स्वतःचे घर

गेल्या काही दिवसांपासून मी आणि माझा मित्र नवीन घर (फ्लॅटस्) बघण्याचा जोरदार कार्यक्रम करत आहोत. जवळजवळ 20 ते 25 फ्लॅटस् आम्ही याची देही याची डोळा बघितले, एक बंगला बने न्यारा, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने… असे कैक हिंदी मराठी गीतातून स्वतःचे एक घर पाहिजेच असे स्वप्न उराशी बाळगून करोडो भारतीय एका अनोख्या सुखाच्या शोधात जीवन जगताय किंवा जीवन ढकलताय म्हटलं तरी वावगं नाही.
असो तर एकंदरीत स्वतःचे घर हाच मुद्दा आमचा दोघांचाही आणि तो ऊराशी बाळगून आम्ही रोज फ्लॅटस् बघत होतो, तसे म्हणायला आम्ही दोघं जीवलग मित्र, बिझनेस पार्टनर आणि त्याहीपुढे जाऊन एक घट्ट नातं आमच्यात गेल्या काही वर्षांत घडत मढत गेलं आणि आता आम्ही या वळणावर आहोत की आपण एकाच सोसायटीत एकाच मजल्यावर समोरासमोर घर घ्यावे आणि अजून घट्ट कौटुंबिक जवळीक साधावी.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात (असे म्हणावे लागते जीवन धकाधकीचे की सुसह्य हे फक्त मानसिकतेचा भाग असे मी मानतो) दिवस रात्र कामाच्या विचारात एक विचित्र विचार आमच्या मनात घर करून गेला की आपले स्वतःचे घर असायलाच पाहिजे आणि ते पण नाही झाले तर आपला काय अर्थ रोज रोज राबून..!!!!

असो, तर एकच गोष्ट जी आपण अर्थार्जनाला सुरूवात केल्यानंतर आपल्या कानांवर आघात करत असते …. तुमचे स्वतःचे घर आहे का? कधी घेताय? आता मुलं बाळ लहान असेपर्यंत घेऊन टाका… , असे एक ना अनेक प्रश्न आणि प्रत्येकजण आपलं म्हणून सांगत सुटतो ते फुकटचे सल्ले!!!

आपलं स्वतःच घर आहे की नाही की होईल की होणार नाही याची काळजी आपण सोडून भोवतालच्या समाजाला एवढी जास्त का? आणि का प्रत्येकजण स्वतःच घर हवच ह्या इर्षेला पेटला आहे? फक्त घर ह्या गोष्टीतच सुख मिळते हा विचार आला तरी कुठून??

विचार करा नक्कीच……