हे हे हें! माझा पण बु (bu) झाला : 20-20 Love Story

मी नंदकिशोर बोलतोय. आठवले का, आपण कॉलेजला एकत्र होतो. होस्टेललासुद्धा तुझ्या रूमशेजारीच माझी रूम होती. आता बरेच दिवस भेट नाही, पण तुझी आठवण मला रोज येते आणि आज तर तुझी आठवण प्रकर्षाने झाली. म्हणून तर तुला आज फोन केला आहे. तुझ्या गळ्यात गळा घालून रडावसं वाटतय.’
‘अरे, एवढं काय झालं रडायला. आभाळ कोसळल्यासारखाच बोलतोयस.’ मी म्हणालो.
‘अरे यार, आभाळच कोसळलय माझ्यावर. काय करावे काही कळत नाही. मन सुन्न झाले आहे. जेवण जात नाही. झोप लागत नाही. आपल्या जिंदगीत आता काही राम राहिला नाही.’
‘अरे नंद्या, एवढा का वैतागला आहेस? तुझा काय प्रॉब्लेम आहे ते तरी सांग. वहिनी बऱ्या आहेत ना? मुले बरी आहेत ना? का तुझ्या बिजनेसमध्ये खोट आली आहे? का तुझी नोकरी गेली? काय झालंय काय तरी तुला?’
”मित्रा, हे सगळं चांगलं आहे रे, पण माझा ब्रेकअप झालाय. तेव्हापासून मेंदू चीनभिन झालाय. जिच्यासाठी जगत होतो तीनेच मला सोडलं. विहिरीत उडी टाकून किंवा औषध खाऊन सगळं संपवावसं वाटतंय.’
‘अरेच्या! म्हणजे तुझा ब्रेक-अप झालाय. माझा पण ‘बु’ झालाय.’ मी म्हणालो.
‘काय झालाय म्हणालास, बु झालाय म्हणजे काय झालाय?’
‘नंदकिशोर मित्रा, उद्या संध्याकाळी माझ्याकडे ये. जेवायलाच ये ना. बरेच दिवस भेटलाही नाहीस, गप्पा-टप्पाही होतील आणि माझ्या ‘बु’ची कहाणीही मी तुला सांगेन.’
‘मनमोहन, आत्ताच सांग ना ती कहाणी. बु ची कहानी म्हणजे काय? मला तर तू कोड्यातचं टाकलेस. आत्ता सांग, नाहीतर रात्री माझी झोप नाही लागणार.’ नंदू म्हणाला.
‘सांगतो, सांगतो मित्रा, परंतु फोनवर सांगण्यासारखी नाही ती. प्रत्यक्ष भेटीतच बोलू. तोपर्यंत तू शांत रहा. काही विचार करू नकोस. काही काळजी करू नकोस.’

दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजता माझा मित्र नंदकिशोर माझ्या घरी आला. घरातील सर्वांची ओळख मी त्याला करून दिली. चहापान झाले.
‘बु कुठे आहे? कोण आहे ती? सांग ना लवकर.’ नंदू मला म्हणाला.
‘अरे यार, सांगतो ना. सायंकाळचे क्लोजिंग करून येतो. त्यानंतर जेवण करू आणि निवांत गप्पा मारत बसू. रात्र आपलीच आहे. घाई कशाला करतोस.’
‘बरोबर, पण बु म्हणजे काय रे.’
‘नंद्या, पुन्हा पुन्हा बुबू करू नकोस. सांगतो म्हटले ना. जरा दम धर.’
असे म्हणून मी दुकानामध्ये गेलो. सायंकाळचा हिशोब आणि इतर कामे उरकून मी घरी आलो. निता जेवणासाठी आमची वाटच पाहत होती. जेवणखाण आटोपून आम्ही बागेमध्ये फिरावयास गेलो.

