डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक
पाकिस्तानची वाटचाल सध्या अराजकाच्या दिशेने आहे. किंबहुना, हा देश विघटनाच्या मार्गावर आहे. प्रथम गिलगिट बाल्टिस्तानमध्ये मोठा उठाव झाला. त्यानंतर कराचीमध्ये लष्कर आणि पोलिस यांच्यात खूप मोठा संघर्ष उफाळून आला. लष्कराविरुद्ध कराचीमधील जनताही रस्त्यावर उतरलेली दिसली. आता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीने डोके वर काढले आहे. यंदा या संघर्षाने अत्यंत व्यापक स्वरुप प्राप्त केले आहे. बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्यासाठी जवळपास 100 बलुच नेत्यांनी तुरुंगवास पत्करला आहे. त्यामुळे संपूर्ण बलुचिस्तानमध्ये जोरदार निदर्शने, विरोध प्रदर्शने होत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, तेथे केवळ पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान किंवा लष्कर यांचाच विरोध केला जात नसून चीनलाही कडाडून विरोध होत आहे. चीन हा बलुचि नागरिकांचा एक शत्रू म्हणून नव्याने पुढे आला आहे. याचे कारण चीन अत्यंत झपाट्याने बलुचिस्तानमध्ये पाय पसरत आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर साधनसंपत्तीचा विकस चीनकडून होत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधून फुटून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र बलुचिस्तानची चळवळ दिवसेंदिवस बळकट होत आता या चळवळीच्या मागणीला तीव्र स्वरुप प्राप्त होताना दिसत आहे. अनेक बलुच नेते पाकिस्तानातून आणि बाहेरूनही या चळवळीला नेतृत्त्व देण्याचा प्रयत्न करत आहेत. या नेत्यांनी उघडपणाने भारताची मदतही मागितली होती.
या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानची ही चळवळ नेमकी काय आहे, बलुच लोकांचा मुख्य प्रश्न काय आहे, हे बलुच लोक नेमके कोण आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि भारत त्यामध्ये कोणती भूमिका बजावू शकतो हे समजून घेणे औचित्याचे ठरणार आहे.
बलुच हा पाकिस्तानातील वांशिक अल्पसंख्याक गट आहे. अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान या तीन देशांमध्ये या बलुच लोकांचे वास्तव्य आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान या पश्चिमेकडील भागात या बलुचि लोकांचे वास्तव्य आहे. त्यांच्या सीमारेषा इराण आणि अफगाणिस्तानशी जोडलेल्या आहेत. हा संपूर्ण भाग नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता असणारा आहे. तिथे नैसर्गिक वायूंचे मोठे साठे आहेत. हा सर्व भाग पाकिस्तानच्या वर्चस्वाखाली आहे. पाकिस्तानच्या आर्थिक विकासात खूप मोठा असमतोल आहे. पंजाबी पाकिस्तानचा विकास जास्त झाला आहे, तर बलुचिस्तान हा प्रदेश विकासापासून कोसो दूर आहे. बलुचिस्तानातील साधनसंपत्ती उत्खनन करून, त्याची लूट करून पंजाबचा विकास करण्यात आला आहे. त्यामुळे बलुचिस्तानच्या लोकांमध्ये असंतोषाची भावना आहे. ही असंतोषाची भावना 1980 च्या दशकापासूनच आहे. मात्र पाकिस्तान लष्करी वर्चस्वाखाली या बलुचि लोकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आला आहे. त्यामुळे अधूनमधून लहानसहान उठाव व्हायचे; पण त्यांचे दमन करण्यात येत असे. 2005 मध्ये एक मोठा उठाव झाला होता तेव्हा पाकिस्तानकडून एक मोठी लष्करी कारवाई करण्यात आली होती. या लष्करी कारवाईत प्रचंड नरसंहार झाला होता. या बलुचींना पाकिस्तानातून फुटून बाहेर पडायचे आहे. किंबहुना, हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यांना स्वतंत्र बलुचिस्तानची निर्मिती करायची आहे. पाकिस्तानच्या अधिपत्याखाली आमचा विकास होऊ शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. 2005 मध्ये झालेला उठाव अत्यंत क्रूरपणाने आणि निष्ठूरपणे चिरडताना पाकिस्तानी लष्कराकडून बलुचिस्तानचा नेता बुकटी त्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बलुचिस्तानातील मुस्लिम नेते बाहेर पळाले. आज हे नेते इराण, अफगाणिस्तान किंवा इंग्लंड या देशांमध्ये राहूल नेतृत्त्व करताहेत. सध्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे नेतृत्व आहे ते मारी नामक व्यक्तीकडे आहे.
