शापित:द हॉंटेड

” शापित”
डिसेंबर महिन्यातील अमावस्येची ती रात्र होती. साडे अकरा वाजून गेले होते .रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून मी एकटाच प्रवास करीत होतो .मला झोप येत नव्हती. किंचित अस्वस्थपणे मी बाहेर पाहिले,बाहेर मिट्ट काळोख पडला होता .सारे काही काळ्या शाईत बुडवून काढल्या सारखे झालेले .झाडांचे,दगडांचे,डोंगरांचे आकारच मुळी त्या काळ्या शाईत हरवून गेलेले.फक्त गाडीच्या शेजारून प्रकाशाचे पट्टे गाडीच्या सोबतीने चाललेले.डब्यातून पडलेल्या प्रकाशाचे चौकोनी तुकडे आणि त्याच्या साथ करणाऱ्या करड्या सावल्या.,सगळे की र्र र्र वाटेल इतकी शांत. फक्त गाडीचा धडाडधड धडाडधड असा एकच तालातला आवाज… गाडीभर उठणारी त्या तालाची सपन्दने आणि पुन्हा तो धापापणारा आवाज उसासत धडधडत ध किंकाळत काळोखातून जीव घेऊन धावणारी गाडी.
गाडी शेजारून धावणारे प्रकाशाचे असंख्य तुकडे,असंख्य वस्तू आपल्या कवेत घेत होते,वस्तूचे डोके,हातपाय छाटून टाकून मधेच कबंधे समोर आणून दचकवीत होते…झाडांची अर्धी रंगलेली खोडे,गारगोट्या सारखी दिसणारी रुळा जवळची सफेद खडी…..
माझी नजर दूरवर गेली,मोकळी माळराने,कुठेतरी क्वचित लुकलूकणारा एखादा दिवा,मध्येच पेटणारा जाळ. बाहेरून एकाएकी वाऱ्याचा एक थंडगार झोत आत शिरला. माझ्या अंगावर शहारा आला.आत नजर वळवताच छातीत धस्स झालं .सबंध डबा रिकामा.पण डब्यात कुणीतरी असेल तर?लपून बसलेले असेल तर?दारामागे,सीटखाली ,टॉयलेट मध्ये,कुणी पुढे येऊन आपला गळा धरला तर? मनात क्षणभर भीतीचा विचार आला.
या विचाराने माझ्या काळजाने ठाव सोडला.पण त्याच वेळी दुसरे मन धीर देऊ लागले.कुणीच नसतांना उगाचच घाबणाऱ्या मनाचं हसू आले. इतके लोक प्रवास करतात निरनिराळ्या परिस्थितीत. दुपारपर्यंत कॉलेजमध्ये काम होतं, या गाडीशिवाय दुसरी सोयीची गाडी नव्हती.मन समजूत घालू लागले
मी समोर बसून पाहत राहिलो. गाडीचा एकसुरी नाद कानात साठवित राहिलो.
सबंध डबा रिकामा होता,भीती वाटण्यासारखं काही नव्हते.
एवढ्यात कोणीतरी चालून गेल्याचा भास झाला.पण कोणी दिसलं नाही.
आपण एक प्राध्यापक आहोत,उगाच पोरकट भीतीच्या आहारी आपण जाणार नाही.याची मी स्वतःला आठवण करून दिली.आणि बॅग मधून पुस्तक वाचायला सुरुवात केली,कारण झोप येत नव्हती.
‘ द सुपर नॅचरल फोर्स’ या पुस्तकातील पहिले वाक्य,’ अ फोर्स काल्ड सुपर नॅचरल इज नो डाउट इन एग्झिस्टन्स….’पहिले वाक्य वाचल्याबरोबरच मी पुस्तक फाटदिशी बंद केलं.साहजिकच गाडीत वाचायला मी हे पुस्तक सोबत आणले होते.मात्र आपण ते बरोबर आणले आता मला त्याचा पश्चात्ताप होऊ लागला.
पण या वेळेस भेदरलेल्या मनाची समजूत चटकन पटेना.उलट सुलट विचार करून डोकं थकून गेलं होतं.भीती कसली?कुणाला डब्यांत येऊ द्यायचे नाही.कुणी असेल तर ते संशयास्पद तर नाही ना अशी खात्री करून घ्यायची.मुख्य म्हणजे झोपायचे नाही ,वाचत बसायचे आणि एकाएकी……
माझ्या ध्यानात आले की,डब्यात कोणी तरी येऊन बसले आहे.ती वयक्ती पलीकडच्या सीटवरून माझ्याकडे रोखून पाहत होती.तिला पाहताच मी दचकलो कारण……..
ती एक बावीस – तेविशी ची एक तरुण मुलगी होती.पांढरे शुभ्र कपडे घातलेली सुंदर तरुण मुलगी!आपला नाजूक हात हलकेच हलवीत ती समोर येऊन उभी राहिली.ती सुंदर तर होतीच पण त्या सौन्दर्यात काहीतरी वेगळेपणा होता .काहीतरी विलक्षण चटका लावणारे होते.
