कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत आत्तापर्यंत खूप चर्चा झाली. काल मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांना पत्र लिहून राज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने प्रकल्पाचे काम चालू करण्याचे आवाहन केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प करण्याचे ठरले. पण स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. शिवसेना भाजपाचा सहकारी पक्ष सत्तेत सामील होता. पण नाणारचा विषय यायचा त्यावेळी सेनेची भूमिका नाणार बाबत दुटप्पी होती. भाजपा नाणारबाबत ठाम होती. पण सेना मात्र मंत्रालयात एक भूमिका घ्यायची आणि कोकणातील स्थानिकांच्या समोर वेगळी भूमिका घ्यायची. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्थानिक कोकणवासीयांना भेटले, त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आणि त्यांचे मंत्री मात्र मंत्रालयात फडणवीस यांच्यासमोर नांगी टाकून बसायचे.
अनेक महिने हे असेच चालू होते. अखेर हे सर्व प्रकरण राजदरबारी पोहोचले. त्यानंतर राज यांनी कोकण दौरा केला स्थानिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी तिथेच घोषणा केली की स्थानिकांच्या समस्यांचे जोपर्यंत निराकरण होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प होणार नाही. सरकारने कोकणातील जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या ज्या काही शंका आहेत, त्याचे निराकरण करायला हवे. त्यानंतर तूर्तास तो विषय थांबला. काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यावेळी नेहमीप्रमाणे कोणतीही उघड भूमिका घेतली नाही. तद्नंतर निवडणूका झाल्या.
राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली. गेले संपूर्ण वर्ष कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये गेले. लोकांचे ना व्यवसाय चालू होते, ना नोकऱ्या. सगळं जग थांबलं होतं. ज्यांची हातावर पोटं आहेत, त्यांचे तर खूप हाल झाले. मध्यमवर्गीयांनी जी काही थोडी बचत केली होती, त्यावर कशीतरी वेळ मारून नेली. एका बाजूने आर्थिक संकटाचा सामना करत, राज्य सरकारला दुसऱ्या बाजूने कोरोनाशी दोन हात करावे लागत होते. दरम्यानच्या काळात कोरोनाने अल्पविश्राम घेतला आणि हळूहळू परिस्थिती पूर्ववत होतेय असे वाटत असतानाच कोरोनाने आता परत एकदा आपले रौद्ररूप धारण केले आणि महाराष्ट्रातील जनता संकटात सापडली.
आता परत एकदा कोरोनाने राज्याला विळखा घालायला सुरुवात केली असतानाच राज्यासमोर आर्थिक तसेच बेरोजगारीचे संकट पाय रोवून उभे राहिले आहे. गाडीच्या काचेवर जसे धुके साठून राहिल्यानंतर गाडी चालकाला समोरच रस्ता दिसत नाही. तशी अवस्था राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झाली आहे. अशातच थोडी दूरदृष्टी दाखवून मनसेप्रमुखांनी काचेवरील धुके पुसून नाणार प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन एका तासातच राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा दिली. राज यांनी प्रमुख पक्षाच्या नेत्यांना साद घातली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, भाजपा नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यावरील आर्थिक संकट, बेरोजगारी यावर मात करण्यासाठी म्हणून कोकणच्या पर्यावरणाला धक्का न लागता राज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्प त्वरित चालू करावा यासाठी राज यांनी पुढाकार घेतला आहे.
संबंधित नेत्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की गेल्या काही दिवसांत नाणारवासीयांचा या प्रकल्पाला जो विरोध आहे. त्याची कारणे जाणून त्यांच्या मनातील भीती किती वास्तव आहे आणि या प्रकल्पाचा खरोखरच कोकणच्या पर्यावरणाला काही त्रास होऊ शकतो का? याबाबत हवं तर काही तज्ञ लोकांशी चर्चा करेन. पण प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये अशी भावना व्यक्त केली आहे.
त्यामुळे शासनाने वेळ न दवडता ताबडतोब यावर काम चालू करावे. नाणारवासियांशी मी स्वतः बोलेन. तिथे होणाऱ्या प्रकल्पात स्थानिक कोकणवासियांना व मराठी माणसांना प्रथम रोजगार, नोकऱ्या उपलब्ध व्हायला हव्यात हे मात्र त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच विनाकारण विरोध करणारांना धडा शिकवला जाईल असाही इशारा राज यांनी आपल्या पत्रातून दिला आहे. आज प्रत्येक राज्य आपापल्या राज्यात उद्योग यावेत यासाठी धडपडत असताना, महाराष्ट्राने गाफील राहून चालणार नाही. एवढा मोठा प्रकल्प राज्याच्या हातून गेला तर कधीही भरून न येणारे नुकसान होईल आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे परवडणारे नाही अशी भूमिका राज यांनी व्यक्त केली आहे.
राज यांच्या भूमिकेला भाजपाने तातडीने समर्थन दिले आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज यांच्या भूमिकेचे स्वागत करून सहकार्याची तयारी दर्शवली आहे. राज यांच्या पत्रानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः राज यांच्याशी फोनवर चर्चा करून प्रकल्पाबाबत अनुकूलता दर्शवली आहे. चारी बाजूंनी राज्य सरकार अडचणीत असताना राज्याच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून राज यांनी दूरदृष्टीने नाणार प्रकल्पासाठी सर्वांना एकत्र येण्यासाठी जे आवाहन केले आहे यालाच खरा महाराष्ट्र धर्म म्हणतात.
संकटाने हातपाय गाळून बसण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढायचा याचे राज यांनी फक्त उदा. घालून दिले नाही तर, त्यासाठी त्यांनी पुढाकार देखिल घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापही काही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते राज यांच्या भूमिकेला किती प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल. पण राजसाहेब महाराष्ट्र धर्माला जागले असेच म्हणावे लागेल. आता चेंडू उद्धव यांच्या कोर्टात आहे. सत्तेत ते आहेत. मुख्यमंत्री ते स्वतः आहेत. ते काय प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल. राज्याच्या हितासाठी जसे राज पुढे आले, तसे उद्धव येतील काय?