चिंता ता चिता चिता चिंता ता ता

एके दिवशी सकाळी मी माझ्या गाडीतून मुंबईला निघालो होतो. गाडी सुरू केली तेवढ्यात माझा बालमित्र जगन्नाथ मला भेटला. मी त्याला नमस्कार केला आणि म्हंटले, ‘नमस्कार जगन्नाथा, ओळखलस का मला.’
‘अरे मी तुला ओळखत नाही, असं होईल का. मी तुझ्याकडे आणि तुझ्या गाडीकडे पहातच बसलोय. तुझ्यासारखा सुखी माणूस तूच आहेस. शेजारी ड्रायव्हर आहे, तुला गाडी चालवायचंहि न्याट नाही. आम्हाला बघ, बारा वर्षे झाली तीच मोटरसायकल वापरतोय. एक दोन आठवड्यात तिला तिच्या डॉक्टरांच्याकडे न्यावेच लागते. कधी हे मोडले, कधी ते मोडले, कधी हे बिघडले, कधी ते बिघडले, चालूच आहे. घरच्यांनीही वैताग दिलेला आहे. बायकोचे आजारपण चालूच आहे. अगदी माझ्या गाडीसारखी तिची अवस्था झाली आहे. गाडीची दुरुस्ती आणि तिची दुरुस्ती सारखीच चालू आहे. गाडी पण सुख देईना आणि बायकोपण सुख देईना.’
‘एवढं काय झाले वहिनींना?’
‘काय झालय काय विचारता. कुठला आजार शिल्लक राहिला नाही, बीपीचा त्रास आहे. शुगरचा त्रास आहे. गुडघेदुखी आहे,चक्कर येत आहे.’
‘जगन्नाथा, दीदी आता मोठी झाली असेल, ती सातआठ वर्षांची असताना पाहिले असेल मी तिला. त्यानंतर कधीच घरी आलो नाही रे तुझ्या. काय करते ती? किती शिकली आहे ती’ ‘खूप शिकली आहे ती. हुशार आहे. ती तशी बीए झाली आहे. तिच्या हिमतीवरच कॉलेज पूर्ण केले तिने. परंतु काय उपयोग. चांगली नोकरी मिळत नाही. लग्न करावं तर नवरा मिळत नाही. खूप स्थळे बघितली. कधी आम्हाला पसंत नसते, तर कधी त्यांना पसंत नसते. काय करायचं. ओळखीचं एखादं स्थळ असलं तर सांग.’
‘जरूर जरूर, माझ्या खूप ओळखी आहेत. पाहीन मी आणि छोकरा लहान आहे ना रे तुझा. तो काय करतो? दिदीपेक्षा तीन वर्षांनी लहान असावा, असं वाटतंय.’
‘बरोबर आहे. तीन वर्षांनी लहान आहे. बारावी झाला कसा तरी गेल्यावर्षी. पुढे शिकायचं नाही म्हणतोय. काय करायचं शिकून, दीदी एवढी शिकली, पण तिला तरी कुठे चांगली नोकरी मिळाली. त्यापेक्षा मी शेती करतो म्हणतोय. माझं आयुष्य शेती आणि मसरात गेलं, पोरांचं जाऊ नये, असं वाटलं होतं, परंतु कर्म माझं. पोरगं काही वेगळे करेल असं वाटत नाही.’
‘त्याला अजून शिकव. वेळ गेलेली नाही. तुझं नाही ऐकलं तर मला सांग, मी समजावून सांगेन त्याला.’
‘एक ना धड, भाराभर चिंध्या. एक अडचण सोडवली की दुसरी, दुसरी सोडवली की तिसरी. जाऊ दे. पण हे असंच चालायचं. कधीकधी वाटतं सगळं सोडून द्यावं आणि मसनवाट्यात जाऊन राहावं.’
