सपना

सपना

किशोर बोराटे @

गेले काही दिवस असेच उदास वाटत होते. सगळे मित्र माझ्या नावाने ओरडत होते. पूर्वीसारखा बोलत नाहीस, मिसळत नाहीस. पण अलिकडे मला एकटे एकटेच राहावे वाटत होते. आजही ऑफिसमध्ये मन लागत नव्हते. सकाळपासून नुसता टाईमपास करत होतो. अगदीच अस्वस्थ झाले म्हणून साधारण सायं. ४:३० ला ऑफिसमधून बाहेर पडलो आणि जवळच गेट-वे ला गेलो. नेहमीप्रमाणेच तिथे चांगली गर्दी होती. विक्रेते होते, लहान मुलं खेळत होती. तिथे जाऊन समुद्राच्या लाटांच्याकडे पाहत बसलो. लाटा किनाऱ्याला धडकून परत जात होत्या. धडकून…..? नव्हे शिवून जात होत्या. किनाऱ्याकडे येताना मला त्या हसऱ्या वाटत होत्या. बागेत खेळणारे लहान मूल जसं आपल्या आई-वडिलांची पळत येऊन पप्पी घेते आणि पळतच खेळायला जाते असेच काहीसे मला त्या लाटांच्याकडे पाहून वाटले. थोडा वेळ गेल्यानंतर या प्रसंगाला मी एका लहान बाळाची का उपमा दिली याचे मला आश्चर्य वाटले. समुद्र आणि समुद्र किनारा हे तर माझे आवडते ठिकाण. त्यातही कोकणातील समुद्र असेल तर मग विचारूच नका. वेळ मिळेल तेंव्हा कोकणात जायची संधी मी कधी सोडली नाही. सोडली नाही असे म्हणण्यापेक्षा मी अशा संधी शोधल्या. इथे मुंबईत असलो की गेट-वे, मरीन ड्राईव्ह ही माझी विशेष आवडती ठिकाणं. या दोन्ही ठिकाणी बसून मी शेकडो कविता लिहिल्या. इथं आलं की मला कविता सुचतातच. मग आज या लाटांच्याकडे पाहून मला कविता सुचण्याऐवजी हे असं लहान बाळाचे उदा. का सुचले असावे?

कविता, शेरो-शायरी ही माझी ताकत आणि आवडही आहे. आहे…….? आहे की होती? आता मात्र माझ्या काळजात धडधड वाढली. ही माझी ताकत नष्ट झाली? आता मला कविता सुचनार नाहीत? म्हणजेच जशी सपना मला सोडून गेली, तसेच शब्दांनीही माझी साथ सोडली? ……नाही…… नाही हे शक्य नाही. माशाने पाण्याशिवाय कसे जगायचे? कवीने शब्दा शिवाय कसे जगायचे? असे असंख्य प्रश्न लोकल ट्रेन सारखे पाठोपाठ माझ्या मनात येऊ लागले. एकटेपणाचे दुःख नको असेल किंवा त्यातून सावरण्याची ताकत हवी असेल तर माणसाकडे कोणती तरी कला हवी असे कोणी म्हटल्याचे मला आठवले. माझ्याकडे कवी मन होतेच, पण सपना मुळे ते अजून विकसित झाले होते. तिच्या नंतरही या विजनवासात याच मनाने मला साथ दिली. मग सपना सारखे ते ही मला सोडून गेले तर……? या एका विचाराने मला कापरं भरलं. तेवढ्यात समोर कोणीतरी उभे असल्याचा भास मला झाला. मी वर पाहिले, एक व्यक्ती माझ्यासमोर उभी होती. माझ्या डोळ्यात डोळे घालून ती बोलली, सपना शिवाय जगतो आहेसच ना? मग शब्दा शिवाय पण जगशील. परिस्थिती सगळं शिकवते. मी म्हटलं, दात आणि आयाळ नसेल तर त्या सिंहाच्या जगण्याला काय अर्थ आहे? मी भानावर आलो. इकडे-तिकडे पाहिले, पण ती व्यक्ती कुठेच दिसेना. आजूबाजूला लोकं फोटो काढण्यात, तर कुणी सेल्फी घेण्यात दंग होती. मी थोडा पुढे सरकलो. किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांचे तुषार माझ्या चेहऱ्यावर येत होते.

