दिलया घरी तू सुखी रहा

*दिल्या घरी तू सुखी रहा*
-डॉ. स्मिता दातार.

आज माझी जुनी फोर्ड फिगो गेली. गेली म्हणजे काढून टाकली. विकली……म्हणायला जीव धजावत नाही. व्यवहार म्हणून विकलीच खरी. ठेवायला जागा नाही, शिवाय गाडी नुसतीच उभी राहणार , त्यावर उगीच खर्च नको म्हणून आमच्याच विश्वासातल्या एका गाड्यांच्या व्यापाऱ्याला विकली. त्याला द्यायचं कारण म्हणजे त्याची गाड्यांची शो रूम आहे . तिथून ती चांगल्या ठिकाणी जाईल, सुस्थळी पडेल, अशी आशा.पण मनाला यातना झाल्याच. आपली प्रत्येक प्रिय गोष्ट आठवणींच्या शिंपल्यात अडकते, मोती होते आणि मनाच्या समुद्रातल्या तळाशी खोल जाऊन पडते…… तरी ती नजरेसमोर नाही म्हणून जे क्लेश होतात, ते झालेच शेवटी. त्या वस्तूच्या रंग, गंध, पोतात आपण मिसळलेले असतो ना म्हणून की काय कोण जाणे? सहवासात येणाऱ्या प्रत्येक सजीव आणि निर्जीवावर प्रेम करणारी मी, स्वयंपाकघरातल्या चमच्या पासून ब्यांकेत पडून राहिलेल्या दागिन्यांपर्यंत , कामाला असलेल्या मोलकरणी पासून कुंडीतल्या हळव्या रोपापर्यंत …प्रत्येकात जीव गुंतवणारी मी, आज माझ्या गाडीची पाठवणी करताना माझा जीव घश्यात गोळा झाला होता .खर म्हणजे नवी गाडी येऊन केव्हाचीच दिमतीला हजर झाली होती. पण नवी वीण विणताना पहिले लागेबांधे उसवतात थोडेच ?
देखणी होती माझी फोर्ड फिगो.तकतकीत हिरव्या अंगाची , त्याला साजेसं इंटीरियर , लोण्यासारखं इंजिन, बदलला तरी कळणार नाही असे मऊसूत गीयर , मजबूत सस्पेन्शन . आकाराने छोटी असून पाय जमिनीवर घट्ट रोवून चालणारी. मुलांना शाळा –क्लास ना पोहोचवण , आणणं. त्यांची मागच्या सीट वर चालणारी मस्ती ते त्यांनी जिंकलेली बक्षिसे , ट्रोफीज सगळच अनुभवलं या गाडीन. २६ / ११ च्या पावसात कित्येकांची सुखरूप सोडवणूक केली होती तिने. सासऱ्यांच्या गुडघ्याच्या ऑपरेशन च्या वेळी माझ्या बरोबरीने धावपळ करत होती ती. लग्नाला वीस वर्ष झाली तरी नवथर प्रेम जपत हिलाच घेऊन bandstand ला रोमांटिक ड्राईव ला जात होतो. आज आठवणींची फुलपाखर उडत होती. पहिल्यांदा बस तिला घासून गेली आणि जो ओरखडा उमटला तो तिच्यावर नव्हता , तर तो थेट माझ्या मनावर उमटला. हळहळले मी. दोन वर्षात एक चराही उमटू दिला नव्हता मी तिच्यावर. तिच तेलपाणी , तिची स्वच्छता यावर जातीने लक्ष असायचं माझं. आतला सुंदरसा एयर फ्रेशनर माझ्या फिगोचा गारवा अधिकच सुगंधी करायचा. dashबोर्ड वरचा पांढरा शुभ्र गणपती बाप्पा खास तिच्यासाठी मी शोधून आणला होता.
माझ्या फिगो वरच मुल गाडी चालवायला शिकली. त्यांचही प्रेम बसलं होत तिच्यावर. सगळयांच्या हातात ती हळूहळू रुळली आणि जुनी पण झाली. मग कधी तिच्या पत्र्याचं , कधी काचांचं काम निघायला लागलं . हिच्यावर आता खर्च करण्यापेक्षा नवी गाडी घ्या, असं मेकेनिक पासून घरातल्यांपर्यंत सगळे सुचवायला लागले आणि मन एकदम माझ्या आजोळी रत्नागिरीला पोहोचलं.
आजोबा भाकड गायीला कसायाला विकायला अजिबात तयार नसायचे. ताम्बू खाईल थोडा चारा एवढ्या गोतावळ्यात. काय झालं राहिली तर ? शेण देईल, गोमूत्र देईल. इतकी वर्ष दिल ना दूध तिने ? चांदी नि कपिलाला सोबत करेल ती गोठ्यात. घरातली माणस थकली, काम करेनाशी झाली की विकतो का आपण ? आजोबा कडाडायचे . आजी ताम्बुच्या अंगावरून मायेचा हात फिरवायची. ते भाबड जनावर मग पुढे कधीतरी आजोबांच्या शेतातच मिसळून जायचं. यथावकाश शेतीवाडी, गोठे कमी झाले. मामा मुंबईहून जाऊन येऊन कसाबसा शेताचा तुकडा सांभाळायला लागला. आजोबा आजींचा कापूस कधीच ढगात विरला होता आणि मामाला दुभती न राहिलेल्या जनावरांची पाठवणी करण्यावाचून पर्याय उरला नाही. कधी दान तर कधी व्यवहार . सगळ्यांनी त्याला समजून घेतलं. चूक की बरोबर याचा जबाब परिस्थितीच देत असते ना?
मी फिगो च्या कपाळाला कुंकू रेखलं. औक्षण केलं. एकदा तिच्या अंगावरून मायेचा हात फिरवला. ताम्बूचं अंग थरथरायचं , तशी थरथर उगीचच फिगो च्या चकचकीत पत्र्यात जाणवली. डोळे भरून आले. “ सुखी रहा ग बायो…. “ , मनातल्या मनात पुटपुटले . अशीच एक दिवस मुलीची आणि मुलाची पण पाठवणी , त्यांच्या जोडीदारांबरोबर करायचीये, याची गाठ बांधली आणि तो हिरवा ठिपका वळणावरून दिसेनासा होईपर्यंत डोळ्यातल्या धुक्याआड पहात राहिले

एक प्रतिक्रिया