माझं नाव तुषार म्हात्रे, पेशाने आणि पैशानेही शिक्षकच! गेली बारा वर्षे नोकरीच्या निमित्ताने भटकंती करतो आहे. मुंबईला जवळ असूनही अस्सल ग्रामीणपणा टिकवलेल्या पिरकोन गावचा कधीकधी रहिवासी. म्हणजे एकप्रकारे अनिवासी पिरकोनकरच. पाककलेचा फारसा अधिकृत पूर्वेइतिहास नसलेल्या कुटूंबातला आणि एकेकाळचा शुद्ध(!) मांसाहारी मनुष्य. एकेकाळचा म्हणण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत शुद्ध मांसाहारी ते शुद्ध शाकाहारी असा कठीण प्रवास झाल्यानंतर सध्या मिश्रहारी हे बिरूद मिरवत आहे. चहा हे आमच्या संपूर्ण कुटुंबाचं राष्ट्रीय पेय. पॅथॉलॉजीच्या लॅबमध्ये ज्याप्रमाणे एखाद्या घटकाचे विश्लेषण करून मिळते त्याप्रमाणे आमच्या घरातील व्यक्ती चहा पिऊन झाल्यानंतर त्यातील चहापत्तीचे प्रमाण, साखर, दूधाचा प्रकार इ. सहज सांगू शकतात. (खोटे वाटत असेल तर माझ्या मोठ्या भावाला म्हणजेच भाईला चहाला बोलवून पहा.)
असो, आता नमनालाच घडाभर चहा झाल्यानंतर मी मूळ मुद्द्याकडे येतो.मी पदार्थ (बि)घडवायला कधी लागलो? नेमकं आठवत नाही पण, माझ्या पाककलेची सुरूवात माझ्या आवडी-निवडीमुळेच झाली. ज्या वेळी ताटात माझ्या आवडीचे जेवण नसेल त्यावेळी मी स्वत: उठून एखादी चटणी किंवा ‘इन्स्टंट’ पूरक पदार्थ तयार करून खात असे. बऱ्याचवेळा हा पदार्थ उपलब्ध साहित्य आणि वेळ या गोष्टींवर अवलंबून असायचा. हा पदार्थ मी एकट्यापुरताच करत असे. या पदार्थाची पाककृती माझी स्वत:ची असल्याने मी ते आवडीने खायचो पण यातील शिल्लक पदार्थ घरातल्यांना मिळाल्यास (चुकून) ते देखील चवीने खायचे. बटाटा आणि अंडे या दोन गोष्टींवर मी आतापर्यंत इतके प्रयोग केले आहेत की ते लिहून ठेवले असतेे तर एखादे पाककृतींचे पुस्तकच तयार झाले असते. कैरी, कच्ची करवंदे यांचे इन्स्टंट लोणचे ही माझी खासियत. मी या पदार्थाचे पेटंटही घ्यायला हरकत नसावी.या पदार्थाने मला आतापर्यंत खूपवेळा मदतीचा हात दिलाय. तिखट मसाल्याला वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने फोडणी दिल्यानंतर कोमट तेलात कैऱ्यांच्या फोडी टाकून तयार केलेले लोणचे घरातील सर्वचजण आवडीने खातात.आमच्या घरातल्यांपैकी खाण्याच्या पदार्थांवर विविध प्रयोग करण्यात आमची ‘बारकी आत्या’ माहिर आहे. तिने घडवलेले-बिघडवलेले पदार्थ मी खूप वेळा खाल्ले आहेत. मात्र तीने देखिल माझ्या कडून या इन्स्टंट लोणच्याची कृती विचारून घेतली आहे. (हे म्हणजे सचिन तेंडुलकरने आशिष नेहराकडून फलंदाजीच्या टिप्स घेतल्यासारखे झाले.) अर्थात त्या बदल्यात मी देखील बरेचसे पदार्थ तिच्याकडून शिकून घेतले.नोकरीची सुरूवात घरापासून दूर महाडजवळील पोलादपूर तालुक्यात झाल्यामुळे पोटापाण्याचा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला होता. एका अविवाहित पुरुषाला ‘परपोषी’पणाकडून ‘स्वयंपोषी’पणाकडे जाण्याची हीच खरी संधी होती, परंतु रुमपार्टनर्सच्या आग्रहाखातर खानावळवाले,डब्बेवाले, हॉटेलचालक, ढाबेवाले या सर्वांना व्यवसाय करण्याची आम्ही वारंवार संधी दिली. या परोपकार करण्याच्या काळातही माझे ‘इन्स्टंट’ प्रयोग चालूच होते. या जोडीला पोलादपूरमधील सुमारे पाच वर्षाच्या काळात मी आमचे ‘राष्ट्रीय पेय’ चहा बनवण्यात तरबेज झालो. खोलीवर कोणीही पाहुणे आले तरी चहा मीच बनवायचा हे अलिखितच होते.
