दिल-विल, प्यार-व्यार मैं क्या जानूँ रे?
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे? उमलती कश्या धुंद भावना, अल्लड वाटे कसे?
‘प्रेम’ ही अशी भावना आहे की कोणत्या क्षणी मन हरवून जाईल हे सांगता येत नाही. आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर प्रेमाची धुंद भावना मनाला भुरळ घालतच असते. पण आजकालचे प्रेम ‘दिल-विल, प्यार-व्यार मैं क्या जानूँ रे’? अश्या स्वरूपात पहावयास मिळते कारण इश्क, मोहब्बतची शायरी करत करत, एकतर्फी प्रेमाच्या नशेत देवदास बनणारी जनरेशन “तूम मेरी नहीं तो और किसीं की भी नहीं” म्हणत ‘लव-लोचा’ पर्यंत कधी पोहचली हे लक्षात ही आले नाही.
एक काळ असा होता की नुसत्या नजरेनं फुलणाऱ्या गुलाबी प्रेमातही मजा वाटत होती. नुसत्या नजरेच्या इशाऱ्याने तिला चोरून खुणवणे, त्याच्याशी नजरानजर होताच तिचं ते चोरून लाजणं किंवा मनातल्या मनातच तिच्यावर प्रेम करणे, हे सारचं प्रत्येकाला सुखावणार वाटायचं. पण काळ बदलला आणि प्रेम व्यक्त करण्याची भाषा ही बदलली. गुलाबी प्रेमाच्या नजरेची भाषा आता मोबाईलमधल्या स्माईलज् व ईमोजीने तर घेतलीच आहे शिवाय नकळत फुलणाऱ्या प्रेमाचे अनेक नवीन प्रकार ही सध्या पाहायला मिळतायत जसे- जस्ट फ्रेंडस्, हेल्दी फ्लर्टिंग, ऑनलाईन डेटिंग, कमिटेड रिलेशनशिप, लाँगडिस्टन्स रिलेशनशिप, फ्रेंडस् विथ बेनिफिट्स, हूकअपस्, वन नाईट स्टँड, लिव-इन रिलेशनशिप अशी भली मोठी न संपणारी लिस्ट ऐकूनच चकित व्हायला होते.
सतत व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिंडर सारख्या डेंटिग एपच्या माध्यमातून स्माईलीज् , ईमोजी, मीम्स् पाठवत, आजकालच्या प्रेमाच्या भावना कृत्रिम तर झाल्या नाहीत ना? पण ह्या सगळ्या प्रकारातून खरं प्रेम अनुभवायला मिळते का? प्रेम म्हणजे फक्त दिवस-रात्र संपर्कात राहणं, सतत मेसेजेस्, फोन कॉल्स, व्हिडीओ कॉल्स. सतत सरप्राईज-गिफ्ट देणं, कुठेतरी फिरायला जाण हे म्हणजे प्रेम आणि समजा असं काही झालं नाही तर एका क्षणात ब्रेकअप.
प्रेम म्हणजे विश्वास, त्याग, सहनशीलता, संयम! प्रेम म्हणजे आनंद देणं, जोडीदाराला सुखात ठेवणं, त्याची काळजी घेणं, प्रसंगी त्याला मानसिक आधार देणं, ह्याची जाणीव ह्या न्यू जनरेशनला करून दिली जाते का? शिक्षण, करियर, पैसा एवढीच स्वप्नं लहानपणापासून दाखवण म्हणजेच पालकत्व समजल जात का? मग आजकालच्या पिढीला आदर, माया, प्रेम उरलच नाही म्हणत, त्यांना दोष देत, त्यांच्यावर खापर फोडण्यातच तर आपण धन्यता मानत नाही ना? इंटरनेटच्या मायापाशात नव्या पिढीचं आयुष्य गुरफटत चाललं आहे मग बाकीची नाती, मैत्री, प्रेम ह्या भावना जपायला त्यांना वेळ तरी आहे का? सतत आभासी दुनियेत राहायची सवय लागल्यावर नवरा-बायकोच्या नात्यातले प्रेमाचे रंग तरी किती दिवस टिकतात?
पण म्हणून काही प्रेम संपत नाही. मनात साचलेल प्रेम कधी फ्लर्टिंग, फ्रेंडशिप, तर कधी रिलेशनशिपच्या माध्यमातून उफाळून येतेच. कारण किती ही व्यस्त आयुष्य असले तरी प्रेम फुलायला वेळ काढायला हवा. नकळत हळूवार फुलत जाणार प्रेम आज सोशल मीडियाच्या वलयात, सेल्फी काढत-काढत सेल्फीश कधी झाल हे समजलच नाही. कारण सध्या वाढलेले घटस्फोटाचे प्रमाण, लिव्ह-इनची वाढती क्रेज, तसेच सिंगल राहणाऱ्यांच वाढलेले प्रमाण हे सगळे कशाचे परिणाम आहेत? आजकाल लग्नाचा निर्णय लांबवताना सतत दिली जाणारी करियरची कारणं हे कश्याच घोतक आहे? सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेली आत्ताची जनरेशन ऑनलाईन प्रेमाच्या रंगीन दुनियेत हरवलेली असते ह्या बद्दल फ़क्त ताशेरे ओढत मुलांना दोष देऊन समस्या सुटणार आहे का?
खरं तर टाईमपास करत करत इंटरनेटच्या जाळ्यात फसलेल त्यांचं प्रेम किती सुख देत, हा प्रश्नच आहे. ह्या जनरेशनला सहवासात फुलत गेलेलं खरं प्रेम कधी अनुभवायला मिळेल का, याचीच खंत वाटते. मग व्हॅलेंटाईन-डे च्या निमित्ताने ऑनलाईन प्रेमाच्या मृगजळात गुरफटलेल्या न्यू जनरेशनला आपला अमूल्य वेळ देऊन संयम व सहवासाने फुलणाऱ्या प्रेमाचं गुपीत सांगूयात.
सायली दिवाकर,