रंग गुलाबी,भुवया कोरीव आधुनिक केशरचना ,रुपयाच्या नाण्याच्या सारखा गोल चेहरा.
माझ्या मनातले समजल्यासारखे ती हसली. हसताना एखाद्या गाण्याचा लकेरी सारखी तिचे मोत्यासारखे दात चमकले.
ती एकटीच होती.सोबत कोणीही नव्हते .मी सहज रिस्ट वॉच कडे पाहिले. बरोबर बारा वाजले होते.
एवढ्या थंडीत मला घाम सुटला.डोक्यात शंकेच शेवाळ पसरायला लागलं.छाती धडधडू लागली.कारण गाडी कुठेही थांबली नव्हती.संपूर्ण डबा रिकामा होता.पलीकडच्या डब्यातून येणारा रस्ता बंद करण्यात आला होता. मग ही आत आली कशी?

“कुठे चाललात तुम्ही…?”
मी विचारतंद्रीतून जागा झालो.
“नाशिक ला” मी एवढेच बोलू शकलो.
पुन्हा डब्यात शांतता निर्माण झाली.
“तुम्ही एकट्याच आहेत?कमाल आहे तुमची?यावेळी एकटीने प्रवास करायचा म्हणजे…,तुम्हाला भीती नाही वाटत? मी माझ्या मनातले भाव लपवत काहीतरी विचारायचे या उद्देशाने विचारले.
“मला माणसांची भीती वाटत नाही.” ती खिन्न स्वरात म्हणाली.
एवढ्यात तिचे लक्ष माझ्या हातातल्या पुस्तकावर गेले.
“सुपर नॅचरल फोर्स,तुमचा विश्वास आहे भुताटकी वर?”
“डिपेंडस, तसा माझा या गोष्टीवर ,विश्वास नाही .कधी प्रत्यक्ष अनुभव घेतला नाही,मात्र तुमचा विश्वास आहे यावर?”
” होय ” ती म्हणाली.
प्रत्येक वेळी तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक मला जाणवत होती.
काही क्षण शांततेत गेले,नुसताच गाडीचा धडाडधड….
मग शांतता असह्य होऊन ती पुढे म्हणाली ,”भूत पिशाच्च असतात.
मात्र आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप वेगळ्या स्वरूपात असतात”.
“एखाद्यालाअगदी अमावस्येला शमशानात जाऊन देखील भूत दिसणार नाही,तो लोकांना येऊन सांगेल की,भूत – बीत सब झूठ है,पण गम्मत म्हणजे त्याच माणसाला कल्पनासुद्धा येणार नाही अशा एखाद्या स्वरूपात पिशाच्च भेटेल.सगळं काही एरवी सारखंच. अगदी संशय देखील येणार नाही की आपल्यासमोर पिशाच्च बसलंय कारण बोलून चालून देहहीन आत्माच ती! कोणाच्याही शरीरात वास्तवय करतील..”
बोलता बोलता ती मध्येच थांबली.माझ्याकडे रोखून पाहू लागली.मला थोडे संकोचल्यासारखे झाले.
“तुम्ही काय कॉलेजमध्ये आहे वाटतं?”काही तरी पुढे बोलायचे आणि गोष्ट वळवायची या हेतूने मी विचारले.
“हो,एम .ए. करतेय,सायकॉलॉजी मध्ये”.
एकाएकी गाडीतले दिवे मंद होऊ लागले.स्पीड कमी होऊ लागला.
“स्टेशन आलं वाटतं एखादं?”
मी फक्त हसलो .तिच्या चेहऱ्यावर चे भाव एकसारखे बदलत होते.निळसर डोळे चकाकत होते.भुवयांच्या कमानी खेचल्या जात होत्या.
गाडीचा स्पीड आता अगदीच कमी झाला होता.एवढ्यात ती स्टेशनच्या आवारात शिरली. आमचा डबा प्लॅटफॉर्मवर खूप पुढे जाऊन थांबला.
“इथे कॉफी खूप छान मिळते,एक एक कप कॉफी घेऊ या ” ती म्हणाली
ती जणू मला नजरेने शोषित होती,पीत होती,मला स्वतः मध्ये सामावून घेऊ पाहत होती.एक विलक्षण आकर्षण आम्हा दोघात तयार होऊ लागले.एक दाहक आकर्षण, धगधगत्या ज्वालासारखं पण तरीही त्या ज्वालांमध्ये विलक्षण सुखद असे काहीतरी होते.त्या सुखाच्या गुंगीत माझे मन खेचले जात होते.
मी तिला ‘नाही’ म्हणू शकलो नाही.
आम्ही डब्यातून खाली उतरलो.