सपना! होय, सपनाला ते तुषार खूपच आवडायचे. मरीन ड्रॉइव्हला आम्ही निवांत बसायचो. मला मरीन ड्राईव्ह आठवले. तातडीने टॅक्सी पकडून मी मरीन ड्राईव्ह गाठले. सपना, माझी सपना काय सांगू तिच्याविषयी? अतिशय हसरी, गोरी, एकदम सडपातळ, साधारण साडे पाच फूट उंची असलेली एक सर्वसाधारण मराठी मुलगी. जीव तोडून माझ्यावर प्रेम करणारी. मला आवडते म्हणून सफेद रंगाचा पांढरा शुभ्र, कधी पिंक कलरचा ड्रेस घालणारी, कधी जीन्स आणि टॉप किंवा शर्ट घालणारी तर कधी full long skurt घालायची. खरेदीचे आमचे आवडते ठिकाण म्हणजे FS (fashion street) नाहीतर मग दादर. अर्थातच माझी कपडेही तिच्याच पसंतीचे असायचे. मी मरीन ड्राईव्हला उतरलो. तिथे आम्ही एका खडकावर जाऊन बसायचो. अगदी समुद्राच्या कडेला….. तिचा हट्ट असायचा पाण्याचे तुषार असे तोंडावर, अंगावर यायला हवेत. कपडे भिजतील म्हणून मी कंटाळा करायचो, तर बोलायची हे काय रे अमर? चल ना, अजून थोडे पुढे जाऊ असे म्हणून मला हाताला धरून ओढत घेऊन जायची. तिथे आम्ही असेच पाण्याचे तुषार अंगावर घेत खडकावर हातात हात घेऊन भावी आयुष्याची स्वप्नं रंगवत तासंन-तास बसायचो. एखादा भेळवाला, आईस्क्रीमवाला आला तर भेळ किंवा आईस्क्रीम घ्यायचो.

पडत्या पावसात सपनाला आईस्क्रीम खायला खूप आवडायचे. मला तिच्या या आवडीचे मोठे विलक्षण आश्चर्य वाटायचे. मी तिला याबद्दल अनेकदा बोललो तर म्हणायची अमर, आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख हवी. जगाने चाकोरी आखायची आणि आपण त्यातून चालायचे यात काय ते वेगळेपण. पावसात मी आईस्क्रीम खात असताना किती लोकं माझ्याकडे आश्चर्याने पाहतात बघतोस ना? असे ती बोलायची आणि त्यावर तीच मनसोक्त हसायची. तिचे असे स्वतःच्या भाव विश्वात हरवून जाणे मला आवडायचे. माणूस संपूर्ण आयुष्य जगतो, पण इतरांच्या संगतीत. स्वतःच्या संगतीत आपण किती जगतो? सपना मात्र याला अपवाद होती. स्वतःशी ती लगेच एकरूप व्हायची. सपना, अजून काय सांगू तिच्याबद्दल?

