या देशांमध्ये प्रत्यक्ष युद्धसंघर्ष घडून आला. गेल्या 20 वर्षांमध्ये किंबहुना शीतयुद्धानंतर एवढे भयानक आणि अमानुष युद्ध जगाने कधीही पाहिले नव्हते. या युद्धामध्ये कोणत्याही युद्धनियमांचे पालन करण्यात आले नाही. लहान मुले आणि महिला यांच्यासह अनेकांच्या कत्तली केल्या गेल्या. शेकडो जण ठार मारले गेले. क्षेपणास्त्रे, बॉम्ब यांचा सढळ वापर केला गेला. हा संघर्ष संपतो न संपतो तोच इथियोपिया आणि इरीट्रिया या दोन देशांत एक नवा संघर्ष सुरू झाला आहे. तिकडे उत्तर कोरियाचा क्रूरकर्मा हुकुमशहा किम जोंग उन याने पुन्हा एकदा नव्या जोमाने अण्वस्त्र चाचण्या करायला सुरूवात केली आहे. जगभरात अनेक देशांमधून तिथल्या सत्ताधीशांविरोधात आंदोलने होण्यास सुरूवात झाली आहे. चीनचा आक्रमकतावाद वाढतो आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आजही कायम आहे. चीनची नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे. ब्लादीमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशिया पुन्हा एकदा स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी धडपडतो आहे. एकंदर, एक प्रकारच्या अराजकतेची स्थिती जागतिक पटलावर आहे. एका बाजूला असे वातावरण असताना संयुक्त राष्ट्र संघटनेची भूमिका पाहिल्यास कोरोना संसर्गकाळात ती जवळपास नगण्य राहिली आहे. जागतिक व्यापार संघटना कालबाह्य झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेने ट्रम्प यांच्या कारकीर्दीत अनेक करारांतून अंग काढून घेतल्यामुळे वैश्विक स्तरावर एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मोेठे देश संघर्ष वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अशीच परिस्थिती होती. अनेक देशांना आपल्या छत्राखाली आणण्याचा हिटलरचा विस्तारवाद बोकाळला होता. आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हिटलच्या वाटेनेच निघाले आहेत. हे सर्व कमी की काय म्हणून जगभरात धार्मिक तेढ वाढत चालली आहे. युरोपात अल्पसंख्यांक मुसलमानांविरोधात कमालीचा असंतोष पसरलेला आहे. याला खतपाणी घालण्याचे काम मूलतत्ववादी धार्मिक संघटना करताहेत. हे सर्व संघर्ष एकत्ररित्या पाहिल्यास केवळ अण्वस्त्रांचा वापर करणेच बाकी राहिल्याचे दिसते. अझरबैझान आणि आर्मेनिया संघर्षात अण्वस्त्रांचा वापर करणेच बाकी होते. भारत-चीन यांच्यातील संघर्षात चीनने तिबेटमध्ये अण्वस्त्रे तैनात केल्याचे उघड झाले आहे. डीएफ 70 सारखे क्षेपणास्त्रही तैनात केले आहे. भारताला धाक दाखवण्यासाठी ही चीनची चाल आहे, असे आज वाटत असले तरी भविष्यात चीन अण्वस्रांचा वापर करु शकतो, हे स्पष्ट होते. अमेरिकेने दुसर्‍या महायुद्धात जपानवर अण्वस्त्रे डागली होती; त्यानंतर जगात आजवर अण्वस्त्रांचा वापर करण्यात आलेला नाही. अनेक अभ्यासकांनी अण्वस्रांबाबत काही सिद्धांत मांडले आहेत. त्यानुसार, अण्वस्त्र हे केवळ धाक दाखवण्याचे साधन आहे. ती एक शोभेची वस्तू आहे. त्याचा वापर केला जाणार नाही. अण्वस्त्रे असल्याने देश संघर्ष करण्यासाठी घाबरतील, असा विचार मांडण्यात आला. थोडक्यात, दहशतीचा समतोल साधला गेल्याने अण्वस्रांमुळे युद्धे होणार नाहीत, अशी थिअरी मांडण्यात आली होती. असे अनेक सिद्धांत दुसर्‍या महायुद्धानंतर विकसित झाले. त्यातूनच एनपीटी आणि सीटीबीटीसारखे करार करण्यात