नाथाभाऊंची व्यथा

नाथाभाऊंची व्यथा

राजकारण असो अगर कोणतेही एखादे क्षेत्र असो. आपापल्या क्षेत्रात टॉपला जाण्याची महत्त्वकांक्षा सर्वांनाच असते. नाथाभाऊ ही त्याला अपवाद नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर महाराष्ट्र भाजपाचा चेहरा नाथाभाऊच होते. जो विरोधी पक्षनेता असतो. त्याला आपल्या पक्षाची सत्ता आल्यावर आपल्यालाच मुख्यमंत्री पद मिळेल ही अपेक्षा असते.

विरोधी पक्षनेता म्हणून आपण निकराने काम केले आहे ही भावना असते. पक्ष पदं देत असतो. पण कामगिरीही पाहत असतो. नाथाभाऊंनाही पक्षाने खूप काही दिले. पण त्यांचे कष्ट, त्यांची योग्यता पाहूनच दिले ना? की त्यांच्यावर मेहेरबानी करण्यासाठी दिले? पक्ष काय असा कुणालाही पदं वाटतो काय? नाथाभाऊंचाही तेंव्हा तेवढा प्रभाव होताच ना? उत्तर महाराष्ट्रात, त्यांच्या जळगाव जिल्ह्यात त्यांनी पक्ष वाढवला. पक्षाला त्यांचा फायदा झाला. त्यांना पक्षाचा फायदा झाला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करणे, म्हणजे प्रवाहाच्या विरोधात सतत पोहण्यासारखे आहे. सत्ताधारी पक्षाला धूळ चारून आपल्या पक्षाची सत्ता आल्यावर त्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची अपेक्षा निर्माण होणे हे नैसर्गिक आहे. किंबहुना तो त्याचा हक्कच आहे.

पण पक्षाने त्यांना डावलून त्यांच्यापेक्षा ज्युनियर नेत्याची मुख्यमंत्री पदी निवड केल्यानंतर त्यांना धक्का बसणे हे ही नैसर्गिक आहे. नाथाभाऊंचेही तसेच झाले. त्या नैराश्येतून त्यांनी काही वक्तव्ये केली. ती चुकीचीच होती. कारण शेवटी देवेंद्र यांना मुख्यमंत्री करणे हा पक्षाचा निर्णय होता आणि नाथाभाऊंनी तो निमूटपणे मान्य करायला हवा होता. पण अपयश पचवणे अवघड असते. नैराश्येतून त्यांनी काही वक्तव्ये केली, त्यामुळे पक्ष नेतृत्त्वाने त्यांना बेदखल केले.

हातातोंडाशी आलेला घास गेल्यावर कुणालाही नैराश्य येणे साहजिकच आहे. देवेंद्र फडणवीस हे ही नुकतेच त्यातून गेले आहेत. विधानसभा निवडणूकीत भाजपा-सेना युतीला कौल मिळूनही सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जेंव्हा घरोबा करून मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, सेनेचे हे वागणे फडणवीस यांच्या जिव्हारी लागले होते. सुरुवातीची त्यांची वक्तव्य काढून पहा. आता त्यांनी वस्तुस्थिती मान्य केली, म्हणून जरा ते शांत झालेत. सौ. फडणवीस अजूनही शांत व्हायला तयार नाहीत.

नाथाभाऊंच्या बाबतीतही असेच झाले. फरक एवढाच आहे की नाथाभाऊंना त्यांच्याच पक्षाने दगा दिला आणि देवेंद्र यांना सहकारी पक्षाने दगा दिला. देवेंद्र यांना मुख्यमंत्री करताना पक्षाने थोडे संतुलन साधून नाथाभाऊंना केंद्रात एखादे मंत्रिपद दिले असते तर आज ही वेळ आली नसती. त्यांच्या पक्षकार्याचा आणि जेष्ठत्त्वाचाही मान राखला गेला असता. मोदी-शहा जर आठवलेंना मंत्रिपद देऊ शकतात तर मग नाथाभाऊंना का नाही? जे विनोद तावडे यांच्या बाबतीत केले, ते नाथाभाऊ यांच्या बाबतीतही होऊ शकले असते. पक्षात एवढे वर्ष काम करणाऱ्या नेत्याला असे एकाएकी खड्यासारखे बाजूला करणे योग्य नव्हते.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचेच उदा. घ्या. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या आणि वर्ष-दीड वर्ष जेलमध्ये घालवून आलेल्या छगन भुजबळ यांना डावलणे राष्ट्रवादीला सहज शक्य होते. पण भाजपाने जी चूक केली, ती राष्ट्रवादीने केली नाही. ( आता ते नैतिक की अनैतिक किंवा चूक की बरोबर हा विषय सोडा.) पण माणसं सांभाळावीत तर ती पवारांनीच, याबाबतीत त्यांचा हात कुणी धरणार नाही. ते नेहमी बेरजेचे राजकारण करतात. पवार शक्यतो स्वतःहून विरोधक तयार करत नाहीत.

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही आज ना उद्या पक्ष दखल घेईल या आशेवर नाथाभाऊ तसे बराच काळ शांत बसले होते. पण पक्षाने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. हा लेख मी काही नाथाभाऊंचे समर्थन करण्यासाठी लिहितोय असे नाही. पण एकंदरीतच ज्या काही घटना घडल्या त्याचा आढावा घेण्यासाठी लिहीत आहे. नाराजांची तशी यादी मोठी आहे. तावडे यांना संघटनेत वरचे पद दिले की महाराष्ट्रातून त्यांचा पत्ता कट केला हे अद्याप त्यांनाही कळले नसेल. हे प्रमोशन आहे की डिमोशन याचा हिशोब ते अजून करत बसले असतील.

पंकजा मुंडे आज जरी शांत असल्या तरी भविष्यात त्या नाथाभाऊ यांच्या वाटेने जाणार नाहीत याची खात्री कोण देणार? भाजपातून आज सत्ताधारी पक्षाविरोधात कोण बोलतंय, तर फक्त देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा. बाकीचे सुधीरभाऊ, पंकजा, गिरीष महाजन आणि बाकी नेते कुठे आहेत? देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा प्रभाव ठेवण्यासाठी बाकीच्या नेत्यांना दाबलं. त्यामुळे आज ते एकटे पडले आहेत. सत्ताधारी सेना- काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याबरोबरच त्यांना पक्षांतर्गत विरोधकांनाही तोंड द्यावे लागते आहे. समोरचा विरोधक दिसतो तरी, पण पक्षांतर्गत असलेले सगळेच विरोधक दिसत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून जे नेते भाजपात गेले आहेत. ते आज ना उद्या हे सरकार पडेल या आशेवर भाजपात थांबले आहेत. आता तसे घडले नाही आणि पवारांनी जर दाणे टाकायला सुरुवात केली. तर राज्य भाजपाची अवस्था फार दयनीय होऊ शकते. मोदी-शहा यांच्या करिष्म्यावर किती वर्षे काढणार?

एवढी वर्षे दिल्लीत असणारे पवार आज महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेत हे भाजपासाठी फार धोक्याचे आहे. मुख्यमंत्रीपदी जरी उद्धव ठाकरे असले, तरी भाजपाला खरा धोका हा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा पवारांच्या पासून जास्त आहे हे भाजपाने लक्षात घ्यावे. कुणाला ही अतिशयोक्ती वाटत असेल तर आज भाजपा सत्तेत असती हे त्याने लक्षात घ्यावे. एकटे देवेंद्र फडणवीस या तेल लावलेल्या पैलवनाचा सामना करू शकतील?

-किशोर बोराटे