टिचभर रुंदीचे ते स्टेशन,त्यातून रात्रीचे जवळपास दीड वाजले होते.स्टेशन अगदी निर्मनुष्य होते.तिकीट चेकर चा देखील पत्ता नव्हता.एक मळकट खरुजलेले कुत्रं मात्र आरामात पहुडले होते.बाकी चिटपाखरू सुद्धा जवळपास नव्हते .
एकाएकी त्या कुत्र्याला काय झाले कोणास ठाऊक,ते उठलं आणि अंगावर काटा येईल अश्या स्वरात विव्हळलं .
माझ्या छातीत धडकी भरली.
मात्र तिने त्या कुत्र्याकडे बघितले. डोळे मोठे केले आणि काय चमत्कार!
ते कुत्रं शेपटी दाबून क्याव क्याव करत पळून गेलं. मी डोक्यावरील घाम पुसला.
“इथे कॉफी मिळेल?” मी शंका काढली.
खरं तर या अश्या स्टेशनवर गाडी थांबलीच कशी, मला हेच समजत नव्हते.कदाचित सिग्नल क्लियर नसेल.
इतक्या रात्री बहुतेक सगळे आपापल्या बर्थ वर गाढ झोपेत होते आणि थंडीमुळे कोणी बाहेर देखील डोकावले नाही.
“तिथे कॉफी मिळेल,एक स्टॉल आहे तिथे” ती पुढे बोट दाखवित म्हणाली.
आम्ही दोघे त्या दिशेने चालू लागलो.त्या छोट्याश्या हॉटेलात कोणीही दिसत नव्हते .एक कोपऱ्यात एक माणूस बसल्याजागी झोपत होता.मी त्याला उठवलं.
अर्धवट झोपेतून उठवल्यामुळे तो चिडला होता पण आम्हा दोघांना पाहून थोडा नरमला.
त्याने दोन कप कॉफी तयार करून दिली.मी अधून मधून तिला तिच्या बद्दल विचारत होतो पण ती गोष्ट वळवून द्यायची.मला तिच्या बद्दल काहीच जास्त माहिती मिळविता आली नाही.
आम्ही परत आमच्या डब्याकडे वळलो. मी समोर झालो.डब्यात पाय ठेवताच गाडी सुरू झाली.पण ती प्लॅटफॉर्मवरच उभी होती,आत येत नव्हती.मी आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. हाताने खूण केली.
“आपला प्रवास इथपर्यंतच “! तिने टा टा करीत हात हलविला.
मी काहीच समजू शकलो नाही.गाडीने वेग धरला होता.तिची एकदम अशी ताटातूट होईल हे माझ्या अगदी जीवावर आलं होतं.
“मी लवकरच भेटेन तुम्हाला….”मला एवढेच ऐकू आलं. पाहता पाहता तिचे शरीर विरळ होत गेले.ती पूर्ण दिसेनाशी झाल्या नंतरही काही वेळ तिचे शब्द ऐकू येत राहिले.
मी असहाय, अनामिक भीतीने डोळे सताड उघडे ठेवून बघत होतो.एकटक बघत होतो
प्रवासा वरून परत आल्यानंतर, मी माझ्या कामावर रुजू झालो.एक दिवशी संध्याकाळी मी कॉलेज हून परत आलो,तेव्हा माझ्या प्रॉपर्टी डीलरचा मला फोन आला.त्याने माझ्यासाठी एक घर बघून ठेवलं होतं.
दुसऱ्या दिवशी जेव्हा ते घर मी प्रथम पाहिले तेव्हा मी देखील बेहद खुश झालो.जरा शांत भागात असे एखादे छोटेसे घर स्वतःच्या मालकीचे असावे.आणि तिथे आपण मोकळा वेल वाचन,लेखन किंवा आराम करीत घालवावा असे माझे फार जुने स्वप्न होते.ते घर पाहताच माझे स्वप्न साकार झाल्यासारखे वाटलें.
घर छोटेसे पण सुबक बांधले होते.आजूबाजूला जागा ही भरपूर सोडली होती.शिवाय मला ते स्वस्तात मिळाले होते कारण त्याचा मालक सगळा गाशा गुंडाळून परदेशी चालला होता.
इतके छान आणि सुबक घर स्वस्तात मिळतंय म्हणून मी इतर गोष्टींची चौकशीसुद्धा केली नाही.
स्वतःच्या मालकीचे बंगलीवजा घरात राहण्याची कल्पना जरी मला सुखद वाटत होती तरीसुध्दा त्या घरात प्रवेश करताच मला अस्वस्थ वाटू लागले.मी एकटाच होतो आणि सारे घर रिकामे म्हणून असेल कदाचित.
सर्वत्र सारे निवांत अगदी भयाण शांत होते.रात्री गार वारे सुटले होते.मी झोपायच्या तयारीत होतो,पण झोप येत नव्हती,ट्रेन मध्ये भेटलेल्या त्या मुलीचा चेहरा राहून राहून माझ्या पुढे येत होता.
