सप्तपदी

0

सप्तपदी

        “हे बघा, मी सगळ्या पाहुण्यांची नावे, त्यांचा पत्ता व फोन नंबर लिहून ठेवले आहे. खासकरून माझ्या माहेरच्या लोकांची नावे मी अधोरेखित केली आहेत तर तिथे हमखास सुमेधाच्या लग्नाची पत्रिका ही गेलीच पाहिजे,” माझ्या आईने पप्पांना ठाम सांगितले. मी मात्र एका बाजूला बसून हसतच होते. ” अगं, सुमेधा तू तिथे काय बसून हसतेस. खरेदी झाली का तुम्हा सगळयांची.तुम्ही मुली तर हल्ली जास्त वेस्टर्न कपडेच घेता ना? साडी, सलवार-कुर्ती असे काही घेतले का? की मी आणू तुझ्यासाठी?,” पप्पांना दटावल्यानंतर आता आईने तिचा मोर्चा माझ्याकडे वळविला होता. ” माझी लाडकी आई,” ऐक ना, मी आता तुझ्या आणि पप्पांच्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करते. मग आता मला लग्नानंतर काय कपडे घालायचे, कसे राहायचे हे तरी नको सांगू. मी तर मला आवडतील तेच कपडे घेणार आणि वापरणार. नाहीतर मी नाही लग्न करणार आधीच सांगते,” असे बोलून मी मोकळी झाले. ” हे काय बोलतेस तू ,सुमेधा? आईने मला प्रश्न केला. तिला उत्तर देण्याऐवजी मी माझ्या खोलीत धूम ठोकली. ” काय हो,ऐकले का? आईने पप्पांना विचारले.”अगं, लग्न झाल्यापासून तुझेच ऐकतो आहे ना? तुझे नाही ऐकणार तर कोणाचे ऐकणार मी,” पप्पांनी मुद्याम विषय बदलला.” तुम्ही दोघे बापलेक फक्त मस्करी करत बसा. मुलीचे लग्न होणार आहे. तिच्या घरी जाणार आहे ती हे घर सोडून आणि.. मध्येच वाक्य तोडून पप्पा बोलले,” सुमेधा सासरी जाणार आहे हे बरोबर आहे पण ती हे घर सोडणार असे नाही, समजले का सुलोचना? ती फक्त त्या घराची सून झाली म्हणजे आपली कोणी नाही असे नाही होणार, लक्षात ठेव,” पप्पा उत्तरले. ” अहो,पण मी कुठे बोलली की, तिचे आणि आपले नातं संपले मी तर…,आई बोलणार तेवढाच पप्पांचा फोन वाजला आणि ते बोलत बाहेर पडले. ” अरे देवा, काय हे? पुढच्या दोन आठवड्यांनी लग्न आहे आणि या घरात बघा कसलीच पर्वा नाही. बिच्चारी आई एकटीच बडबडत होती. मी खोलीत जरी बसले असले तरीही आईचे बोलणे मला स्पष्ट ऐकू येत होते. आधीच आईपप्पांचे मुलगा शोधणे, त्याच्याशी चर्चा, मग त्यांना घरी बोलवून मला पाहण्याचा कार्यक्रम या सगळ्यांमुळे माझे ऑफिसचे काम रखडले होते. त्यात अजून भर म्हणून काय तर शॉपिंग, नातेवाईकांच्या भेटीगाठी, मंडप बांधणारे, डेकेरेशन करणारे वगैरे.
इतके दिवस सगळयांना फोन करून आईने माझ्या फोनला बिझी करून ठेवले होते. आज कुठे थोडा वेळ मिळाला होता म्हणून मी कुणालशी बोलायचे ठरविले. कुणाल हा माझा शाळेतील मित्र. त्याची गुपिते माझ्या पोटात आणि माझी त्याच्या पोटात अशी आमची घट्ट मैत्री. कॉलेज जरी वेगवेगळी असली तरीही फिरायला मात्र आम्ही दोघेही जायचो ते पण एकमेकांच्या मित्रमैत्रिणींसोबत. एकतर लग्न आणि त्यात कुणाल गावी गेला होता. त्याला फोन केला तर नेटवर्क नसल्याने माझे आणि त्याचे बोलणं झाले नव्हते. पाच-सहा वेळा प्रयत्न केल्यानंतर कुठे त्याचा फोन लागला आणि त्याच्या आईने फोन उचलला.” काकू, मी सुमेधा बोलते. माझे लग्न ठरलं आहे आणि त्यासाठीच मी कुणालला फोन करत होते. आता आहे कुठे तो?,” मी विचारले. ” तुझे लगेच ठरले ही चांगलीच बातमी आहे. तुझा संसार सुखाचा होऊ दे. तुझा मित्र सध्या त्याच्या बाबांसोबत काही कामानिमित्त तालुक्यात गेला आहे. तो आला की, मी कळविते त्याला,” कुणालची आई बोलली. ” काकू, नुसते कळवू नका. त्याला इथे माझ्या घरी पाठवून द्या. इतके दिवस त्याचे आणि माझे बोलणे झाले नाही. अगदी माझा नवरा कोण आहे? काय करतो हे पण मी माझ्या कोणत्याही मित्रमंडळींना सांगितले नाही. मग आधी कुणालला सांगेन आणि नंतर इतरांना,” मी उत्तरले. ” बरं, बेटा. कुणाल येईल तसेच मी त्याला मुंबईसाठी निघायला सांगेन, चालेल?,” काकूंनी विचारले. मी माझा होकार कळवून नंतर फोन ठेवून दिला. कुणालची आई पण खूप प्रेमळ होती. एका अपघातात त्यांच्या मुलीचे निधन झाल्यावर त्या माझेही त्यांच्या मुलीप्रमाणे लाड करत. घरात काही