बलुचिस्तानी लोकांच्या अनेक सशस्त्र संघटना आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही मोठी संघटना आहे. याखेरीज बलुचिस्तान रिपब्लिकन, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटही अशाही काही संघटना आहेत. तथापि, आताचा हल्ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेच केलेला आहे.
2015 सालापर्यंत या बलुचि लोकांचा संघर्ष पाकिस्तानी लष्कराबरोबर होता. पण 2015 मध्ये चीनने पाकिस्तानसोबतच्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पाचे नाव आहे चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडॉर (सीपेक). या योजनेअंतर्गत चीनच्या पश्चिमेकडील शिन शियांग या प्रांताला बलुचिस्तानातील ग्वादार बंदर जोडायचे आहे. शिन शियांग ते ग्वादार बंदरापर्यंत रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग विकसित करायचा आहे. याचे कारण ग्वादार बंदराच्या माध्यमातून चीनला संपूर्ण पश्चिम आशिया त्याचप्रमाणे आखाती प्रदेश तसेच मध्य आशियात प्रवेश मिळणार आहे. चीनला प्रामुख्याने या भागावर वर्चस्व गाजवायचे आहेच. त्यामुळेच चीनने बलुचिस्तानात आर्थिक परिक्षेत्राच्या अंतर्गत साधनसंपत्तीचा विकास करायला सुरुवात केली आहे. बलुचिस्तानात खूप मोठे बांधकाम सुरु आहे. यासाठी तिथल्या स्थानिक लोकांना जबरदस्तीने बाहेर जायला लावले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा या विकासाला पर्यायाने परिक्षेत्राला विरोध आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या विकास कामांमुळे केवळ पाकिस्तानचा फायदा होणार असून बलुचि लोकांना याचा काहीही उपयोग नाही. या भागात रस्तेमार्ग, रेल्वेमार्ग झाल्यानंतर इतर प्रांतातील लोक येतील आणि स्थानिकांचा रोजगार कमी होईल अशी बलुचि लोकांची भीती आहे. मुळातच इथले बलुचि लोक मागास असल्याने या बाहेरील लोकांचा सामना करू शकणार नाहीत. किंबहुना बलुचि लोकांना बाहेर पाठवले जाईल. त्यामुळे चीन- पाकिस्तान आर्थिक परिक्षेत्र विकास हा प्रकल्प बलुचिस्तानसाठी विघातक असून हा विकास प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, अशी बुलिचींची भूमिका आहे.
चीनने पाकिस्तानमध्ये जे मोठे प्रकल्प सुरू झाले आहेत त्यासाठी जवळपास 20 हजार चीनी इंजिनिअर बलुचिस्तान प्रांतामध्ये आहेत. त्यांना पाकिस्तानी लष्कराचे संरक्षण आहे. या लष्करावर सातत्याने हल्ले होत असले तरीही मुख्य लक्ष्य आहे ते चीन. सतत हल्ले करून दहशत माजवल्यास चीन तिथून काढता पाय घेईल, हा यामागचा उद्देश आहे.
2017 मध्ये ऑगस्टमध्ये बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्ये चीनी अभियंत्यांना घेऊन जाणार्या एका बसवर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळीही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या विकासकामांना आमचा विरोध असल्याचा इशारा दिला होता.
पाकिस्तानचा अंतर्गत कलह आणि पाकिस्तानचा असमतोल आर्थिक विकास ही या विरोधाची कारणे आहेत. त्याला सिंध प्रांताचाही विरोध आहे. कारण सिंध प्रांताचाही विकास झालेला नाही. पाकिस्तानला या सर्वांची खूप मोठी आर्थिक किंमत मोजावी लागणार आहे. कारण पंजाब प्रांत वगळता त्या देशात कोणत्याही प्रांताचा विकास झालेला नाही. आता विकासापासून वंचित राहिलेल्या प्रांतातून होणारा आक्रोश, असंतोष वाढत चालला असून त्याचे भीषण परिणाम येणार्या काळात दिसणार आहेत.
बलुचींकडून कोणताही हल्ला झाला की पाकिस्तान त्याचा संदर्भ भारताशी जोडत असतो. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केेलेल्या भाषणात बलुचिस्तानच्या परिस्थितीचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या छुप्या कारवायांना इशारा देताना बलुचिस्तानला उघड मदतीसंदर्भात वक्तव्य केले होते. त्यामुळे भारतच बलुचिंना मदत करतो आहे असे पाकिस्तानला वाटते आहे. पण भारताने या संघर्षात आपल्याला काही रस नसल्याचे सांगत आपली भूमिका नेहमीच स्पष्ट केली आहे.
⚡️परराष्ट्र, संरक्षण धोरणातील, आंतरराष्ट्रीय संबंधातील सर्व चालूघडामोडींविषयी, कोरोना, भारत – चीन तणाव या विषयी मराठी व इंग्रजीतून माहिती व विश्लेषणासाठी.
* Twitter –