मी जगन्नाथकडे निरखून पाहिले, खरंच चेहरा पडलेला, केसं पिकलेली, दाढी थोडीशी वाढलेली, मिशा पिकलेल्या, हसण्याचा प्रयत्न करत करत त्याचे प्रॉब्लेम्स मला तो सांगत होता. मी जगन्नाथाला म्हटले, ‘एवढा का वैतागला आहेस, चल मुंबईला माझ्याबरोबर. गप्पा मारू. दोन दिवस राहू. माझी कामे आहेत, तुझी पण सोबत होईल.’
जगन्नाथ म्हणाला, ‘एवढं कुठलं आमचं नशीब मुंबईला यायचं. पंधरा वर्षांपूर्वी वडिलांच्या बरोबर गेलो होतो. त्यांची काहीतरी कामं होती. काकांच्या चाळीतल्या घरी राहिलो होतो, पण परत मुंबईचं दर्शन नाही. आता तर शक्यच नाही. म्हशींना कोण सोडणार. सर्व कामे माझ्या बोकांडीवर आहेत.’
त्याचा त्रागा पाहून मी म्हटले, ‘राहू दे. पण बुधवारी सकाळी तू माझ्याकडे ये. आपण गप्पा मारत बसू या. पण नक्की ये. मी तुझ्यासाठी वेळ काढून ठेवतो. सकाळी सात वाजता मी रनिंगला जात असतो. त्यावेळी पळणेही होईल, फिरणेही होईल, आणि गप्पाही होतील.’

बुधवारी सकाळी सात वाजताच जगन्नाथ माझ्याकडे आला. मी रनिंगला बाहेर पडण्याच्या तयारीत होतो. जगन्नाथा, पळ माझ्याबरोबर, असे म्हणताच जास्त काही न बोलताच, आम्ही रनिंगला सुरुवात केली. दोन किलोमीटर रनिंग केल्यानंतर आम्ही एका नदीकिनारी थांबलो. नदीला सुंदर असा घाट होता. पाणी दुथडी भरून वाहत होते. पावसाळा नुकताच संपल्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूला हिरवळही पसरलेली होती. महादेवाचे मंदिर नदीकिनारी होते. मंदिराच्या पुढे मोठा पार होता. पाराच्या मधोमध पिंपळाचे एक मोठे झाड होते. पिंपळाच्या पानांची सळसळ ऐकू येत होती. वातावरण एकदम आल्हाददायक असे होते. मी जगन्नाथाला म्हटले, ‘जगन्नाथा, दमला असशील. आता जरा आपण बसुया. चल पारावर बसूया. किती छान निसर्गसौंदर्य आहे ते पहा. पलीकडच्या तीराला एक मंदिर दिसत आहे. मंदिराच्या पायऱ्या किती छान आहेत. मंदिराच्या दोन्ही बाजूला हिरवळ कशी पसरली आहे. जगन्नाथा, हे जग किती सुंदर आहे, पण ते पाहण्यासाठी आपणाला सुंदर डोळे हवे आहेत. अर्थ कळाला का तुला? सुंदर डोळे म्हणजे अगदी चिकणे डोळे दिसायला पाहिजेत असं नव्हे, परंतु प्रत्येक वस्तू, व्यक्ती आणि घटना पाहताना त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून, सुंदरतेच्या दृष्टिकोनातून पाहता यायला हवे. अशाप्रकारचे सुंदर डोळे हवे आहेत. काय वाटतं तुला?’
‘हो डॉक्टर, खरे म्हणणे आहे तुझं. काही लोक विनाकारण नावे ठेवत राहतात. नदीला पाणी नसलं तरी यांना वाईट वाटतं, नदीला पूर आला तरी यांना वाईट वाटतं. पाऊस नाही पडला तरी रडतात, पाऊस पडला तरी रडतात. त्यांचा स्वभावच रडका असतो.’
