अपेक्षित मी, तरीही उपेक्षित मी

*अपेक्षित मी, तरीही उपेक्षित मी*

किशोर बोराटे@

*शरद पवार* या सहा अक्षरी शब्दाची जादू फक्त महाराष्ट्रच नाही तर, संपूर्ण भारतभर गेली *५९ वर्षे* पसरली आहे. आतापर्यंत अनेक लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाच्या इच्छुक यादीत पवारसाहेबांचे नाव १००% असायचेच. तशी राजकीय परिस्थिती त्यांच्या बाजूने कधी नव्हती किंवा त्यांना पंतप्रधान करावे अशी परिस्थितीही कधी निर्माण झाली नाही. मुत्सद्दीपणा दाखवून तशी परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी कायम पडद्यामागे राहून प्रयत्न केले असतील पण त्यात त्यांना यश आले नाही. पवारसाहेबांनी काँग्रेस सोडल्यानंतर तर ही शक्यता तशी धुसरच झाली. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचा आवाका पाहता हे कदापि शक्य नव्हते आणि इथून पुढेही नसेल.

*तरीही आपल्या भारत या देशाचा इतिहास चमत्कारांनी भरलेला आहे आणि इथली जनताही चमत्काराला नमस्कार करणारी आहे.* तसे शरद पवारसाहेब पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा बाळगणारे लोकंही प्रचंड संख्येने आहेत. तरीही पात्रता असूनही त्यांना पंतप्रधान पद काही मिळाले नाही. देवेगौडा यांना पंतप्रधान पदाची तशी लॉटरीच लागली असे म्हणावे लागेल. देवेगौडा पंतप्रधान होऊ शकतात तर मग शरद पवार का नाही? त्यानंतर शरद पवार समर्थकांच्या आशा वाढल्या होत्या. खुद्द पवारसाहेबांनाही तसे वाटत होते. पण तसे काही घडले नाही. म्हणूनच दुर्दैवाने का होईना पण *अपेक्षित मी, तरीही उपेक्षित मी* असेच त्यांच्याबाबतीत झालेले आपल्याला पाहायला मिळते. पवारसाहेबांचे कट्टर राजकीय विरोधक आणि त्यांचे वैयक्तिक जीवनातील मित्र मा. बाळासाहेब ठाकरे हे ही त्यांच्या पंतप्रधान पदाचे समर्थक होते. त्यांनी अनेकदा शरद पवारांनी पंतप्रधान व्हावे ही इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी गरज पडली तर शिवसेना त्यांना पाठिंबा ही देईल असे ही बोलायला ते विसरले नव्हते. त्याला कारण ही तसेच होते ते म्हणजे बाळासाहेबांचे महाराष्ट्र प्रेम. मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर मा. बाळासाहेब राजकीय वैर आणि आपली तत्त्वे बाजूला सारून त्यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा द्यायला तयार होते. बाळासाहेब म्हणजे शब्दाचे पक्के, त्यांनी प्रतिभाताई पाटील यांनाही भाजपाच्या विरोधात जाऊन राष्ट्रपतीपदासाठी मदत केली. *स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यानंतर दिल्लीत महाराष्ट्र जिवंत राहिला, तो फक्त शरद पवारसाहेबांच्या मुळेच हे बाळासाहेब ही मान्य करत होते आणि पवारसाहेबांचे इतर राजकीय विरोधक ही मान्य करतात.*

पवारसाहेब जरी काँग्रेसी विचारसरणीचे असले तरी त्यांच्या घरातील वातावरण हे शेकापच्या बाजूने होते. पवारसाहेबांचे वडील शेकापचे समर्थक होते. त्यांचे थोरले भाऊ वसंतराव यांनी वकीलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्ण वेळ शेकापचे काम केले. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे काँग्रेसमध्ये आलेल्या शरद पवार यांनी काँग्रेस मध्ये येण्या अगोदर काँग्रेसच्या विरोधात काम करून बारामतीत काँग्रेसला पराभूत केले होते. *१९५३ साली फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली. पंडित नेहरू यांनी सौराष्ट्रसह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र आणि स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली आणि पंडित नेहरू व राज्य पुनर्रचना आयोगाच्या विरोधात त्यावेळी महाराष्ट्रात प्रचंड भडका उडाला. त्यावेळी पवारसाहेबांच्या घरातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठबळ मिळाले व शेकापच्या माध्यमातून त्यांनी नेहरू आणि काँग्रेसला उघडपणे विरोध केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पवारसाहेबांनी सायकलवर फिरून काँग्रेस विरोधी प्रचार करून बारामतीत काँग्रेसचा पराभव केला.* त्यांची जडण-घडण जरी काँग्रेसी विचारांची असली तरी जशी वेळ येईल, तसे त्यांनी आपले विचार आणि आचार बदलले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे तसे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. त्याचा अनुभव वेळोवेळी देशाने घेतला आहे. *समस्या कोणतीही असो तिच्याकडे तटस्थपणे पाहून तिच्या मुळाशी जाऊन चौफेर विचार करून त्यातील फायदे-तोटे जाणून घेऊन मग निर्णय घेणे आणि घेतलेला निर्णय लोकांच्या गळी उतरवणे ही हातोटी त्यांच्याकडे उत्तम आहे.*

