‘शास्त्र असतं ते…!’

दिवाळी हा जसा दिव्यांचा सण तसाच तो आरोग्याचाही उत्सव आहे.डोळ्यांना दिव्यांची रोषणाई, नाकाला सुग्रास पदार्थांचा वास, जीभेवर त्यांची रेंगाळणारी चव, सर्व शरीराला थंडीसोबत उटण्याचा होणारा स्पर्श व कानाला फटाक्यांचा कडकडकडाट… सर्वांगालाच जणू दिवाळीचे वेध लागतात..’दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’, या उक्तीचा शब्दशः अनुभव घ्यावा असा हा सण..

थंडीचा कडाका एव्हाना चांगलाच वाढलाय..गुलाबी वाटणारी थंडी आता बोचरी जाणवू लागली आहे.हा बोचरेपणा अधिक जाणवू लागतो तो शरीराला आलेल्या कोरडेपणामुळे..वातावरणातील बदलाला शरीर व मनही हळूहळू प्रतिसाद देऊ लागते.त्याचाच परिणाम म्हणून त्वचा कोरडी पडू लागते, हाता-पायांना भेगा पडू लागतात, ओठांचा रंग बदलतो, केसांतील आर्द्रता कमी होऊन, ते गळू लागतात, (पोटातील) जाठराग्नी प्रदीप्त होऊन भुकेचे प्रमाण वाढू लागते.या आणि अशा कितीतरी बदलांचा सामना या काळात शरीराला करावा लागतो.

या बदलांशी जुळवून घेण्यासाठी, त्यांचा आनंदाने स्वीकार करण्यासाठी दिवाळीसारख्या सणांची योजना अगदी मार्गदर्शक ठरते…आजचा नरकचतुर्दशीचा दिवसही याच बदलाचे प्रतिनिधित्व करणारा आहे.

पहाटेच्या वेळी कडाक्याच्या थंडीत उठून उटणं-सुगंधी तेल लावून आंघोळ करण्याची प्रथा कुणा महाभागाला सुचली असावी, असा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या लहानपणी पडला असेल; किंवा अजूनही पडत असेल..

मात्र या प्रश्नावर- “शास्त्र असतं ते…!” याव्यतिरिक्त दुसरं उत्तर खचितच कोणाला मिळालं असेल..बरं जे उत्तर मिळतं तेही तितकंसं समाधानकारक नसतं.. त्यामुळे “शास्त्र असतं ते” हे पालुपद पिढी दर पिढी असंच चालू राहतं, पण खरं शास्त्र काय असतं हे मात्र कोणीच सांगत नाही..

चला तर मग आज जाणून घेऊ या याच्या मागचं खरं शास्त्र.. हे शास्त्र आहे आयुर्वेदाचं शास्त्र.. काल ज्या धन्वंतरींची आपण पूजा केली, त्यांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी निर्माण केलेलं हे शास्त्र…हे शास्त्र असं सांगत, की आपली प्रकृती (health) वात, पित्त आणि कफ या तीन दोषांनी मिळून बनलेली आहे.हे तीनही दोष जोपर्यंत सम प्रमाणात (equal) असतात, तोपर्यंत आपण निरोगी असतो.परंतु यापैकी कोणत्याही एका दोषाचे प्रमाण कमी किंवा जास्त झाले, तर मात्र आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो..

हिवाळ्यामध्ये बाहेरील वातावरणात व शरीरातही वात दोषाचे प्रमाण वाढलेले असते.वात म्हणजे वारा, वायू..हा वायू स्वभावाने चंचल आहे, त्यामुळे तो एका जागी थांबत नाही, साठत नाही..परंतु तो जर एका जागी साठला तर त्याठिकाणी दोष उत्पन्न करतो.. जर हा वायू सांध्यांच्या ठिकाणी साठला तर सांधे दुखू लागतात.तसेच गुडघा, कंबर, मान, पाठ, पोट, डोकं अशा वेगवेगळ्या ठिकाणी साठून तो त्या ठिकाणच्या व्याधी निर्माण करतो..यासाठी त्याला सतत प्रवाही ठेवणे आवश्यक असते.दुसरी गोष्ट वायू रुक्ष म्हणजे कोरडा आहे व ही रुक्षता त्वचा, केस, ओठ, डोळे अशा भागांवर विशेषतः दिसून येते.

आता हा वायू एकटाच बिघडत नाही.तर तो स्वतः बरोबर इतरही दोषांना बिघडवतो.त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात सर्दी, खोकला, सायनस, दमा, डोकेदुखी यांसारख्या ‘कफ’ प्रधान व्याधी व acidity, अपचन, बद्धकोष्ठता अशा ‘पित्त’ प्रधान व पचनाशी संबंधित व्याधी डोके वर काढू लागतात.अशा रीतीने तीनही दोषांचे संतुलन बिघडले की शरीरातही बिघाड होतो व हा बिघाड मानसिक ताणाला आमंत्रण देतो..

शरीर-मनाची ही बिघडलेली यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी ( In short body-mind servicing and greacing साठी) दिवाळी मध्ये नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटेच्या थंडीत अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे.

आहे की नाही symbolic…!

संपूर्ण शरीराला तेल लावून ते पूर्ण शोषले जाईपर्यंत चोळणे याला ‘अभ्यंग’ म्हणतात. तेलामध्ये स्निग्धता असल्यामुळे भंगलेल्या, फुटलेल्या गोष्टी सांधण्याचे काम तेलाने केले जाते.शिवाय तेल हे वातदोष कमी करण्यासाठी अधिक गुणकारी आहे.

तेलातील ही स्निग्धता, अभ्यंगाच्या वेळचा आईचा प्रेमळ स्पर्श, वात्सल्य हे जगात कितीही भारी असलेल्या body location मध्ये कुठून येणार… !

शरीरशास्त्र असं सांगत, की आपल्या त्वचेचे सात थर (layers) असतात.त्या प्रत्येक थरापर्यंत हे तेलाचे गुणधर्म झिरपत जातात.मायेच्या स्पर्शातून सात थर खाली झिरपत आलेला हा स्नेह पेशी-पेशींत एकवटलेल्या मनालाही मग स्पर्शून जातो व मन आनंदून उठतं..तेलाची स्निग्धता मनातील ओलावा जागवते व नात्यांची वीण अधिकाधिक घट्ट होत जाते.

काय मग आता तुम्हीही प्रत्येक दिवाळीला पहाटे उठून न कुरकुरता तेलाने अभ्यंग करणार ना…! पटतंय का बघा.. नाहीतर तेल लावत जा….! (टोमणा नाही health tip समजा…!)☺️

एक प्रतिक्रिया