‘आपण नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या धैर्याने करावयास पाहिजेत आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्या आपण आनंदाने स्वीकारायला पाहिजेत. पाऊस कधी कुठे किती पडेल हे आपण सांगू शकत नाही किंवा कधी कुठे किती पाडावा हे आपल्या हातात नाही. म्हणून तो केव्हा पडेल तेव्हा आनंद मानणे आपल्या हातात आहे आणि तेच आपल्या हिताचे आहे. जगन्नाथ, पाऊसाचे तर आहेच, पण प्रत्येक ऋतूबद्दल माझे हेच म्हणणे आहे. थंडी पडली म्हणून काही लोक विव्हळत बसतात. त्यांना त्रास होत असतो. माझे मन मी सेट करून घेतले आहे. कोणताही ऋतू असू दे, आपण चांगला माणून घ्यायचे, तरच आपल्याला त्रास होणार नाही.’
‘तसा विचार केला तर तू म्हणत आहेस ते बरोबरच आहे, परंतु यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे माझे एक एकरातले सोयाबीनचे पीक वाया गेले. जास्त पावसामुळे ते ओंबळले. सोयाबीनची पाने पिवळी पडली. सोयाबीनच्या शेंगा सडून गेल्या. काही ठिकाणी सोयाबीन पुन्हा उगवले. सगळी दाणादाण झाली. वाटले होते या वर्षी सोयाबीनचे पीक चांगले आलेले आहे, एकरात 12 पोती होतील आणि माझा कर्जाचा डोंगर थोडासा कमी होईल. परंतु झालं उलटच. सर्वच्या सर्व पीक वाया गेले आणि काढणीचा खर्च झाला तो वेगळाच. एवढं सगळं करुन कसं तरी एक पोतं घरी आलं.’
‘ जगन्नाथा, खरोखरच तुझे खूप नुकसान झाले आहे, पण आपण विचार करूया. हे मोठे संकट टाळण्यासाठी आपण काय करू शकलो असतो. पाऊस थांबवू शकलो असतो का? आपल्या शेतावरील पाऊस आपण ढकलून दुसऱ्याच्या शेतावर घालवू शकलो असतो का? पावसाळा संपल्यानंतर आपण सोयाबीन पेरू शकलो असतो का? हे तीन प्रश्न तुझ्या मनाला विचार. उत्तर नाही असेच मिळेल. म्हणून म्हणतोय, कि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्या आनंदाने स्वीकारावयाच्या. अरे, शेती म्हटले तर ती निसर्गावर अवलंबून आहे. कधी फायदा कधी तोटा हे ठरलेलेच आहे. बऱ्याच वेळा आपण खूप खूप विचार करून निर्णय घेत असतो, परंतु निसर्ग त्याची वाट लावत असतो. काय करणार? निसर्गापुढे कोणाचाच काही विलाज नाही. तुला माहित आहे का जगन्नाथा, माझ्या अमरावतीच्या मित्राची काय गंमत झाली ते. त्याने शेतामध्ये औषधी वनस्पती शतावरी लावली होती. शतावरीला पाणी कमी लागते. त्याच्या भागात तसा पाऊस कमी पडत असतो. परंतु यावर्षी धो-धो पाऊस पडला आणि दहा एकराच्या शतावरीची अक्षरशा वाट लागली. कुजून गेली, कुजून. सांग काय करायचे त्याने? 22 लाख कर्ज घेऊन त्याने हे धाडस केले होते. तुझे तर एक एकरातील सोयाबीन होते. माझ्या घराच्या पाठीमागे तीन एकरामध्ये असणारा ऊस गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या वादळ आणि पावसामुळे पूर्ण झोपला आहे.’
