दिल बेचारा

दिल बेचारा..
तुम ना किसी के हुए तो क्या.
मै तुम्हारा मैं तुम्हारा वो चंदा ..
दिल बेचारातलं हे अप्रतिम गाणं. जीवनाचे सत्य अधोरेखित करणारे. वेदनेचा अविष्कार सुंदर जगुन आनंदात परावर्तित करायचा असतो. काही गोष्टी आपल्या होऊ शकत नाही पण आपण तर त्यांचे होऊ शकतो ना. आवाक्या बाहेरच्या गोष्टीवर प्रेम बसतं तेव्हा आपल्याला प्रेम करायला कुणी रोखू शकत नाही. सौंदर्य हे प्रेमासाठी असतं, आस्वादासाठी असतं. सौंदर्याचे हजारो उपासक असतात. देवाचेही हजारो उपासक असतात. देवाने आपल्या कडे लक्ष नाही दिलं, देव मंदिरातून अदृश्य झाला, देऊळे बंद झाली तरी आपलं देवाविषयी प्रेम असतंच आणि त्याला कोणी रोखू शकत नाही. प्रेम करणारा माणूस मिळाले की आयुष्याला कलाटणी मिळते, जगावसं वाटू लागतं.
आपण प्रत्येक जण रियालिटी शोच्या ऑडिशनसाठी आलेले असतो. कधी एलिमिनेशन होईल सांगता येत नाही पण वाइल्ड कार्ड ने पुन्हा एन्ट्री कधी कधी मिळते, तसच आयुष्यात काही माणसे भेटल्यानंतर पुन्हा काही काळ आपण आपल्याला सिद्ध करू शकतो, ही उमेद जगण्याला कारणीभूत ठरते.जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो पण कसं जगायचं हे आपल्या हातात असतं असं म्हणणारा नायकच जेव्हा जगाला रामराम करतो तेव्हा त्याचं ते म्हणणं अभिनय होता का? तो अभिनय जगत होता का जिवन जगत होता हा प्रश्न पडतो.. खोटे आणि छोटे-छोटे अभिनय करतच माणसे जगतात. माणसे दिसतात तशी नसतात. तत्त्वज्ञान सांगण वेगळं आणि जगणं वेगळं. माणसे केवळ औषधावर जगत नाहीत. प्रेमावर व प्रेरणेवर जगतअसतात.
नायक नाईका दोघांनाही कॅन्सर असतो. मृत्यू पर्यंत दोघेही एकमेकाला फुलवतात आनंद देतात.
प्रत्येकालाच मृत्यूच्या भोज्ज्याला शिवूून येता येतं नाही. वेदना जगलेला माणूस मृत्यू जगलेलाच असतो.प्रत्येक वेदनेतून फिनिक्स पक्षी उभारी घेत नाही.
मृत्यू अटळ आहे हे समजल्यावर राहिलेला संकल्प पूर्ण करणे, आनंद जगुन घेणे एवढेच आपल्या हातात असतं. आपली शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्धवट गाण्याच्या पुढच्या ओळी काय असतील हे जाणून घेण्यासाठी नायिकेच्या इच्छेनुसार नायक नायिकेला घेऊन पॅरिसला, ज्या कवी ने हे गाणं लिहिले आहे त्याच्याकडे जातो. प्रत्येकाची आशा वेगळी. निराशा वेगळी. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारे त्यावेळी त्या क्षणापुरते सुखीच असतात.दुःखाला आनंदात बुचकळायला हवं.
काही माणसें असली काय आणि नसली काय त्यांच जाणं आणि अभिनय चटकाच लावतं.वेदना जेव्हा प्रेमाला हात घालते तेव्हा ती सुगंधी जखम करून जाते.
अभिनयात सुशांत व संजना उणीव शब्दाची आठवण करून देत नाहीत.
आपणही आपल्या आयुष्याच्या पुढचं काय वाढून ठेवलंय हे पाहण्यासाठी कळत नकळत प्रस्थानच करतो.
डॉ.अनिल कुलकर्णी.

मन

वडील..