मन

“मन”… माणसाचं माणूसपण जपणारं मनं,भावनांनी ओथंबून वाहणारं मनं,भावनेच्या आहारी जाऊन वेडेपणा करायला लावणारं मनं,आणि एखाद्या निवांतक्षणी त्या वेडेपणावर हसणारही मनचं.
का हे मन असे करतं….? का या मनाला एवढे कंगोरे असतात….?,मन एवढं गोड का असतं….? खरंच प्रश्न विचारणारही मन आणि त्याचं उत्तर शोधणारही मनचं.
आज हे मन एकाला शोधतयं अगदी स्वतःला हरवून तो चेहरा खूप जुनी ओळख सांगतोय,ते डोळे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध जपणारे,ते ओठांवरील हास्य तू माझाच आहेस हे पटवून देणारं…
का आज असं मन भरकटतेय….?कुठं चाललयं आज मन….? काय आहे आज मनाच्या मनात….? खरचं ह्या तुफानात स्वतःची ओळख हरवणारही मन,आणि स्वतःची ओळख जपण्यासाठी धडपडणारही मनचं…!
आज एक स्वप्न पाहिलं त्या स्वप्नातही फक्त तूच माझ्याजवळ असल्यासारखी वाटलीस.पण स्वप्नच ते ….कधी तरी भंगणारच….तरीही अवतीभवती कुठेतरी तू आहेस हे सांगणारही मनचं ,का हे मन अशी स्वप्न दाखवत….? का ह्या स्वप्नांच्या मागे मागे पळतं….? आणि का हे मन त्या स्वप्नांचे तुकडे तुकडे करतं….? खरंच मन तोडणारही मन आणि मनाचे तुकडे झाल्यावर मनाची समजूत घालणारही मनचं..!
खूप काही सांगायचं आहे तुला पण हे बोल ओठांवर येतच नाहीत.छळत राहतात मनातल्या मनात…उगाचच…या वेड्या मनाला…!मला माहित आहे माझीच आहेस तू.पण का कोणास ठाऊक दोघांमध्ये एक अंतर आहे कधीही पार न करता येण्यासारखं.का भास निर्माण होतात हे…? का ह्या मृगजळामागे धावतं हे मन….? तु माझी आहेस हा भास निर्माण करणारही मन आणि त्या भासातून भानावर आणणारं देखील मनचं…..!
शब्दसारथी
निलेश बाबर