‘ अरे मी माझ्या बायकोच्या आजारपणासाठी 50 हजार रुपये कर्ज काढले होते. ते मी या सोयाबीनमधून फेडणार होतो. बायकोची तब्येत अजून बरी नाहीच. आमच्या गावात बऱ्याच डॉक्टरांना तिची तब्येत दाखवली पण कोणाचा गुण येत नव्हता. शेवटी एका डॉक्टरांनी तिला जवळच्या शहरातील एका नामांकित डॉक्टरना दाखवण्यास सांगितले. त्यांनी अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या. रक्त तपासणी, लघवीची तपासणी केली. एक्स-रे काढला. MRI केले. तरीही निदान पक्के झाले नाही. बीपीचा आणि मधुमेहाचा त्रास कमी झाला आहे परंतु, तिची चक्कर येण्याची काही थांबत नाही. मी तर वैतागलो आहे, तिच्या या दुखण्याला.’
‘आशा वहिनींना काय काय त्रास होत आहे? फक्त चक्कर येते का दुसरा काही त्रास आहे? रक्ताचे प्रमाण किती आहे? कानाचा काही त्रास आहे का? उलट्या होतात का? पित्ताचा त्रास आहे का? टेन्शन आहे का? चक्करसारखा आजार शक्यतो जास्त दिवस राहत नाही, परंतु काही काही पेशंटमध्ये चक्कर जास्त दिवसही राहते. जर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर तू थोडा दम धर. औषधे चालू ठेव. हा आजार बरा व्हावयाला काही अवधी लागतो. त्या आजाराला लागणारा अवधी त्याला द्यायलाच पाहिजे. काळ हे मोठे औषध आहे, हे लक्षात ठेव.’
‘ अरे यार, तिचे दुखणे तर चालूच आहे, पण मलाही चार वर्षापासून मधुमेह झाला आहे. मी नियमित औषधे घेत आहे, परंतु भीती वाटते. मधुमेह भयानक आजार आहे. कधी काय होईल सांगता येत नाही.’
‘नियमित औषधोपचार, नियमित तपासण्या, नियमित पथ्य आणि नियमित व्यायाम ही चतु:सूत्री जर अमलात आणलीस तर हा आजार तुला काहीच करणार नाही. काहीच त्रास देणार नाही. मधुमेह होऊ नये पण झालाच आहे तर त्याला तुझा मित्र मान. त्याला काय पाहिजे, काय नको ते पहा, मग तो आजार हा आजार रहातच नाही, तो तुझा मित्र बनेल.’
‘ खरे तर माझ्या आई-वडिलांना मधुमेह होता, त्यामुळे मला झाला. हा आजार अनुवंशिक आहे हे मला माहित आहे. मला काळजी वाटते की, माझ्यामुळे माझ्या मुलांना हा आजार होऊ नये. त्यांचे अजून लग्न व्हावयाचे आहे. दिदी एका खाजगी कंपनीत नोकरी करीत आहे. तिच्या लग्नाचा प्रश्न भेडसावत आहे. तिचे वय आता अठ्ठावीस वर्षे झालेले आहे. लग्नासाठी स्थळे येतात, पण कधी त्यांना पसंत असते तर कधी दिदीला पसंत नसते, त्यामुळे प्रॉब्लेम येत आहेत. चार वर्षे झाली आम्ही स्थळे पाहात आहोत, परंतु अजून कुठे जमलेले नाही. ओंकार तर बारावी झाल्यानंतर शेतीच करत आहे. त्याचेही वय पंचवीस वर्षे झालेले आहे. शेती म्हटले की, मुली लग्नाला तयार होत नाहीत. त्यांना सरकारी नोकरी करणारा मुलगाच पाहिजे असतो. दोघांची लग्ने कधी होणार कोणास ठाऊक.’
‘जगन्नाथा, मधुमेह हा आजार अनुवंशिक आहे. तू म्हणतोस ते सत्यच आहे. परंतु तो तुझ्या मुलांना होईलच अशी खात्री नाही. जर त्यांनी व्यायाम आणि आहार याचे पथ्य पाळले तर शक्यतो होणार नाही आणि जर अनुवंशिकतेमुळे झालाच तर स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. तू कसे स्वीकारलेस, तसेच त्यालाही ते स्वीकारावे लागेल. अनुवंशिकता बदलणे आपल्या हातात आहे का? मग त्याचा आनंदाने स्वीकार करावयाचा.’