खास पदार्थ बनवले की, कुणालप्रमाणे मलाही त्या घरी बोलावून खाऊ घालत. असे बोलतात की, आईचे प्रेम हे निस्वार्थ असते. न जाणो पाठवणीच्या वेळी मी कसे जाणार या घरातून? आईपप्पांना सोडून? कुणाल व त्याच्या आईला सोडून? विचार करत असताना मी झोपी गेले. सायंकाळी पाचचा माझा अलार्म वाजला आणि मी उठून बसले. माझा होणारा नवरा श्रवण हा एक इंजिनिअर होता. लग्न करून आम्हाला दुसऱ्या शहरात जायचे असल्याने ज्या दिवशी साखरपुडा तेव्हाच लग्न करायचे ठरले होते. मी आणि श्रवण क्वचितच बोलत होतो. त्यामुळे मला काही अगदीच लग्नाची घाई किंवा अशी उत्सुकता असे काही वाटत नव्हते. कधी एकदा कुणालशी बोलते असे झाले होते मला. जेव्हा दोन दिवसांनी कुणाल मला भेटायला घरी आला तेव्हा कुठे मला बरे वाटले.
तो जसा माझ्या घरी आला तसेच मी त्याला बाहेर घेऊन गेले. आमचा फ्लॅट मोठा आणि प्रशस्त असल्याने एकतर घरात सगळे पाहुणे येऊन बसले होते. अचानक अनोळखी मुलगा घरात बघून ते काही बोलतील त्या आधीच आम्ही दोघेही निघालो. पण मी जाण्याआधी पप्पांना सांगून गेले होते. सायंकाळची वेळ होती म्हणून आम्ही जवळच्या कॉफी शॉपमध्ये बसलो. कुणालचा चेहरा पाहून तो थोडा चिडला ते समजले होते मला. पण त्याच्या फोनला नेटवर्क नसल्याने आमचे बोलणे झाले नव्हते हे समजल्यावर तो काही बोलला नाही. इतके दिवस माझ्या मनात जे होते तिथपासून घरी झालेल्या कार्यक्रमापर्यंत सगळे सविस्तर मी त्याला सांगून टाकले. मी मुळातच बोलकी असल्याने कुणाल हा फक्त हो, ठीक आहे, असं काय? एवढेच बोलायचा. आता फक्त एक आठवडा राहिला होता लग्नाला आणि त्या आठवड्यात मेहंदी, हळदीपासून पाठवणीपर्यंतचे सगळे कार्यक्रम होते. दोन्ही घरातील कुटुंबामधले हे पहिले लग्न असल्याने एवढी जय्यत तयारी असणे साहजिकच होते. श्रवण हा मितभाषी आहे हे जेव्हा कुणालला समजले तेव्हा तर तो हसूनच खाली पडला होता. एकदाचा काय तो रविवार उजाडला आणि घर सजवायला सुरुवात झाली होती.

        घराची सजावट करणे सुरू झाले होते. सगळे नातेवाईक अगदी एखाद्या चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे नटले होते. आईने ठरविल्याप्रमाणे मेहंदी, संगीत, हळद असे सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडणार होते. मी जशी सकाळी उठले तेव्हा आईने मला खोलीत येऊन आवरायला सांगितले. माझे आवरून झाले होते आणि मी कुणालला फोन केला. त्याचे आईवडील माझ्या लग्नाच्या दिवशीच येणार असल्याने सध्या तो त्याच्या घरात एकटाच होता. त्याला एकटेपणा वाटू नये म्हणून मी माझ्या घरी बोलावून घेणार होते.मी त्याला फोन केला. ” अरे कुणाल, आहेस कुठे? कधी येतो आहे रे? आज मेहंदीचा कार्यक्रम आहे माझा. लक्षात आहे ना?,” मी माझ्या नेहमीच्या शैलीत सलग बोलत सुटले. ” हो, सुमेधा. मला माहिती आहे गं. पण मी तिथे येऊन काय करू?,” कुणालने विचारले. प्रश्न तर योग्य होता. मेहंदीच्या कार्यक्रमात त्याचे काय काम? मी तर एकाच ठिकाणी बसून राहणार होते. तरीही मला तो तिथे पाहिजे होताच. शेवटी मग काय तो नाही आला. पण मी त्याला माझ्या हातावर काढलेली मेहंदी फोटो काढून पाठवली आणि त्यासोबत श्रवणलाही तो फोटो पाठवून दिला. कुणालने लगेचच गुलाबी रंगाची हार्ट असणारे इमेजेस पाठवून त्याची प्रतिक्रिया दिली पण श्रवणने मात्र काहीच उत्तर दिले नाही. मी फार काही विचार न करता, दुसऱ्या दिवशी असलेल्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले. दिवसभर बसून असल्याने मला काही झोप येत नव्हती. मी पलंगावर बसून माझ्या फोनमध्ये ऑफिस स्टाफने केलेली कामे व त्यांचे इ-मेल पाहत बसले. पप्पांनी माझ्या व त्यांच्या काही ओळखीच्या व्यावसायिक मित्रमंडळींनादेखील अगदी आग्रहाचे निमंत्रण दिले होते. एक गोष्ट मात्र खरी होती ती म्हणजे, आईने बजावले तम्हणून नव्हे तर माझे लग्न अगदी थाटामाटात ते करत असल्याने जेवढ्या छापल्या तेवढ्या सगळ्या पत्रिका अगदी सगळ्यांना वेळेआधीच मिळाल्या होत्या.

