*जिंकलंस नेहा*
किशोर बोराटे @
३० सप्टेंबर १८७० साली भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. *१९१३ साली त्यांनी भारतातील पहिला चित्रपट प्रदर्शित केला त्याचे नाव होते राजा हरिश्चंद्र.* आज भारतीय जनतेसाठी भारतीय चित्रपटसृष्टी म्हणजे जीवनाचा अविभाज्य घटक झालेली आपण पाहतो. पण सुरुवातीच्या काळात याच चित्रपटसृष्टीकडे उच्चभ्रू वर्गाने पाठ फिरवली होती. ते आणि त्यांच्या घरातील मुलं-बाळं, स्त्रिया यांना काम करणे तर दूरच, पण चित्रपट पाहण्यास देखिल मज्जाव केला जात असे.
भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या याच दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटसृष्टीने आज इंडस्ट्रीचा दर्जा प्राप्त केला. पडद्यावरील आणि पडद्यामागील अनेक हिरे घडवले. त्यातीलच काळाच्या पडद्याआड गेलेल्या एका हिऱ्याला इंडियन आयडॉलने त्यांच्या व्यासपीठावर आणले आणि त्यांना पाहून भारतीय जनतेचे मन फक्त हेलावलेच नाही, तर त्यांनी आश्चर्याने तोंडात बोट घातले. चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव, तर डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, त्या एका गीतकारासाठी आणि त्यांचे नाव होते संतोष आनंद.
*होय, तेच संतोष आनंद, ज्यांनी एक प्यार का नगमा हैं, तेरा साथ हैं तो, मेघा रे मेघा रे, मोहब्बत हैं क्या चीज अशी गाणी लिहिली.* आपण लहानपणापासून ही गाणी ऐकत, गुणगुणत आलो. पण याचे बोल कुणी लिहिले हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. त्या संतोष आनंद यांना टीव्हीच्या स्क्रीनवर एकदम थकलेल्या, गलितगात्र झालेल्या अवस्थेत पाहिले तेंव्हा, तिथे उपस्थित असणारे आणि टीव्हीसमोर बसून कार्यक्रम पाहणारे या सर्वांच्याच डोळ्यातून अश्रूंच्या धारा चालू झाल्या.
इंडियन आयडॉलचे सर्व स्पर्धक, अँकर, आणि जजेस् आणि संतोष आनंद यांच्या गीतांना ज्यांनी संगीताचा साज चढवला ते प्यारेलाल सगळेच भावनाविवश झाले. *सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने. ती संतोष आनंद यांची सद्यस्थिती पाहून हमसून रडत होती. नेहाने संतोष आनंद यांना पाच लाख रुपये भेट, मदत म्हणून देऊ केले. पण सूर्य अस्ताकडे झुकलेला असताना देखिल, आपलं अस्तित्त्व जपणाऱ्या या स्वाभिमानी कलाकाराने ती नम्रपणे नाकारली. तरीही नेहाने मला तुमची नात समजा आणि कृपया ही भेट स्विकारा अशी गळ घातली, तेंव्हा त्यांनी ती स्विकारली.*
खरंतर केवळ टाईमपास म्हणून चित्रपट बघणाऱ्या आणि बाथरूम सिंगर असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाने जुन्या जमान्यातील गीतकार संतोष आनंद यांना तरी का ओळखावे आणि इंडियन आयडॉलचा प्रत्येक कार्यक्रम आपल्या अश्रूंनी ओला करणाऱ्या नेहा कक्करची तरी दखल का घ्यावी? तिचे गायिका असणे आणि तिचे रडणे मला कधीच भावले नाही. एक गायिका आहे एवढीच काय ती मला तिच्याबाबतची माहिती. बाकी तिचे रडणे वगैरे मला नेहमीच कृत्रिम वाटत आले होते. *पण कालच्या प्रकाराने नेहाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आणि आपसूकच माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले नेहा जिंकलंस.*
पडद्यावर भावना दाखवणाऱ्या आणि प्रत्यक्ष हीन भावना बाळगणाऱ्या या चित्रपटसृष्टीत एवढ्या कोमल मनाची ही कळी अद्याप कोमेजून कशी गेली नाही हेच विचार परवापासून माझ्या मनात घोळत आहे. असो, नेहाला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ज्यांना या चित्रपटसृष्टीचे जनक म्हंटले जाते ते दादासाहेब फाळके तसेच लक्ष्मी-प्यारे असतील, संतोष आनंद असतील, नावं घ्यायची म्हटले तर खूप घेता येतील. पण अशा या मोठ्या लोकांची, कलाकारांची जाण या पिढीने ठेवावी आणि त्यांच्याबाबत काय दृष्टीकोन असावा हे नेहाने दाखवून दिले आहे. त्याबद्दल तिचे अभिनंदन तर करावेच लागेल. पण तिच्याकडून बाकीच्यांनी पण हे शिकावे.
धन्यवाद
-किशोर बोराटे