‘ दुसरा प्रश्न राहतो त्यांच्या लग्नाचा. अरे एऱ्यागबाळ्यांची लग्ने होतात. तुझी मुलगी दिसावयास छान आहे. तुझा मुलगा तर स्मार्ट आहे. गोरा आहे. उंच आहे. दिदी खाजगी कंपनीत असली तरी, काहीतरी करून दाखवण्याची तिच्या ठिकाणी जिद्द आहे. त्यामुळे घाबरू नकोस. लग्न होण्यासाठी आपण स्थळे पाहतच राहावयाचे, प्रयत्न करतच राहावयाचे. जेव्हा योगायोग असेल तेव्हा त्यांची लग्ने नक्कीच ठरतील. एखाद्यावेळेस त्याने त्याची जोडीदारीण शोधली पण असेल. तू उगाच चिंता करत बसू नकोस, फक्त प्रयत्न करत राहा.’
‘डॉक्टर, माझ्याच मागे एवढी संकटे का लागली आहेत. माझे नातेवाईक, तुझ्यासारखे माझे मित्र किती सुखात आहेत. देवाने मला संकटाच्या खाईत ओढले आहे. एक संकट झाले की दुसरे, दुसरे झाले की, तिसरे. मी अगदी खचून गेलो आहे.’
‘अरे मित्रा, संकटे कोणाला चुकली आहेत. तुला वाटते का माझ्यापुढे संकटे नसतील. रोज रोज नवीन नवीन संकटे येतात, परंतु मी शांत डोक्याने त्यावर उपाय करत असतो. नाही उपाय निघाला तर सोडून देत असतो. फार वर्षांपूर्वी मीही असाच संकटांना घाबरायचो, वैतागायचो. परंतु आता संकटे झेलून झेलून मन खंबीर झाले आहे. कितीही मोठे संकट आले तरी ते संकट वाटतच नाही, ते एक चॅलेंज वाटते, ती एक संधी वाटते.’
‘मित्रा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकटे येतच असतात, किंबहुना आयुष्य हे संकटांची एक मालिकाच आहे. संकटांना धीरगंभीरपणे सामोरे जायचे की, हातपाय गाळून रडतकुढत बसायचे, हे ज्याचे त्याने ठरवावयाचे असते.’

‘मित्रा, त्या तिकडे नदीकिनारी पहा. कैलास स्मशानभूमीत कोणाचीतरी चिता जळत आहे. आगीचा डोंब उसळला आहे. स्मशानभूमीतून धूर निघत आहे. कोण असेल तो कोणास ठाऊक. पण त्याच्याबरोबर त्याची चिंताही जळत आहे. चिंता ही चितेपेक्षा भयानक असते. चिता ही एकदाच जाळते परंतु चिंता ही रोजरोज जाळत असते. चितेचे चटके बसत नाहीत, परंतु चिंतेचे मात्र जबरदस्त चटके बसत असतात. चिता ही शरीराला जाळते, तर चिंता ही मनाला जाळते, हे लक्षात ठेव.’