मी उठलो आणि बिछान्या – जवळची खिडकी बंद केली.तिची तावदाने काचेची होती.पण खिडकी लावल्यामुळे मला थोडे सुरक्षित वाटू लागले.थोड्या वेळातच मला झोप लागली.
आणि मध्यरात्री खडबडून मी जागा झालो.खिडकीच्या तावदानापलिकडून एक चेहरा माझ्याकडे टक लावून पाहत होता.
मी जागा आहे की स्वप्नात हे कळून यायला मला थोडा वेळ लागला.मी भानावर येईपर्यत तो चेहरा नाहीस झाला,काही क्षण तावदानावर ठेवलेले हात दिसत राहिले.मग हळूहळू ते देखील नाहीसे झाले.
माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला.मी कसाबसा दिवा लावला ,घड्याळ कडे पाहिलं,रात्रीचे दोन वाजले होते.ग्लासभर पाणी प्यायलो आणि पुन्हा अंथरुणावर अंग टाकले.पहाटे केव्हातरी माझा डोळा लागला.
सकाळी जरा उशिराच जागा झालो.तेव्हा खोली प्रकाशाने भरून गेली होती.मी फ्रेश झालो.बिछाना अवरायचा मला कंटाळा आला होता.कुठेतरी बाहेर चहा घ्यावा आणि थोडे भटकून यावे या विचाराने बाहेर पडलो.मोलकरीण अकरा वाजेपर्यंत येणार नव्हती.मला भटकायला भरपूर वेळ होता.
साधारण अकराच्या सुमारास मी घरी परतलो.वेळ जावा याकरिता एखादं पुस्तक वाचीत बसावे याकरिता बेडरूम मध्ये गेलो.
— आणि एकाएकी मी दचकलो.
गोष्ट क्षुल्लक होती तरी चमत्कारिक होती.
माझा बिछाना कुणीतरी उचलून नीट लावून ठेवला होता,मला चांगले आठवत होते की,मी बिछाना न आवरता गेलो होतो आणि आता पहावे तर गाद्या व्यवस्थित लावलेल्या,उश्या जागच्या जागी ठेवलेल्या पलंगावर चादर पसरलेली.
बारकाईने पाहिल्यावर आणखीही काही माझ्या लक्षात येऊ लागले.केवल बिछानाच नव्हे,तर खोलीतील इतर वस्तू जागेच्या जागी ठेवलेल्या दिसत होत्या.हे कोणी आवरून ठेवले असेल?नक्कीच कोणी तरी आले असले पाहिजे,पण ते कसं शक्य आहे,दाराला कुलूप होते,खिडक्याही बंद होत्या,मोलकरीण अजून आलेली नव्हती.मला काही कळेनासे झाले.
आणि मग एकदम मला रात्री खिडकीत दिसलेल्या चेहऱ्याची आठवण झाली.
माझ्या अंगावर काटा उभा राहिला.
पुन्हा एकदा रात्रीच्या अस्वस्थतेने मला पछाडले.माझा सारा उत्साह ओसरला आणि त्याची जागा एकटेपणाचा जाणिवेने घेतली.आपल्याला माहीत नसलेले असे कुणी आपल्या जवळपास वावरते आहे.असे मला वाटत होते.
एवढ्यात पाठीमागे पावलाची चाहूल लागली.मी वळलो.मोलकरीण आली होती.
मी तिला विचारले.
“तू यापूर्वी आली होती का?”
“नाही ” ती म्हणाली.
घरात एक झोपाळा टांगलेला होता.मला घरात झोपाळा आवडत नाही म्हणून मी त्याचा पाट काढून ठेवला होता.
पण संध्याकाळी येऊन पाहतो तर पाट जागच्या जागी होता म्हणून मी मोलकरीण ला विचारले,”झोपाळा तू परत लावून ठेवलास?”.
ती माझ्याकडे चकित होऊन पाहू लागली.तिला गैरसमज होऊ नये म्हणून मी तिला म्हटले,”हे बघ,गेल्या दोन -चार दिवसात असला प्रकार वारंवार होत आहे.वस्तू जागच्या जागी
ठेवलेल्या दिसतात.आपल्या दोघांशिवाय तर इथे तिसरं कुणी येत नाही ना?”
ती काही बोलली नाही.तिचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला.
दुसऱ्या दिवसापासून ती कामावर येईनाशी झाली.मी त्या घरात अधिकच एकटा पडलो.
रात्री बाराचा सुमार होता.पुस्तक बंद करून मी नुकताच दिवा घालवला होता.हळूहळू डोळ्यावर झापड येऊ लागली होती.
इतक्यात कसल्यातरी आवाजाने मी खाड्दिशी जागा झालो.
