कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेला तोटा की फायदा?

कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेला तोटा की फायदा?

किशोर बोराटे @

साधारण १५ दिवसांपूर्वी एका वाहिनीवरील चर्चेत एक अर्थतज्ज्ञ या विषयांवर बोलताना म्हणाले की चीनने जगाला आज कोरोनाच्या खाईत ढकलले आहे. आगामी काळात चीनला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. सर्व जग चीनच्या विरोधात उभे राहील. चीनवर आर्थिक निर्बंध लादले जातील. चीनी वस्तुंच्यावर बहिष्कार टाकला जाईल आणि याच भारतीय बाजारपेठेला मोठा फायदा होईल. जग चीनला बाजूला करून भारताला प्राधान्य देईल आणि बघा तुम्ही विचार करू शकणार एवढी मोठी सुधारणा पुढील वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्थेत होईल. खरंतर हे सर्व ऐकून मला या कोरोनाच्या संकटात सुद्धा एक आशेचा किरण दिसला. दुःखातही सुख असते हे मला त्यावेळी पटले.

त्यानंतर मी यावर विचार केला की खरंच असे काही होईल? कोरोनावरून जग चीनच्या विरोधात जाईल? मला याबाबत जरा शंका वाटत होती आणि मी ती काही दिवसांपूर्वी याच विषयावर लिहिलेल्या एका लेखातही व्यक्त केली होती आणि ती खरी देखिल ठरली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कोरोनावर चर्चा करण्यास चीनने स्पष्ट नकार दिला आणि त्याला रशिया व उत्तर कोरियाचीही मूक संमती होती असे म्हणतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की खरंच चीन विरोधात जग काही पावले उचलेल? जग म्हणजे तरी कोण? तर अमेरिका आणि त्यांची मित्र राष्ट्र ब्रिटन वगैरे…. रशिया, उत्तर कोरिया, जपान अमेरिकेला साथ देण्याची शक्यता कमीच आहे. पण भारतही जागतिक पातळीवर चीनच्या विरोधात भूमिका घेणार नाही.

आंतरराष्ट्रीय राजकारणात आजपर्यंत भारताने नेहमीच अलिप्त भूमिका ठेवली आहे. त्याचबरोबर कोरोनाचा जेवढा फटका अमेरिका, स्पेन, इटली, इराण यांना बसला तेवढा तो भारताला बसला नाही. चीनने ठरवलेच असते की हे जैविक अस्त्र भारताच्या विरोधात वापरायचे तर आपण शेजारी आहोत. त्यांच्या आणि आपल्या सीमा एकच आहेत. हा व्हायरस मोठ्या प्रमाणात भारतावर सोडणे त्यांना सहज शक्य होते आणि तसे झाले असते तर भारताला मृतदेह मोजता मोजता नाकीनऊ आले असते आणि त्याची सुरुवात ही ईशान्येकडील राज्यांतूनच झाली असती. पण माझं स्वतःचे व्यक्तिगत मत असे आहे की कोरोनाच्या माध्यमातून चीनने काही देशांवर जैविक हल्ला केलाच असेल तर त्यात त्यांनी भारताला वगळले आहे.

मग प्रश्न हा उरतो की भारतात कोरोना आला कसा? तर चीनच्या काही भागात व अमेरिका, इटली, स्पेन, इराण इकडे कोरोना ज्यावेळी हातपाय पसरत होता, त्यावेळी आपल्याकडे लॉकडाऊन नव्हते. आपली आंतरराष्ट्रीय विमानसेवाही चालूच होती. नेमके त्याचवेळी बाहेरून जे काही प्रवासी मग ते भारतीय असतील किंवा विदेशी असतील जे भारतात आले. त्यातील काही कोरोनाग्रस्त असतील आणि त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा भारतात शिरकाव झाला असावा असे वाटते.

आता येतो महत्त्वाचा प्रश्न की पुढे काय? तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा चीनच्या बाजारपेठेला फटका बसेल आणि जग भारतीय बाजारपेठेकडे झुकेल. कारण भारतीय बाजारपेठ ही एक मोठी बाजारपेठ आहे आणि सर्व जगाचे अगदी चीनचे सुद्धा भारतीय बाजारपेठेवर लक्ष असते. निश्चितच आपली भारतीय बाजारपेठ मोठी आहे. पण इथं एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा की भारतीय बाजारपेठ मोठी असली आणि जग भारतीय बाजारपेठेकडे आशेने पाहत असले तरी ते आपल्याकडे ग्राहक या नजरेने पाहतात. आपण त्यांचे ग्राहक ( customer ) आहोत. ते त्यांच्या वस्तू ( product ) विकण्यासाठी म्हणून आपल्या बाजारपेठेकडे डोळे लावून बसलेले असतात. भारतीय बाजारपेठ ही ग्राहकांनी भरलेली आहे. आपण उत्पादक नाही. आपण फार मोठे निर्यातदार नाही. जगाने चिनी वस्तुंच्यावर बहिष्कार टाकला (जी शक्यता फारच कमी आहे.) तर ती जागा भारत भरून काढू शकतो का?

