नवले बापू
किशोर बोराटे @
फुलं वाटणाराच्या हाताला सुगंध असतो असे म्हणतात. आमचे नवले बापूही तसेच होते. तसे म्हणजे खरोखरच त्यांचा फुलांचा व्यवसाय होता. वर्ण अगदी गोरा-लाल होता. गुलाब, मोगरा, जास्वंदी अशी सगळ्या प्रकारची फुलं जणू काही त्यांच्या चेहऱ्यावर कुस्करली आहेत असे त्यांच्याकडे पाहून नेहमी जाणवायचे. एवढे ते गोरे आणि लाल होते. उंची आणि तब्येत अगदी मध्यम, राहणीमान म्हणाल तर एकदम साधे, लेंगा, शर्ट आणि कडक इस्त्रीची गांधी टोपी आणि हातात सतत सायकल असायची. बायको, मुलगी आणि जावई (म्हणजे माझा मित्रच) असा एकंदर त्यांचा परिवार होता. स्वभाव म्हणाल तर अगदी मनमोकळा आणि विनोदी, त्यापेक्षाही हजरजबाबी खूप होते.
आमचे हॉस्पिटल कुडाळला होते. कधीतरी पेशंट बनून आलेले हे नवले बापू कळत-नकळत आमच्या कुटुंबातील सदस्य कधी बनले हे समजलेच नाही. माझे मामा डॉक्टर, त्यांच्यावर बापूंचा खूप विश्वास. विश्वास म्हणजे हवं तर श्रद्धा म्हणा. मामांना पण सगळे बापूच म्हणतात. ससाणे बापूंचा हात लागला ना मग तुमचा कसलाही आजार असू देत तो बरा झालाच म्हणून समजा असे ते नेहमी म्हणत. त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे त्यांची फुलांची शेती होती. शेतातून फुलं आणून दिवसभर हार तयार करून हे नवले बापू रोज पाचवड पासून ते कुडाळ पर्यंत घरा-घरात हार टाकायचे. प्रवास सगळा सायकलवरूनच असायचा. त्यामुळे भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. कुणी आजारी पडले की तू ससाणे बापूंच्याकडे जा. बापूंचा हात लागला की बघ कसा लगेच बरा होतोस असे म्हणत त्यांनी आमचे हॉस्पिटल कुडाळला असूनही पाचवड, चिंधवली, अमृतवाडी, भुईंज भागातील अनेक पेशंट कुडाळला पाठवले. हळूहळू त्या भागातील पेशंटची संख्या वाढत गेली.
मग नवले बापूंचे चालू झाले. तुमच्या हाताला एवढा चांगला गुण आहे. लोकं किती लांबून लांबून येतात. त्यापेक्षा पाचवड सारख्या बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी तुम्ही मोठे हॉस्पिटल का चालू करत नाही? ससाणे बापू ,कुडाळ आणि भागातील पेशंट पाचवडला येऊ शकतात. पण पाचवड, भुईंज भागातील रुग्णांना इकडे यायचे म्हणजे उलटे पडते. तुम्ही तिकडे हॉस्पिटल चालू कराच असा मामांच्या मागे तगादा लावला. कुडाळमध्ये एवढा चांगला जम बसलेला असताना पाचवडला जाण्याचा निर्णय हा तसा धाडसी होता. मामांच्या मनात अनेकदा यायचे, पण ते मनातच होते. पण फक्त बोलून थांबतील ते नवले बापू कसले? त्यांनी आम्हाला न विचारताच हॉस्पिटलसाठी जागेचा शोध चालू केला. दोन गुंठे जागा शोधून काढली. ती मामांना दाखवली आणि खरेदी करायला लावली. सगळ्या गोष्टीत अर्थातच नवले बापू पुढे होते. मी त्यावेळी नववीत होतो. जागा पाहिली, खरेदी झाली. हॉस्पिटलचे बांधकाम चालू सुद्धा झाले.
