राजाला राजासारखा निरोप द्यावा
द्वारकानाथ संझगिरी
अत्यंत जड अंतःकरणाने मी हा लेख लिहितोय.
पराभूत धोनी पाहताना त्यादिवशी खूपच वाईट वाटत होतं. कारण तसं त्याला कधी फारसं पाहिलेलंच नाही. त्यामुळे धोनीने आयपीएल खेळण्याचा पुनर्विचार करावा, असं कुठे तरी मनात येऊन गेलं.
सचिननंतर जर कुणी एखादा खेळाडू तरुणांना आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर तो धोनी आहे.
त्याची कथा ही’ रँगस् टू रीचेस स्टोरी’ आहे.
कुठे रेल्वे स्टेशनवरचा तिकीट चेकर आणि कुठे दोन वर्ल्ड कप जिंकून देणारा भारताचा कर्णधार आणि क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत!
प्रसंग कितीही बाका असो, बर्फालाही त्याच्याकडून थंडपणा घ्यावा अस वाटावा असा थंड. मैदानावर आणि मैदानाबाहेर सहसा वाद विवाद नाही!
वनडे आणि टीट्वेन्टीमध्ये, जागतिक दर्जाचाच नाही, तर ऑलटाईम ग्रेटमध्ये जाऊन बसावा असा परफॉर्मन्स. आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधल्या इतिहासातला तो सर्वोत्कृष्ट कर्णधार. कॅप्टन कुल!
अशा माणसाला त्याच्या आयपीएल खेळण्याबद्दल पुनर्विचार करायला सांगताना मनावर दगड ठेवावा लागतो.
पण या आयपीएल 2020 मध्ये धोनी हा धोनी वाटलाच नाही. हिंदी चित्रपटाच्या डॉयलॉगच्या स्टाईल मध्ये सांगायचं तर, “कोई बहरूपीया धोनी की जगह पर खेल रहा था।” असं म्हणायला लागेल. आयुष्यात योग्य वेळी सर्वोच्च स्थानावर असताना कार्य संपवणं हे सर्वांनाच जमत नाही. फार फार थोड्या जणांना जमलंय.
ते ज्ञानेश्वरांना जमलं.
ते नेल्सन मंडेलांना जमलं. 27 वर्ष तुरुंगवास! मग देशाचा अध्यक्ष होणं. अणि तहहयात अध्यक्ष राहायची शक्यता असताना निवृत्त होणं. आणि मग सामान्य माणसासारखं आयुष्य जगणं. सगळंच ग्रेट.
क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमनबद्दल तसं म्हणता येईल. 1948 साली सर डॉन ब्रॅडमन ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते. त्या ऍशेश सीरिजमध्ये ते एकही काउंटी मॅच सुध्दा हरले नाहीत. 5 कसोटीपैकी 4 कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकल्या. स्वतः ब्रॅडमनने वयाच्या 40 व्या वर्षी 72 च्या सरासरीने 9 डावात 508 धावा केल्या. त्यात 2 शतकं ठोकली. आणि तरीही निवृत्त झाले. निवृत्त होताना ते शेवटच्या डावात शून्यावर बाद झाले. त्यामुळे त्यांची सरासरी 99.94 अशीच झाली. ते भारतीय असते तर’ खास लोकाग्रहास्तव’ त्यांना 1 कसोटी खेळवून सरासरी 100 करायला लावली असती. 99.94 च्या कड्यावर आयुष्यभर लटकून रहायला त्यांना दिलं गेलं नसतं.
त्यानंतर फार कमी जणांना ते जमलं.
आता ते जास्त कठीण झालंय. कारण क्रिकेटमध्ये आलेला पैसा आणि पैशाकडे नेणारा प्रकाशझोत. प्रकाशझोत कमी झाला की पैसा कमी होतो. त्यामुळे निर्णय कठीण झालाय. जे आयपीएल क्रिकेट खेळतात त्यांच्या निवृत्तीची प्रक्रिया साधारण अशी असते. आधी कसोटीतून निवृत्त व्हायचं. मग वनडेतून. मग टीट्वेन्टीतून आणि शेवटी आयपीएलमधून. कारण आयपीएलमधून निवृत्त होणं म्हणजे कुबेराच्या दरबारातून निवृत्त होणं. ते कठीण जाणारच. धोनीही त्याच मार्गाने गेला. आधी तडकाफडकी तो कसोटीतून निवृत्त झाला. मग कोविडच्या वातावरणात त्याने अचानक वनडे, टीट्वेन्टीतून निवृत्ती स्विकारली. आणि मग तो फक्त आयपीएलच खेळला.