रात्रीची वेळ होती. चांदणे मस्तच पडले होते. बागेतील झाडे टवटवीत वाटत होती. काही झाडांवर फुले डोलत होती. काही फुलावर पाणी तरळत होते. चांदण्याच्या मंद प्रकाशात ते चमचमत होते. रातराणीचा सुगंध तर घमघमीत येतच होता. बागेच्या मध्यभागी गणपतीचे मंदिर आहे. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराभोवती आम्ही गप्पा मारत मारत फेऱ्या मारत होतो. त्यानंतर आम्ही दोघे देवळासमोरील बाकड्यावर बसलो. बसल्या बसल्या नंदू म्हणाला, ‘बु कुठे आहे?’
‘अरे सांगतो मी तुला. परंतु तुझा काय प्रॉब्लेम झाला ते अगोदर सांग.’

मनमोहन मित्रा, मी माझ्या बिजनेसबरोबरच मुंबईला आठ वर्षांपासून कंपनीमध्ये जॉब करत आहे. मी कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर पंधरा दिवसातच आमच्या डिपार्टमेंटमध्ये एक महिला कर्मचारी दाखल झाली आणि तिला पाहताच मी घायाळ झालो. माझ्या मनात विचार आला, इतकी वर्षे जिची मी वाट पाहत होतो, तिच ही. सडपातळ बांधा, सर्वसाधारण उंची, गौरवर्ण, पांढरेशुभ्र तेजस्वी डोळे, एकदम आकर्षक वाटावे असे तिचे रूप होते.’
‘ अरे पण, तिला नाव होते की नाही.’
‘ सॉरी, नाव सांगायचं विसरलोच. नूतन. नूतन ज्ञानेश्वर कथापे. ऑफिसमध्ये माझ्या टेबलसमोरच तिचा टेबल होता. ऑफिसमध्ये आल्यानंतर मी माझी कामे पटापट उरकून तिच्याकडे पाहातच बसावयाचो. ती मात्र सारखी कामात मग्न असावयाची. तिच्याशी कसे बोलावे, हाच मला प्रश्न पडला होता. एकदा मात्र मी तिच्याकडे टक लावून पहात असताना तिचे लक्ष माझ्याकडे गेले आणि तिने मला तत्क्षणीच स्माईल दिले. माझ्या हृदयात धस्स झाले. एक अनामिक शिरशिरी माझ्या अंगातून सळसळत गेली. मित्रा, तिच्या एका कटाक्षाने मी घायाळ झालो होतो. नंतर ती काम करता करता माझ्याकडे चोरून पाहू लागली होती. अशा प्रकारचा खेळ बरेच दिवस चालला होता. नंतर मीच डेअरिंग करून तिच्याशी बोलायला सुरुवात केली.’
‘मॅडम, आज ऑफिस सुटल्यानंतर मी तुम्हाला कॉफी शॉपमध्ये कॉफी देणार आहे.’
‘पण कशाबद्दल?’
‘काही नाही, पण ऑफिसमध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे. मला आवडले सर्व.’
‘तिने मानेला एक हलकासा झटका देत ओके म्हटले. पुन्हा माझ्या अंगात शिरशिरी. अशाप्रकारे आमचे कॉफी शॉपमध्ये भेटणे हळूहळू वाढत गेले. एकमेकांची माहिती झाली, स्वभाव जुळत गेले, आवडी-निवडी जुळत गेल्या. आमचे ऑफिस नरिमन पॉइंटला आहे. तेथून समुद्र जवळच आहे. ऑफिस सुटल्यानंतर आम्ही तेथे फिरावयास जात होतो. मज्जाच मज्जा करत होतो. अरे काय सांगू तुला, अफलातून होती नूतन. तासन-तास गप्पा मारत बसायची. गप्पा मारण्याचा तिला अजिबात कंटाळा येत नव्हता आणि गप्पा मारायला तिला विषयही लागत नव्हते. अरे कुठल्याकुठे विषय जायचे आम्हालाच कळायचं नाही. नरिमन पॉईंटवर समुद्राकडे पहात आमचा वेळ कसा जावयाचा हे कळायचंच नाही. परंतु अंधार पडायला लागला की, हा अंधार पडूच नये असं वाटायचं, कारण अंधार पडला कि आम्हाला घरचा रस्ता धरायला लागायचा. ती राहायला बांद्र्याला होती आणि मी वाशीला. त्यामुळे आमचे मार्ग वेगळे होते. एकमेकांना बाय करताना आम्हाला खूप त्रास होत होता. आमची मैत्री प्रेमात बदलली होती. एकमेकाशिवाय रहायचे नाही, असे आम्ही ठरवले होते. परंतु ऑफिसचा एक निर्णय आमच्या प्रेमाच्या आड आला. तिला ट्रेनिंगसाठी दोन वर्षे मिरत येथील हेड ऑफिसला जाण्याची ऑर्डर निघाली होती. तिने चक्क नकार दिला होता, परंतु तरीही तिला ती ऑर्डर स्वीकारावी लागली, कारण जॉब तर टिकवावयाचा होता. जड अंतःकरणाने तिने मिरत गाठले. रात्री आम्ही बराच वेळ फोनवर बोलत होतो. तिची एक गम्मत तुला सांगतो, माझे जेवन संपत आल्यावर तिला फोन करायचा, अशी तिची मला ऑर्डरच होती. मी फोन केल्यानंतर माझ्यासाठी माझे पाच घास खा, असा हट्ट ती धरायची. मित्रा, दोन वर्षे खूप खडतर गेली. तिला पाहिल्याशिवाय माझा एकहि दिवस जात नव्हता, परंतु ही दोन वर्षे मी कशी काढली, हे माझे मलाच माहीत. सुट्ट्या जोडून आल्या तर मी मिरतला जात होतो. तिला भेटत होतो. गप्पा-टप्पा होत होत्या. मिरतमध्येही आम्ही खूप मजा केली.’
