अक्षराला अंधार गिळत चालला
आता अक्षरशाईचे खेळ सम्पल्यात जमा आहे,
मोठं मोठे कवी लेखक, पत्रकार पेनाच्या शाईचे बोट सोडून
टायपायला लागलेत,
हातच्या अक्षराला ग्रहण लागले,
पूर्वी…
लिहता लिहता बोटांशी शाईची
मैत्री व्हायची,
शाई सम्पली की दौत आई बनून
पेनाच्या पोटात शाई टाकायची,
वडिलांचा पेन मुलगा वापरायचा,
रविवारी सर्व पेनाच्या निपा गरम पाण्यात धुवून पुसून काढायचो,
त्या वेळेस शाईचा पुड्या मिळायच्या, त्याची शाई बनवितांना, खूप मजा यायची, शाईत टाक बुडवून तीनरेघी वहीवर अ आ ई इ लिहायचो,
अचानक पेनातली शाई सम्पली की मित्राकडून दहा थेंब शाई उधार घेऊन ती दुसऱ्या दिवशी परत करायचो,
हिरवी, लाल, जांभळी, निळी अशा शाईंच्या दौती कायम टेबल वर मिरवत असायच्या,
शाईच्या पेनाने कविता लिहण्यात एक वेगळीच मज्या यायची,
पेन झटकला की पेनातून थेंबाथेंबा उडणारी शाई शाळेतल्या फरशीवर पडायची,
होळीच्या अगोदरल्या दिवशी मित्रांच्या पांढऱ्या शर्टावर पेनातल्या साईची होळी एक चित्रविचित्र धमाल असायची, उघडया पेनाने वार केला की पेनातली शाई रांगोळी सारखी उमटायची….
खिशाला पेन लावून कुठे पेन गळला तर शर्टाची होळी व्हायची, म्हणून पेनाचा कधी राग वैगरे आला नाही,
शाई आणि प्रेमपत्राचं नातं काही वेगळंच होतं
टाक गेले, पेन गेले, मग रिफिल आल्या, त्या थोड्या बहुत अजून जीवन्त आहे,
शाळेतही टॅब आलेत..
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा लयाला जाणार,
प्रकाशकाकडे लिखित बाड जायचं, आता पेनड्रॉव्ह जातो, पेनाबरोबर कागद ही सपंत चाललाय,
बातमी टायपुन पाठविली की ती पहिले लागते,
हल्ली अक्षर लागत नाही अशी ओरड ऐकू येते,
पण मी मात्र अक्षर जीवन्त ठेवले,
हाताला पेनाचा स्पर्श झाला की रिमझिम वाक्य बरसायला लागतात, वहीची पानं ओसंडून वाहतात
पण …..
कौलारू घर जशी दिसणार नाहीत
तसे वहीवर शब्दही दिसणार नाहीत,
शब्दांची थोडी धुकधुकं बाकी आहे,
शब्दशिवाय जगणं पुढे खूप पेनफुल होईल,
तेव्हा अक्षरब्रह्म निधन पावलेलं असेल,
जस संस्कृतच झालं,
मोबाईल वरदान की अनेक गोष्टीवरच शरसंधान
याचा उलगडाच होत नाही…
*@श्री सचिन शिंदे*