जिवनाचे संदर्भ…
घरात माणसें व चौका चौकात आदर्शांचे पुतळे धूळ खात पडलेले असतांना
विषाणू पेक्षाही जलदगतीने माणसे एकमेकांवर जळण्यात व एकमेकांना संपवण्याचा आराखडा तयार करण्यात मग्न असताना
माणसांनी देवांना बंदिस्त केलं का देवांनी माणसांना बंदिस्त केलं?
देव ऑनलाइन उपलब्ध आहेत पण भक्ती अजून ऑनलाईन उपलब्ध नाही
भक्ती म्हणजे मनातून मना कडचा प्रवास
जीवनाचाही अभ्यासक्रम असतो
तो बदलला की नव्याने सामोरे जावं लागतं नव्याअभ्यासक्रमाला जुनी प्रश्नपत्रिका चालत नाही.
अनेक प्रश्न अनुत्तरित असतांना जोड्या लावा व संदर्भासहित स्पष्टीकरण द्या? हे प्रश्न कसे सोडवणार?
माणसे आता चेहऱ्यावरून ओळखलेच जात नाहीत अशा युगात
आज काल मधूनच अचानक उस्वस्थ व्हायला होतं
सगळं संपलं असं वाटत असतानाच
अचानक लक्ष जातं अडीअडचणीत, कपारीत
उगवणारे इवलेसे कोंब जे जगायला जे प्रवृत्त करतात.
कुठे रुजावं, कुठे वाढावं याचे अजून तरी ठोकताळे नाहीत.
परिस्थिती विपरित असली तरीही रूजता आलं की संदर्भ गौण ठरतात.
डॉ. अनिल कुलकर्णी