‘ दोन वर्षांचे ट्रेनिंग संपवून ती परत आमच्या ऑफिसमध्ये जॉईन झाली. रोज घरी जाताना ट्रॅफिकचा खूप त्रास व्हायचा, त्यामुळे मी कार घ्यावयाचे ठरवले होते. मी सेंट्रो कार पसंत केली होती, परंतु तिची इच्छा इनोव्हा घेण्याचीच होती. माझ्याकडे काही पैसे साठलेले होते, परंतु तेवढ्याने काही कार खरेदी करता येणार नव्हती. मला कर्ज काढणे गरजेचे होते. मला माझ्या सर्व्हिसवर फक्त पाच लाख कर्ज मिळत होते. या संकटात ती माझ्या पाठीशी उभी राहिली. तिने तिच्याकडील दोन लाख तर दिलेच परंतु त्याशिवाय तिच्या नावावर पाच लाख रुपये कंपनीतून कर्ज काढले. खरेतर इनोव्हा कार, कार लोन करून घेऊ शकलो असतो, परंतु कंपनीचा व्याजदर अगदीच नगण्य होता, म्हणून मी तो मार्ग स्वीकारला होता. अशाप्रकारे आम्ही पैसे जमा करून इनोव्हा कार घेतली. कार घेतल्यानंतर आमचे फिरणे भरपूर वाढले. विकेंडला आम्ही नॅशनल पार्क, कधी गेटवे ऑफ इंडिया, कधी हाजी अली, महालक्ष्मी, कधी सिद्धिविनायक तर कधी लोणावळा असे फिरत होतो. तिचा आणि माझा स्वभाव परफेक्ट जुळत असल्यामुळे आमचे दिवस आनंदात जात होते. अरे, नूतन खूप हरहुन्नरी होती. हसणारी होती, खेळणारी होती, बागडणारी होती, खोडकर होती, रुसणारी होती, पण तिचा रुसवा फार काळ टिकत नव्हता. मी सॉरी म्हटले की, पुन्हा तिचे हसणे खिदळणे सुरूच. तिला पावसात भिजायला खूप आवडायचे. आम्ही लोणावळ्याला खूप वेळा पावसात भिजलो आहे. तिला आईस्क्रीम खूप आवडते. उन्हाळ्यात तर ती आईस्क्रीम खात होतीच, पण भर पावसातसुद्धा आईस्क्रीमची मजा घेत होती. तिला सर्वच रंग आवडत होते, परंतु पांढरा रंग तिच्या खास आवडीचा होता रे. पांढऱ्या ड्रेसमध्ये किंवा पांढर्‍या साडीमध्ये एवढी खुलून दिसायची की, मला सिंड्रेलाची आठवण यायची. तिला पिक्चर पाहायला फार आवडायचे. दक्षिण मुंबईतील एकही चित्रपटगगृह आम्ही सोडले नव्हते.’
‘अरे वा! खुपच छान चाललं होतं तुमचं, मग बिघडलं कशात?’
‘आम्ही लग्न करायचं ठरवलं. मी माझ्या घरी, तर तिने तिच्या घरी हा निर्णय सांगायचा होता. मी घरीं सांगितल्यानंतर सुरुवातीला खूप विरोध झाला. नूतनशी लग्न केल्यानंतर काय काय प्रॉब्लेम्स येतील, हे मला दादांनी पटवून सांगितलं. परंतु मी माझा हट्ट सोडला नाही. नूतनशी लग्न केल्यानंतर आपले कुटुंब कसे सुखी होईल, हे मी दादांना पटवून सांगत होतो. दादांना मला नाराज करणे आवडत नाही, म्हणून नाविलाजाने त्यांनी परवानगी दिली. हा निर्णय मी नूतनला सांगितला, तशी ती खूष झाली. मी तिला विचारले, ‘तुझ्या पप्पांनी पण परमिशन दिली असेल. अरे नाही रे, अजून मी पप्पांना विचारलेच नाही. कसं विचारावं तेच कळत नाही. तरीपण या रविवारी मी विचारणारच आहे.’ सुदैवाने एक दिवस अगोदर तिच्या पप्पांचा फोन आला. तिच्यासाठी त्यांच्या जवळच्या नात्यातलं एक स्थळ आलं होतं, परंतु तिने ते नाकारलं. मी माझा जोडीदार शोधला आहे असं पप्पांना सांगितलं. त्याक्षणीच पप्पांचा पारा चढला आणि नूतनला खूप काही बोलले. रविवारी तिच्या भावाचा फोन आला, त्याने पण तिला धमकी दिली. आम्ही दोघे खूप विचारात पडलो. कसं होणार, काय होणार. परंतु लग्न करावयाचे यावर आम्ही ठाम होतो.’
‘तिचा भाऊ, आई, वडील, चुलते, चुलती एक दिवस माझ्या रूमवर आले. त्यांनी मलाही धमकी दिली.नको नको ते बोलले. यापुढे एकमेकांच्या संबंधात राहाल तर मुडदे पडतील, असे भाऊ म्हणाला. परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. आमच्या भेटी सुरूच होत्या.’
‘पंधरा दिवसानंतर आम्हाला पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं. तेथे तिच्या आई-वडिलांनी तक्रार नोंदवली होती. पोलीस स्टेशनला आमची दोघांची सेपरेट स्टेटमेंटस् घेतली गेली. आम्ही दोघे प्रेम करत आहोत आणि आम्ही लग्न करणारच हे मी लिहून दिले. परंतु आईवडिल आणि भावाच्या धमकीपुढे नूतनने हार खाल्ली. तिने पलटी मारली. पोलिसांसमोर तिने लग्न करण्याचा अजिबात विचार नसल्याचे सांगितले. मला तर शॉकच बसला. माझ्याच माणसाने माझा गळा कापला होता. पोलीस स्टेशनला आमच्या नातेवाईकांसमोर मला शरमेने मान खाली घालावी लागली. फार मोठा आघात झाला माझ्या मनावर. अजुनही त्यातून मी सावरलेलो नाही. म्हणून मी तुला म्हटले की, जीवन नको झाले आहे. आत्महत्या करावी असे वाटत आहे. तिच्याशिवाय मी जगूच शकत नाही रे.’

