अभिषेकच्या अभिनयासाठी हा चित्रपट पहाच

अभिषेकसाठी हा चित्रपट नक्की पहाच

#thebigbull खूप दिवसांनी अभिषेकचा एक उत्तम सिनेमा पाहण्यात आला. #thebigbull हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. हर्षद मेहताच्या स्कॅमवर आधारित म्हणजे त्यासारखा हा सिनेमा वाटतो. यात अभिषेकने हेमंत शहा हे पात्र अतिशय दमदारपणे साकारले आहे. कथानक तर उत्तम आहेच, पण अभिषेकच्या अभिनयासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा. संपूर्ण चित्रपटातील eye contacts चेहऱ्यावरील हावभाव आणि संवादफेक जबरदस्त आहे. फक्त body language मध्ये अभिषेक कमी पडतो असे माझे स्वतःचे निरीक्षण आहे. हेमंत शहा हे पात्र मुळातच स्वतःविषयी प्रचंड आत्मविश्वास असलेले असे दाखवण्यात आले आहे. प्रचंड आत्मविश्वास असणाऱ्या माणसाकडे त्या आत्मविश्वासा बरोबरच थोडा अहंकार आणि घमेंड ही नैसर्गिकरित्या न सांगताच येते. अतिशय चलाख बुद्धीने कायद्याच्या पळवाटांचा फायदा घेत तो यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचतो. त्याच्यामुळे भारतातील शेअर मार्केटला नवी ऊर्जा, नवी दिशा प्राप्त होते. सर्वसामान्य माणसांच्या खिशात पैसा येतो. पण म्हणतात ना कोणतीही पळवाट ही माणसाला अंतिम ध्येयापर्यंत नेऊ शकत नाही, तसेच यातील हेमंत शहाचे होते. यशाच्या धुंदीत आणि भावनिक स्वभावामुळे त्याच्या हातून काही चूका घडतात आणि तो कायद्याच्या कचाट्यात अडकतो. पण तरीही त्याचा आत्मविश्वास म्हणा किंवा अहंकार म्हणा त्याला डगमगू देत नाही. देशातील सर्वात मोठा वकील तो नेमतो. या कथित स्कॅम मध्ये त्याच्याबरोबर कोण कोण आहे हे तो न घाबरता जगातल्या सर्व मिडियासमोर सांगून त्याला अडचणीत आणू पाहणाऱ्यांना तो धडा शिकवतो. अभिषेकने एकदम जबरदस्त performance या चित्रपटाच्या माध्यमातून दिला आहे. हा चित्रपट पाहताना, त्याच्या गुरू या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अभिषेक एक उत्तम अभिनेता आहे, याबद्दल शंकाच नाही. पण अभिषेकमध्ये जर आपण अमिताभला शोधत असू, तर आपल्या पदरी निराशा आल्याशिवाय राहणार नाही. रणवीरसिंगच्या उथळ आणि बटबटीत नौटंकीपेक्षा आणि चेहऱ्यावरील रेष ही हलू न देता मठ्ठ चेहऱ्याने संवाद वाचणाऱ्या अर्जुन कपूर पेक्षा अभिषेक कधीही मला चांगला वाटत आला आहे. त्याचे दुर्दैव एवढेच की रणवीरला जसे भन्साळी सारख्या मोठ्या बॅनर्सचे चित्रपट मिळाले, तसे अभिषेकला मिळाले नाहीत. पण तरीही युवा, गुरू आणि आता बिग बुलच्या माध्यमातून त्याने आपली दमदार अभिनयक्षमता परत एकदा सिद्ध केली आहे. त्याच्या अभिनयासाठी तरी हा चित्रपट एकदा जरूर पाहायलाच हवा.

-किशोर बोराटे