शामू नावाचा सात – आठ वर्षांचा मुलगा… अगदी निरागस… पण त्याच्या डोक्यावरचे आई – वडिलांचे छत्र देवाने अलगद हिरावले होते. त्याची व त्याच्या दादाची परिस्थिती फार हलाखीची. एकदा शामू दादाला म्हणतो, ‘दादा मला ना शिकून खूप मोठ्ठं व्हायचंय’ पण तितक्यात दादा शामूला म्हणतो, ‘गप्प बस! आपली परिस्थिती गरीब आहे ,चल आज तुला भिक मागायला जायचंय चल लवकर..’ ‘अरे दादा पण माझं ऐकून घे ना’ शामू कळवळीने दादाला म्हणतो. थोड्या वेळाने दादा आणि शामू रस्त्यावर येतात. तेथे रस्त्याच्या कडेला एक गरीब बाई बसलेली असते तिच्याकडे बोट दाखवत दादा शामूला म्हणतो, ‘ते बघ शामू.. तिथे ती बाई बसलेली आहे जा तिच्या शेजारी जाऊन बस. कोणी काही म्हणालं तर…. सांग माझी आई आहे म्हणून.’ आईsssss हा शब्द ऐकताच शामूच्या डोळ्यात घळाघळा अश्रू येतात पण दादा ओरडेल या भीतीने तो काहीच बोलत नाही गुपचूप त्या म्हातारी जवळ जाऊन बसतो. थोड्या वेळाने तिथे एक आजोबा येतात आणि शामूला प्रश्न विचारतात, ‘काय रे बाळा ही कोण तुझी?’ तेव्हा शामू रडत रडत म्हणतो ही माझी आई आहे, ही माझी आई आहे.. असाच पूर्ण दिवस जातो जो येईल त्याला शामू म्हणत असतो ही माझी आई आहे, ही माझी आई आहे.. रात्री शामू घरी येतो आणि दादाला म्हणतो, ‘दादा मला त्या बाईची खूप आठवण येते आहे. ती कशी असेल? काय करत असेल? मला फार काळजी वाटत आहे.’ तेव्हा दादा म्हणतो, ‘अरे वेड्या ती तुझी खरी आई नाही रडायला.’ दादा असे म्हणाल्यावर शामूला राग येतो आणि तो म्हणतो ‘दादा किती क्रूर आहेस तू.. थोडीतरी माणुसकी ठेव रे जीवनात..’ पुन्हा दुसऱ्या दिवशीची सकाळ होते ठरल्याप्रमाणे शामू त्या बाईजवळ जाऊन बसतो. आता ती बाई उठते शामूला जवळ घेते आणि म्हणते, ‘सोन्या, किती रे सेवा केलीस माझी तुला या जगातील सर्व सुखं मिळो…’ असाच पूर्ण दुसरा दिवस सुद्धा जातो. रात्री शामू घरी येतो. आता दादा शामूला म्हणतो, ‘शामू, मला काय वाटतं की ती बाई आहे ना ती आता काही जास्त दिवस तिथे थांबणार नाही. त्यामुळे जर का ती उद्या निघून गेली ना तर तू सुद्धा तेथून पटकन पळ काढ..’ तेव्हा शामू म्हणतो, ‘अरे दादा काय बोलत आहेस हे.. दादा तुला नाही कळणार आई – बाबांचं छत्र म्हणजेच या जगातील सर्वात मोठं सुख आहे.’ पुन्हा तिसऱ्या दिवशीची सकाळ होते. ठरल्याप्रमाणेच शामू त्या गरीब आजारी बाईजवळ जाऊन बसतो. आता पुन्हा ती बाई उठते शामूला जवळ घेते, त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते परंतु…. दुसऱ्याच क्षणी ती शामूला तिथेच सोडून दूरवर निघून जाते. आई… आई… शामू कळवळीने ओरडतो पण दादाच्या भीतीने तेथून निघून जातो. घरी गेल्यावर आता अधिकच धीटपणाने शामू दादाला म्हणतो, ‘दादा तुला पैसे हवे होते रे पण मला जे पाहिजे होतं ते आज मला मिळालं.. मला एकदा आई म्हणायचंय होतं रे दादा.. अरे जन्मल्यापासून वाटायचं मला कुशीत घेणारी, माझ्यावर प्रचंड प्रेम करणारी आई मला पाहिजे होती रे आई मला पाहिजे होती.. दररोज लहान मुलं त्यांच्या आईचं बोट धरून जातात ना तेव्हा वाटायचं हे बोट माझ्या आयुष्यात का नाही देवा??? दादा, जन्मल्यापासून एकदा मला तिच्या कुशीत घट्ट शिरायचं होतं तिचा मायेचा झरा अंगावर घ्यायचा होता रे दादा.. फक्त एकदा मला आई म्हणायचं होतं…..’ दादा आता अपराधी वृत्तीने शामूची माफी मागतो. पुढे अनेक वर्ष लोटतात आर्थिक परिस्थितीशी सामना करत, धडाडीने शिक्षण घेऊन शामू मोठा उद्योगपती होतो. एका मोठ्या समारंभात मुलाखतकार शामूची मुलाखत घेत असतात. तेव्हा ते शामूला प्रश्न विचारतात, “सर, आपल्या सर्वच इच्छा पूर्ण झाल्या असतील ना??” तेव्हा उद्योगपती, लखपती शामूच्या डोळ्यात घळाघळा अश्रू येतात शामू म्हणतो, ‘खरंतर मला वाटते माझा जन्म फुकट गेला कारण मला माझ्या आईला आई म्हणायचं होतं.. फक्त एकदाच मला आई म्हणायचंय होतं….
लेखन = नेहल जोशी
(अभिव्यक्ती स्पर्धा 2020 साठी)