नंदू, खूप वाईट झाले तुझ्या बाबतीत. परंतु मीही तुझ्यासारखाच आहे. तुझ्यासारखाच माझा पण बु म्हणजे break-up झाला आहे. माझ्या दुकानातील एका महिलेबरोबर माझे प्रेमसंबंध जुळले होते. ज्याला आपण परफेक्ट मॅच म्हणतो अशी आमची जोडी जमली होती. तिचे खरे नाव यशश्री होते, पण मी तिला राणीसाहेब किंवा राणीसरकार म्हणत होतो. अनेक वर्षे आमचे छान चालले होते. परंतु तीन महिन्यांपासून अचानकच ती दुकानांमध्ये यावयाची बंद झाली. मी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो परंतु तिचा फोनच लागत नव्हता. मला काहीच कळत नव्हते. काय झाले असेल, कुठे गेली असेल, कोणी धमकी दिली असेल का. अशा विचारातच पंधरा दिवस तडफडत गेले. एका दिवशी अचानक तिचा फोन आला. ‘आता आपण वेगळे होऊ या. मला फोन करत जाऊ नका. माझ्या मुलांनाही फोन करू नका.’ ही तीनच वाक्ये तिने उच्चारली आणि फोन बंद केला. तुझ्यासारखाच मी घायाळ झालो. जेवण नकोसे होऊ लागले. झोप लागेनाशी झाली. एका महिन्यांमध्ये तीन किलो वजन कमी झाले. सारखे तिचेच विचार येत होते. काय झाले असेल, कसे झाले असेल, हा निर्णय का घेतला असेल,कोणी ध्यायला लावला असेल. आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आम्हीही आणाभाका घेतल्या होत्या. सारं सारं खोटं ठरलं रे. अनेक वेळा मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. मला त्या गाण्याची आठवण आली. तुच जोडीशी, तुच तोडीशी, कुरवाळिसि तू, तूच ताडीसी। हे विठ्ठला पांडुरंगा, कशासाठी आमची भेट घडवून आणलीस आणि कशासाठी आमची ताटातूट केलीस.’ असं माझ्या मनालाच मी विचारत होतो. कारण हा विषय मी दुसऱ्या कोणाजवळच बोलू शकत नव्हतो.