‘कु S ई कुईक खळ…’असा काहीसा आवाज होता.पडल्या पडल्या मी कां देऊन आवाज ऐकत राहिलो.त्या आवाजाला एक गती होती.संथ लय होती.माझ्या लक्षात आले की तो आवाज झोपाळयाच्या कडीचा आहे.कुणीतरी बाहेर झोपल्यावर बसून झोके घेत आहे.
मी उठून बसलो,आणि पावलांचा आवाज न करता दरवाज्यापाशी गेलो, काय नजरेला पडेल काय नाही या विचाराने मी धास्तावून गेलो.
झोपाळयाचा आवाज येतच होता.अखेरीस मी धीर करून दरवाजा उघडला.बाहेर येऊन झोपाळयावर नजर टाकली,तो रिकामा होता ,अजून ही तो हलत होताच पण त्याची लय कमी होत होती.त्यावर जे कोणी बसले होते ते उठून गेले होते.
मी कपाळावरचा घाम टिपला.झोपाळा हळूहळू झोके घ्यायचा थांबला.मी क्षणभर तसाच उभा राहिलो.त्या झोपाळयाला स्पर्श करण्याची देखील भीती वाटत होती.
कसाबसा मी बेडरूममध्ये परतलो.दार लोटले.पाहतो तर काय……
एक खडूसारखी सफेद आकृती आत उभी होती.पाहता पाहता ती धूसर होऊ लागली.पुसट होता होता ती नाहीशी होणार,एवढ्यात मी ओरडलो,”थांब!जाऊ नकोस,मला तुझ्याशी बोलायचे आहे.’
आता ती आकृती पुन्हा घन होऊ लागली.जेव्हा ती पूर्णपणे स्पष्ट झाली.तिच्यात अमानुष असे वाटेनासे झाले तेव्हा मी कमालीचा दचकलो कारण ती तीच होती.
मला प्रवासात भेटलेली तरुण मुलगी.

” तू कोण आहेस आणि इथे कशी” मी विचारले
ती किंचित हसली,म्हणाली,
“मी, मला ओळखलं, पण मी जिवंत नाही हे तुमच्या लक्षात आले असेलच’
“हो म्हणजे तू…” पुढचे शब्द बाहेर निघेना.
“घाबरलात ” ती पुन्हा हसली.
” नाही,पण तू इथे काय करतेस?”
आता मात्र तिचे हसू मावळले.थोडी रागावून म्हणाली
“असा प्रश्न मला कुणीच विचारू शकत नाही,उलट मीच तुम्हाला तसं विचारायला हवं.”
“मी या घराचा मालक आहे” मी आवाज वर करून म्हटलं.
“चुकताय तुम्ही,हे घर माझे आहे” ती वचकून म्हणाली.
“कशावरून ?” मी विचारले .
” हे घर माझ्यासाठी बांधलेले आहे माझ्या वडिलांनी.माझी फार इच्छा होती इथे राहण्याची,हे घर सजवण्याची,घराभोवती मी सुंदर बाग करणार होते,घराला मण्याची तोरणं लावणार होती,पण…..”
एक दीर्घ उसासा टाकत ती पुढे म्हणाली ” आम्ही इथे रहायला येण्या आधीच रेल्वेच्या अपघातात माझा प्राण गेला.हे पाहिलंत? बोलता बोलता तिने माझ्याकडे पाठ करून झटकन केस बाजूला केले.
तिच्या मानेवर एक लांबलचक व्रण होता.त्या गोऱ्यापान कातडीवर तो काळपट गुलाबी व्रण अत्यंत विद्रूप दिसत होता.तो पाहताच माझ्या अंगावर शहारे आले,तो अपघात किती भयंकर होता ते त्यावरून कळत होते.
आता माझ्या लक्षात आले की,त्या रात्री चालत्या गाडीत ती कशी आली ते?प्लॅटफॉर्मवरील ते कुत्रं हिला पाहून का विव्हळलं आणि पळून गेलं. आणि निरोप घेता घेता तिचं एकाएकी नाहीसं होणं.
तिचे अपुरे राहिलेले स्वप्न ऐकुन क्षणभर माझेही डोळे पाणावले.एकूण हे दुःख उराशी घेऊन या घराचा मालक परदेशात गेला.एकुलत्या एक लाडक्या मुलीसाठी हौसेने घर बांधावे आणि ते पाहण्याआधीच ती एकाएकी जग सोडून जावी हे केवढे दुर्दैव!
आता माझ्या लक्षात आले की,त्या मालकाने इतक्या स्वस्तात हे घर विकले ते.पण हे विचार घाईघाईने काढून टाकले.या संबंधात मला हळवे होऊन चालण्यासारखे नव्हते.माझ्या कळत नकळत घराचा ताबा दुसऱ्या कुणी घेणे मला आवडले नव्हते .
म्हणून मी तिला विचारलं .” या घरात तुझ्या सारख्या आणखी कुणाचा संचार तर नाही नां?”