चहाच्या संदर्भातील तेथिल एक आठवण आहे. आमच्या एका शिक्षक मित्राचे नुकतेच लग्न झाले होते. त्याने आम्हाला जेवणासाठी आमंत्रण दिले होते. पोलादपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शाळेत तो काम करत होता. राहण्याचे ठिकाणही तेच गाव. अमित आणि विश्वंभर हे माझे दोन रूमपार्टनर तसेच आमच्याहून वयाने ज्येष्ठ असलेले म्हात्रे गुरूजी असे चारजण संध्याकाळी त्याच्या घरी गेलो. सुरुवातीला पाणी वगैरे देऊन झाल्यानंतर त्या शिक्षक मित्राने मला किचनमध्ये बोलावले आणि सर्वांसाठी चहा करण्यास सांगीतले. त्याला माझ्या हातचा चहा आवडत होता. चहा बनवल्यानंतर त्याने तो चहा त्याच्या पत्नीलाही दिला व असाच चहा बनवायला शिकूून घे असा सल्लाही दिला. माझे नशिब इतकेच की मी भांडीदेखिल चांगली घासतो हे त्याला आठवले नाही, नाहीतर अजूनच पंचाईत झाली असती.
कालांतराने माझी बदली उरण तालुक्यात झाली, त्यानंतर लग्नही झाले त्यामुळे माझी स्वयंपाकघरातील लुडबूडही कमी झाली. आता माझ्यातील स्वयंपाकातील कला लुप्त होणार की काय अशी भिती निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा आमचे व्यवस्थापन मदतीला धावले. अवघ्या 4 वर्षानंतर 2016 साली माझी बदली पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात झाली. नोकरदार पत्नी आणि दीड वर्षाच्या रियानला सोडून 200 किमी लांबच्या शाळेत रुजू झालो. तालुक्याचे ठिकाण असूनही केवळ एकच खानावळ, लहानशी बाजारपेठ यांमुळे माझेही कुपोषण होण्याची शक्यता निर्माण झाली. माझ्या सुदैवाने व माझ्या मित्राच्या म्हणजेच महेशच्या दुर्दैवाने त्याचीही बदली मोखाडा येथेच झाली. माझे सुदैव असे म्हणण्याचे कारण म्हणजे तो एक चांगला स्वयंपाकी आहे. त्याच्या सोबत राहून मी सुद्धा आता बऱ्यापैकी जेवण तयार करू शकतो. ‘इन्स्टंट’ प्रकारापुरती मर्यादित असलेली माझ्या पाककलेच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत. इतरांच्या घरात जसे स्वयंपाकघर असते तसे आमच्या खोलीत ‘स्वयंपाक प्रयोगशाळा’ आहे. अनुभवातून चुकतो आहे पण शिकतो आहे. विविध प्रकारचे पदार्थ तयार केलेत, परंतु उत्कृष्ट चहा बनवणारा अशीच माझ्या मित्रांमध्ये ख्याती आहे. मात्र अजूनही मी केलेला चहा आमच्या भाईला फारसा रुचलेला नाही. जेव्हा मी केलेल्या चहाला भाई पसंती देईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मी चहा बनवण्यात वाकबगार झालो असे म्हणता येईल.
– तुषार म्हात्रे,