दोन दिवसांचे अर्भक

 

आज 27 Sep. बालिका दिन
( नुकत्याच जन्मलेल्या स्त्री अर्भकाला तिच्या निर्दयी मातेने रस्त्यावर फेकुन दिलेल्या त्या असमज बालिकेच्या मनातून… )

उघडझाप डोळ्यांची,ऊन सहन होईना,
असेच असावे जग, मलाच काही कळेना,

घोंगावत माशा अंगावर, निपचित राहिले पडून,
वाट पाहिली तुझी, पण तुच गेलीस सोडून,

श्वापद आली वासाने, वास माझा घेऊ लागली,
पाहिलं मला कुणीतरी, गर्दी इथं जमू लागली,

भावूकतेने पाहत होते, सर्वजण माझ्याकडे,
भिरभर फिरत होती नजर, फक्त तुझ्याकडे,

मलाच काही कळेना, हे काय होतयं,
थांबून थांबून प्रत्येकजण, तिरस्काराने पाहतंय,

अलगद उचलले मला कुणी, गाडीमध्ये टाकलं,
कोण?मला माहित नाही, त्यांच्यात आपलेपण वाटलं,

मोठाल्या इमारतीत, घेउन गेले मला,
डॉक्टर आले हसत, मला हसवत औषधांचा डोस दिला,

एकमेकांशी पुटपुटत, स्त्री अर्भक होते म्हणत,
मनात आली शंका, हे माझे नांव तर नाही ठेवत,

आणलं मला एका खोलीत, माझ्यासारखे होते खुपजण,
खुप गोंधळून गेले मी, माझ्यासारखेच नांव घेवून होते सर्वजण,

मला पडले मोठे कोडे, तू मला कशी ओळखणार?
मनाशीच वाटलं, तू शोधण्याचा त्रासच कसा घेणार,

नकोच हवी होती मी तूला, तूझ्या विचारांच्या समाजाला,
बळी पडले मी तूझ्या पापाला, नकोच होती तर जन्म दिलास कशाला?

केलास कधी शोधण्याचा प्रयत्न, येथील अर्भके पाहून घाबरू नको,
दोन दिवसांचे “स्त्री अर्भक” पाटीजवळ थांबून, मूळीच तूझी सहानूभूती नको….