यशोदय…
दिवस सुखाचे जातात उलटून
जशी कॅलेंडर ची पानेच जणू..
रात्री खेळतात अमावस्या- पौर्णिमेचा खेळ
पृथ्वी,सूर्य,चंद्र,तारे यांचा असतो का कधी मेळ.?
मग माणसेच का करतात नात्यांची दहिमिसळ आणि विचारांची भेळ ?
वर्ष सुद्धा थांबत नाही कोणासाठी,
मग आपणच का वाट पहात बसावे
गेलेल्यांसाठी..?
जे घडून गेले ते तेव्हाच संपले
तरी का लागतात आशेचे
पाणावलेले डोळे वाटेकडे.?
ज्या वाटेवर वर्षानुवर्षे चपला झिजवून
उमटलेल्या पाऊलखुणांमध्ये आयुष्याची
वाट तुडवण्यासाठी केलेला
संघर्ष डोकावतो..
तोच संघर्ष करण्यासाठी आपणही
कोणाची, हवे ते न मिळालेल्या गोष्टीची
वाट बघणे सोडून,दिसते ती वाट धरून
प्रवास का चालू करू नये.?
कदाचित पुढे गेल्यावर असा एखादा
चौक लागेल जिथे कधी आठवणही येणार नाही गेलेल्या लोकांची,मेलेल्या इच्छांची
कारण त्या भूतकाळातील मळलेल्या वाटांपेक्षा कष्टाने तुडवलेला हा राजमार्ग
कितीतरी सुखाचा वाटेल..
आणि आपल्या विधात्याने नियोजल्यामुळेच ते आता सोबत नाहीत,त्यांचा स्वार्थ आणि
त्या स्वार्थामुळे आपल्या आयुष्यातील त्यांचे
अस्तित्व य सगळ्याला तेव्हाच फाटा
दिला असेल याची अनुभूती व्हावी..
पण आपल्याला कुठे आलीय एवढी दूरदृष्टी
क्षणिक सुखाचे दुःख कुरवाळत
बसणारे आपण ..?
कशाला पहावे भूतकाळातील अंधाराकडे,
जेव्हा भविष्यातील उजेडाचा झगमगाट
समोर खुणावतो आहे.. जिथे गरज आहे
फक्त कष्टाचा प्रवास पूर्ण करण्याची..
द्यावे सोडून सगळे हेवे दावे
गेलेल्या माणसांना, आठवणींना बगल देऊन
करू सुरुवात नवीन वाट तुडवायला
जिथे वर्षाने पुन्हा एकदा उघडी होतील
नवीन कवाड ,चमचमणारे यश दाखवायला
देतील वाट जायला तेच यश कवेत घ्यायला..
आपणही खेळ खेळू जरा दुःखाचे ऊन
आणि सुखाच्या सावल्यांचा..
आणि थकल्यावर घेऊ विसावा
एका मोठ्या सावलीचा ,
आयुष्याच्या संध्याकाळी….😊
– Sunshine (डॉ. किर्ती)