कधीही चिंता निर्माण झाली तर जागरूकपणे त्याच्यावर विचार करावयाचा. हे संकट खरेच आहे का, नुसते आभासी आहे. बऱ्याचवेळा संकटे ही आभासी असतात. बऱ्याचवेळा भीती ही आभासी असते. जर संकट खरेच असले तर, मनाला त्याचा स्वीकार करायला लावायचा. स्वीकार केल्यामुळे अनेक संकटे हलकी होतात किंवा नाहीशी होतात. मनातल्या नकारामाला काढून सकारामाला दोस्त बनवलं पाहिजे. आपल्या आयुष्याचे इंजीनियरिंग आपणच करावयाला पाहिजे. आपले मानसिक ताणतणाव बऱ्याच वेळा आपणच निर्माण केलेले असतात. आपणच त्यावर योग्य तो मार्ग काढला पाहिजे. बऱ्याच वेळा काही समस्यांवर काळ हेच औषध असते. त्यामुळे जर समस्या सुटत नसेल तर, त्याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असते. कालांतराने त्यावर उपाय आपोआपच सुचत असतो किंवा निघत असतो. आपण समाधानी राहावयाला शिकले पाहिजे. देवाने आपल्याला जे काही दिलेलं आहे ते खूप काही छान दिलेलं आहे असं नेहमी मनाला सांगितलं पाहिजे. यापेक्षा जास्त मिळण्याच्या अपेक्षा करण्यात काहीच गैर नाही, परंतु जास्त मिळाले नाही तर नाराज होणे यामध्ये गैर आहे, हे लक्षात ठेव. समस्या आली तर चिंता करत बसण्यापेक्षा माझ्याकडे ये. आपण दोघे चर्चा करू. मी नसलो तर कोणत्याही हितचिंतक मित्राशी चर्चा कर किंवा गुरूंशी चर्चा कर. ते योग्य तो मार्ग सुचवतील.’
डॉक्टर मित्रा,तू फारच अभ्यास केलेला दिसतोयस. हे ज्ञान कुठून मिळालं तुला?’
‘ माझ्या गुरुंपासून, माझ्या वाचनातून, माझ्या युट्युब वरील व्हिडिओ पाहण्याच्या छंदातून आणि माझ्या सकारात्मक विचारातून मला हे ज्ञान मिळालेले आहे. मित्रा, मी अनेक वर्षे हा अभ्यास सातत्याने करीत आहे. नियमितपणे योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम मी करीत असतो. तसेच रोज मी ध्यान करीत असतो. ध्यानाच्या शेवटच्या अल्फा अवस्थेमध्ये मी माझे प्रॉब्लेम्स फक्त पहात राहत असतो. फक्त पहात राहण्यामुळे जे खरच प्रॉब्लेम्स नसतात ते विरून जातात आणि जे खरे प्रॉब्लेम्स असतात त्यावर मला उपाय आपोआप सुचत असतात. हे उपाय कोण सुचवत असेल असे तुला वाटते. निसर्गामध्ये जी प्रचंड शक्ती आहे तिच हे उपाय मला सुचवत असेल. कदाचित देव मला ही बुद्धी देत असतील. मला माहित नाही, परंतु अनेक संकटावर आणि अनेक समस्यांवर मला या ध्यानामध्ये उपाय सापडलेले आहेत. जगन्नाथा, तुही नियमित योगासने कर, सूर्यनमस्कार कर, प्राणायाम कर, ध्यान कर. तुलाही हे अनुभव येतील, हे मात्र निश्चित.’
‘ मित्रा, खूप मोलाचा सल्ला मला दिला आहेस. माझ्या जीवनातील सर्व समस्या आणि सर्व संकटे सोडवण्याची गुरुकिल्ली तू मला दिली आहेस. खरेतर मैत्रीमध्ये उपकार मानावयाचे नसतात, परंतु तुझे उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत.’
बस्, मी सांगितलेली गुरुकिल्ली रोज वापरत जा आणि सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य टिकवून प्रगती करत रहा. हेच यशाचे रहस्य आहे आणि हेच जीवनाचे यश आहे, हे लक्षात ठेव. मित्रा, खूप वेळ झालेला आहे. आता आपण परत फिरू या.

एक प्रतिक्रिया

  1. खूपच छान ! दिवसांपासून मीही चिंतेत होतो.तुमच्या सहवासात आलो , मार्गदर्शन मिळाले.मनापासून आभार ! सर लिहित रहा उद्बोधक लिहिता.खूप खूप ! शुभेच्छा