गेल्या आठवड्यात खूप दिवसांनी ननावरे काका-काकी भेटले. हॉस्पिटलमध्ये आले होते. दोघेही वयस्कर, काका रिटायर झालेले. दोघांचीही तब्येत बऱ्यापैकी म्हणजे अगदी सडपातळ पण नाही आणि जाड म्हणावी इतपत पण नाही. तरीही काकी तब्येतीने काकांच्यापेक्षा जरा जास्तच होत्या. मी म्हटलं कसे आहात काका-काकी? काका म्हटले मी उत्तम आहे. या कोरोनामुळे फक्त बाहेर फिरत नाही. पण काकी मात्र सारखी हॉस्पिटलच्या वाऱ्या करत असते. मी आपला महिन्यातून एकदा तब्येत दाखवून औषधे घेऊन जातो. पण काकी मात्र दर आठवड्याला आहेच. मी म्हटलं या चहा घेऊ. आम्ही माझ्या केबिनमध्ये बसलो. चहा मागवला आणि चहा घेतच मी म्हटलं काय होतंय काकींना? काका बोलले, काही नाही, झोप लागत नाही, किरकिर करत बसते. सगळं मानसिक आहे. एवढा वेळ गप्प बसलेल्या काकी लगेच उसळून म्हणाल्या म्हणजे मी काय मुद्दाम करते का? मानसिक म्हणता म्हणजे मी काय वेडी आहे काय? मग मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडा. तुम्ही चांगले, तुमचं पोरगं चांगलं, तुमची सून चांगली. मीच तेवढी वेडी आहे. काका लगेचच काकींकडे बोट दाखवून बोलले, हे असं आहे बघ, काय करायचे?
मी म्हटलं, पण झोप का लागत नाही काकी? कसली काळजी करता? कसली नाही रे, आता चालायचंच. पूर्वी कामं केली की थकून-भागून झोप लागायची. आता काय काम आहे? ताट पुढं आलं की खायचं आणि बसायचं. मी म्हटलं, काकी मग चांगलं आहे की, आयतं ताट येतंय, जेवायचे आणि मस्त मजेत नातवाला खेळवत बसायचे. काकी लगेच उसळून म्हणाली, मला काही गरज नाही कुणाच्या जीवावर आयतं खायची. अजून माझे हातपाय चांगले आहेत. माझं मी करून खाऊ शकते. ही काल आली की लगेच सगळ्या घरावर कब्जा केला आणि आम्हाला अडगळीत टाकलं. आता मात्र काकीचा काय आजार आहे हे माझ्या लक्षात आलं. काकांनी मला डोळ्यांनीच खुणावले. काकांचा चेहरा आणि डोळे एवढे बोलके आहेत की त्यांनी नुसत्या डोळ्याने खुणावले की त्यांना काय म्हणायचे ते समोरच्याच्या लगेचच लक्षात येते. त्यांना पाहिले की अगदी अभिनेते आत्माराम भेंडे यांचीच आठवण येते.
काका बोलले एवढी चांगली सून मिळाली, नाहीतर आजकालच्या पोरी कशा असतात बघतोस ना? पण ही पटवून घेईल तर हराम. ती राऊतांची सून गेली ना पुण्याला नवऱ्याला घेऊन? म्हातारा-म्हातारीला ठेवलं एकट्याला इकडे. ठसका लागला तरी कोण आहे पाणी पाजायला? काय तर म्हणे घरावर कब्जा केला? अरे आता त्यांचा प्रपंच आहे. आपले नेत्र आता पैलतिरी लागले. ठेविले अनंते तैसेचि राहावे….. हे हिला कळत नाही. जाताना काय वर घेऊन जाणारे का सगळं? रात्री डोळे मिटून झोपलीस आणि सकाळी डोळे उघडशील तेंव्हा स्वतःला थेट नरकात पाहशील. सगळं इथंच राहणार आहे असे म्हणून काका जोरजोराने हसू लागले. काकी लगेच रागाने तशी बरी मी एकटी जाईन? तुम्हाला घेतल्याशिवाय मी थोडीच नरकात जाते? मला नरकात पाठवून तुम्ही काय स्वर्गात जाणारे काय? मी तिथ पण येईन. काका लगेच सुनांना छळणाऱ्या सासवांना स्वर्गात जागा नसते असे म्हणत परत जोरात हसले. आता मात्र काकीच्या डोळ्यात पाणी आले. मी म्हटलं काका, बस् की का काकीला त्रास देताय? त्यांचं म्हणणं तरी नीट ऐकून घ्याल की नाही?
