श्रीमंत श्रीमान

हा डावीकडे आहे तो मार्टिन स्कोर्सीसी.. थोर दिग्दर्शकांच्या यादीत त्यामध्ये याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते! हा, स्पिलबर्ग, कॅमेरॉन they have their own league of extraordinary directors! पलीकडे बसलाय तो… असो.

स्कोर्सेसी पडद्यावर जे काही आणेल त्याचे सोने होईल, कारकिर्दीच्या अशा मुक्कामावर आहे. सत्तरच्या दशकात स्कोर्सीसी तरुण होता, त्यावेळी एक नवखा अभिनेता देखील अभिनयात हातपाय मारत होता, रॉबर्ट डी निरो. दोघांमध्ये अमर्याद गुणवत्ता होती.. दोघे एकत्र आले… “मीन स्ट्रीटस” या चित्रपटबरोबरच त्या क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ जोडगोळी कोणती हा प्रश्नच निकालात निघाला! त्याच्या स्वतःच्या “टॅक्सी ड्राइवर” मध्ये स्कोर्सीसी “पाहुण्या भूमिकेत” मध्ये होता.

माफियापट हा मार्टिनचा हातखंडा. एरवी दिसणारा रक्तरंजित भडकपणा त्याच्या माफियापटात अभावाने आढळतो… म्हणजे “फक्त तेवढेच” नसते त्यात. मीन स्ट्रीटस, गुडफेलाज वगैरे उदाहरणे. डी निरो, ज्यो पेसी वगैरे त्याच्या भिडू लोकांबरोबर आणखी एक नेहेमीचा चेहरा त्याच्या चित्रपटात असतो, “न्यूयॉर्क शहर”! मार्टिन मूळचा न्यूयॉर्कर. मूळचा मुंबईकर जसा असतो तसा न्यूयॉर्कर! या शहराबद्दल त्याला अपार ममत्व असावे, कारण कायमच न्यूयॉर्कला तो मोठी भूमिका देऊ करतो!!

स्कोर्सेसीचा”द डीपार्टेड” नावाचा एक अफलातून माफियापट आहे. खालचा फोटो त्याच चित्रपटातील. त्याच्या लाडक्या न्यूयॉर्कऐवजी बोस्टन शहराला त्याने यात मुख्य भूमिका दिली! चित्रपटाची कथा बोस्टन शहर, त्यातील वरवर अदृश्य तरीही जाणवणारे माफिया विश्व आणि त्या माफियाचा मुख्य फ्रॅंक कॉस्टेल्लो नामक कराल माफिया बॉस याच्या अवतीभवती फिरते.

त्यातील फ्रॅंक कॉस्टेल्लो म्हणजे आपला जॅक निकल्सन. अन्यत्र जसा तो आपलं गारुड घालतो तसे ते यातही त्याने घातले आहे! मार्टिनचा लाडका डी निरो यात नाही, त्याऐवजी डीकॅप्रियो आहे. पोलिसाच्या भूमिकेत! मॅट डेमन देखील आहे, तो पण पोलिसच आहे… म्हणजे नावाला पोलीस आहे. मार्क व्हॉलबर्ग देखील आपली अफाट ऊर्जा घेऊन आलाय, तोदेखील पोलिसच!

बोस्टन शहरात “डिप डाऊन” अस्तित्वात असलेले अंडरवर्ल्ड, त्यातील पोलीस दल, अंडरवर्ल्ड यातील उंदरामांजराचा खेळ, पोखरलेले बोस्टन पोलीस दल सगळं काही अफाट कॅनव्हास वर साकारले आहे मार्टिनने. बोस्टन मधील अदृश्य परंतु शक्तिशाली माफिया जगत यामधील बुद्धिबळसम लढाई. अन्य बौद्धिक लढायांमध्ये असते तशी धारधार कुरघोडी वगैरे यात ठराविक काळाने येत राहते. त्यामुळे डीपार्टेड केवळ रक्तरंजित माफियापट न राहता तो बघताना डोके लावून बघणे अत्यावश्यक होऊन जाते.

नटसम्राट जॅक निकल्सन फ्रॅंक कॉस्टेल्लोच्या भूमिकेत आहे यात! एखाद्या भल्यामोठ्या संस्थेचा मालक जसा सर्वत्र फिरून काय काय चाललंय जसे बघतो तसा, बोस्टन मध्ये फिरून आपले साम्राज्य ठीकठाक आहे का बघणारा फ्रँक कॉस्टेल्लो… आपल्या संघटनेत पोलीस हेर घुसलाय हे कळून सैरभैर झालेला “आय स्मेल रॅट” म्हणत आपल्याला थिजवणारा जॅक इझ अॅट हिज बेस्ट.

“वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट”, “द अॅव्हिएटर”,”शटर आयलंड” याआधी सर्वप्रथम डीकॅप्रियो आणि स्कोर्सेसी “द डीपार्टेड” मध्ये आणि त्याही आधी “गंग्स ऑफ न्यूयॉर्क” मध्ये (पुन्हा न्यूयॉर्क!) एकत्र आले असावेत. बार मध्ये हाणामारी केलेला “इट्स नॉट दॅट यु कान्ट हिट धिस गाय बट धिस गाय इझ अलमोस्ट द गाय यु कान्ट हिट”! हे कॉस्टेल्लो च्या माणसाकडून एकूण घेणारा संतप्त डीकॅप्रियो… तर एके ठिकाणी मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेणारा डीकॅप्रियो… अनेकविध छटा असतात तशा त्याच्या भूमिकेला अनेक छटा आहेत.

हे सगळं करून चित्रपटाचे मनोरंजनमूल्य कमी न होऊ देणे हे सोपे नसते. “मीन स्ट्रीटस” चा अपवाद वगळता स्कोर्सेसी हे नेहेमीच साधत आलाय. या चित्रपटानेच त्याला त्याचा पहिला ऑस्कर देखील मिळवून दिला. आधी डी निरो आणि नंतर डी कॅप्रियो दोन श्रेष्ठ अभिनेत्यांना सोबत घेऊन मार्टिन आपला अमीट ठसा उमटवण्यात यशस्वी झालाय.

काल त्याचा वाढदिवस होता, एरवी काही श्रीमंत लोक फोटोशूट वगैरे करतात. तसे याचे फोटोशूट केले तर एकेक चित्रपटाचे पोस्टर घेऊन बसलाय हा हे दृश्य डोळ्यासमोर येते! केवळ “रेजिंग बुल”ची पुण्याईच आयुष्य पुरेल इतकी आहे त्याची. इतर चित्रपटांची यादी बघता त्याची चित्रपट संपदा अजोड आहे. त्यादृष्टीने तो हॉलिवूडमधील “श्रीमंत” आहे. या श्रीमंत श्रीमानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा… Happy Birthday Martin Scorcese!

© Ashutosh Ratnaparkhi.

श्रीकृष्णार्पणामस्तू