        दुसऱ्या दिवशी पण मी सकाळीच उठले होते. एकतर घरात एवढी सगळी मंडळी असताना त्यांच्या आवाजाने जास्त वेळ झोप येत नसे आणि मला ऑफिसला जाण्यासाठी सकाळी लवकर उठून तयार होण्याची सवय होती मग मी सगळ्यांच्या आधीच उठायचे. आज संगीत होते, थोडक्यात घरातील मंडळी आपापल्या पद्धतीने नाचगाणी करणार होती. आई उठून मला बोलवून घेईल त्याआधीच मी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये फोन करून प्रत्येकाला त्यांची कामे व मिटींग्स नीट करवून घेण्यासाठी सांगितले. असे दोन आठवडे मी फक्त शांत बसून काढू शकत नव्हते. काही वेळाने आई माझ्या खोलीत आली आणि मला नाश्ता खाण्यासाठी सांगून गेली. मी सहसा स्वयंपाक घरात जात नसल्याने ती व घरात कामासाठी येणाऱ्या काकू जेवणाची कामे करत. आता मात्र घरात माझे नातेवाईक असल्याने आईला थोडा आराम होता. जसा आम्ही सगळयांनी नाश्ता संपविला तिथे दुसरीकडे लहान मुले गाणी लावून नाचू लागली. मी आधीच सांगून टाकले होते की, कोणतीही लग्नाची किंवा पाठवणीची गाणी लावायची नाही. उगाचच आईला अश्रू गाळायला कारण मिळाले असते. लग्न ठरल्यापासून ते आजपर्यंत मला श्रवण सोडून इतरांनी फोन केला होता. अगदी कालच्या मेहंदीच्या फोटोदेखील त्याने पाहिला नव्हता. कदाचित लग्नाच्या तयारीत तो पण बिझी असेल असा विचार करून मी तिथे दुर्लक्ष केले. दिवसभर लहान मुले,माझी मित्रमंडळी आणि मोठी माणसे नाचत होती. दुपारी आणि सायंकाळी फक्त जेवण व चहाच्या वेळी ते सगळे कुठे बसले होते. पण त्यानंतर पण रात्रीच्या जेवणानंतर ते सगळे मला घेऊन नाचले. यामध्ये आम्ही खूप फोटो पण काढले. सगळ्यांत मजेशीर बाब म्हणजे मी आई-पप्पा यांनी नाच करत असतानाच फोटो व विडियो देखील काढला.  मी हसत असतानाच आईच्या डोळ्यात आसवे आली आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. पप्पांनी तिला समजावून शांत केले तोच कुणालचा फोन आला. घरातील आवाजामुळे मला काहीच ऐकू येत नव्हते. मी घरातून बाहेर पडले आणि समोर बघते तर कुणाल उभा होता. मरुन रंगाचे चेक्सचे शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स घातली होती त्याने. मी त्याला वाढदिवसाला दिलेले कपडे आज पहिल्यांदा त्याने घातले होते. एकदम हिरो दिसत होता तो. मी नार्मल गुलाबी रंगाचा व त्यावर निळ्या रंगाची नक्षीकाम असलेला गाऊन घातला होता. मला पाहतच त्याने लगेच फोन हातात घेऊन माझा फोटो घेतला. मी त्याला पाहून हसू लागले.” काय रे,किती उशीर? दिवसभरातून आता रात्री दहा वाजता तुला वेळ मिळाला?,” मी बोलले. “अगं शांत हो तू आधी. मला खरचं महत्त्वाची कामे होती. ती संपवून लगेच मी इथे आलोय,” कुणाल उत्तरला. त्याचे पण खरेच होते. तसा तो वर्कोहोलिक होताच. पण नेमका माझ्या लग्नाच्या वेळी तो माझ्या एकाही कार्यक्रमात नव्हता म्हणून मी चिडले होते. इतर सगळेजण असून पण मला कुणालचे माझ्या सोबत नसणे हा विचार पटला नव्हता. माझा राग शांत करण्यासाठी आम्ही सेल्फी काढायचे ठरविले. कुणाल ऑफिसमधूनच माझ्या घरी आल्याने मी आधी त्याला घरात नेऊन जेवायला दिले. कुणाल आला ते बघून आईनेच त्याला जेवण वाढले होते. बाकी सगळे जण तर नाचतच होते. मी