मग मात्र काका गंभीर झाले. मला म्हटले हे बघ दोन वर्षांपूर्वी मुलाचे लग्न झाले. तेंव्हा अगदी खुश होती. माझी सून आली, माझी सून आली म्हणून किती कौतुक करत होती. त्याच्या आधी पण माझी सून येऊ द्या, मग बघा मला किती सुख देईल? अगदी इकडचं भांडं तिकडं पण करून देणार नाही. चहाचा कप पण हातात आणून देईल. आता चहाचा कपच नाही तर जेवणाचे ताट पण पुढं आणून देते, तर हिला वाटतं, माझ्या घरावर कब्जा केला. किचनमध्ये मला काही करू देत नाही. कुठल्या भांड्याला हात लावू देत नाही. तिला किती वेळा समजावले, पण तिच्या डोक्यातच शिरत नाही. ऐकूनच घेत नाही. ती जसं बोलली, तसंच आता घडतंय. मग किती आनंदी व्हायला हवं ना? ज्या सुखाची कल्पना तिने केली होती, तेच सुख आज तिच्याजवळ आहे. तर ते पण तिला टोचतंय. बाकी तुला सांगतो *सुखं ही कल्पनेतच सुख देतात. प्रत्यक्षात अवतरली की ती कल्पनेतली ती मजा नाही.* काकी बोलल्या मला काय माहिती होते की ती माझ्याच किचनमधून मला बाहेर काढेल? माझ्याच घरात मीच अडगळीत पडेन? काकींचे दुखणे काय आहे ते मला समजले होते. याच टेन्शनमुळे काकींना झोप येत नव्हती.
बराच वेळ काका-काकी घरी आले नाहीत म्हणून त्यांचा मुलगा सचिन आणि सून शुभांगी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाहायला आले. दोघेही खूप घाबरले होते. सचिन बोलला, तुम्ही इथे गप्पा मारत बसलाय आणि आम्ही किती घाबरलो, म्हटलं आईला डॉक्टरांनी ऍडमिट करून घेतले की काय? मी म्हटलं नाही रे, खूप दिवसांनी भेट झाली. मग बसलो गप्पा मारत. कसा आहेस सचिन? तो म्हटला एकदम उत्तम. शुभांगी तुझं काय चाललंय? ती बोलली काही नाही, घरचीच कामं. खूप वेळ झाला आई आल्या नाहीत म्हणून याला म्हटलं चला बघून येऊ. त्यात बाबा मोबाईल पण घरीच विसरून आले. काकांनी खिसा चापसला आणि हसत म्हटले अरे हो, मोबाईल घरीच राहिला. सचिन आणि शुभांगीला मी म्हटले बसा चहा घेऊ. दोघेही बसले. काका म्हटले, तुम्ही निवांत बसा. आता आम्ही दोघे निघतो. काका-काकी घरी गेले. मी म्हटले काय सचिन काय म्हणतोस? तो बोलला काही नाही, ऐकलेस ना? काय झाले कळत नाही. पण आता आई खूप बदलली. सारखी चिडचिड करत असते. खूप त्रास करून घेते. मग तिला झोप नीट लागत नाही. झोप नीट न झाल्याने परत चिडचिड होते.
आता शुभांगी पण बोलायला लागली. ती म्हटली माझं काय चुकत असेल तर सांगा म्हटलं तर ते ही सांगत नाहीत. तरी त्यांचे मन दुखावले जाऊ नये म्हणून मी खूप काळजी घेते. कसलेच काम त्यांना करू देत नाही. सगळं काही त्यांच्या हातात देते. मी तिला म्हटले, हीच तर तुझी मोठी चूक आहे. ती बोलली, मग अजून मी काय करायला हवं? मी सचिनला म्हटलं काकींचे दुखणे मानसिक आहे. हे बघ, तू काय किंवा मी काय? आपले लग्न होत नाही तोपर्यंत आपल्या घरातले सगळे निर्णय आपले आई-वडील घेत असतात. बाहेरची कामं वडील करतात. घराची मालकीण आई असते. घरात तिच्या शब्दाला वजन असते. घरात तिचा अधिकार चालत असतो. हळूहळू आपण मोठे होतो, वडिलांची कामं आपण करू लागतो. आपली जबाबदारी आपला मुलगा वाटून घेतोय. पोरगं हातातोंडाशी आलं. बाप म्हणून त्याचा त्यांना खूप अभिमान वाटत असतो. मग आई सुद्धा सुनेची स्वप्नं पाहायला सुरुवात करते. पोराचं लग्न होईल. माझी सून येईल. मग मी निवांत होईन. ती माझी सेवा करेल वगैरे वगैरे…..