यावर्षी आयपीएलमध्ये एक संघ म्हणून चेन्नई सुपरकिंग पहिल्यांदाच’ प्ले ऑफ’ मध्ये पोचण्यापूर्वीच कोसळला. त्यांची या मोसमाची सुरवात सुद्धा वाईटच झाली. सुरेश रैनाशी दुरावलेले संबंध, ही चेन्नई सुपरकिंगने स्वतःच्या पायावर मारून घेतलेली पहिली गोळी होती. मग आणखीन एक गोळी पायात घुसली. हरभजनने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला. मग सपोर्ट स्टाफला करोना झाला. मुंबईला हरवून त्यांची सुरवात चांगली झाली होती. पण पुढचा रस्ता लंगडतच चालावा लागला. आणि प्ले ऑफच्या सीमारेषेपर्यंत जखमा भरल्याच नाहीत. उलट वाढतच गेल्या. त्यात धोनीने या मोसमात अजूनपर्यंत 12 सामन्यात 199 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 118.45 असा आहे. त्यात एकही अर्धशतक नाही. धोनीसाठी हा स्ट्राईक रेट म्हणजे आयएस अधिकार्याने,
कारकुनाचा पगार घेण्यासारख आहे. धोनी म्हणतो त्याप्रमाणे नशिबाने त्याच्याशी कट्टी केली असेल. पण कर्णधार धोनीचेही काही निर्णय अयशस्वी ठरले.
आता पुढे काय?
धोनीच 2021 च्या मोसमात कर्णधार होईल असं चेन्नईच्या सीईओने सांगितलं. अर्थात धोनीची इच्छा असेल तर ती पूर्ण होईलच. कारण शेवटी धोनी हा धोनी आहे. पण प्रश्न असा आहे की, धोनीला सुद्धा आता विचार करावा लागेल की त्याचं शरीर त्याला किती साथ देतंय? त्याचे रिफ्लेक्सेस त्याला किती साथ देताहेत? हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट नसेल तरीसुद्धा धोनीची एक प्रतिमा आपल्या मनात आहे. ती प्रतिमा त्याच्या शेवटच्या दिवसात विस्कटता कामा नये. देवानंद हा माझा लाडका हिरो. मी त्याला पहिल्यांदा म्हातारपणी भेटलो. त्याला भेटल्याचा प्रचंड आनंद मला झाला. पण डोक्यात देवानंद होता तो पडद्यावरचा. तो समोर नव्हता. त्यामुळे मी प्रचंड निराश झालो. म्हणून मला कधी कधी वाटतं की, मधुबाला तरुण वयात गेली तेच बरं झालं. म्हातारी मधुबाला मी पाहू शकलो नसतो. तसंच क्रिकेटपटूचं आहे. क्रिकेटपटूला त्याच्या फुल फॉर्ममध्ये ज्यांनी पाहिलंय त्याला नंतर फॉर्मसाठी झगडताना, धावांसाठी झगडताना पहावत नाही.एरवी लीलया षटकार मारणार्चाया पाय चेंडूपर्यंत पोहचला नाही की मग वाईट वाटतं. कधीतरी तो एखादी चांगली खेळी खेळून जाईलही.दोन चार जुने फटके दाखवेलही. वाघ म्हातारा झाला तरी त्याचा पंजा मांजरीचा होत नाही.पण त्याला पहाताना मन जखमी होतं.
श्रीकृष्णाला कुरुक्षेत्रावरचे हजारो बाण स्पर्श करू शकले नाहीत. पारध्याच्या एका बाणाने त्याला संगितलं, ‘ अवतार कार्य संपवायची वेळ आलीय.’ धोनीसुध्हा त्याच बाणाच्या शोधात असावा. निवृत्तीचा निर्णय स्वतः धोनीलाच घ्यायचा आहे. माझी एक इच्छा आहे की पुढच्या वर्षी धोनीने आपला कसा फॉर्म आहे हे पहावं. आणि त्याला खरंच वाटलं की नाही बसं झालं तर मग त्याच आयपीएलमध्ये त्याने एक मॅच निवडावी आणि त्यादिवशी निवृत्त व्हावं. ते सुद्धा सचिन तेंडुलकर प्रमाणे भरलेल्या स्टेडियममध्ये आणि टेलिव्हिजन पाहणाऱ्या करोडो लोकांच्या डोळ्यात अश्रू आलेले असताना.
राजाला राजा सारखा निरोप मिळावा.