ती पाहताच बाला……

ती पाहताच बाला……

किशोर बोराटे @

कॉलेजमध्ये असतानाची घटना आहे. कॉलेजला दांडी मारून माझा एक मित्र निलेश आणि मी आमच्या येथिल चित्रपटगृहाच्या रस्त्यावरून ( न्यू चित्र टॉकीज) चाललो होतो. अचानक एक मुलगी स्कूटीवरून आली, आम्हाला गाडी आडवी मारून पुढे गेली आणि चित्रपटगृहा जवळ थांबली. तिने गाडी आडवी मारल्याचा निल्याला भयंकर राग आला. तो तिला काही बोलणार (दोन शिव्या घालणार) तोपर्यंत ती टॉकीज जवळ पोहोचली होती. निल्याचा तो एक प्रॉब्लेमच होता. त्याला पटदिशी बोलता येत नव्हते. तत….पप करेपर्यंत तिने टॉकीज जवळ गाडी पार्क पण केली. तरी याच्या तोंडून शब्द (शिवी) बाहेर पडत नव्हती. हा त्याचा जन्मजात प्रॉब्लेम होता. त्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये तो चेष्टेचा तर कधी भावनेचा विषय होता. मी त्याला म्हटलं जाऊ दे आता, ती पोहोचली. बोलला ज..ज जातेय कु… कु…कु…कुठं? टॉकीज जवळच असेल. त्याने मला ओढतच नेले. तिथे गेलो तर ती तिकीट काढायला रांगेत उभी होती. ती रांग advance booking ची होती. तिथं तिला पाहिले आणि निल्या जाम संतापला. पण मी म्हटलं जाऊ दे, सोडून दे. त्याचं परत तत…. पप चालू झालं. मी म्हटलं राहू दे आता, तुझ्या तोंडून शब्द बाहेर पडेपर्यंत ती घरी पोहोचेल. त्याने मला खुणावले तू जाऊन बोल. मी नको म्हटले तर माझ्यावर चिडला. मग माझ्यातली मित्रत्त्वाची भावना जागी झाली आणि मी त्या रांगेजवळ गेलो.

तिथं गर्दी होती. तरी मी वाट काढत त्या रांगेच्या बाहेर तिला आवाज जाईल अशा अंतरावर उभा राहिलो. मी हॅलो म्हटले. त्यात राग कमी आणि तोराच जास्त होता. सुरुवातीला तिला ऐकायला गेले नाही. मग मी २-३ वेळा बोललो. तेंव्हा तिचे लक्ष गेले. तिने गर्रदिशी मान वळवली, म्हणजे मानेला झटका देत माझ्याकडे पाहिले तसे तिच्या त्या मोकळ्या केसांनी तिच्या मानेभोवती रिंगण घातले आणि एक छानशी स्माईल देत तिने डोळ्यांनीच काय? असे विचारले. तिने मानेला झटका देऊन जसे का माझ्याकडे पाहिले तसा मी एकदम निःशब्दच झालो. मी एकटक तिच्याकडे पाहतच राहिलो. सडपातळ, एकदम रेखीव बांध्याची, छानसे हरणीसारखे डोळे असलेली, मऊ लुसलुशीत ओठ असलेली साधारण साडेपाच फूट उंचीची ती तरुणी पाहताच क्षणी मी घायाळ झालो. किश्या, किश्या निल्या जोरात ओरडला ककक…..ककक किश्या.. मी भानावर आलो. मी म्हटलं काय? किश्या तिला बोलणार आहेस की नाही? एका दमात निल्या एवढं वाक्य मात्र न अडखळता बोलला. माझे डोळे मात्र तिच्यावरच खिळलेले होते. परत एकदा तिने आमच्याकडे पाहिले. पण ती माझ्याकडेच पाहतेय असा समज करून मी खूप आशावादी झालो आणि माझ्या पाठीवरील सॅक काढली आणि निल्याच्या गळ्यात अडकवली. तो काय बोलतोय ऐकायला मी थांबलोच नाही. तसाच मध्ये घुसलो आणि इतरांना तुडवत, त्यांच्या शिव्या खात तिकीट काढण्यासाठी मी तिच्यामागे जाऊन उभा राहिलो. पण नको तेंव्हा जागृत होणाऱ्या आणि नको तेंव्हा अन्यायाला विरोध करणाऱ्या आपल्या जनतेने मला पुढून परत मागे पाठवले. धक्के मारून पाठवले हे सांगण्याची काही आवश्यकता नाही असे मला वाटते.