सुरुवातीच्या काळात ते राजकारणात उतरले त्यावेळी पासून त्यांनी आपला दृष्टिकोन व्यापक ठेवला. बाळासाहेबांच्या सारखी फक्त हिंदूत्वाचीं कास धरली नाही. त्यापलीकडे त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन बहुजन वर्गाला साद घातली. ते करत असताना आपली *मराठा नेता* इमेज ही सांभाळली. त्याबरोबरच ब्राम्हण समाज दूर जाऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेतली. धार्मिक विचारांचा पगडा त्यांचेवर कधीच नव्हता.

शरद पवारसाहेबांची राजकीय कारकीर्द तशी उतार-चढावांची राहिली आहे. त्यांना जेवढे समर्थन मिळत गेले, तेवढाच त्यांना विरोधही झाला. *भ्रष्टाचाराचे, जमिनी खरेदीचे, दाऊद बरोबर संबंध असल्याचे शेकडो आरोप त्यांच्यावर झाले. पण यासंदर्भात आजपर्यंत त्यांच्यावर एकही आरोप सिद्ध झाला नाही किंवा साधा गुन्हा सुद्धा दाखल झाला नाही.* एवढा मोठा आवाका ज्याला राजकारण, शिक्षण, कृषी, सहकार, खेळ, प्रशासन, उद्योगधंदे, शेती सर्व बाजूचे ज्ञान असताना प्रचंड जनसंपर्क असताना गाढा राजकीय अभ्यास महाराष्ट्राची इत्यंभूत माहिती असताना देखील या सर्व यशाला एक अपयशाची किनार होती ती म्हणजे त्यांना राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून कधीही महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता आली नाही.

*जे चंद्राबाबूंनी आंध्रमध्ये, मनोहर पर्रिकरांनी गोव्यात, जयललिता आणि करुणानिधी यांनी तामिळनाडूत, मोदींनी गुजरातमध्ये, माया-मुलायम यांनी उत्तरप्रदेशात तर लालू-नितीश यांनी बिहारमध्ये केले ते पवारसाहेबांना महाराष्ट्रात करता आले नाही.* पवारसाहेबांनी राजकीय मित्र कमावले त्यापेक्षा जास्त त्यांना राजकीय विरोधक मिळाले. *काँग्रेसमध्ये असतानाही दिल्लीच्या दरबारी पवार विरोधी लॉबी सक्रिय होती त्याचे नेतृत्त्व वेळोवेळी विठ्ठलराव गाडगीळ, शंकरराव चव्हाण, प्रतापराव भोसले, बाळासाहेब विखे, विलासराव, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव यांनी केले. हयात गेली यांची शरद पवारांच्या पायात पाय घालण्यात.* तसे पहिले तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शरद पवारांना ५-१० अशा संख्येने प्रबळ विरोधक आहेत. जे फक्त त्या जिल्ह्याच्याच नाहीतर राज्याच्याही राजकारणावर प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेस मर्यादा पडत गेल्या. राजकीय वर्तुळात मा. पवारसाहेबांचे व्यक्तिमत्त्व कालही विश्वासू नव्हते आणि आजही नाही. बेभरवशी आणि उपद्रवी राजकारणाचा शिक्का त्यामुळेच त्यांच्यावर बसला आहे. कालपर्यंत जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला पण आपल्या राजकीय वर्तुळातील लोकांचा विश्वास ते संपादन करू शकले नाहीत. त्यांच्या विश्वासघातकी राजकारणामुळे सर्वजण त्यांच्यापासून चार हात दूर राहणेच पसंद करत होते आजही तेच चालू आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते भुजबळ यांच्यापर्यंत पवारांनी पाठीत *खंजीर* खुपसला असे म्हणणाऱ्यांची यादी मोठी आहे. *राज ठाकरे यांना एकदा पत्रकारांनी विचारले की अलीकडे पवारसाहेब तुमची सारखी स्तुती का करत असतात? त्यावेळी त्यांनी अतिशय मार्मिक पण गंभीर उत्तर दिले की त्यांनी एकवेळ टीका केली तर समजू शकतो पण स्तुती केली की समजावे काहीतरी घोळ आहे.*
मा. शरद पवारसाहेबांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात सर्वसामान्य माणसाशी नाळ जी जोडली होती ती कधी तुटून दिली नाही. प्रशासनावर वचक, अफाट स्मरणशक्ती तसेच त्यांचा गाढा प्रशासकीय अभ्यास, नाविन्याची ओढ याचा त्यांना त्यांच्या राजकीय जीवनात नेहमीच फायदा झाला. त्यांचे संबंध राजकारणापुरतेच मर्यादित नव्हते. राजकारणा बरोबरच ते खेळ, कला, साहित्य, शिक्षण, उद्योग, शेती, समाजकारण, पाणी, सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला. महाराष्ट्रात सहकार खऱ्या अर्थाने त्यांनी रुजवला. विकासाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्र जो आज एवढा विकसित दिसतोय त्यात पवारसाहेबांचे योगदान मोठे आहे हे अजून माझ्या वयाच्या तरुण पिढीला किंवा माझ्यानंतरच्या पिढीला अजून माहित नाही. सतत अभ्यास करून, महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरणे, शेतकऱ्यांच्या, व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेणे, जगात होणारे बदल त्याची माहिती करून घेणे अशाप्रकारे त्यांनी आपले नॉलेज वाढवले. जे ज्ञान मिळेल ते घेत गेले. त्यामुळेच आज दिल्लीत किंवा राज्यात सरकार कोणाचेही सत्तेत असो अचानक काही समस्या निर्माण झाली ते सरकारला लगेच पवारसाहेबांची आठवण येते. पवारसाहेबांच्या तुलनेत विचार केला तर आताच्या राजकीय नेत्यांचा अभ्यास कमी पडतोय. ही खंत त्यांनीही अनेकदा बोलून दाखवली आहे. याचा विचार व्हायला हवा.

