*लपाछपी*
तुम्हाला आठवते
तुम्ही शेवटचे लपाछपी कधी खेळला होतात??
मला आठवतेय
हे आत्ताच काही क्षणापूर्वी चालू होती माझी लपाछपी
माझे सारे सवंगडी माझ्यावर राज्य देऊन पसार झाले
आणि मी या राज्याचा राजा
एकाकी, शोधतोय
माझे सैन्य, सेनापती, आणि हो प्रजेला देखील
.
आत्ता इथे एक सैनिक ओझरता दिसला होता मला
पण जणू काय मी इथे नाहीच असा निघून गेला
आपल्या राजाकडे न पाहताच
.
मी खूप ओरडलो, अगदी घसा खरवडून
पण विरून गेली माझी हाक
आभाळापर्यंत जाऊन परत आली
.
कोपरा नसलेल्या चौकोनी आंगणात
माझे सारे सवंगडी कुठे लपले आहेत कोण जाणे
कोणीच कसं दिसत नाही
.
का आता अंधार झाला म्हणून गेले सगळे आपापल्या घरी??
नाही पण
या आधी डाव असा अर्ध्यावर टाकून
कोणी गेले नव्हते
.
मी खरंच लपाछपी खेळतोय ना??
का मी एकटाच आहे
.
मग ते माझे राज्य, तो सैनिक, माझा सेनापती, माझी प्रजा
माझे सारे सवंगडी
कुठे लपले आहेत कोण जाणे
कोणीच कसं दिसत नाही
.
तुम्हाला आठवते
तुम्ही शेवटचे लपाछपी कधी खेळला होतात??
मला आठवतेय
.
हे आत्ताच काही क्षणापूर्वी
कोपरा नसलेल्या चौकोनी आंगणात
*मार्तंड*