आता हा सगळा तमाशा तिच्यासमोरच घडला होता. रणांगणात हरलो तरीही मनाने न हरता मी तिच्याकडे आशाळभूत नजरेने पाहत राहिलो. निल्याचे आपले काही वेगळेच चालले होते. तिथे जाऊन बोलायची काय गरज आहे? इथून पण बोलू शकला असतास? तिने हसत माझ्याकडे पाहिले आणि माझ्या आशा पल्लवित झाल्या. तिच्याकडे पाहत मी तसाच उभा राहिलो. माझ्या डोक्यात काय चाललेय ते निल्याला बिलकूल माहिती नव्हते. जातेय कुठे? बाहेर तर येईलच की? पण किश्या साला मित्र असावा तर तुझ्यासारखा. मित्राचा अपमान सहन करून न घेणारा. मित्रासाठी कुणालाही नडणारा. खरंच तुझा अभिमान वाटतो यार असं काहीसं तो बडबडत होता. माझं त्याच्याकडे बिलकूल लक्ष नव्हते. १० मि. ती बाहेर आली, ती थेट आमच्याजवळच येऊन उभी राहिली. तिच्या हातात तीन तिकिटे होती. त्यातील दोन तिकिटे हसत तिने माझ्या हातात ठेवली. मी तिच्याकडे एकटक पाहतच राहिलो. एवढी कसली गडबड होती की मध्येच घुसलात? ती बोलली. मी भानावर आलो. तुम्हाला लागलं नाही ना? मी मानेनेच नाही म्हटले.

इकडे निल्या किश्या तिकिटे घेऊ नकोस, तिकिटे घेऊ नकोस. तिची चूक तिच्या लक्षात आलीय, म्हणून ती पाणी लावतेय. तू लगेच बर्फासारखा वितळू नकोस. पण तिचे आणि माझेही त्याच्याकडे लक्ष नव्हते. मी म्हटलं किती वाजता शो आहे? ती हसली आणि बोलली त्यावर लिहिलेय. मी पाहिले, म्हटलं ३ ते ६? ती हसली, मानेला झटका दिला तसे तिची ती मुलायम केसं माझ्या तोंडाला स्पर्शून गेली. त्या स्पर्शाने मी एकदम हरखून गेलो. चार पावले पुढे गेल्यानंतर ती थांबली आणि परत तसाच मानेला झटका देत तिने मागे पाहत बाय-बाय म्हटले आणि गाडी स्टार्ट करून निघून गेली. ती पाहताच बाला….. अशी माझी अवस्था झाली. ती गेली आणि मग मी भानावर आलो. निल्या त्या टॉकीजच्या पायरीवर जाऊन रागाने माझ्याकडे पाहत स्वतःशीच काहीतरी पुटपुटत बसला होता. पुटपुटने म्हणजे तरी काय? तर मी तिला शिव्या घातल्या नाहीत, म्हणून तो मला शिव्या घालत बसला असणार हे मी चाणाक्षपणे ओळखले. मी त्याच्याकडे गेलो. तर तो रागाने नुसता फणफणत होता. जज….जा ना, तत…..तिच्याकडेच. कक…..कशाला इकडे आलास. तिच्याबरोबरच जायचे ना? दोस्त-बिस्त गेला खड्डयात. तू तिकिटे काढायला आत घुसलास? मला वाटले माझ्या अपमानाचा बदला घ्यायला? एका मुलीसाठी…… त्याचे हे वाक्य पूर्ण न होऊ देता, मी त्याला ओढतच समोरच्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेलो. निल्या काही केल्या शांत होत नव्हता. ३ ते ६ चे गणित जुळवायचे असेल तर निल्याला शांत करणे गरजेचे होते. मी म्हटलं निल्या काय खाणार? तो जोरात ओरडला, विष दे, विष. मी म्हटलं छोड ना यार, तू पण काय मनाला लावून घेतोस? तिने तिकिटे दिली ती बघ. मुलगी बघ किती सुंदर आहे. स्वभावही चांगला आहे. मध्येच रांगेत घुसलो म्हणून लोकांनी मला बाहेर काढले. पण तिला दया आली म्हणून तिने आपल्यासाठी बाल्कनीची दोन तिकिटे काढून आणली.