” ते शक्यच नाही.मी हे सहन करणार नाही. हे माझे घर आहे.इथे माझ्याशिवाय दुसरं कुणीच राहिलेलं मला सहन होणार नाही”इतके बोलून ती हवेत विरघळून गेली.
एकुण मामला असा होता तर.हे घर तिच्यासाठी बांधलेले होते.तिचे होते.त्या भोवती तिची वासना घोटाळत होती.घरावर तिचे नितांत प्रेम होते.पण याचा अर्थ काय समजायचा?ती स्वतः शिवाय दुसऱ्या कुणाला त्या घरात राहू देणार नव्हती का?तिने तर मला ‘सळो की पळो’ करायला हवं होतं.
मी तिला तिचा वैरी वाटायला हवा होतो.पण प्रत्यक्षात तिला तसे वाटलेले दिसत नव्हते .ती मला बिल्कुल त्रास देत नसे.माझ्याशी मुळीच शत्रुत्व करीत नसे.
मी अप्रत्यक्षपणे तिला हे म्हटले तेव्हा ती म्हणाली.
“पिशाच्च विषयी तुम्हा लोकांच्या कल्पना फार विचित्र आणि चुकीच्या आहेत.पिशाच्च म्हणजे अक्राळविक्राळ आणि माणसाचे वाईट करण्यासाठी टपलेली ,त्यांना त्रास देणारी अशी असतात.असं तुम्हाला का वाटतं?पिशाच्चचा स्वभाव हा त्या माणसांच्या मूळ स्वभावासारखाच असतो .रूप नाही का तसंच राहत? मग स्वभाव का म्हणून बदलेल?”
तिच्या बाबतीत तेच झाले होते.तिचा स्वभाव बराच गोड, लाघवी असावा.माझ्या वर तिचा मुळीच राग नव्हता.मी त्या घरात राहण्याला तिची हरकत नव्हती,फक्त मी त्या घरावरच तिचा हक्क मान्य करायला हवा होता.
आणि नेमके मी तेच करणार नव्हतो.
मी बेचैन झालो होतो.तिच्याशी बोलतांना मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नव्हती.इतकी सुस्वभावी,देखणी,बुद्धिमान मुलगी इतक्या अल्पवयात मृत्युमुखी पडावी ही खरोखरच दुर्दैवाची बाब होती.पण तरीही मी तिच्या विषयात विलक्षण अस्वस्थ होतो.
एका पिशाच्च बरोबर आपण सतत बोलतो -चालतो ही गोष्टच मला भयंकर वाटे.ही विकृती जर कुणाला कळली तर…..आणि आज नि उद्या हे कळल्याशिवाय राहिलेच नसते.
म्हणून काहीही झाले तरी मला तिचा संबंध तोडणे भाग होते.दुसरा मार्गच नव्हता.
घर मला तिच्या वर्चस्वाखाली ठवायचे नव्हते.झोपाळा मला आवडत नव्हता.पण तिच्यासाठी मला तो लावावा लागला होता.असे प्रत्येक गोष्टीत तिच्या मनासारखे होऊन चालले नसते. त्यातून जिवंत माणसाचे करणे वेगळे आणि …..एक दिवस मी तिच्यावर ओरडलो.
“तू जा इथून,मला सहन होत नाही हे.तू जा आधी!”
क्षणभर तिने माझ्याकडे पाहिले.त्या नजरेत अपार दुःख होते,आश्चर्यही होते.मी असा तोडून वागेन असं तिला कधी वाटलं नसेल.
दुसऱ्याच क्षणी ती नाहीशी झाली.पण रात्री मला खिडकी बाहेरून हुंदके ऐकू आले.पहाटेपर्यंत मी हुंदके ऐकत होतो.पहाटे पहाटे ते थांबले आणि त्या हुंदक्यांनी सगळे वातावरण अशुभ करून टाकले.
संध्याकाळी ती माझ्या अगदी जवळ येऊन उभी राहिली आणि एखाद्या फुरगटलेल्या लहान मुलीसारखी म्हणाली
“काल रात्री मी पुष्कळ रडले”
मी काहीच बोललो नाही
थोडा वेळ वाट पाहून तीच पुढे म्हणाली
“तुम्हाला माझ्याविषयी काहीच वाटत नाही का?”
“वाटतं, खूप वाटतं ” मी म्हणालो,”पण तरी देखील मला तुझ्याशी संबंध ठेवायचा नाही.या घरात मला रहायचं आहे तेव्हा तू या घराची आसक्ती सोडायला हवी.”
“आसक्ती सोडू? मग माझं कसं होईल?मी कायमची विरून जाईन,पुन्हा कधीच येणार नाही”.