एके दिवशी मी ध्यान करीत असताना अचानकच मला मी बनवलेल्या व्हिडिओची आठवण झाली. ब्रेकअप झालेल्यांसाठीच मी तो बनवलेला होता. होऊ नये परंतु ब्रेक-अप झालाच, तर त्यावर काय उपाय करावेत हे अगदी ठसठशीतपणे आणि सविस्तरपणे मी सांगितले आहे. व्हिडिओ मी पुन: पुन्हा पाहिला आणि माझे मन शांत झाले. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेच आहे. आठ ते पंधरा दिवस पुन्हा तडजोडीचा प्रयत्न करावयाचा. पंधरा ते एकवीस दिवसपर्यंत जवळच्या व्यक्तींशी चर्चा करावयाची, म्हणजे आपले मन मोकळे होते. जर कोणाही व्यक्तींना सांगता येत नसेल तर रोजनिशीमध्ये लिहून आपले मन मोकळे करावयाचे. मी तसेच केले. एकवीस दिवसानंतर मात्र मी फाईल क्लोज करून टाकली. ‘आगे की सोच.’ अरे या जगामध्ये ईश्वराने जोड्या बनवलेल्या असतात आणि त्याचा कालखंडही त्यानेच ठरवलेला असतो, अशी माझी मनोमन खात्री झाली आहे. ईश्वराचे आभार मानावयाचे. मला यातून तू लवकर मोकळे केले आहेस. ज्यावेळी नाती ही त्रासदायक होतात, दुःखदायक होतात तेव्हा ती तुटलेलीच बरी असतात. फाईल क्लोज केल्यानंतर तिच्या आठवणी, फोटो, व्हिडिओ, मॅसेजेस सर्व सर्व डिलीट करून टाकावयाचे. फक्त मोबाईलमधूनच नव्हे, तर मनातूनही काढून टाकावयाचे. मित्रा, मला माहित आहे की हे काम फार अवघड आहे, परंतु हेही मला माहित आहे की, ‘हे अशक्य नाही.’ अनेकजणांनी ब्रेकअप झाल्यानंतर असेच करून पुन्हा उभारी घेतलेली आहे. मी माझे मन, माझ्या दुकानातील कामात गुंतवत राहिलो. रोज दोन तास अधिक काम करत राहिलो. कामात असलो म्हणजे हे विचार मनाला शिवत नसतात. माझ्या आवडीनिवडीकडे बरेच दिवस मी लक्ष दिले नव्हते. ज्या माझ्या छंदांकडे लक्ष दिले नव्हते ते म्हणजे वाचन, लेखन, गायन यात मी स्वतःला गुंतवून घेऊ लागलो.’

