तिसरी लाट रोखायची असेल तर……

तिसरी लाट रोखायची असेल तर…….

किशोर बोराटे@

कोरोनाची पहिली लाट चालू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली होती. आता दुसरी महाभयंकर लाट अजून संपली नाही, तोपर्यंतच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साधारण सप्टेंबर-ऑक्टोंबर दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेबाबत अनेक जागतिक तज्ञांनी सुद्धा अंदाज वर्तवले आहेत.

पहिल्या आणि त्यापेक्षाही दुसऱ्या लाटेत आपल्याला अपरिमित नुकसान सोसावे लागले आहे. दुसऱ्या लाटेची झळ देशातील तरुण वर्गालाही बसली. अनेकांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले. कुणी आई-वडील, कुणी नवरा, कुणी बायको, कुणी बहीण, कुणी भाऊ, कुणी मुलगा, मुलगी हे खूप विदारक चित्र आहे. लिहायला पण नको वाटते, तरी काही गोष्टी टाळल्या जाऊ शकत नाहीत. ही कधीही न भरून येणारी हानी आहे. डोळ्यादेखत माणसं तडफडून मरताहेत आणि आपण बघत बसण्याशिवाय काही करू शकत नाही. ही एवढी हतबलता आमच्या दोन-तीन पिढ्यांनी पाहिली नाही.

असो, जे व्हायचे ते होऊन गेले. काळजी घेतली, तर काळजी करावी लागणार नाही या आजाराचे हेच महत्त्वाचे सूत्र आहे. अचानक भूकंप व्हावा, पाऊस येऊन पूर यावा किंवा शत्रू राष्ट्राने अचानक हल्ला चढवावा आणि आपल्याला सावरायलाही वेळ मिळू नये. पहिल्या लाटेने आपली अशी अवस्था केली होती. पण सुरुवातीच्या पडझडीनंतर हा देश सावरला. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात आपल्या देशातील डॉक्टरांनाही नक्की या आजारावर काय उपचार करावे हे समजत नव्हते. लक्षणे तर सगळी व्हायरल इन्फेक्शन सारखी होती. पण रुग्ण, ऑक्सिजन पातळी खालावून चार-पाच दिवसांत सिरीयस होत होता.

Anti-biotics Anti-cold medicines देऊनही काही परिणाम होत नव्हता. वेगवेगळी औषधे डॉक्टरांनी वापरायला सुरुवात केली आणि मग साधारण सहा महिन्यांनी ते योग्य निष्कर्षापर्यंत आले. आपल्याकडे काही नव्हते. ना मास्क, ना सॅनिटायझर, ना औषधे, ना लस. कोरोना-२ ला सामोरे जाताना बऱ्यापैकी कोरोना विरोधात लढण्यासाठी शस्त्रसामग्री आपण जमवली. पण ही दुसरी लाटच एवढी भयंकर होती की तिनेही खूप नुकसान केले.

आता अजून दुसरी संपली नाही, तोपर्यंत तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. पण तिसऱ्या लाटेची एवढी भीती बाळगण्याचे काही कारण नाही. कारण तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना आपल्या हातात महत्त्वाचे हत्यार आले आहे, ते म्हणजे लस. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण चालू आहे. १४० कोटींचा देश आहे. लसींचे दोन डोस आहेत म्हणजे आपल्याला किमान २८० कोटी पेक्षा जास्त लसी लागणार आहेत. निश्चितपणे हा आकडा मोठा आहे. त्यामुळे यात काही काळ जाईल.

४५ वयाच्या पुढील नागरिकांचे बऱ्यापैकी दोन डोस झाले आहेत. आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १८ ते ४५ पर्यंतच्या नागरिकांना लस द्यायला सुरुवात होते आहे. मध्यंतरीच्या काळात अमेरिकेने कच्चा माल द्यायला आढेवेढे घेतल्याने लस तयार करण्याचा वेग मंदावला, त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर झाला. पण केंद्र सरकारने अमेरिकेशी बोलून तो प्रश्न सोडवला. आता मोठ्या प्रमाणावर लस निर्मिती होते आहे. पण देशाची एकूण लोकसंख्या पाहता लसीकरण मोहिमेच्या निर्णायक टप्प्यावर यायला आपल्याला साधारण एक वर्ष जाईल. तोपर्यंत आपल्याला फार काळजीपूर्वक राहावे लागेल.
वय वर्षे ४५ ते ६०+ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बऱ्यापैकी उरकले आहे. आता १८ ते ४५ आणि उर्वरित सर्व वयोगट यांचे लसीकरण उरकायला साधारण १ ते दीड वर्षे लागेल. त्याचबरोबर
ज्यांनी लस घेतली आहे व जे घेणार आहेत, त्यांनी सुद्धा विनाकारण बाहेर फिरणे, गर्दीत जाणे टाळायला हवे. मास्क वापरायलाच हवा. आपली स्वच्छता ठेवायला हवी. त्याचबरोबर सरकारने टेस्ट आणि लसीकरण मोहीम शक्य तितक्या वेगाने राबवायला हवी.
टेस्ट आणि लसीकरण मोहीम ही कोरोना विरुद्धच्या लढाईतील खूप महत्त्वाची बाब आहे. सरकारने रुग्ण कमी दाखवण्यासाठी म्हणून जर टेस्टिंग करणे थांबवले तर तिसरी, चौथी, पाचवी अशा लाटा येतच राहणार आणि मनुष्यहानी होतच राहणार हे लक्षात घेऊन टेस्टिंग आणि लसीकरण मोहिमेबाबत विरोधी पक्षांचा आणि जनतेचा सरकारवर दबाव हवा. जनतेने पण सरकार जे नियम बनवेल, ते पाळायला हवेत. कारण ते आपल्या हिताचे आहेत. अनेक पातळीवर आपण आघाडी घेतली असल्याने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी ती फार गंभीर नुकसान करणारी नसेल अशी आशा करू या. धन्यवाद

-किशोर बोराटे