“मेलेल्या माणसांनी परत न येणंच चांगलं ” मी माझ्या मतांवर ठाम होतो
“पण मला जिवंत माणसासारखं वावरता येतं, तुम्ही पाहिलंय ते ”
तिने दोन्ही हात माझ्या गळ्यात टाकले,माझ्या नजरेला नजर भिडवली.तिची नजर विलक्षण भेदक दिसत होती.
“तुम्ही म्हणता त्याच्या अगदी उलट कल्पना सुचली आहे मला.मी एखादया जिवंत स्त्री प्रमाणे घरात वावरायला यायचं म्हणते आहे.मग मला या घरात असं चोरटयासारखं अधूनमधून यावं लागणार नाही.मी सतत या घरात वावरत राहीन,घराची काळजी घेईन.खऱ्या अर्थाने हे घर माझं होईल…..”
” पुरे!” तिचा विचार समजताच मी ओरडलो.
तिची भयंकर कल्पना मला सहन होईना.एखाद्या पिशाच्चने जिवंत माणूस म्हणून ववरायचं?
मी तिचे हात गळ्यातून काढून टाकले आणि निर्धाराने म्हटले
“तुझा बेत मला पटण्यासारखा नाही.मला तुझ्याशी कसलाही संबंध ठेवायचा नाही,तू या घरात येणं मला चालणार नाही.”
“पाहाल काय होतं ते,मी माझं म्हणणं खरं करीनचं “.असं म्हणून ती हसू लागली.
हसत हसत विरून गेली.कितीतरी वेळ वाऱ्याच्या सोसाट्यातून तिचे ते भयंकर हास्य ऐकू येत होते आणि अंगावर काटा उभा राहत होता.

सकाळ झाली.मी घरातून बाहेर पडलो. वातावरण प्रसन्न होते.रात्रीच्या घटनेचा भेसूरपणा आता जाणवत नव्हता.माझा निर्धार ही बळकट होत चालला होता.
मी जे ठरवले होते तेच बरोबर होते.तिच्या कल्पनेला बळी पडण्यात अर्थ नव्हता.या विचारात मी घरी परतलो,आणि जे दृश्य समोर दिसले त्याने माझी शुद्धच हरपण्याची पाळी आली.
माझ्या बेडरूम मधून धूर उसळत होता.माझा संबंध बिछाना पेटला होता,बिछान्याजवळच खिडकीच्या पडदा सुद्धा पेटला होता,भिंत मध्येच पेटली होती,जाळ भिंतीवरून खाली येत होता,आग पसरू लागली होती.
पळतच मी बाथरूममध्ये गेलो ,भरून ठेवलेल्या पाण्याच्या बादल्या ओतून तो जाळ भिंतीवरून खाली येत होता,आग पसरू लागली होती .
पळतच मी बाथरूममध्ये गेलो,भरून ठेवलेल्या बादल्या ओतून तो जाळ विझवला .आग विझली पण या प्रसंगाने मी चांगलाच हादरून गेलो.
इतक्यात,दबलेल्या आवाजात लहान मुले एखाद्याची फजिती झाल्यानंतर हसतात,असे हास्य ऐकू आले.एकूण तिने मला घाबरवण्याचा डाव रचलेला दिसत होता.
बेडरूमची दुर्दशा पाहून मला मनस्वी वाईट वाटत होतं.कपड्यांचे काळे पापुद्रे सगळीकडे पडले होते.पाण्याची तळी जमली होती.भिंतीवर जाळाची लांबलचक खूण उमटली होती.
त्या पसाऱ्याकडे पाहून मला एक गोष्ट तीव्रतेने जाणवली,ती हे सारे मला घाबरविण्यासाठी करीत नव्हती .एका वेड्या हट्टापायी ती तशी वागत होती.लहान मूल जसे हवी असलेली वस्तू न मिळाल्यास आकांडतांडव करून ती वस्तूच नष्ट करून टाकतात,तसे ती करत होती.हे घर माझे आहे मला न मिळाल्यास मी ते मोडून – तोडून उध्वस्त करून टाकीन असाच तिचा विचार असावा.तिचे त्या घरावर किती प्रेम होते हे मला माहित होते.त्या घराला अपाय करताना तिच्या जीवाला कष्ट झाल्याखेरीज कसे राहतील पण तरी देखील एका प्रकारच्या मनस्वीपणाने हट्टीपणाने ती हे सर्व करीत होती.
पुढच्या काही दिवसात हे प्रकार वरचे वर घडू लागले.कधी कधी कौलं भराभर खाली पडून फुटत,विटा सटासट सुटून खाली पडत,खिडक्यांची तावदाने फुटत,पडदे एकाएकी टरटरा फाटत. पण मला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.
अखेरीस मला त्या घराची दया आली.इतके सुबक घर आणि केवळ आम्हां दोघांच्या हट्टापायी त्याची नासाडी व्हावी याचे मला वाईट वाटू लागले.मी माघार घेण्याचे ठरविले.
मी ते घर विकून टाकायचे ठरविले.