आईला नखरेल स्वरातच बोलले,” जर हा माझ्या लग्नाला असाच उशिरा आला तर मी मुळीच याच्या लग्नात जाणार नाही.” कुणालला समजले की,मी मस्करी करत आहे. यावर मी आणि आई खळखळून हसलो. आईने बनविलेले श्रीखंड खाऊन कुणाल घरी जायला निघाला. ” घरी पोहोचला की फोन कर, असे आईने त्याला सांगितले व तो गेला. आता कुठे तरी मला छान वाटत होतं. पावणे अकरा वाजले असतील मी झोपायला खोलीत गेले. बाकी सगळे पण नाचून दमल्यामुळे झोपी गेले. उद्या हळदीचा कार्यक्रम होता पण तो सायंकाळी. एवढी काही लगबग नसल्याने सगळे कसे आरामात होते. नाश्ता, दुपारची जेवणं झाली आणि इथे मग हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. काही कारणास्तव श्रवणकडून हळद यायला वेळ होणार असल्याने आईने माझ्यासाठी आणलेली हळद आणली व मला लावली. त्यानंतर पप्पा आले. इतके दिवस सगळ्यांसोबत हसतमुखाने वावरणारे ते आज मला गंभीर जाणवले. त्यांच्या स्पर्शात कोमलता व माझ्यासाठीचे प्रेम होते. मला पाहून ते रडतील म्हणून मी त्यांना काल त्यांचा व आईचा नाचताना काढलेला विडियो दाखविला. थोड्या वेळासाठी तर ते हसलेच. त्यानंतर माझ्या इतर नातेवाईकांनी मला हळद लावून शुभाशीर्वाद दिले. आईने नंतर मला अंघोळीसाठी पाठविले. माझी अंघोळ झाली आणि मी कपडे बदलून आले तिथे बाहेरच कुणाल माझ्या पप्पासोबत बोलत होता. आजही तो उशिरा आला तरी मला भेटला होता. बाबांनी त्याला मघाशीच ज्या भांड्यात हळद होती ते आणून दिले व कुणालने पण मला हळद लावली. मी कुठे कमी होते, मी पण तशीच हळद त्यालाही लावली. या क्षणाची आठवण पप्पांनी फोटोत जपून ठेवली आणि आम्हा दोघांना तो दाखविला. थोडा वेळ माझ्याशी व पप्पा सोबत बोलून तो घरी गेला. उद्याचा दिवस फक्त आम्हाला आराम होता कारण परवा लग्न होते. परंतु तो दिवस जणू काही आला तसाच गेलाही. आता सगळे वाट पाहत होते ती लग्नाच्या दिवसाची.

        आजचा दिवस हा आईच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता.  सकाळी दहा वाजता गुरुजींनी ठरविल्याप्रमाणे माझा आणि श्रवणचा साखरपुडा होता आणि त्यानंतर बरोबर बारा वाजून नऊ मिनिटांनी लग्नाचा मुहूर्त होता. सगळेजण पहाटेच उठून तयारीला लागले होते. मला एकतर आधी साखपुड्यासाठी आईने निवडलेला शालू नेसायचा होता आणि नंतर लग्नासाठी भरीव नक्षीकाम केलेली मोरपिसी रंगाची पैठणी नेसायची होती. दोन्ही पारंपरिक पद्धतीचे कपडे असल्याने अगदीच जास्त मेकअप मी काही करणार नव्हते. अगदी थाटामाटात वरात काढायचा बेत होता म्हणून तर आईने आमच्या घराबाहेरच लग्नमंडप उभारला होता. ती आणि पप्पा सारे काही काटेकोरपणे पाहत होते. लग्न असते त्या घरी वधूच्या आईवडीलांनी उपवास करायचा असे होते पण मी मात्र याबद्दल साफ नकार दिला. माझ्या नकळत आईवडील तसे करतील अशी शंका माझ्या मनात होती म्हणून मी मुद्यामच त्या दोघांना घेऊन आज नाश्ता केला होता. घरातील नातेवाईक, लहानमोठी मुले सगळे छान नटले होते. परंतु या सगळ्यांत मीच उठून दिसणार असा माझा उत्साह बाळगून मी व माझी मैत्रीण खोलीत तयारी करू लागलो. आईला शालू नेसवता येतो हे माहिती होते मला पण ती नक्कीच रडेल म्हणून मी माझ्या मैत्रिणीची मदत घेतली.