मा. शरद पवारसाहेबांनी कुणी कितीही आरोप केले तरी कुणाविषयीही मनात द्वेष ठेवला नाही. जे येईल त्याला आपले करत गेले. जे अगदीच नडले त्यांना त्यांनी तितक्याच संयमाने योग्य वेळ पाहून कात्रजचा घाट दाखवला. आता काळ बदलला, नेते बदलले, पण देशापुढचे व राज्यापुढचे प्रश्न पूर्वीचे आहेत काही नवीन निर्माण होत आहेत. आताची तरुण पिढी शिकली, सुशिक्षित झाली. आधुनिकीकरण झाले इंटरनेट आले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आज लोकांना घरबसल्या जगाची माहिती समजू लागली. तरुण पिढीचा तरुण देश म्हणून भारताची गणना होऊ लागली. *आताच्या पिढीला आक्रमक राजकीय नेते आवडू लागले. एवढ्या वर्षाच्या काँग्रेस भ्रष्टाचारी राजवटीला जनता किकली होती. त्यांना काँग्रेसच्या दरबारी आणि बोटचेप्या राजकारणाचा वीट आला होता. त्यामुळे त्यांनी भाजपाकडे मोर्चा वळवला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच त्यांच्या सहकारी पक्षांचे हिंदूविरोधी धोरण याचा फटकाही काँग्रेसला तसेच त्यांच्या धोरणावर चालणाऱ्या पवारसाहेबांना बसला. आताची पिढी आणि पवारसाहेब यांच्यात एक मोठी वैचारिक दरी निर्माण झाली आहे.* ती दूर करणे तसेच स्वतःवर असलेले बेभरवशी, विश्वासघाती, उपद्रवी, भांडवलदारांना, भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालणार नेता, गरजेनुसार माणसं वापरणे आणि काम झाले की त्यांना कात्रजचा घाट दाखवणे हे जे आरोप त्यांच्यावर सातत्याने होत आहेत त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेला धोका पोहोचत आहे.

जेवढी त्यांच्या गुणांविषयी चर्चा झाली तेवढीच कथित अवगुणांविषयीही झालीय आणि आजही होत आहे. कुणीही व्यक्ती परिपूर्ण नसते. पवारसाहेबांचे विरोधक सुद्धा त्यांना मान देतात तो त्यांच्या बुद्धिमतेला आहे. कुणी काही म्हणो मा. शरद पवारांना तुम्ही नावं ठेवली तरी त्यांचे नाव घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जात येणार नाही. त्यांच्या मुत्सद्दीपणाची झलक आपण आत्ता १०५ आमदार असूनही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवून सेना आणि काँग्रेसला बरोबर घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना पाहिली आहे. आज महाराष्ट्रातल्या खेडी-पाड्यातल्या, वाडी-वस्तीवरील सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते नावानिशी ओळखतात. कोणती व्यक्ती कुठे फिट होऊ शकते हे त्यांना बरोबर माहिती असते. *शरद पवारांना वजा करून तुम्ही दिल्लीत महाराष्ट्र शोधा नाही सापडणार. महाराष्ट्रात तुम्ही त्यांना वजा करूच शकत नाही केलं तर तुमचे गणित चुकलेच म्हणून समजा. हा पवारसाहेबांच्या धोरणांचाच परिणाम आहे.* आज अशा या मोठ्या थोर नेत्याचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या हातून महाराष्ट्र हिताचे राजकारण घडो आणि त्यात त्यांना ईश्वरी साथ मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. ते ईश्वराला मानत नसले तरीही…

धन्यवाद

-किशोर बोराटे