सचिन, शुभांगी पण एक लक्षात घ्या. शुभांगी माझे वाक्य तोडतच म्हटली अरे पण मग आता मी हे सगळं जबाबदारीने करतेय ना? सचिन पण पाहतोय. मी म्हटलं अगं तू करतेस, तो पण करतोय. हे मी पण पाहतोय. पण याची दुसरी बाजू तुम्ही लक्षात घेत नाही आहात. दुसरी बाजू म्हणजे? कोणती दुसरी बाजू? सचिनने प्रश्न केला. मी म्हटलं जिथं आईचा म्हणजे काकीचा अधिकार चालायचा ते क्षेत्र आता शुभांगीच्या ताब्यात गेलं ना? सुनेकडून सेवा करून घेण्याच्या बदल्यात आपली वतनदारी, आपली जहागिरी जाईल याची तेंव्हा कल्पना काकींना नव्हती. ती आत्ता आली. वतनदारी, जहागीरी हे तू काय बोलतोस? शुभांगीने प्रश्न केला. मी म्हटलं यासाठी तुला काकीच्या ठिकाणी उभे राहून विचार करावा लागेल आणि काकीला तुझ्या ठिकाणी उभं राहून विचार करावा लागेल. आता काकींचे वय, शिक्षण आणि स्वभाव पाहता त्यांच्याकडून ही अपेक्षा धरणे शक्यच नाही. मग दोन्हीची जबाबदारी शुभांगी तुलाच घ्यावी लागेल. अरे तू स्पष्ट बोल ना? शुभांगी ओरडली. मी म्हटलं हे बघ, एक सून म्हणून तू घरातली जास्तीत जास्त जबाबदारी उचलतेस. काकींना कसलाही त्रास पडून देत नाहीस. काही काम करून देत नाहीस. सगळं हातात देतेस. किचनमध्ये, घरात त्यांना काडीचे काम करून देत नाहीस. त्यांना कसलाच त्रास होऊ देत नाहीस. सगळं काही तूच बघतेस. बरोबर ना? ती हो म्हणाली.
हेच पूर्वी काकी करायची. आता तू करतेस. त्यामुळे मग काकीला आता तिचे अधिकार क्षेत्र गमावल्याचे आणि ते तू घेतल्याचे दुःख झालेय. तिला आता असे वाटते की घरात सगळे तूच निर्णय घेतेस. मला काही अधिकारच राहिला नाही. मी म्हणजे अडगळीत पडलेय. मला काही किंमतच नाही. निर्णय प्रक्रिया त्यांच्याकडून तुमच्याकडे आली. शुभांगी उसळून बोलली, अरे पण….. मी म्हटलं अगोदर ऐकून घे. जशी जशी तू पुढं आलीस, तशी तशी ती मागे कधी गेली हे तिलाही कळले नाही आणि तुम्हालाही कळले नाही. आता तिला ते समजले. आत्तापर्यंत ते तिचे अधिकार क्षेत्र होते. ते गमावल्याची सल, भावना, दुःख तिच्या मनात खोलवर आहे. सचिन आमची चर्चा गप्प राहून ऐकत होता. नक्की कुठं चूक होतेय हे त्याच्या लक्षात आलेय. त्याच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत होते. समजलं का तुला शुभांगी? ती म्हटली हो रे, तू म्हणतोस ते खरे आहे. एवढा वेळ शांत बसलेला सचिन म्हटला. अरे हो रे आईचे दुःख समजले. पण मग आता काय करायचे? शुभांगी पण म्हटली हो रे, काय करता येईल की आईंच्या डोक्यातून हे सर्व निघून जाईल? सचिनने प्रश्न विचारला की आता मुलगा म्हणून जेंव्हा मी सर्व गोष्टी पुढे होऊन करतो तर मग बाबांना कधी असे का कधी वाटले नाही? मी म्हटलं बाबा समजदार आहेत. त्यांनी जग पाहिलंय. सरकारी नोकरी करून रिटायर झालेत.