अवघ्या काही दिवसांत तिने माझे आयुष्य व्यापले होते. सायंकाळचा सूर्य मुंबईचा निरोप घेत असताना आकाश एकदम चित्रकार चित्रात रंगवतो तसे तांबूस झालेले असायचे. समुद्राकडून येणारे वारे अंगाला झोंबायचे. त्या वाऱ्याने सपनाचे केस उडायचे, सारखे कपाळवरून हात फिरवून ते ती मागे घ्यायची. मी मात्र या सर्व गोष्टींचा मनमुराद आनंद घ्यायचो. मग तिचा हट्ट असायचा अमर किती सुंदर वातावरण आहे ना? मी हो म्हणायचो. मग कर ना एखादी कविता. एखादी एखादी म्हणत तिने माझ्याकडून शेकडो कविता करून घेतल्या. नाही सुचत गं, काय करू? मग ती लटक्या रागाने एवढा छान सूर्य, समुद्र किनारा, हा गार वारा आणि सोबत एवढी सुंदर, हॉट तुझी girl friend असताना तुला कविता सुचत नाही डफ्फर? असे म्हणून रागवायची आणि मग नेमक्या त्याच प्रसंगावरूनच मी एखादी कविता करायचो. ती ऐकायची, खूश व्हायची आणि त्या खडकावर उभे राहिल्या राहिल्याच हाताची घट्ट मूठ करून माझ्या छातीवर हलकेच मारायची, मिठीत येऊन मला घट्ट पकडायची आणि म्हणायची I LOVE YOU AMAR कधीही मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, नाही राहू शकत. अमर, या समुद्राची, या किनाऱ्याची, या खडकाची, या थंडगार वाऱ्याची, या निळ्या आकाशाची शपथ आहे तुला, या आकाशातील पक्षांची शपथ आहे तुला, या भोवतालच्या झाडांची शपथ आहे तुला अमर, प्लिज प्लिज या सपनाला आयुष्यात कधीही सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय नाही रे राहू शकणार. छातीला बिलगून डोळ्यात पाणी आणून ती असे बोलायची.

आम्ही एकाच ऑफिसमध्ये जॉब करायचो. रोज एकमेकांना भेटायचो. पण रोज निरोप घेताना एकमेकांना अगदी डोळे भरून पाहायचो. माझ्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळावा म्हणून लोकलमध्ये कधी कधी ती महिलांचा डबा सोडून पुरुषांच्या डब्यातून माझ्याबरोबर प्रवास करायची. एकमेकांच्या संगतीत वेळ जावा म्हणून आम्ही ऑफिस सुटल्यावर अनेकदा काही अंतर चालतच जायचो. ऑफिसमधील इतरांना काही कारण सांगून कटवायचो. ऑफिसमध्ये चहा आला की सर्वांची नजर चुकवून गुपचूप आम्ही चहाचे ग्लास बदलायचो. ही हातचलाखी करण्यात तिला खूप गंमत वाटायची. मला प्रमोशन मिळावे म्हणून पहाटे चप्पल न घालता अनवाणी चालत ती सिद्धिविनायकाला जायची, वेळ काढून महालक्ष्मीला जायची. मला प्रमोशन मिळाल्यानंतर तिने मला हे सांगितले. तिच्या या प्रेमातून कसे उतराई व्हावे हेच मला कळत नव्हते. प्रमोशन मिळाल्यावर आम्ही महालक्ष्मीला जाऊन आईचे आशिर्वाद घेतले. सिद्धिविनायकाला जाऊन पेढे ठेवले. सिद्धिविनायकावर तिची खूप श्रद्धा होती. अजून काय तिच्या आठवणी सांगू? ती लाजायची तेंव्हा असे वाटायचे की मुंबईतील सर्व गुलाबाची फुले तिच्या गालावर कुस्करली आहेत असे तिचे गाल लाल, लाल व्हायचे. पक्षांचे पाठोपाठ थवे यावेत तशा आज आठवणी दाटून येत होत्या.

थोडे पुढे जाऊन आम्ही बसत होतो त्या खडकावर जाऊन मी बसलो. त्याच खडकावर आम्ही आमचे नाव कोरले होते, *अमर-सपना* त्या नावावरून मी प्रेमाने हात फिरवला. माझे नाव तिने कोरले होते, तिचे नाव मी कोरले होते. रोज ती मला हाताला धरून या खडकावर ओढत आणायची. पण आज मीच स्वतःला घेऊन आलो. आजूबाजूला अनेक कपल्स हातात हात घालून फिरत होती. काहीजण एकमेकांना खेटून गुजगोष्टी करण्यात दंग होते. नेहमीप्रमाणे निळ्या आकाशातून पक्षी फिरत होते. वाहत्या वाऱ्याला झाडे झुकून सलाम करत होती. मी एकदम स्थितप्रज्ञ होतो. आवाज आला म्हणून पाहिले तर भेळवाला उभा होता. बोलला साहब, आज अकेले आये हैं. मेमसाहब नही आयी? माझ्या डोळ्यात अश्रू दाटले. ते लपवत मी मान हलवत नाही म्हटले. ज्यांची ज्यांची तिने मला शपथ घातली ते सर्वजण इथे होते, पण शपथ घालणारी मात्र नव्हती. आयुष्यात आलेला हा एकटेपणा अक्षरशः जीवघेणा होता. सहन तरी किती आणि काय काय करणार? असं वाटत होतं की असेच सरळ पाण्यातून चालत जावे. चालतच राहावे आत अगदी आतपर्यंत आणि जीवनाचे विसर्जन करून टाकावे. ए बावळट, काय विचार करतोस? मी दचकलो, आवाज सपनाचा होता. मी उभा राहिलो. इकडे तिकडे पाहिले ती हाका मारत होती. अमर…..अमर मी जोरात ओरडलो सपना…..सपना
पण प्रतिसाद मिळाला नाही.