पिवळ्या रंगाचा आणि हिरवा काठपदर असलेला तो शालू पण थोडा भरीव होता. मला आर्टिफिशियल दागिन्यांची एलर्जी होती म्हणून आईने मला माझ्या आजीने बनवून ठेवलेला हार दिला. त्या शालूवर तो हार उठून दिसत होता. शालू खूप जड होता म्हणून मी तो एकच हार गळ्यात घातला.केसांचा एक मोठा अंबाडा व त्यात मोगरा आणि अबोलीचा गजरा माळला. कानातले, बांगड्या, बाजूबंद सगळे काही घातला तोच माझ्या खोलीच्या दारावर थाप मारली. माझी तयारी झालीच होती. माझ्या मैत्रीणीने दार उघडले तर समोर आई आणि काकी उभ्या होत्या. काकी आत आली पण आई मात्र मला बघतच उभी होती. जणूकाही तिने आज प्रथमच मला पाहिले होते. तिच्या डोळ्यातील आसवांनी तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. मी मात्र तसे जाणवू न देता तिच्यासमोर गेले. थोडी अडखळतच मी चालत होते कारण होते ते शालू व त्याच्या त्या नीट घातलेल्या निऱ्या. आईने मला बघितलं आणि मिठी मारून रडायला लागली. माझाही ताबा सुटला असता परंतु मी तिला मस्करीत बोलले,” सांग तू? तुझ्या लग्नात तू तरी नेसला होता का एवढा नक्षीदार शालू ?” आई मात्र काहीच बोलली नाही.घडीमध्ये साडेआठ वाजले होते. अजून बराच वेळ होता साखरपुडा व्हायला. पण काहीजण फोटो काढायला हट्ट करून बसले होते. मी कशीबशी सावरत पप्पाकडे गेले. जेव्हा मी खोलीतून बाहेर आले होते तेव्हाच घराबाहेरील मंडप पाहिला. एवढा सुरेख, उठावदार आणि मनोवेधक बांधला होता की मला प्रशंसा करताच येईना. पप्पा तर मस्त सदरा आणि धोतर नेसून मी येण्याची वाट बघत होते. माझ्या आईने नऊवारी साडी नेसूनसुद्धा पप्पा मात्र माझ्या मोहक रूपाचेच कौतुक करत होते तिच्यासमोर.
नऊ वाजले असता पप्पांनी श्रवणच्या घरी फोन लावला जेणेकरुन ते सगळे निघाले का हे विचारण्यासाठी. हळूहळू सगळी मंडळी जमा झाली होती. पप्पा फोन करत होते परंतु कोणीही फोन उचलत नव्हते. मी तिथेच उभी होते. बाहेरून नातेवाईक, मित्रमैत्रिणी मला फोटो काढण्यासाठी आग्रह करत होते. आईने मला जायला सांगितले आणि मी बाहेर आले. मी जरी बाहेर होते तरी माझे सगळे लक्ष पप्पाकडेच होते. साडेनऊच्या सुमारास मी पुन्हा आईजवळ गेले. ते दोघेही फोन करून काही समजते का? काही अडचण तर नाही ना? याची शाश्वती मिळवण्याचा प्रयत्न करत होते पण काहीच समजत नव्हते. मला राहावले नाही आणि मी तातडीने माझ्या खोलीत गेले. जिथे मला चालायला जमत नव्हते तिथे त्या क्षणी मी झपाझप चालत गेले. खोलीत जाऊन मी फोन घेतला आणि श्रवणला फोन केला तिथेही तसेच. मी काय करू तेच सुचत नव्हतं आणि माझ्या वॉट्स अपवर मला सलग तीन मैसेज मिळाले. कदाचित कोणीतरी शुभेच्छा देण्यासाठी मैसेज करत असेल असा विचार आला मला. मी माझ्या फोनच्या स्क्रीनवर पाहिले तर, ते मैसैज श्रवणचे होते. मला आनंद झाला आणि मी ते मैसैजेस पाहिले तर मला धक्काच बसला. मी जे बघत होते त्यावर कशी प्रतिक्रिया देऊ हेच कळेनासे झाले. मी सगळे मैसैजेस नीट वाचले आणि घरात आईपप्पांना ते दाखवायला घेऊन गेले. खोलीत ते दोघेही नव्हते म्हणून मी सगळे घर शोधून काढले. शेवटी ते मंडपात गेले असतील म्हणून मी फोन पाहिला तर पावणेदहा वाजायला आले होते. मी फोन घेऊन निघत असतानाच मला कोणीतरी आवाज दिला. तो कुणालच होता. रॉयल ब्लू रंगाची शेरवानी, चुडीदार आणि मोजडी असा एकदम तयार होऊन आला होता तो. माझ्या चेहऱ्यावरचे भाव त्याने अचूक ओळखले होते.