आईचे तसे नाही. त्या चार खोल्या, ते किचन म्हणजे तिचे जग होते. सचिन ही स्वकष्टाने, स्वाभिमानाने जगलेली लोकं असतात. या वयात आता त्यांना काम होत नाही आणि बसून खाणे त्यांच्या स्वभावात नसते. आपण त्यांना जास्तीत जास्त सुखी ठेवण्याच्या कल्पनेने म्हण किंवा ते आता थकलेत. आता सर्व व्यवहार आपल्या हातात आलेत. मग त्यांना काय विचारायचे? त्यांना काही मत नाही आणि त्यांच्या मताची आपल्या लेखी काही किंमत नाही. असे वेगवेगळे समज करून घेऊन त्यांना काही सांगत नाही. विचारत नाही. त्यांना गृहीत धरून चालतो. ते एकदम चुकीचे आहे. त्यांना एकाकी पडू द्यायचे नाही. त्यांच्या मोठेपणाला कधी आव्हान द्यायचे नाही. ते एकाकी पडले की मग हे असे *समज-गैरसमज* निर्माण होतात. जे काही करायचे ते त्यांना विचारून, मोठेपणा देऊन करायचे. आमची मुलं आम्हाला विचारल्याशिवाय काही निर्णय घेत नाहीत अशी त्यांना खात्री वाटायला हवी. कोणतीही गोष्ट करायला ते तुम्हाला अडवणार नाहीत. पण घरातील मोठ्या माणसांचा मान हा त्यांना द्यायलाच हवा. त्यांच्या हयातीत त्यांचे कुटुंबप्रमुख हे पद कधी काढून घ्यायचे नाही. उद्या आपल्याला पण याच रस्त्याने जायचे आहे. त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून पहा. मग तुम्हाला त्यांचे दुःख कळेल.
शुभांगी आणि सचिनच्या डोळ्यात पाणी आले. ते दोघेही म्हटले, थँक्स यार, खरंच आज आमची चूक आम्हाला कळली. आज इथं आलो नसतो तर ती कधीच कळली नसती. शुभांगी सचिनकडे पाहून म्हटली,जरा मोबाईल दे, तिने तडक घरी फोन लावला आणि म्हटली बाबा, आईकडे फोन द्या ना. आई, रात्रीच्या जेवणाला बासुंदी आणू का? पलिकडून काकूने हो म्हणून सांगितले असेल. ती हसतच म्हटली चल आईने बासुंदी आणायला सांगितली आहे असे म्हणून ते गेले आणि बरोबर आज आठ दिवसांनी काकांचा फोन आला त्यादिवशी तुझ्याकडे आम्ही आलो आणि त्या दिवसापासून घरातले वातावरण एकदमच बदलले. तुझी काकी आता एकदम खुश आहे. आता चिडचिड करत नाही. झोपेच्या गोळ्यांची देखिल तिला आता गरज पडत नाही. सगळे *समज-गैरसमज* बघ. मी म्हटलं असे नाही काका, आमच्या पिढीने थोडं समजून घेतलं, तर मग असे गैरसमज होणार नाहीत. सगळं आम्हालाच कळतं या मानसिकतेतून आमच्या पिढीलाही बाहेर यावे लागेल. आम्ही कितीही मोठे झालो तरी आई-बापापेक्षा मोठे होऊ शकणार नाही हे वास्तव आम्हीही स्विकारायला हवे असे म्हणून मी फोन ठेवला.
धन्यवाद
-किशोर बोराटे
खुपच छान कथा. लेखकाने एका घडलेल्या प्रसंगाचे वर्णन खूप खूप समर्पक रीतीने केलेले आहे. या कथेमुळे सध्याच्या काळात मुलगा वडील सासु सुना सासरे किंबहुना सर्वच नातेसंबंध सुधारण्यासाठी वाचकांकडून प्रयत्न केले जातील. वाचकांना अंतर्मुख करावयास लावणारी अशी ही उत्तम कलाकृती प्रथितयश लेखक श्रीयुत किशोर बोराटे यांनी सादर केल्याबद्दल त्यांचे आभार.