“मोनालीसा स्माईल” नावाचा एक चित्रपट आला होता. “ज्युलिया रॉबर्ट्स” होती त्यात. तिच्या हसण्यावरही चित्रपट येतो यावर आश्चर्ययुक्त कुतूहल वाटण्यामागे तिचे “हास्य” आहे…! ज्युलिया रॉबर्ट्सच्या हास्याला निखळ किनार आहे. म्हटलं तर ती नव्वदच्या दशकाची अनभिषिक्त सम्राज्ञी होती, तिच्या हास्याला कसली दशकाची बंधनं? या सगळ्या सीमा पार केलेली गोष्ट आहे ती. त्यासाठी इंग्लिशमध्ये एक समर्पक शब्द आहे “Timeless Beauty”… तिचे हास्य तसेच आहे “कालातीत”!
१९८७ पासून हॉलिवूडमध्ये खटपटी करत करत एकदोन चित्रपट नावावर होते. फारसे लक्षात न येण्यासारखे. पुढच्या वर्षी एक चित्रपट आला. तिथून ती अमेरिकेतील घराघरात पोचली.. मग तिथून ती जगभरातील घरात पोचली. रिच गिअर, त्यामध्ये शांतपणे अंडरप्ले करत राहिला. त्याने ज्युलियाला तिचे काम करू दिले.. रिझल्ट? प्रेटी वूमन! तिच्या दिसण्यावर पण चित्रपट येतो…! कमाल आहे.
इकडे बॉलिवूडमध्ये “अग्निसाक्षी” आला होता. तो हिच्या “स्लीपिंग विथ द एनेमी” ची (चोरलेली) आवृत्ती होता… अग्निसाक्षी मध्ये मनीषा कोईराला “इकरार करना मुश्किल है” वर थिरकत होती.. ज्युलियाने हे काही केलं नाही. समीक्षकांनी धरून चोपला या चित्रपटाला. हिच्या चित्रपटांची नक्कल होते, जगातील विख्यात चित्रपट इंडस्ट्रीत…! कमाल आहे.
डेंझेल वॉशिंग्टन नामक एक, Mammoth… अर्थात बलाढ्य अभिनय संस्थान आहे तिकडे पश्चिमेकडे. त्याला सामोरे गेली ही बाय.. “द पेलीकन ब्रिफ” मध्ये! रोमान्सचा उबदार जॉनर सोडून थ्रिल मध्ये घुसणे आणि तेही थेट डेंझेल समोर… सोपे नोहे! अर्थातच चित्रपट सुपरहिट झाला. त्याचे अर्धे क्रेडिट हिला जाते बरं का! एखाद्या हिरो इतकाच हिला मान आहे…! कमाल आहे.
१९९७ साली ती घरच्या मैदानावर होती, “माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग” मध्ये. याची (पुन्हा एकदा चोरून) आवृत्ती निघाली बॉलिवूडमध्ये, “मेरे यार की शादी है”! असो. १९९९ मधल्या “नॉटिंग हिल” मध्ये तिला “स्वतःला” च साकारायचे होते. समोर ह्यू ग्रँट होता. देखणेपणात, या जॉनर मध्ये काम करताना असलेली सफाई. घरच्या मैदानावर खेळून खेळून एक प्रकारचा सराईतपणा येतो, तसा काहीसा असलेला… सामना तुल्यबळ होता, रंगतदार झाला तो सामना.
स्टीव्हन सोडरबर्ग या मनुष्याने आठ हिरो, चटपटीत कथा आणि एक ज्युलिया रॉबर्ट्स अशी कल्पना केली. “ओशन्स एट” मध्ये जॉर्ज क्लुनी, मॅट डेमन, ब्रॅड पिट आणि ज्युलिया रॉबर्ट्स होते अशी इतिहास नोंद ठेवेल. या सगळ्या चटपटीत भेळेत ज्युलिया, एखाद्याच असणाऱ्या बेदाण्यासारखी होती. ही मल्टीस्टार चित्रपटात एकटीच पुरेशी असते…! कमाल आहे.
निम करोली बाबा यांच्या तसविरी मुळे ज्युलियाला एक दिवस हिंदू धर्म गवसला आणि तिच्यात आमूलाग्र बदल झाला. भरभरून बोलते त्यावर ती. “लक्ष्मी” (हेझल), “गणेश” (फिनेस) आणि “कृष्ण बलराम” (हेन्री) ही तिची मुले. भारतात, एक आश्रमात तिच्या “ईट प्रे लव्ह” या चित्रपटाचे शूटिंग चालू होते… तो प्रभाव प्रचंड होता. तेव्हा तिने मुलांची नावे ठेवली असे ती सांगते. कमाल आहे नाही?
आपले आयुष्य सुसह्य होण्यात अनेक गोष्टी आहेत. ज्युलिया रॉबर्ट्स नामक हास्य कारंजे ही त्यातीलच एक गोष्ट असावी. ती नसती तर, प्रेटी वूमन नसता, रनअवे ब्राईड नसता, बेस्ट फ्रेंड्स वेडिंग नसते… ब्रॅड पिट, जॉर्ज क्लूनी आणि मॅट डेमन निरुद्देश्य भटकले असते… आणि चित्रपटाचा पडदा “सिल्व्हर स्क्रीन” म्हटला गेला नसता. प्रेटी वूमन या शब्दाला काही अर्थच राहिला नसता… किंबहुना “प्रेटी वूमन” हा शब्दच अस्तित्वात नसता. या शब्दाच्या प्रत्यक्ष स्वरूपाचा आज वाढदिवस. तसा तो मधाळ हास्याचा देखील वाढदिवस. Happy Birthday ज्युलिया रॉबर्ट्स…
#HappyBirthdayPretty_Woman
© Ashutosh Ratnaparkhi.
#cinemagully
श्रीकृष्णार्पणमस्तू