‘तु हे कसे काय करू शकतोस. मला तर अजून त्यातून बाहेर पडावेसे वाटत नाही. ती कधीतरी येईल. ती माझी होईल, या विचारातच मी गुरफटून गेलो आहे.’

नंदकिशोर, सांगितल्याप्रमाणे कर. ही फाईल क्लोज करून टाक आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे आणि आरोग्याकडे लक्ष दे. ज्याप्रमाणे देव तोडतो, त्याप्रमाणे तो जोडतो, हे लक्षात ठेव. आपल्या जीवनामध्ये कोण अत्यंत महत्त्वाचे आहे, हे तुला माहित आहे का? आपले आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी, प्रेयसी हे आपले अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे तुला वाटत असेल, परंतु स्वतःच्या जीवनामध्ये ‘मी’ फार महत्त्वाचा आहे. मी शाश्वत आहे, बाकी सर्व नाती, घर, नोकरी, गाडी, मित्र-मैत्रिणी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड इत्यादी सर्व सर्व अशाश्वत आहे, हे तू लक्षात ठेव. जर तुझ्या मनात तिचा, तिच्या भावाचा किंवा तिच्या आई-वडिलांचा बदला घ्यावयाचा विचार येत असेल तर तो या क्षणी सोडून दे. तुझा वेळ, पैसा, शक्ती आणि बुद्धी वाया घालवू नकोस. ब्रेकअप मध्येच up हा शब्द आहे, हे तू लक्षात ठेव. ब्रेक व्हावयाचे का up व्हावयाचे, हे तुझ्या हातात आहे. तू सारखा सारखा म्हणत आहेस की, आत्महत्या करावीशी वाटते. अरे कोण करतं आत्महत्या, ज्याच्या अंगात जीव नसतो, तोच जीव देतो. सुसाईड इज अ परमनंट सोल्युशन ऑन अ टेम्पररी प्रॉब्लेम. तू नही तो और सही, हेही लक्षात ठेव. जीवन हे एक चॅलेंज आहे. आपल्या जीवनात, आपल्याच काय प्रत्येकाच्या जीवनातच संकटे येत असतात. कोणाच्या जीवनात कमी, तर कोणाच्या जीवनात अधिक मोठी संकटे येत असतात. जीवन ही एक संकटांची मालिका आहे. संकटांना न घाबरता त्यावर आपण धैर्याने तोडगा काढला पाहिजे, तरच आपण आपले जीवन यशस्वी बनवू शकतो, विजयी बनवू शकतो.’ ‘
मित्रा, मी जे सांगितले आहे त्याप्रमाणे विषय समजून घेऊन, धीरोदात्तपणे पावले टाकलीस तर विजय तुझाच आहे. ब्रेकपविरुद्धचा सामना तूच जिंकणार आहेस, हे लक्षात ठेव. मी त्यातून सावरले आहे, तूही सावरशील. सकारात्मक विचार कर.’
मनमोहना, लाख मोलाची गोष्ट सांगितलीस. माझं संकट हे संकटच नाही, असं वाटतंय. काय सांगावं, कदाचित माझं तिच्याशी लग्न झालं असतं तर, संकटांची मालिका अधिकच मोठी झाली असती. तिच्या भावाने, वडिलांनी, मला आयुष्यभर त्रासही दिला असता. आता मला कळले की, देवाने का अशी आमची ताटातूट केली. काहीतरी अशुभ घडणार असावे म्हणूनच पांडुरंगाने आम्हाला वेगळे केले असावे. आता मी नूतनची फाईल क्लोज करून, तू सांगतोस त्याप्रमाणे व्यक्तिमत्त्वविकास आणि आरोग्याकडे लक्ष देणार आहे. मी माझा भविष्यकाळ उज्ज्वल बनवणार आहे.’
‘शाब्बास! शाब्बास मित्रा!! अशी हिंमत धर आणि पुढील वाटचाल कर. सकारात्मक विचार करणे हे एक फार मोठे औषध आहे, म्हणून मी तुला म्हणलो होतो ना, ‘हे हे हें माझा पण बु (b-u) झालाय.’

Profile Photo
Dr. Manohar Sasane @ manohar-sasane
  • 7

    Followers

  • 23

    Following

  • 0

    Points