आले. पण या करारांनाही काही अर्थ राहिलेला नाही. कारण आज उत्तर कोरिया, इराण यांसारख्या देशांचा अण्वस्त्र विकास कार्यक्रम सुरू आहे. सद्यस्थितीतील अराजकसदृश परिस्थिती अण्वस्त्र वापरण्यासाठी अत्यंत पोषक आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. कोरोनामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या शासनाविरोधातील असंतोष वाढला आहे. बेरोजगारी कमालीची वाढते आहे. उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झाला आहे. सामान्य जनतेचा शासनावरचा दबाव वाढतो आहे. त्यामुळे अनेक सत्ताधीश भावनिक किंवा अतिरेकी राष्ट्रवादाला खतपाणी घालून जनतेचे लक्ष विचलित करताहेत. सार्वभौमत्वाचे, प्रखर राष्ट्रवादाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रा-राष्ट्रांमधील संघर्षादरम्यान अनेकदा अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धमक्या दिल्या जाताहेत. पाकिस्तान, उत्तर कोरियासारखे देश उघडपणाने अशा धमक्या देताना जगाने पाहिले आहे. नुकतेच उत्तर कोरियाने अण्वस्त्र परीक्षण केले आहे आणि त्याचा वापर करू शकतो असे वक्तव्यही केले आहे. ही परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे. सुमारे 9 वर्षांपूर्वी म्हणजे 2011 मध्ये रशिया आणि अमेरिका या दोन देशांमध्ये प्रत्येक देशाने किती अण्वस्त्रे ठेवायची ती संख्या मर्यादित करण्याविषयीचा करार झाला होता. या कराराला न्यू स्टार्ट ट्रीटी म्हणजेच स्ट्रॅटेजिक आर्म रिडक्शन ट्रीटी (नवीन) असे म्हणतात. दहा वर्षांसाठी हा करार झाला होता. या करारानुसार नवी अण्वस्त्रे बनवायची नाहीत, नव्या चाचण्या करायच्या नाहीत असे निर्धारित करण्यात आले होते. 2021 मध्ये हा करार संपुष्टात येतो आहे. पण तो पुनर्जिवित करण्यासाठी किंवा त्याची मुदत वाढवण्यासाठी अमेरिका आणि रशिया या दोघांमध्ये परस्परसहमती होत नाहीये. ट्रम्प यांनी यापूर्वीच असे सांगितले आहे की याप्रकारच्या कोणत्याही कराराला अमेरिका बांधील राहाणार नाही. आम्ही नव्याने चाचण्या करणारच. हाच प्रकार रशियाकडूनही होतो आहे. या दोन्ही राष्ट्रांकडून अत्यंत अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे परीक्षण केले जात आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. याबाबत सर्वाधिक चिंता आहे ती नॉन स्टेट अ‍ॅक्टर्सची. विशेषतः पाकिस्तानातील दहशतवादी संघटना या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात. आज पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खानच्या विरोधात प्रचंड असंतोष माजलेला आहे. अशा वेळी अनेक दहशतवादी संघटना अण्वस्त्रे ताब्यात घेऊ शकतात. आजवरचा इतिहास पाहिला तर, एखाद्या देशाने अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली तर त्याला नियंत्रित करण्यासाठी एकमत असणारी राष्ट्रे एकत्र येऊन त्याचा सामना करत असत. याला सामूहिक सुरक्षितता म्हटले जाते. सद्दाम हुसेन यांनी कुवेतवर हल्ला केला तेव्हा प्रतिआक्रमणासाठी अमेरिका आणि इतर देश एकत्र आले होते. परंतु आज परिस्थिती बदलली आहे. अमेरिका, चीन, रशिया यांच्यामध्ये एकमत नाही. जागतिक सुरक्षा परिषद राजकीय द़ृष्ट्या दुभंगलेली आहे. परिणामी, अण्वस्त्रांचा वापर करून जागतिक शांतता, सुरक्षा धोक्यात आणू शकणार्‍या देशांना वठणीवर आणणार कोण अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ, उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर अण्वस्र हल्ला करण्याचा निर्णय घेतला, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने प्रतिहल्ला केला तर रशिया आणि चीन हे उत्तर कोरियाला समर्थन देऊ शकतात. उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्राने आर्थिक निर्बंध लावूनही 10 वर्ष झाली आहेत. परंतु ते यशस्वी झालेले नाहीत. कारण चीन उत्तर कोरियाला सातत्याने मदत करत आहे. बहुराष्ट्रीय संघटनाही कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात शत्रू राष्ट्राचा विध्वंस करण्यासाठी अण्वस्रांचा वापर करण्यास एक प्रकारे मोकळे रान मिळाले आहे. परिणामी, अण्वस्त्रांबाबतची म्युचुअली अ‍ॅशुअर्ड डिस्ट्रक्शन (मॅड) ही थिअरी आता फोल ठरताना दिसत आहे. यानिमित्ताने आठवण होते ती क्युबन मिसाईल क्रायसिसची. 1962 सालातील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हे संकट जगावर ओढवणार होते. शीतयुद्धाच्या काळात पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली होती की जेव्हा रशिया आणि अमेरिका एकमेकांवर अण्वस्त्र हल्ले करणार होते. अमेरिका क्युबावर अण्वस्त्रांचा हल्ला कऱणार होता. 13 दिवस संघर्षाची परिस्थिती गंभीर होती. पण हा संघर्ष शमला; अन्यथा दुसरे अण्वस्त्र युद्ध होऊन जग बेचिराख झाले असते. म्हणूनच क्युबन मिसाईल क्रायसिस अत्यंत धोकादायक मानला जातो. या क्रायसिसला 58 वर्षे पूर्ण झाली. पण आज पुन्हा त्याच्या आठवणींना उजाळा देण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे राजनयावरही परिणाम झाला आहे. संयुक्त राष्ट्र संघटना, ब्रिक्स, जी-7 यांच्या बैठका नियमितपणे होत नाहीयेत. राजकीय संघर्ष सोडवण्यासाठीची व्यासपीठेही उपलब्ध नाहीयेत. अशा परिस्थितीत जगाला विशेषतः प्रगत महासत्तांना परिपक्वता दाखवावी लागणार आहे. अन्यथा महासंहारक युद्धाला जगाला सामोरे जावे लागू शकते. परराष्ट्र, संरक्षण धोरणातील, आंतरराष्ट्रीय संबंधातील सर्व चालूघडामोडींविषयी, कोरोना, भारत - चीन तणाव या विषयी मराठी व इंग्रजीतून माहिती व विश्लेषणासाठी. * Instagram - https://instagram.com/dr.shailendradeolankar?igshid=1dpe34b2p0ai2 * Twitter - https://twitter.com/skdeolankar?s=09

आत्मनिर्भर भारत : समज आणि गैरसमज

कोरोना महामारीमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे ‘टाळे’ उघडताना केंद्र सरकारने 20 लाख कोटी रूपयांचे पॅकेज घोषित केले होते. हे पॅकेज देताना ‘आत्मनिर्भर भारत’...

सिटवे बंदर : भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’

भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी आणि या देशांबरोबरच्या संबंधांमध्ये निर्माण झालेली विश्वासतूट कमी करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. या ‘नेबरहूड...

कोरोना आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे बदलते संदर्भ : भारतीय परराष्ट्र धोरणापुढील आव्हाने.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक. 11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिड-19 या कोरोना विषाणू संसर्गाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले. चीनच्या वुहान या...