गोलंदाजांचा कर्दनकाळ

आदर कमवायचा असतो असे म्हणतात. सेहवागचा आदर कमवण्यासाठी बॉलरना हिमालयात किमान दोन हजार वर्षे तपश्चर्या करावी लागली असती, तरीही तो त्यांना मिळाला असताच असे नाही! गोलंदाज ही सर्वाधिक तुच्छ जमात असावी त्याच्या लेखी, दखलही न घेण्याच्या योग्यतेची. हरियाणाच्या नजफगढ़ नावाच्या छोट्याश्या गावातून आलेल्या विरेंदर सेहवाग या मनुष्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील थोर थोर गोलंदाजांना भिऊन रस्ता देण्याची पद्धत मोडीत काढली.

ते करण्यामागे त्याचा रांगडा स्वभाव असावा. रांगडा म्हणजे उगाचच मारकुटेपणा करत सुटलाय असा नाही. हा रांगडेपणा त्याच्या बोलण्याचालण्यातून दिसे. फलंदाजीत तो त्याचा सर्वाधिक ठळक रंग होता. असे असले तरीही त्याच्या फटक्यांची गणना कलाकुसर या विभागात मोडेल.

अत्यंत बेदरकार खेळ हा अनेक आक्रमक फलंदाजांच्या खेळाचा मुख्य भाग असतो. म्हणजे एखाद्या वळणावळणाच्या घाटात देखील अतिशय वेगाने आणि कसाही गाडी चालवणाऱ्या चालकप्रमाणे. विरेंदर सेहवाग अत्यंत वळणावळणाच्या घाटातही “ड्रीफ्टिंग” करायचा, कौशल्यपूर्ण ड्रीफ्टिंग! ते बघताना आपण गाडीत बसलोय इतका थरार प्रेक्षकांना मिळायचा. सेहवाग बेदरकारपण आत्मघातकी नसायचे, साहसी असायचे.

२००३ विश्वचषकाआधी वादळी न्यूझीलंड टूरवर भारतीय फलंदाजी हजेरी लावून भत्ता घेऊन तंबूत परतत असताना, विरेंदर सेहवागने तीन शतके मारली होती. त्या दौऱ्यावर अन्य फलंदाजांना सतावत असलेला प्रश्नच त्याच्या आसपास फिरकत नसावा. भीती, हा तो प्रश्न! त्याला कशाचीच भीती नसे, हिरवंगार पिच, मोठा गोलंदाज, निष्णात क्षेत्ररक्षक किंवा पराभव… कशाचीही भीती नसायची त्याला. त्याच्या सहज तरीही उत्तुंग यशामागे हे कारण असेल.

कसोटीत त्याला केवळ कंटाळा आला तर तो आउट व्हायचा! भारतीय संघाचा जुन्या काळाचा सलामीच्या फलंदाजाच प्रश्न सेहवागच्या आगमनानंतर सुटला. दुसरा सलामीवीर म्हणून आकाश चोप्रा असायचा, सेहवागमुळे तो सुसह्य व्हायचा!

तसे त्याच्यामुळे बरेच काही सुसह्य झाले आपल्यासाठी. कसोटीत देखील वेगाचा थरार त्याच्यामुळेच मिळाला आपल्याला. त्याचे अतिशय मोठ्या गोलंदाजांची पत्रास न राखणे हे देखील आश्चर्यकारक वाटायचे. मागच्या सामन्यात फारसा काही न करता आउट झाला तरी पुढच्या सामन्यात आपला जन्मजात खेळ करणे ही देखील असाच दिलासा देणारी गोष्ट करायचा तो.

मोकळा ढाकळा स्वभाव हे त्याचे गुणवैशिष्ट्य त्याच्या फलंदाजीतही उतरलेले. पायाची न इतपत हालचाल असूनसुद्धा त्याने मारलेला चेंडू तुफान वेगाने पळत सुटायचा, थेट सीमारेषेकडे. भन्नाट हँड-आय ताळमेळ हे त्यामागचे कारण. अत्यंत दुर्मिळ गोष्ट असते ही, मोजक्या काही फलंदाजांकडे असते. ती असणे तोंडात बोटं घालायला लावणारे फटके उत्पन्न करते. सेहवाग आपल्याला हाताची पाचही बोटे आश्चर्याने तोंडात घालण्यास भाग पाडायचा.

अनेक थोर माजी क्रिकेटपटूंना त्याच्या या ताळमेळ बघून चकित होताना आपण पाहिलंय आणि ऐकलंय. त्यांचे त्याबाबतचे आश्चर्य समालोचन करताना शब्दांवाटे बाहेर पडत असे. आनंद वाटायचा तेव्हा. जेव्हा तो त्याच्या धरणाचे “फ्लड गेट” उघडायचा तेव्हा देखील असाच आनंद व्हायचा. गोलंदाज दुखी व्हायचे, प्रेक्षक आनंदित व्हायचे. कोच त्याच्या जागेवर तो सैलावून बसायचा. कप्तान विजयाचा जल्लोष मनात आरंभ करायचा. आणि आपण… आपण दिपलेले डोळे घेऊन बुद्धी आणि डोळे यांच्यात ताळमेळ लावायचा यत्न करायचो… जमल्यास.

Thank you Sehwag Paaji…

© Ashutosh Ratnaparkhi.

श्रीकृष्णार्पणमस्तू

2 प्रतिक्रिया

  1. विरेंद्र सहवागची फलंदाजी पाहणे हा माझ्यासाठी स्वर्गीय आनंद होत. अजूनही सहवाग, सौरभ, द्रविड, लक्ष्मण, श्रीनाथ, धोनी, कुंबळे यांना खेळताना पाहण्याची तीव्र इच्छा आहे.