मोठी घरं, छोटी माणसं आणि कोती मनं

*मोठी घरं, छोटी माणसं आणि कोती मनं*

किशोर बोराटे @

सर्वसामान्य माणूस कोणतीही गोष्ट करताना प्रथम समाज काय म्हणेल, लोग क्या कहेंगे? याचा जास्त विचार करतो. ग्रामीण भागात आपण ज्या वास्तूत राहतो त्याला घर म्हणतात. शहरी भागात प्लॅट, बंगलो अशी नावं असतात. पण घर या शब्दात जो ओलावा, जे सुख आणि जी माया आहे, ती इतर कशात नाही. आपण लहानपणापासून काही पारंपरिक रिती-रिवाज पाहत आलो आहोत. उदा. द्यायचेच झाले तर एखाद्या घरातील व्यक्ती मृत पावली, तर पूर्ण भावकी त्याचे सुतक पाळते. हे सुतक पाळणे म्हणजे तरी काय असते?

सुतक पाळणे म्हणजे मृत व्यक्तीच्या कुटुंबाच्या प्रति संवेदना बाळगणे. दुःख वाटून घेतलं, की दुःख हलकं होतं असे म्हणतात आणि हे खरे आहे. एखादी व्यक्ती मृत पावली की त्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो. संबंधित कुटुंब त्या खाली दबू नये, म्हणून समाज त्यांचा मानसिक आधार बनून पुढं येतो आणि त्यांचे दुःख वाटून घेतो. त्या कुटुंबासोबतच समाज सुद्धा १०-१२ दिवसांचा दुखवटा पाळतो आणि तुम्ही एकटे नाहीत. आम्हीही तुमच्या दुःखात सहभागी आहोत असा संदेश समाज देतो आणि त्या दुःखातून संबंधित कुटुंबाला बाहेर पडण्यासाठी मदत करतो.

या दुखवट्याच्या कालावधीत समाजात कोणतेही आनंदाचे कार्यक्रम होत नाहीत. उदा. वाढदिवस, लग्न, पूजा, पार्ट्या कोणतेही धार्मिक कार्य, सण या सर्व सुखाच्या गोष्टींना फाटा दिला जातो. लोकं आपल्या घरून भाजी-भाकरी घेऊन त्या कुटुंबाच्या घरी जातात, त्यांचे सांत्वन करत त्यांना खाऊ घालतात आणि स्वतःही खातात. काळाच्या ओघात संबंधित कुटुंब हळूहळू दुःखातून सावरते आणि त्यांचे जीवन पूर्वपदावर येते. या संपूर्ण कालावधीत एक समाज म्हणून लोकं त्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभी राहतात.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज हा विषय घेण्याचे कारण काय? तर सांगतो की अभिनेते राजीव कपूर यांच्या निधनाला अजून एक आठवडा सुद्धा झाला नाही, तोपर्यंत कपूर कुटुंबाने रणधीर कपूर यांच्या ७५ व्या वाढदिवसाची जंगी पार्टी साजरी केली. चित्रपटसृष्टीतल्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी हजेरी लावली. त्याचे फोटो व्हायरल झाल्यावर संवेदनशील लोकांनी कपूर कुटुंबावर आणि पार्टीला हजर राहणाऱ्या सेलिब्रिटींच्यावर टीकेची झोड उठवली.

राजीव कपूर गेल्यावर, रणधीर कपूरला किती मोठे दुःख झाले याचे रसरशीत वर्णन करून बातम्या देणाऱ्या वृत्त वाहिन्या कशा तोंडावर पडल्या हे कालच्या पार्टीने दिसून आले. सख्खा भाऊ जाऊन आठवडा झाला नाही, तरीसुद्धा रणधीर कपूर आणि त्याचे कुटुंब जर वाढदिवसाची पार्टी करत असेल आणि त्या पार्टीला चित्रपटसृष्टीसह इतर क्षेत्रातील काही सेलिब्रिटी हजेरी लावत असतील तर यांच्या कुटुंबात एकमेकांबद्दल किती प्रेम, आदरभाव आहे याचा विचार आपण करायला हवा.