मी त्याला माझा फोन दाखविला. माझ्याप्रमाणे तोदेखील अवाक् झाला होता. कुणाल काही बोलणार तिथेच माझी मामी मला मंडपात न्यायला आली. ” मी आलेच,असे बोलून तिला बाहेर पाठविले. घरात आता काम करणारी माणसे आणि लहान मुले सोडली तर जाणती अशी कोणतीही व्यक्ती नव्हती. कुणालने मला धीर दिला आणि जवळच्या झोपाळ्यावर मला बसायला सांगितले. न जाणो कितीतरी वेळ निघून गेला आणि शेवटी मी मंडपात गेले. दहा वाजण्याच्या सुमारास नवरदेव आला. त्याला पाहून आई आणि पप्पांचा जीव भांड्यात पडला. तो फेटा बांधून आला होता आणि फेट्याला समोरून मण्यांनी सजविले होते. ते पाहून सगळे जण मला चिडवू लागले की,” सुमेधाच्या नवऱ्याचा थाटच निराळा”.आम्ही सगळे हसायला लागलो.  “अरे श्रवण, तू एकटाच आलास? आईबाबा कुठे आहे रे?” असे आईने विचारले. “अहो,वहिनी ते येत असतीलच. पण तुमच्या जावयाला घाई असेल सुमेधाला पाहण्याची म्हणून तो आधी आला असेल,” काकींच्या या उद्गाराने पुन्हा हशा पिकला.” चला, मस्करी पुरे झाली. दहा वाजले आहेत लवकर साखरपुड्याचा विधी करून घ्या”,माझे काका बोलले. आईने माझ्या पप्पांकडे असलेली अंगठी मला दिली आणि तिथून नवऱ्याने त्याच्या खिशातून एक छोटासा बॉक्स बंद काढला आणि त्यातील अंगठी काढली. आईने थोडे थांबायचा आग्रह केला पण मुहूर्त निघून जातो हे सांगून पप्पांनी नवऱ्याला माझ्या बोटात अंगठी घालण्यास सांगितले. त्यानंतर मी पण माझ्याजवळ दिलेली अंगठी त्याच्या बोटात घातली व आमच्यावर पुष्पवृष्टी झाली. आमचा साखरपुडा झाला होता. आईच्या चेहऱ्यावर हसू आले होते. दोन तासांनी लग्न होते आमचे म्हणून आम्ही दोघांनी आता लग्नासाठी तयार व्हायला जाणार होतो. साखरपुडा सोहळा पार पडला असल्याने पाहुण्यांना पेढे आणि अल्पोपहार देऊ करणार होते. आईने आम्हा दोघांना कपडे बदलून येण्यास सांगितले तितक्याच मी तिला माझ्या सोबत घरी यायला सांगितले. एव्हाना आम्ही फोटो काढून मंडपाच्या बाहेर पडलो होतो. मी आईला असे का बोलत आहे ते तिला समजत नव्हते. आम्ही दोघे आणि आईपप्पा असे चौघेही एकत्र घराकडे निघालो. संपूर्ण मंडप हा आमंत्रित पाहुणे व नातेवाईक यांच्या हजेरीने भरून गेला होता. आम्ही तिथून केव्हा निघालो ते कोणीही पाहिले नव्हते. आमच्या घरात सुद्धा आता कोणीच नसल्याने मी निश्चिंत होते. मी घराचे दार उघडून त्या तिघांना आत जायला सांगितले. सगळे त्या सोहळ्यात फोटो काढणे, एकमेकांना भेटणे या गोष्टींत व्यस्त होते. मी घराचे दार पटकन बंद केले.
आई आणि पप्पा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. मी त्यांना बसायला सांगितले. ” अगं, सुमेधा ही काय घरात बसायची वेळ आहे का?तुझे लग्न आहे आज. तू जा आणि आवरून घे चल,” आई म्हणाली. मी तिला काहीच उत्तम दिले नाही आणि स्वयंपाक घरात जाऊन आई व पप्पाला पाणी आणून दिले. “सुमेधा, आम्ही सगळे करतो तू जा आधी आवर”, पप्पा बोलले. मी नवरदेवाला माझ्या बाजूला येण्यास सांगितले. आई मला फक्त बघतच होती आणि मी जेव्हा नवरदेवाचा चेहरा त्या दोघांना दाखविला आई अक्षरशः किंचाळलीच. त्याचे कारणही तसेच होते. नवरदेवाच्या जागी श्रवण नसून कुणाल होता. आई बोलणार तितक्यात पप्पांनी मला “हे सगळे काय आहे असे विचारले. “सुमेधा, तुझे लग्न श्रवण सोबत ठरले असताना कुणाल इथे श्रवणच्या जागी? हा काय प्रकार आहे?,”पप्पांनी मला विचारले. पप्पा, मी सविस्तर सांगते तुम्हाला असे बोलून तिथे टी पॉयवर माझा ठेवलेला फोन मी घेतला आणि श्रवणने आज पाठविलेले मैसैजेस दाखविले. ते पाहून पप्पांनी तो फोन आईला देऊ केला. तिने फोन पाहताच माझ्याकडे वळून पाहिले. “सकाळी जेव्हा तुम्ही दोघेही फोन करत असताना मी मग खोलीत गेले आणि श्रवणशी बोलायचा प्रयत्न केला. पण तो सुद्धा फोन उचलत नव्हता. काही वेळाने मला हे मैसैजेस आले. श्रवणने फक्त नाईलाजाने माझ्याशी लग्न करायला होकार दिला होता. पण त्याचे दुसऱ्या मुलीवर प्रेम होते. हळदीच्या दिवशीच तो घरातून काही न सांगता निघून गेला होता. आज मी फोन करत आहे हे जेव्हा त्याला समजले तेव्हा त्याने त्या मुलीसोबत लग्न केल्याचे फोटो आणि या सगळ्या गोष्टी मला मैसेज करून सांगितल्या. मी तर मैसेज वाचून हे सगळे तुम्हाला सांगायला येत होते पण तुम्ही घरात नव्हता आणि त्यावेळी कुणाल तिथे आला. माझा फोन बघून त्याला सारे काही समजले परंतु बाहेर आलेले नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी,उद्योगपती आणि व्यावसायिक यांना जर हा प्रकार समजला तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. कदाचित तुम्हा दोघांना काही त्रास