आम्हाला आमचे प्राधान्यक्रम ठरवू द्या

तिसरा डोळा- भाग ९६

आम्हाला आमचे प्राधान्यक्रम ठरवू द्यात.

गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अनेकजणांना प्राण गमवावे लागले. तर कित्येकजण चांगले बरे होऊन घरी आले. जे सोडून गेले, त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू अजून सुकले नाहीत. या आजाराने आपल्याला आरोग्याचे आणि स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच निवडणुकीत काय काय फुकट देणार हे आश्वासन घ्यायचे की आरोग्य सुविधा काय काय देणार हे आश्वासन घ्यायचे हे समजून आले. प्राधान्यक्रम कशाला द्यायचा हे आता एव्हाना सर्वांच्या लक्षात आलेच असेल.

नको त्या गोष्टी फुकट घेण्याने, हवे ते विकत मिळणे सुद्धा मुश्कील झाले. उत्तम निरोगी आयुष्य किती महत्त्वाचे असते हे समजले. तसेच कोरोनाच्या आधी कुठेही मुक्त संचार करता येत होता. विना मास्क फिरले तरी काही अडचण नव्हती. कुठेही जा, काहीही खा. कुठेही फिरा. कसलीच बंधने नव्हती. हवेतून फुकट ऑक्सिजन मिळत होता. त्याची किंमत नव्हती. आता पैसे देऊनही मिळेना.

राजकीय पक्षांना सुद्धा आता आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे हे समजले असेल. आरक्षण, मोफत पाणी, वीज की ऑक्सिजन? हॉस्पिटल्स, आरोग्य सुविधा? जगण्यासाठी आरक्षण हवे होते. आता मरताना आरक्षण आहे का? ज्यांना आरक्षण आहे, त्यांना कोरोना झाला नाही आणि ज्यांना आरक्षण नाही अशानांच कोरोना झाला असे काही निदर्शनास आले का? गेल्यावर्षीपासून आरक्षण आहे म्हणून कुणाचे जगणे सोपे झाले नाही आणि आरक्षण नाही म्हणून कुणाचे जगणे अवघड झाले नाही.

आपत्ती, आजार, महामारी ही जात, धर्म, आरक्षण, गरीब-श्रीमंत पाहून येत नाही ही बाब जरी लक्षात आली असेल, तरी या महामारीतून आपण खूप काही शिकलो असे समजायला हरकत नाही. जेंव्हा ऑक्सिजन लेव्हल कमी होते ना, तेंव्हा जात, धर्म, आरक्षण, पैसा, श्रीमंती काही उपयोगी येत नाही. आपल्या प्राथमिक गरजा काय आहेत हे लक्षात घ्या. सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना जगायला ऑक्सिजनच लागतो.

ऑक्सिजन कमी होऊन धाप लागते ना, तेंव्हा डॉक्टरांच्या पुढेच हात जोडावे लागतात. त्यावेळी डॉक्टरांच्यातच आपल्याला राम-अल्ला-बुद्ध-गुरुनानक-येशू दिसत असतात. आपल्या प्राथमिक गरजा ओळखा. आरक्षण देणारांना नव्हे, तर ऑक्सिजन देणारांना मतदान करा. आपल्या देवावर आपली श्रद्धा असायलाच हवी. मंदिरे ही आपली श्रद्धा स्थाने आहेतच. कुणी असे म्हणत असेल की मंदिरे नकोत. तर ते चुकीचे आहे. ते आवश्यक आहेच, पण त्याबरोबर इतर पायाभूत सुविधाही अत्यावश्यक आहेत. आम्हाला मोफत काही नको. पण जे अत्यावश्यक आणि आवश्यक आहे, ते कमी पडायला नको.

जनता फुकट काहीच मागत नाही. तुम्ही आश्वासने देता, लॉलीपॉप तुम्ही दाखवता. मोफत वीज द्या म्हणून जनता कधी रस्त्यावर उतरली? मोफत राशन द्या म्हणून जनता कधी रस्त्यावर उतरली? मोफत लसीची कधी मागणी केली? गॅस, पेट्रोल, डिझेल, तेल, डाळी महागल्या तरी मुकाट पैसे देऊन आम्ही आमच्या गरजा भागवत आहोतच. फुकट नको, पण विकत तरी लस द्या. कोरोना होऊन जीव धोक्यात घालण्यापेक्षा आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन लाखो रुपये बील भरण्यापेक्षा आम्हाला लसीसाठी १००-२०० रुपये मोजणे कधीही परवडेल. मग तुम्ही का मोफत लसीची घोषणा करता? एक म्हणतो मोफत द्या, दुसरा म्हणतो देऊ, तिसरा म्हणतो देता येणार नाही. पण आम्ही कधी मोफत लस मागितली हे तरी सांगा? मोफत नको, विकत द्या, वेळेवर द्या आणि मुबलक द्या. पुढच्या जाहीरनाम्यात आम्हाला बदल दिसू द्यात. आम्हाला आमचे प्राधान्यक्रम ठरवू द्यात आणि जे आम्हाला हवे तेच द्या.

धन्यवाद

-किशोर बोराटे