तो माझ्यासारखाच खेळतो

“तो माझ्यासारखाच खेळतो”!

या वाक्याने, ऑसी बोटं आश्चर्याने तोंडात गेली. भारतीय डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागले… क्रिकेटच्या आद्य श्रेष्ठाने, सर्वकालीन श्रेष्ठ फलंदाजाबद्दल काढलेले हे आश्चर्योदगार. महानतेला महानतेची मिळालेली मान्यता. सर्वकालीन महान फलंदाजांचे नाव घेत असताना, सचिन तेंडुलकर आणि सर डॉन यांच्या सोबत सर व्हीवीयन रिचर्डस हे नाव येणे बंधनकारक आहे.

विराट कोहली वेगाने या यादीत समाविष्ट होण्याकडे वाटचाल करतोय. “वेग”. अचंबित करणारा वेग हे त्याच्या कारकिर्दीचे ठळक वैशिष्ट्य मानता येईल. १७५ व्या सामन्यात ८,०००, १९४ व्या सामन्यात ९,०००, २०५ व्या सामन्यात १०,०००, २२२ व्या सामन्यात ११,००० एकदिवसीय धावा या वेगाने त्याने धावा केल्यात. हे देखील एक वेळ सोडून द्या. ते करताना त्याने कुरुपतेला जवळपासही फिरकुन दिलेले नाही. हे आश्चर्यजनक आहे.

अतिशय देखणे क्रिकेट फटके हे विराटच्या खेळाचे मुख्य वैशिष्ट्य. फटक्यांमध्ये रेखीवता असणे हे क्रिकेटमध्ये अतिशय दुर्मिळ! ती विराटच्या खेळात भरभरून आढळते. साधारणतः, मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट होते तेव्हा त्यात सौन्दर्य, रेखीवपण राहत नाही. बेढबता येते. विराट कोहलीच्या बाबतीत हे झालेले नाही. तो डोळे विस्फारणाऱ्या वेगाने धावा जमवतोय, तरीही त्याच्या प्रत्येक धावेमध्ये सौन्दर्य आहे. हे करताना डोळ्यांचे पारणे फेडणे तो मुक्तहस्ते फेडत असतो. स्टीव्ह स्मिथ नामक अजागळ मनुष्य क्रिकेट खेळतो तेव्हा तात्काळ टीव्ही बंद करावा वाटतो, कोहली खेळताना रिप्ले देखील थरारक वाटतो!

तो फेरारीच्या वेगाने कसोटी विक्रम मोडत चाललाय. एकेकाळी दुष्प्राप्य असलेले विक्रम सचिनने मोडले. ते विक्रम इतक्यात तरी मोडतील असे वाटत नसताना कोहली झाडावरची फळे तोडावीत त्या सहजतेने ते विक्रम गाठत चाललाय. महेंद्रसिंग धोनी नंतर त्याच्या कडे संघाची धुरा आली. स्नायपर कडून कप्तानपद मशीनगन कडे गेलं!

विराट कप्तानपदाखाली भारत, निरस वाटणारे कसोटी सामने जिंकण्याच्या इर्षेने खेळू लागला. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पहिलावहिला कसोटी मालिका विजय प्राप्त केला. यामागे नेहेमी म्हटले जाते तसे धोनीचा आयता मिळालेला संघ वगैरे नव्हता.

धावांचा पाठलाग करताना त्याची सरासरी ६९ एवढी आहे. ६९?? याचा अर्थ प्रत्येक पाठलागात त्याने किमान अर्धशतक झळकावले आहे असा होतो! त्याची शैली भरजरी आहे. त्याच्या फटक्यांची श्रीमंती ठसठशीतपणे डोळ्यात भरते. “Torn jeans” च्या फॅशन युगात एखादी भरजरी वस्त्र नेसलेली व्यक्ती जशी उठून दिसेल, तशी आडव्या तिडव्या कुरूप फटाक्यांच्या सुळसुळाट असलेली या ट्वेन्टी ट्वेन्टी कालखंडात त्याची फलंदाजी उठून दिसते!

भारतीय संघात बऱ्यापैकी भिनलेली आक्रमकता विराटने स्वाभाविक केली. भारतीय चाहत्यांना अजूनही ती अनेकदा अनाठायी वाटते. आरनॉल्ड श्वार्झनेगर कधी सूरज बडजात्याच्या चित्रपटातील मोहनिश बहल प्रमाणे गोडगोड वागू शकत नाही… तो बुकलूनच काढणार!

तसेच, विराट कडून तशी अपेक्षा करणे हे देखील चुकीचेच. अनैसर्गिक होईल ते. विशेषतः जेव्हा स्वयम् व्हीव रिचर्डस तुमच्याबद्दल बोलतात “तो माझ्यासारखा खेळतो” तेव्हा तर मुळीच नाही! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा विराट कोहली. Happy Birthday King Kohli.

© Ashutosh Ratnaparkhi

श्रीकृष्णार्पणमस्तू