आकाशात ढग साठले होते. पाऊस ठिपकायला लागला. मुंबईचा पाऊस असाच बेमौसमी असतो. पाऊस आला की सपना खुश व्हायची भिजायची. मी मात्र छत्री उघडून बसायचो. मला सर्दीचा त्रास असल्याने मी भिजायचे टाळायचो. ती लहान मुलीसारखी उड्या मारायची. पण आज मात्र मी पूर्ण भिजलो होतो. थोड्यावेळाने पाऊस थांबला आणि थंड हवेचे झोत चालू झाले. सूर्य नारायणाने जाता जाता दर्शन दिले. आकाश परत तांबूस झाले. इथूनच पुढे गेल्यावर टोयाटो गाडीचे एक शो-रूम लागते. मला innova गाडी खूप आवडायची. तिला हे माहीत होते. तिने मला ओढतच त्या शो-रुम मध्ये नेले होते. अमर आपल्याला हीच गाडी घ्यायची. मी म्हटलं सपना अगं एवढे पैसे कुठून आणणार? आपल्याकडे एवढे पैसे नाहीत. ती बोलायची येतील रे, काळजी करू नकोस. मग इथे का आणलेस? ती बोलली छोड ना यार, कोटेशन घ्यायला थोडीच पैसे लागतात? फुकटची कॉफी पण मिळेल. तिथला तो स्टाफ कसा आपल्याला हॅलो सर, हॅलो मॅडम करतो. चल ना फुकटचा भाव खाऊन येऊ. पण अमर एक दिवस तरी आपण ही गाडी नक्की घेऊ. सांग ना, ए सांग ना घेऊ या ना? मी हो म्हटले की तिला गाडी घेतल्याचा एवढा आनंद व्हायचा की ती अक्षरशः उड्या मारायची. असेच तिने मला हट्टाने नेले आणि आम्ही innova चे कोटेशन घेऊनच बाहेर पडलो.