त्यामुळेच मला या लेखाला मोठी घरं, छोटी माणसं आणि कोती मनं हे नाव द्यावे वाटले. यांची घरं मोठी आहेत, पैशा-पाण्याने ही लोकं दिसायला मोठी आहेत. पण यांची मनं मात्र कोती आहेत आणि या अशा लोकांना ज्यांना स्वतःच्या घरातल्या व्यक्तीविषयी प्रेम नाही ही अशी लोकं जर आमच्या तरुण पिढीचे आयडॉल असतील तर हे आमच्या पिढीचे दुर्दैव आहे. आयडॉल कुणाला म्हणावे? आपल्या डोळ्यात पाणी बघून, ज्याच्या डोळ्यात पाणी येते ना, तो खरा आपला आयडॉल असतो.

ज्यांना आपण आयडॉल मानतो ना, त्यांचा अभिनय जिवंत असला, तरी त्यांच्यातला माणूस केंव्हाच मेलेला असतो. ही असली लोकं त्यांच्या घरच्यांचे कधी आयडॉल होऊ शकत नाहीत , ते आपले कधी होणार? मित्रांनो आपले खरे आयडॉल हे आपले कुटुंब आहे हे लक्षात घ्या. या कागदी हिरोंना आजिबात महत्त्व देऊ नका. हे पैसा, शराब, कबाब आणि शबाब मध्ये बुडालेले आयडॉल आहेत. यांना भावना नाहीत. यांचे आयुष्य एकदम प्रॅक्टिकल आहे. यांचा मोठेपणा, हिरोगीरी सगळे कृत्रिम आहे. वरून जरी हे चांगले दिसत असले, तरी आतून हे पूर्ण तुटून गेलेले आहेत.

मित्रांनो, आपण खूप सुखी आहोत. आपली काळजी करणारं, प्रेमाचा ओलावा देणारे, जेवणासाठी आपली वाट पाहणारं आपलं कुणी आहे. त्यामुळे यांच्यापेक्षा आपण नशीबवान आहोत. भल्या सकाळी आपल्या घरात देवपूजा होते. अगरबत्तीचा सुगंध घरात दरवळतो. यांच्या घरात सकाळी उठल्या उठल्या सिगारेटचा धूर पसरतो. तिन्ही सांजेला आपल्या घरात देवासमोर तेलाचा दिवा जळत असतो. यांच्या घरात दारूच्या बाटल्या फुटत असतात. मग सांगा, कोण श्रीमंत? कोण सुखी?

दिवसभर काम करून घरी आल्यानंतर दमला असशील, हात-पाय तोंड धुवून घे म्हणणारे आपले आई-वडील, हसतमुखाने चहा आणून देणारी आपली बायको आणि पप्पा, पप्पा म्हणत पळत येऊन गळ्यात पडणारे आपले चिमुकले चिमणा-चिमणी. मित्रांनो, हेच खरं आपलं घर आहे आणि हाच आपला स्वर्ग आहे. तुम्ही ज्यांना आयडॉल मानता ना ती त्यांची घरं नसतात. त्या त्यांच्या कोठ्या असतात. तिथे कोणतीही सात्विकता नसते. आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, माया काहीही नसते. तिथे राहतात फक्त अतृप्त आत्मे, जे सत्तेचे, दारूचे आणि शरीराचे भुकेलेले असतात. जे रात्रंदिवस तिथे इतरांचे दमन करत असतात. तेथील निर्जिव भिंतींना कोणकोणते अत्याचार पाहावे लागत असतील ना हे त्यांचे तेच जाणोत. हे असले भुकेले आत्मे कुणाचेही आयडॉल होऊ शकत नाहीत.

धन्यवाद

-किशोर बोराटे

https://www.lokmat.com/bollywood/kareena-kapoor-ranbir-kapoor-get-trolled-attending-randhir-kapoors-birthday-dinner-5-days-after-a590/