एका हळव्या बापाचे लाडक्या मुलीस पत्र
प्रिय दीदी ,
पत्र लिहिताना थोडा गोंधळून गेलोयं ! काय लिहायचे हा प्रश्न आहे. वय वर्षे १४ असलेल्या किशोरवयीन पोरीला काय सांगणार ? काय लिहिणार ?..तरीही लिहिण्याचा प्रयत्न करतोयं . तुला काल शब्द दिला होता ,तुला आज पत्र लिहिणार ! तुझी उत्सुकता तुझ्या चेहऱ्यावर दिसत होती.असो.
आज वय वर्षे १४ पुर्ण केलीस.मागे वळून पहाताना आठवते ते तुझे बालपण ! मी घरात थोरला, मात्र तुझ्या दोन्ही आत्यांची लग्नं माझ्या अगोदर झाल्याने नातवंड म्हणून घरात तुझा सहावा नंबर लागला.तरीही तुझ्या लाडात काहीच कमी नव्हते .तुझे आजोबा आज आपल्यात नाहीत. त्यांच्या कडेवर बसून तु भैरवनाथाच्या मंदीरात जायचीस .आजी सोबत शेतात यायचीस .एकाच जागेवर बसून देईल त्या खेळण्याशी खेळत बसायचीस.दै.सकाळसाठी बातमीदारी करताना एकदा शेतीच्या खुरपनी संदर्भात बातमी दिली होती.त्या बातमीच्या छायाचित्रात तु होतीस .पाच- सहा वर्षे ते कात्रण मी जपून ठेवले होते.
वीस वर्षांत हजारो बातम्या लिहिल्या शेकडोंचे फोटो छापून आणले.मात्र माझ्या पोरीचा फोटो सकाळमध्ये आला या गोष्टीचे मलाही कौतुक होते.तुला एक गंमत सागू ,गेल्या वीस वर्षांत माझा फोटो दैनिकात छापून आलेला नाही .जावळी तालुका पत्रकार संघाचा उपाध्यक्ष झाल्यावर छापून येईल, असे वाटले होते.मात्र ,लोकमतने नावाचा उल्लेख केला आणि बातमीची औपचारिकता संपवली.
पुढे जाता जाता तुझ्या विषयी एक तक्रार सांगतो.तू लहान असताना खूपच नाजूक होतीस.हवामान बदलले की लगेच आजारी पडायचीस.रात्री दोन -तीन पर्यंत तुला झोप येत नव्हती .रात्री दहा ते एक तुला खेळवत रहाण्याची माझी बारी असायची .नंतर तुला झोप येई पर्यंत तुझी आई खेळवत रहायची.या वेळा आम्ही आमच्या सोयीने ठरवून घेतल्या होत्या .मला एक पर्यंत जागायची सवय आणि तुझ्या आईला लवकर झोपायची सवय ! सगळं सोयीने होते.
तीन वर्षांची झालीस आणि आम्हाला तुझ्या शाळेचे वेध लागले .मी म्हणायचो मराठी माध्यम ,तर तुझी आई म्हणायची इंग्रजी माध्यम ! घरातल्या निर्णया बाबत बायका अनेकदा जिंकतात.तुला इंग्रजी माध्यमात दाखल केली.केजी ते आठवी, पहिल्या तीन मध्ये येण्याचा विक्रम तु अबाधीत ठेवला आहेस. पहिल्या क्रमांकासाठी तु आजही कष्ट घेतेस.केवळ अभ्यास न करता शाळेतल्या विविध उपक्रमांत भाग घेतेस.मला गुणपत्रीकेतील गुणांचे कौतुक आजही नाही .पोरांनी साठ-सत्तर टक्के मिळवून इतर गोष्टींतही सक्रीय असावे,या विचाराचा मी !एकेकाळी मीही पुस्तकी कीडा. मात्र माझा विचार बदलला आहे.पोरांनी खेळायचे ,पडायचे भांडायचे सोबत अभ्यासाकडे बघायचे.
गेल्या चौदा वर्षांत खूप बदल झाले.छोटी दीदी मोठी झाली.खऱ्या अर्थाने दीदी झाली .आर्याला दटावणारी तर कधी सांभाळून घेणारी मोठी बहिण झाली.आर्या तुझ्या पाठची ,दोन वर्षांनी लहान .तुझ्या नंतर तुला भाऊ होईल,अशी अपेक्षा सर्वांचीच होती.मात्र घरात पुन्हा लक्ष्मी आली.आर्या झाली त्या वेळी तुझ्या आईचे आॕपरेशन करावे लागले .डाॕक्टरांनी विचारले ,मुलं बंद व्हायचे आॕपरेशन करायचे का ? तुझ्या आईने ठामपणे सांगितले ,करायचे !
एकाचवेळी दोन आॕपरेशन झाली .आम्हाला आजही खंत नाही ,आणि भविष्यातही नसेल.गोंडस ,गोरी गोमटी आर्या तुझ्या सोबत वाढू लागली .एक पश्चिमेला तर दुसरी पुर्वेला ! दोघींत एवढे अंतर ! तरीही चोवीस तास एकत्र असता.अगदी मैत्रीणी बनून .भांडता आणि पुन्हा एकत्र येता.तु मोठी झालीस तरी ऐहीक सुखाचे आकर्षण तुला अद्याप नाही .तुला मेकअप करताना मी कधीच पाहिले नाही .पोरींनी सौंदर्याकडे लक्ष द्यावे म्हणतात .मात्र ,तु साधी भोळी ! जे आहे ते स्वीकारायाचे आणि पुढे जायचे.
प्रगल्भता सहज येत नाही .तुझ्यात ती अकालीच आली.ध्यान, मोटीवेशनल स्पिकर्स आणि तुझे मार्गदर्शक तुझे मामा Ravie Walekar तुझ्या आयुष्याचे भाग झाले आहेत.शाळेच्या अभ्यासा सोबत फ्रेंच शिकत आहेस.केवळ मोबाईलवर शिकून तु फ्रेंच माणसाशी गरजे एवढे बोलू शकतेस.
आणखी काय लिहिणार ..? आम्ही मोबाईलवर दीर्घकाळ दिसलो की भांडतेस .मोबाईलचा योग्य वापर व्हावा म्हणून आग्रही रहातेस.माझ्यातल्या अवगुणांवर लक्ष ठेवून जाबही विचारतेस.दीदी ,तुझी खरचं कधी कधी भीती वाटते .काही गोष्टी चोरुन कराव्या लागतात.काल बोललीस ,पत्र मला लिहितायं ,फेसबुकची दुनीयादारी नको.पत्र फेसबुकवरच टाकतोयं .तुझ्याशी भांडायला मजा येते म्हणून !
दीदी ,आज तुझा वाढदिवस ! आणखी मोठी हो.तुझ्याकडून मोठ्या अपेक्षा नाहीत .लवकर स्वयंपाक करायला शिक.बापाला पोरीच्या हातचे गोडच लागते.भविष्यात तू कोण होणार माहित नाही .ते दडपण द्यायचेही नाही .तुझ्या आवडीचे क्षेत्र निवड .फक्त त्या क्षेत्रातील शिखरावर तू दिसायला हवीस !
वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा !
तुझा बाप ,
रवि गावडे