दिवसांमागून दिवस जात होते. ऑफिस सुटल्यावर आठवड्यातून किमान ३-४ वेळा तरी आम्ही मरीनला जाऊन बसायचो. रविवारी सुट्टी असल्याने दिवसभर मस्त मजा करायचो. बाहेर जेवायला जाणे, चित्रपट, नाटक पाहणे असे आमचे रुटीन चालू होते. ऑफिसमधून घरी आल्यावर एके रात्री तिचा फोन आला आणि बोलली की अमर मी उद्या ऑफिसला नाही येणार. काही कामानिमित्त मला गावी रत्नागिरीला जावे लागत आहे. आम्ही घरचे सर्वजण जाणार आहोत. मला कळेना हे असे अचानक काय झाले? ते चार दिवस मी अक्षरशः कसेतरी ढकलले. चार दिवसांनी मी रत्नागिरीहून मुंबईत आलेय असा तिचा मेसेज आला. माझ्या जीवात जीव आला. उद्या ती भेटणार या आनंदात मी झोपी गेलो. नेहमीप्रमाणे सकाळी उठून आवरून मी स्टेशन गाठले. पण ती आली नव्हती. फोन केला पण लागला नाही. मी विचार केला, रत्नागिरीहून रात्री उशिरा आल्याने कदाचित ऑफिसला यायला तिला उशीर होईल. दुपारपर्यंत वाट पाहिली, पण ती आली नाही. मोबाईल पण switch off लागत होता. सायंकाळी ४ वाजता तिच्या आईचा मला फोन आला की सपना आजारी आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. हा फोन माझ्यासाठी धक्कादायक होता. कारण ती आजारी आहे हे मला प्रथमच समजले. ती रत्नागिरीला असल्याने माझे तिचे बोलणे झाले नव्हते. फक्त मुंबईत आल्याचे तिने मेसेज करून सांगितले होते. मी ऑफिसमधून लगेचच निघालो आणि हॉस्पिटल गाठले. तिथे सपनाची आई-वडील, भाऊ आणि धाकटी बहीण होती. चौघेही खूप टेन्शनमध्ये होते. मी गेल्यावर तिची आई आणि बहीण माझ्याजवळ येऊन रडायला लागल्या. त्यांना शांत करत मी तिच्या वडिलांकडे गेलो. ते बोलले रत्नागिरीला गेल्यावर तिला अस्वस्थ व्हायला लागले. ताप आला, अंग दुखू लागले. तिथल्या डॉक्टरांना दाखवले. पण तिला तितका फरक पडला नाही. रात्री उशिरा आलो. सकाळी ताप असल्याने ती ऑफिसला आली नाही. नंतर तिला खूपच त्रास झाला म्हणून मग इथे आणून ऍडमिट केले. तिला ICU मध्ये ऍडमिट केले होते. मी काचेतून पाहिले. तिला ऑक्सिजन लावला होता. बहुधा श्वास घ्यायला तिला त्रास होत असेल. तिची ती अवस्था पाहून माझे हात-पाय गळाले. मी खाली बसलो. तिच्या वडिलांनी आणि भावाने मला धीर दिला. मी डॉक्टरांना जाऊन भेटलो. त्यांनी स्वाईन-फ्लू झाल्याचे सांगितले.

रात्र झाली होती. त्या रात्री मी तिथेच हॉस्पिटलमध्ये थांबलो. संपूर्ण रात्र त्या काचेतून सपणाकडे पाहत मी जागून काढली. असं वाटायचे की ती जागी होईल , तोंडावरचा मास्क काढेल आणि मला हाक मारेल, पण असे काही घडले नाही. २-३ वेळा तिची हालचाल जाणवली. किती त्रास होत असेल ना तिला? इतकी हरहुन्नरी, हसणारी, खेळणारी, बागडणारी, रुसणारी, माझ्याकडून कविता करून घेणारी, हीच गाडी घ्यायची असा हट्ट करणारी, पडत्या पावसात आईस्क्रीम खाणारी माझी सपना आज आयसीयूत असहायपणे बेडवर पडली होती. तिला शुद्ध असेल का? मी आलोय हे तिला कळले असेल का? या बेडवरून उठून ती परत माझ्याबरोबर मरीन ड्राइव्हला येईल का? आम्ही जेवतो त्या हॉटेलमध्ये येईल का? ऑफिसमध्ये गुपचूप चहाचा कप बदलेल का? एक ना अनेक प्रश्न होते. पण उत्तर एकाही प्रश्नाचे मिळत नव्हते. माझं मन मला सांगत होते की हो, ती चांगली बरी होईल आणि आमचे रुटीन परत चालू होईल. आज तिच्यासाठी काहीही करायची माझी तयारी होती. सपना, उठ ना, मी आलोय, बोल माझ्याशी 😢😢😢😢😢