झाला तर या गोष्टींची कुणालने मला कल्पना दिली,” मी म्हणाले. “काका, मी फक्त सुमेधा आणि तुम्हा सगळ्यांचा विचार करून हे पाऊल उचलले. सुमेधाच्या संमतीने हा साखरपुडा झाला आहे. खरं तर माझ्या मनात तिच्यासाठी एक वेगळीच जागा होती पण ते नक्की काय हेच समजत नव्हते. आज मला जाणवलं की, ते एक अबोल आणि शुद्ध प्रेम होते. थोडा वेळ झाला समजायला पण योग्य वेळी ते समजले. आता जर तुम्हाला हे मान्य नसेल तर असे कुणाल बोलणार तोच पप्पांनी प्रश्न केला,”  कुणाल, तुझ्या आईवडीलांना हे सगळे माहिती आहे?” ही शंका तर खूप मोठी होती. कुणाल माझ्याकडे बघायला लागला. ” पप्पा, त्याच काय आहे ना की, ” कुणालचे आईवडील इतक्यात येतीलच फक्त तुम्ही त्यांना जर हे सविस्तर सांगितले तर…मी बोलून गप्प बसले. पुढचा प्रकार हा एकंदरीत त्यांना समजला होताच. त्यांनी संमती दिली आणि आम्हाला तयार व्हायला सांगितले. आम्ही दोघे जात असताना आई उठली आणि मला थांबविले. ” हे काय करतेस तू? श्रवण असा निघाला म्हणून कुणालसोबत लग्न करते. सगळेजण काय बोलतील? की ठरवलं एकाशी आणि लग्न दुसऱ्याशी?”,आईने माझ्या आणि कुणालकडे पाहून हे विधान केले होते. तिचे मत बरोबर होते पण जर पाहायला गेले तर बघण्याचा कार्यक्रम ते लग्न ठरवणे या गोष्टींत फक्त मी आणि आईपप्पा यांचा सहभाग होता. इतर कोणालाही श्रवण काय करतो?दिसतो कसा? उंची, रंग यातील काही एक माहिती नव्हते. मी या साऱ्या गोष्टींची तिला उजळणी करून दिली. “हे बघ आई, लग्न ठरविण्यापासून ते तयारी याची जबाबदारी आईवडील म्हणून तुम्ही स्विकारली आणि पार देखील पाडली. श्रवणच्या एका चुकीची शिक्षा मी आपल्या कुटुंबाला भोगायला देऊ शकत नाही. आज तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती मला आणि आपल्या घराला शुभाशीर्वाद देण्यास आली आहे. पप्पा आणि माझ्या ओळखीचे काहीजण सुद्धा तिथेच आहेत. आज जर माझे लग्न झाले नाही तर माझी, तुमची परिणामतः साऱ्यांची बदनामी होईल. पप्पांनी व्यावसायिक जीवनात कमावलेले नाव माझ्यामुळे पायदळी तुडवले जाईल जे मला मान्य नाही. राहिला प्रश्न आम्हा दोघांचा तर कुणालने त्याच्या प्रेमाची कबुली तुमच्या समोर दिली आहे आणि फक्त माझेच बोलणं ऐकून घेणारा नवरा जर मला मिळत असेल तर माझी काही हरकत नाही,” असे बोलताना मला हसूच फुटले. आईची खात्री पटली होती की,” हे लग्न मला मान्य आहे आणि मी कुणालसोबत खूप खुश राहिन.” परिणामी तिने कुणालसाठी त्याच्या पसंतीचे लग्नात घालायला ब्रँडेड कपडे मागविले. पप्पा तोपर्यंत कुणालच्या आईवडिलांना पाहायला बाहेर गेले.  मला मदत करायला आई आली होती. ती पैठणी एवढी सुंदर होती की मला पाहताक्षणी ती आवडलीच. अकरा वाजता बरोबर पप्पा कुणालच्या आईवडीलांना घेऊन घरात आले. ते आले तशीच आई खाली उतरून त्यांना भेटायला गेली. मी त्याच्या आईवडीलांना परिचित होतेच त्यामुळे मला काही नवखे नव्हते ते. मनात थोडी धाकधूक होतीच आणि कुणाल तर तिथे खोलीत बसूनच होता. शेवटी पप्पा मला बोलवायला आले आणि मी खाली गेले. अजूनही कुणाल मात्र आला नव्हताच. कुणालची आई मला पाहताच बोलली,” माझ्या मुलाला शोभेल अशी आहे हो सुमेधा.” मी पहिल्यांदाच लाजून मान खाली घातली. कुणालच्या पालकांची या लग्नाला संमती होती हे माझ्या लक्षात आले होते. कुणालची आई तिथून उठली आणि माझ्याजवळ आली. त्यांनी माझा हात पकडला आणि ज्या खोलीत तो तयार होऊन बसला तिथे मला नेऊन बाहेरूनच त्या बोलल्या,” बरं विहीण बाई, आम्ही आमच्या सुनबाईला घेऊन निघतो आता. कुणालला राहू दे तुमच्याच घरी.” त्या मला घेऊन वळाल्या तोच कुणालने दार उघडून माझा दुसरा हात पकडला. ते पाहून आम्हा दोघांचेही आईवडील कुणालला पाहू लागले. “अगं, मम्मी तू माझी आई आहेस ना? मग सुमेधाला असे कसे घेऊन जाते? आमचे लग्न कुठे झालेय अजून?,” कुणाल बोलला. ” नवरदेव तू बाहेर यावे यासाठी आमची ही योजना होती. चला आता लग्नाला. अर्धा तास शिल्लक राहिला आहे आता लग्नासाठी. मी आनंदी होते की सारेकाही सुरळीत झाले होते. आम्ही एकत्रितपणे मंडपात गेलो. कुणालच्या आईने माझा व कुणालचा हात पकडला आणि आम्हाला होमाजवळ बसायला दिले. त्याच्या आईच्या अशा वागणुकीने माझी आई भारावून गेली होती. गुरुजींनी ठरलेल्या मुहूर्तानुसार सगळे विधी करायला सुरुवात केली. कन्यादान करताना आईपेक्षा पप्पांचा हात थरथरत होता. कुणालने नजरेने त्यांना आश्वासन देऊन सांभाळून घेतलं. सप्तपदी करत असताना कुणालचे आणि माझे पडणारे प्रत्येक पाऊल हे आमच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या सुरूवातीची चाहुलच देत होते.