अनिरुध्द ला ते घर विकताना मी सर्व काही प्रामाणिक पणे सांगून टाकले.मला त्याला फसवायचे नव्हते,शिवाय ही गोष्ट लपवून राहण्यासारखी नव्हती.आज नि उद्या त्याला देखील तोच अनुभव येणार याची मला खात्री होती.पण त्याने फारसे मनावर घेतले नाही.कदाचित त्याला विश्वास नसेल ह्या गोष्टीवर किंवा त्या ही अवस्थेत त्याला हे घर आवडले असेल.
तो राहायला येण्याच्या काही दिवस आधीच मी ते घर सोडले.निघण्याच्या दिवसापर्यत मी ती ची वाट पाहत राहिलो पण त्या रात्रीनंतर ती परत आली नाही.ती फार स्वाभिमानी मुलगी असावी पण त्या रात्रीनंतर ती परत आली नाही.ती फार स्वाभिमानी मुलगी असावी,निघतांना मला तिच्या आठवणीने भडभडून आले.ती बालिश मोकळ्या स्वभावाची हसत हसत बोलणारी,एकदा तरी भेटायला हवी असे वाटत राहिले.
त्यानंतर मी जवळपास दोन महिने माझ्या गावीच जाऊन राहिलो.
एक दिवस अनिरुद्ध माझ्याकडे आला.मी त्याचे स्वागत केले.
तो म्हणाला,”झाले असतील तुला काही भास पण ते सगळे कमकुवत मनाचे खेळ म्हटले पाहिजेत,मला तर त्या घरात काही वेगळेपणा आढळला नाही उलट ते मला चांगलंच लाभलं!
“लाभलं ते कसं?”
अनिरुद्ध किंचित लाजला आणि म्हणाला,”माझं लग्न झालं त्या घरात रहायला गेल्यापासून महिन्याभराच्या आत,बायकोही चांगली मिळाली”.
“मला नाही कळवलंस ते?” मी बोललो.
“आम्ही घरच्या घरी केलं शिवाय तू इथे नव्हातास …”
मी त्याच्या घरी यावं आणि त्याचा नवा संसार पहावा,त्याने घर कसे लावले आहे ते पहावे यासाठी त्याचा आग्रह सुरू झाला.
त्या घराचे रंगरूप अनिरुद्धने असे पालटले असेल हे पाहण्याची मला उत्सुकता होतीच.
मी त्याच्या घरी गेलो.घराची कळा खरोखरच पालटली होती.नुकताच रंग काढलेला दिसत होता ,दारंखिडक्यांना पडदे लावलेले दिसत होते,दारावर मण्यांचे तोरण झगमगत होते,घराच्या सभोवताली फुलझाडे लावलेली दिसत ,घराच्या आतील मांडणी देखील विलक्षण टापटीपीची होती .झोपाळा लावलेला होता,प्रत्येक वस्तू जागच्या जागी होती,भिंतीवर चित्रे होती,घर नुसते टवटवीत दिसत होते.अनिरुद्ध आत जाऊन मी येल्याचे सांगून आला.येण्याच्या थोड्याच वेळात खडपदार्थाचा वास घरभर दरवळू लागला.अनिरुद्ध ची बडबड चालूच होती.
माझे मात्र त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष नव्हते .त्या वास्तू मध्ये पाऊल टाकल्यापासूनच अनुभवांच्या आठवणीने माझ्या मनात गर्दी केली.माझे तिथंच वास्तव्य, तिथला तो जीवघेणा एकांत,नंतर होऊ लागलेली ती पटझड आणि …..
या सगळ्यात एखाद्या स्वप्नाप्रमाणे वावरणारी ती! या जगात असलेली,नसलेली ती ….!
अनिरुद्ध सारखा घराविषयी बोलत होता.त्याच्या बायकोने चहा- पोहे करून आणले.ते खाल्ले आणि त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा करून मी घरी निघालो.निघण्यापूर्वी त्याची बायको पोहेची रिकामी बशी उचलायला खाली वाकली.
आणि तेव्हा पासून एक विलक्षण अस्वस्थतेने मला पछाडले.अनिरुद्धला त्या घरात कसलाही त्रास का झाला नाही?याचे रहस्य मला उलगडले.त्याची बायको जेव्हा रिकामी बशी उचलायला खाली वाकली तेव्हा तिच्या मानेवरच्या जखमेचा तो भयंकर व्रण मी ओळखला होता.तोच व्रण.
अखेर तिने तिचं म्हणणं खरं करून दाखवलं होतं!

समाप्त
(संपूर्ण काल्पनिक)
या कथेतील पात्र, प्रसंग ई.चा कोणत्याही वयक्ती,घटना,ई सोबत काहीही संबंध नाही,असल्यास तो निव्वळ योगायोग असेल.लेखक तसेच माध्यम याकरिता जवाबदार नाही
धन्यवाद .