सकाळ झाल्यावर तिचे वडील मला बोलले अमर, मी थांबतो तू घरी जाऊन थोडा आराम करून आवरून ये. रात्रभर झोपला नाहीस. सपणाला अशा अवस्थेत सोडून मला जाऊ वाटत नव्हते. पण तरीही तिच्या वडिलांच्या हट्टामुळे मी गेलो. पण आराम न करता आवरून लगेच आलो. तिचे आई-वडील, भाऊ-बहीण सगळे होते. थोड्यावेळाने डॉक्टरांनी आम्हाला आत बोलावले आणि सपना खूप सिरीयस असल्याचे सांगितले. सर्वांचे चेहरे पडले. तिचे आई-वडील, भाऊ-बहीण सगळे रडायला लागले. माझाही धीर तुटला. डॉक्टरांना विनंती करून आम्ही सपनाच्या जवळ गेलो. तिच्या शेजारी बसलो. तिचा हात हातात घेतला. पण ती निस्तेज होती. तिला काही कळत नव्हते. Infection होईल म्हणून आम्हाला तिथे जास्त वेळ थांबू दिले नाही. त्या दिवशी दिवसभर तिला ventilator वर ठेवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मन तडफडत होते. काहीतरी चमत्कार होईल असे वाटत होते. तेवढ्यात मला महालक्ष्मी आणि सिद्धिविनायकाची आठवण झाली. तातडीने मी सिद्धिविनायक आणि महालक्ष्मीला गेलो. दोन्ही देवतांच्यावर सपनाची खूप श्रद्धा आहे. अंतःकरणापासून मी सिद्धिविनायकाला आणि महालक्ष्मीला प्रार्थना केली आणि माघारी हॉस्पिटलला आलो.

तिथे आल्या क्षणी सपनाचे भाऊ-बहीण पळत येऊन मला बिलगून रडायला लागले. सपनाची आईर्डत होती, तिला हॉस्पिटल मधील नर्स समजावत होत्या. तिचे वडील भिंतीकडे तोंड करून रडत होते. परिस्थितीची कल्पना मला आली. तिच्या बहिणीने रडत-रडत मला ताई गेली असे सांगितले आणि वरून काचेचे भांडे जमिनीवर पडून त्याचे तुकडे-तुकडे व्हावेत तसे माझ्या आयुष्याचे तुकडे झाले असल्याचे मला जाणवले. मी तिथेच गुडघ्यावर बसलो. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. काही कामानिमित्त मला गावी रत्नागिरीला जावे लागत आहे हे माझ्याबरोबर बोललेले तिचे शेवटचे शब्द होते. आयुष्यातले सगळ्यात मोठे दुःख माझ्या वाट्याला आले होते. पुढचे सर्व सोपस्कार पार पाडले आणि तिथून पुढे ८-१० दिवस मी स्वतःला घरात कोंडून घेतले. कुठे बाहेर पडलो नाही. ऑफिसला गेलो नाही. एके दिवशी सकाळी सपनाचे आई-वडील घरी आले. वडिलांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि बोलले अमर बेटा, तुझ्या दुःखाची आम्हाला कल्पना आहे. आम्ही तर तिचे आई-वडील आहोत. लहानाची मोठी केली. अंगावर खेळलेल्या पोटच्या पोरगीला खांद्यावरून नेताना या बापाचे काळीज किती तुटले असेल विचार कर. तिच्या आईचा विचार कर. कसे सहन करत असेल? आपणच आता एकमेकांना आधार द्यायचा. उठ आणि आता ऑफिसला जायला सुरुवात कर. तिच्या एका-एका आठवणीने मला भरून आले. मी त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून खूप खूप रडलो. त्यांनी मला शांत केले. माझा हुंदका गेल्यावर मी त्यांना बोललो. पप्पा, मी उद्यापासून ऑफिसला जाईन. थोड्यावेळाने ते जायला निघाले. मी दारापर्यंत त्यांना सोडायला आलो. जाताना ते थोडे अडखळले. मी म्हटलं काय झाले पप्पा? काही बोलयाचेय का? त्यांनी माझ्या हातात एक बॅग दिली आणि बोलले आम्ही गेल्यावर उघड.

मला कळेना की नक्की त्यात काय असेल? ते गेल्यावर तातडीने मी ती बॅग उघडली, तर त्यात खूप सारे पैसे होते. त्यात एक चिट्ठी होती. ती सपनाची होती.