लग्न होऊन आता पाठवणीची वेळ आली होती. मी सोडून घरातील सगळे हमसून रडत होते. माझ्या आईला रडताना पाहून कुणाल बोलला,” आई, तुम्ही तर आनंदाने नाचले पाहिजे. सुमेधा पप्पांसोबत मिळून घरात तुम्हाला त्रास द्यायची. पण आता बघा, मी तिला घेऊन जातोय. आता तरी हसा.” कुणालने मिश्कीलपणे माझ्या आईला धीर दिला होता. आई आणि पप्पांचा निरोप घेऊन मी,कुणाल व त्याचे आईवडील कारमध्ये बसून घरी गेलो. तिथून बाकीचे कार्यक्रम आणि पूजा त्याच्या घरीच झाली. एका महिन्यानंतर मी आणि कुणाल माझ्या घरी गेलो. मी माझ्या पसंतीनुसार गडद निळ्या रंगाचे ऑफ शोल्डर टॉप आणि त्याला शोभेल असा मोठा घेर असलेला स्कर्ट घातला होता. पप्पा तर मला बघून खूशच झाले तिथे माझे कपडे बघून आई थोडी चिडली. ” अगं हे काय घातले? आणि गळ्यात मंगळसूत्र नाही? हातात पण एकच हिरवी बांगडी? असे कितीतरी प्रश्न तिने विचारले. “बापरे! मला बसू देशील का तू? मी आईला म्हणाले. मी बसून तिला बोलले,” माझी मम्मा खूप मस्त आहे. माझ्यावर कसलेही बंधन नाही. अगदी आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मला ती बोलली की,” नात्याने जरी सासू असले तरीही मला तुझी आईच समज तू. लग्नाआधी जशी राहायची तशीच राहा तू. तू आणि कुणाल दोघेही ठरवा की तू नक्की मला काय म्हणून हाक मारणार ते. सासूबाई सोडून काहीही बोल.” मग काय कुणाल त्यांना आई बोलतो म्हणून मी त्यांना मम्मा बोलते. माझे मंगळसूत्र थोडे मोठे आहे म्हणून मम्माने नवीन बनवायला दिले त्यामुळे आज मी फक्त भांगेत कुंकू भरले. राहिला प्रश्न बांगड्यांचा तर मम्माच बोलली,” आईकडे जातेस ना मग अशा कपड्यांवर एवढ्या बांगड्या नको. एक पुरेशी आहे.” माझे असे बोलणे ऐकून आईला फक्त घेरी येणे राहिले होते. नंतर आम्ही थोडा नाश्ता केला व कुणाल आम्हा तिघांना वर गच्चीवर घेऊन गेला. तिथे दहा मिनिटाच्या अंतरावर एक प्रशस्त बंगला होता जो रिकामा होता. माझ्या आईवडीलांना त्याने तो बंगला दाखविला आणि म्हणाला,” तो जो बंगला दिसतो आहे तिथे आम्ही राहायला येणार आहोत एका आठवडयानंतर. मी सुमेधाच्या नावावर तो बंगला विकत घेतला आहे. माझ्या आईवडीलांनी तिला दिलेली भेट आहे तो बंगला म्हणजेच तिच्या हक्काचे घर. आईपप्पांसारखे मी पण कुणालला शांतपणे बघत राहिले.. कारण ही गोष्ट मला पण आताच समजली होती.”आई,अहो अशा काय बघताय? मी माझ्यासाठी तो बंगला घेतलाय. जशी ही सुमेधा माझ्या आईकडून लाड करून घेते तसेच मला पण तुमच्या कडून माझे लाड करून घ्यायचे. चालेल ना तुम्हाला?”कुणालने विचारले. आईने हसूनच होकार दिला आणि एका आठवडयानंतर आम्ही सहपरिवार नवीन घरात पूजा करून प्रवेश केला.

……………………………….समाप्त…………………………….
 

0

विध्वंस

शोध