आज किरकोळ छोट्या छोट्या वस्तुंच्यासाठी सुद्धा आपल्याला चीन आणि इतर देशांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. आपल्या लहान मुलांच्या हातातील खेळणी सुद्धा आपण चायना वरून आयात करतो. इलेक्ट्रिक्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा चीन हा जगातला सगळ्यात मोठा निर्यातदार आहे. चीनवर अनेक देशांनी अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आय फोन जरी अमेरिकेत बनत असले तरी त्याचे पार्टस हे चीनमध्ये असेंम्बल होतात. लॅपटॉप सारखी इतर अनेक छोटी-मोठी उपकरणे आहेत. अगदी नेलकटर पासून ते शस्त्रास्त्रांच्या पर्यंत चीन सर्व काही उत्पादन करतो आणि जगाला निर्यात करतो.

छोट्या छोट्या गोष्टींसाठी भारत जर चीनवर अवलंबून असेल तर मग आंतरराष्ट्रीय व्यापारात, बाजारात भारत चीनची जागा कशी घेऊ शकेल? गणेशोत्सव असेल, दिवाळी असेल, रंगपंचमी असेल त्यावेळी जी रोषणाई आपण करतो ना, ती चिनी बनावटीची असते. Small scale पासून ते अगदी शस्त्रास्त्रांच्या पर्यंत चीनने मोठी मजल मारली आहे. खुद्द अमेरिकेची अर्थव्यवस्था ही मंदीतूनच वाटचाल करते आहे. त्यामुळे ते ही चीन विरोधात फार मोठी काही ठोस कारवाई करतील ही शक्यता फारच कमी आहे. चीनला जागतिक महासत्ता होण्याचे वेध लागले आहेत. चिनी उत्पादक कंपन्यांनी जगाची बाजारपेठ काबीज केली आहे. त्यांना अमेरिकेलाही बाजूला सारून जगाचे नेतृत्त्व करण्याची महत्त्वकांक्षा आहे. अमेरिकेला बाजूला करून जगाची नाडी आपल्या हाती कशी घेता येईल आणि जगातील इतर देशांना आपले मांडलिक कसे बनवता येईल हा

चीन समोरच राष्ट्रीय प्रश्न आहे. आपल्या समोरील राष्ट्रीय प्रश्न वेगळे आहेत. आपल्यासमोर जे प्रश्न आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू कोण होते? त्यांनी कुत्रे पाळले होते की नव्हते? सावरकर स्वातंत्र्यवीर होते की नव्हते? कोणत्या रस्त्याला, चौकाला कोणत्या नेत्याचे नाव द्यायचे? अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती उंच पुतळा बांधायचा? महापुरुषांच्या विचारांशी आम्हाला काही देणे-घेणे नाही. ते घ्यायचे राहिले बाजूला, आम्हाला फक्त त्यांचे पुतळे आणि स्मारकं हवीत. त्यावरून आम्हाला राजकारण करायला हवे. एनआरसी, सीएए, एनपीआर, कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यांच्या पिकाला हमीभाव, खड्डयातील रस्ते, संविधान बचाव, अंतर्गत कायदा-सुव्यवस्था, आरक्षण, या सर्व प्रश्नांतून वेळ मिळाला तर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे निर्यातदार म्हणून पुढे येऊ आणि चीनची जागा भरून काढू शकू ना? यासाठी किती वर्षे लागतील? जरा विचार करून पहा. आजही आपण पायाभूत सुविधांच्यासाठी संघर्ष करतोय.

आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर आपल्याला उत्पादक व्हायला लागेल. मोठे निर्यातदार व्हायला लागेल. आपली शिक्षणपद्धती सुधारायला लागेल. आपली शिक्षण व्यवस्था फक्त बेरोजगारी तयार करतेय अशी व्यवस्था बदलून व्यावसायिक शिक्षण व्यवस्था पुढे आणायला लागेल. व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यावे लागेल. जग कुठे चाललेय याचा वेध घेऊन त्यांच्याबरोबरीने किंवा चार पावले पुढे चालायचे तर दूरदृष्टी ठेवावी लागेल. कृषिप्रधान देश म्हणून मिरवण्यापेक्षा व्यावसायिक देश म्हणून पुढे यावे लागेल. उत्पादन क्षमता वाढवावी लागेल. व्यावसायिक शिक्षण पद्धती वापरून नवनवीन व्यावसायिक तयार करावे लागतील. भारतीय निर्यातदार कंपन्यांच्या मागे ताकत उभी करावी लागेल. केवळ शेतीवर अर्थव्यवस्था बळ धरू शकणार नाही. कृषी तंत्रज्ञानात इस्त्राईल आपल्यापेक्षा खूप प्रगत आहे. तरीही त्यांचा शस्त्रास्त्र निर्मितीवर आणि निर्यातीवर भर असतो. अमेरिका, रशिया यांची अर्थव्यवस्था यावरच अवलंबून आहे. आपल्यालाही आता पर्यायी व्यापक विचार करून दूरदृष्टीने निर्णय घ्यावे लागतील. ग्राहकांची बाजारपेठ म्हणवून घेण्यापेक्षा उत्पादकांची बाजारपेठ म्हणवून घेणे कधीही चांगले आणि देश हिताचे आहे.

धन्यवाद

-किशोर बोराटे