प्रिय अमर,

मी रत्नागिरीला येण्याचे कारण तुला सांगितले नाही. आमची गावाकडे जमिन आहे. त्यासंदर्भात मी इकडे आले होते. पप्पांनी माझ्या भविष्यासाठी म्हणून त्यातील काही जमिन माझ्या नावावर केली होती ती माझ्या हट्टाखातर विकली. त्याचे जे पैसे आले तेच हे २५ लाख आहेत. माझे भविष्य तूच आहेस. आपल्या innova गाडीसाठी हे पैसे आहेत. तुझ्या वाढदिवसाला आपण गाडी आणायची असे मी ठरवले होते. पण मी आजारी पडले आणि आत्ता मला खूप अस्वस्थ वाटत आहे. मला माहिती नाही, माझी सकाळ होईल की नाही. मला खूप धाप लागत आहे, ताप आला आहे. मी घरात सर्व काही सांगितले आहे. माझे काही बरे-वाईट झाले तर तू नक्की गाडी घे. माझी आठवण, हवं तर माझा हट्ट म्हणून गाडी घे. खूप स्वप्नं पाहिली रे, पण काय माहिती नियतीच्या मनात काय आहे? माझं काही बरं-वाईट झाले तर तू लग्न कर असाच राहून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुला सोडून नाही जायचे रे, पण का कुणास ठाऊक, आज मला खूप भीती वाटतेय. तुझ्यापासून मला कुणीतरी खूप लांब घेऊन चालल्यासारखे वाटतेय.

काळजी घे.

तुझीच, सपना

आठवणींच्या खोल समुद्रात बुडून गेलो होतो. मी भानावर आलो तेंव्हा जोरात पाऊस पडून गेला होता. मी चिंब भिजलो होतो. आजूबाजूला पाहिले तर कुणीही नव्हते. अंधार पडला होता. मी त्या खडकावरून उठून रस्त्यावर आलो. रस्त्यावरून गाड्यांची ये-जा चालू होती. फुटपाथवरून लोकांची वर्दळ कमी झाली होती. मी तसाच पुढे चालत राहिलो. पुढे गेल्यावर टोयोटाचे शो-रूम लागले आणि सपनाच्या आठवणीने माझे डोळे भरून आले. माझं माझ्याजवळ काही उरलंच नव्हतं. कधीही भरून न येणारी जखम घेऊन आजही मी त्या अश्वत्थाम्यासारखा भटकतच आहे.

– किशोर बोराटे

8 प्रतिक्रिया

  1. खूप छान कथा. लेखकाने संपूर्ण प्रसंग असा काही वर्णन केला आहे की, एक चित्रपट आपण पहात आहोत असे वाटते. अधून मधून जीवनाची मर्मे, तत्त्वज्ञान सांगण्याची कला विशेष लक्षात येते. निसर्गकवीप्रमाणे निसर्गाचे वर्णनही सही रे सही केलेले आहे. सध्याच्या करोना महामारीच्या काळात तर अशा प्रकारचे प्रसंग अंगावर काटा आणतात. लेखकाचे अत्यंत मनःपूर्वक अभिनंदन आणि लेखकांच्या हातून अशाच प्रकारे दर्जेदार लेखन व्हावे हीच सदिच्छा ––डॉक्टर मनोहर ससाणे

  2. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, आभार
    आपण सपना या कथेला जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मी परत एकदा आभार मानतो. अनेकांनी फेसबुकवर, व्हॉट्सप-अपवर तर खूप लोकांनी फोन करून प्रतिक्रिया दिल्या. कथा वाचताना अनेकांना अश्रू अनावर झाल्याचेही सांगितले. वाचकांचा प्रतिसाद हीच लेखकाची ताकत असते. पेणातील शाई असते. या ऍप वरील प्रत्येक कथा चांगली आहे. लेखक चांगले आहेत. त्यांनाही असाच उदंड प्रतिसाद द्या आणि आपल्या नातलगांना तसेच जवळच्या मित्रांना, लेखकांना, साहित्यिकांना हे ऍप डाऊनलोड करायला सांगा. त्यावर कथा, लेख टाकायला सांगा. व आपणही आपले लेखन टाकून या