आई शपथ यार ! मी एकदम ओरडलो. तो बोलला काय झालं? मी म्हटलं आपण तिला पैसेही दिले नाहीत. तो बोलला द्यायचे पण नाहीत. एका सुंदर तरुणी सोबत पिक्चर पाहायला मिळणार म्हणून मी जाम खुश होतो. तीन वाजायला वेळ होता म्हणून मग थोडा टाईमपास करत इकडे-तिकडे फिरलो आणि बरोबर तीनच्या दरम्यान आम्ही टॉकीज जवळ पोहोचलो. तिकिटे दाखवून गडबडीत आत घुसलो आणि टॉकीज मधल्या वाटाड्याला तिकिटे दाखवली. त्याने आम्हाला बाल्कनीत आमच्या खुर्चीवर नेऊन बसवले. मी बरोबर निल्याला माझ्या शेजारी बसवले आणि तिची वाट पाहत राहिलो. तिची खुर्ची मोकळीच होती. कधी एकदा ती येतेय असे मला झाले होते. माझे लक्ष सारखे त्या दरवाज्याकडे होते. थोड्या वेळात लाईट बंद झाल्या. मला काळजी लागली. अजून का आली नाही? काही काम लागले असेल का? की गाडी पंक्चर झाली असेल? काय माहिती? इकडे पडद्यावर नावं पडत होती. तेवढ्यात दरवाज्यातून कोणीतरी आत येताना दिसले. मी उत्सुकतेने पाहिले. पण एक म्हातारबाबा आत आले ते थेट माझ्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसले. मी ओरडलो, म्हटलं बाबा ही तुमची खुर्ची नाही. इथून उठा आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसा. पण बाबा काही केल्या ऐकायला तयार नव्हते.

ते खुर्चीवरून उठेनात. मग मात्र माझा संयम गेला. मी त्यांच्याशी वाद घालायला लागलो. निल्याही बोलला, बाबा ही तुमची जागा नाही. मी म्हटलं तुम्ही तुमच्या तिकिटावरील नंबर पहा आणि त्याप्रमाणे बसा. गोंधळ वाढायला लागल्यावर आजूबाजूचे लोकं ओरडायला लागली. एकजण उठला आणि बोलला तुला खुर्ची मिळाली ना? मग गप पिक्चर बघ की. मी पण म्हटलं ही माझ्या girlfriend ची जागा आहे. गोंधळ वाढल्याने तो बॅटरीवाला बॅटरीच्या उजेडात मार्ग शोधत आमच्याजवळ आला. तो बोलला काय भानगड आहे? आता बाबाही तापले होते. मागचे-पुढचेही लोकं त्यांना डिस्टर्ब झाल्याने बडबडत होते. बाबा बोलले ही दोन कार्टी मला त्रास देतात त्यांना अगोदर बाहेर काढा. मी पण म्हटलं यांचे तिकीट तपासा आणि त्यांना त्यांच्या जागेवर नेऊन बसवा. आमचा गोंधळ वाढल्याने शेवटी चित्रपट थोडावेळ थांबवण्यात आला. तो टॉकीजचा कर्मचारी ओरडला. थांबा, दंगा करू नका मी पाहतो. त्याने बाबांचे तिकीट पाहिले आणि माझ्याकडे पाहत बोलला, ते बरोबर बसलेत. कशाला उगीच आकांड-तांडव करताय? मी म्हटलं कसे शक्य आहे? बाबा चांगलेच तापले होते. बोलले का शक्य नाही? मी विचारले तुम्ही हे तिकीट कोठून घेतले? बाबा रागात बोलले एस-टी स्टँडवरून.

तो बॅटरीवाला कर्मचारी बोलला आता शांतपणे पिक्चर बघा आणि इतरांनाही बघू द्या. मला काहीच कळेना. मी त्यांच्याकडे पाहून म्हटले हे माझ्या girlfriend चे तिकीट आहे. तुमच्याकडे कसे आले? बाबा वैतागले आणि म्हणाले, काय त्रास आहे हा? कोण तुझी girlfriend? हा त्रास नको म्हणून मी माझ्या नातीला सकाळीच advance booking करून तिकीट काढायला पाठवले होते. तरी हा घोळ? लोकांना शिस्तच राहिली नाही. मी म्हटलं….. नात? ते हो बोलले. मग मात्र मी पूर्णपणे ओशाळलो. मी निल्याचा हात धरला आणि त्याला ओढतच थिएटर बाहेर आणले. केवढा मोठा पचका? हा शुद्ध धोका आहे. मी मनातून चडफडत होतो. हे असं कसं घडलं? माझी झालेली फजिती पाहून निल्याला हसू येत होते. माझ्या मनाला ते खूप लागलं होतं. तिने तिच्या आजोबांसाठी तिकीट घेतले होते. मला वाटले ती स्वतः पिक्चर पाहायला येणार आहे. तिची ती मानेला हिसका देत पाहण्याची पद्धत आणि ती ज्या नाजूक आणि गोड आवाजात बाय-बाय म्हटलेले आणि ती रेशमी केसं जे माझ्या तोंडावरून फिरलेले या आठवणींचे तेवढे सुखाचे गाठोडे घेऊन आम्ही घराकडे परतलो. मनाशी म्हटलं बघू परत कधीतरी भेटेल. दुनिया बहोत छोटी हैं. तरी निल्या बोंबलत होता. फुकट पिक्चर बघायला मिळत होता तो पण घालवला. मी मात्र संधी हुकली म्हणून तळमळत होतो.

-किशोर बोराटे