माझी १० वीची परीक्षा झाली आणि आम्ही कुडाळवरून इकडे पाचवडला आलो. खरंतर कुडाळ सोडण्याची माझी बिलकूल इच्छा नव्हती. माझे सर्व बालपण तिथे गेले होते. माझी शाळा, वर्ग मित्र, तिथेच लहानाचा मोठा झालो असल्याने घरा-घरात ओळख होती. ते सगळे सोडून नवख्या गावात जाऊन राहायला मन तयार होत नव्हते. आम्ही पाचवडला गेलो. आता आपल्या हट्टाने हे कुटुंब इकडे आले असल्याने तिथे आमचे चांगले बस्तान बसायला हवे ही आपलीच जबाबदारी आहे असे समजून नवले बापू रोज आमच्याकडे येऊन काय हवे, काय नको हे अगदी प्रकर्षाने पहायचे. मोठ्या लोकांच्या बरोबर मोठ्या सारखे. आम्हा पोरांच्या बरोबर आमच्यासारखे राहायचे. आता पोरं म्हणजे तरी कोण होते? मी होतो, माझा मावस भाऊ दिपक होता आणि आमचे बाकीचे मित्र होते. आमची जरा बऱ्यापैकी मस्ती चालायची. सगळ्या पाचवड फाट्याचा डेटा काखेत घेऊन फिरणाऱ्या नवले बापूंच्या नजरेतून आमच्या उचापती कशा सुटतील? कधी एखाद्या मुलीशी बोलताना पाहिले की खट्याळ नजरेने भुवया उडवत हसत म्हणणार मग काय? पसंत आहे? जुळलंय की मी काही मदत करू? आम्ही आपले नाही हो बापू, असे काही नाही just friendship असे म्हटले की ते हसायचे.
आमच्या घराच्या सर्व सुख-दुःखात दोन नवलेंनी आम्हाला कायम साथ दिली. एक नवले बापू आणि दुसरे नवले टेलर अर्थात एन. टी. ( NT) आज विषय नवले बापूंचा आहे. नवले टेलर यांच्याविषयी नंतर कधीतरी नक्कीच लिहीन. आम्ही म्हणजे मी आणि दिपक, बापूंचा जावई दत्ता ऐन तारुण्यात येत होतो. बापूंचा आमच्या घरातील वावर अगदी सहज असायचा. कोणत्याही महत्त्वाच्या क्षणी आमचे मामा या दोन्ही नवलेंशी म्हणजे नवले बापू आणि एन. टी. यांच्याशी नेहमीच चर्चा करायचे. दोघेही मामांच्या बरोबर सावलीसारखे असायचे. आज नवले बापू हयात नाहीत. हे सगळं मला आज लिहावे वाटले त्याचे कारण असे की आज सकाळी सकाळी माझ्या स्वप्नात नवले बापू आले. ते स्वप्न मी इथे नाही लिहू शकणार. पण एवढेच सांगेन की ते क्षण भावनिक होते. जाग आल्यानंतर मग मला समजले की आपण स्वप्नात होतो. पण हे असे का घडले? बापू एवढ्या वर्षांनी माझ्या स्वप्नात का आले? बापूंच्या आठवणीने माझ्या डोळ्यात पाणी आले. आज दिवसभर राहून राहून मला बापूंची आठवण येतेय.
आम्हाला पाचवडला आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आमच्या तिथे येण्याने आम्हाला जे काही मिळाले, मग ते नाव असेल, प्रतिष्ठा असेल, पैसा असेल. जे काही सर्व मिळाले त्यात बापूंचे निश्चितच योगदान आहे. आमच्या पडत्या काळात बापूंनी आणि एनटींनी दिलेली साथ मी आणि माझे मामा कधीही विसरू शकणार नाही. आज आपण ज्या उंचीवर आहोत, त्यामध्ये अनेकांचे योगदान आहे आणि असते. हे प्रत्येकाच्याच बाबतीत घडते. आपण उंचीवर जावे म्हणून अनेकांनी आपल्याला खांद्यावर घेतलेले असते. पाय ओढणारे असतात, तसे खांद्यावर घेणारे पण असतात. या अशा माणसांचा विसर कधीही पडू नये ही दक्षता आपण घ्यायची असते. आयुष्याच्या प्रवासात असे अनेक प्रवासी आपल्याला भेटतात आणि आपल्याला यशाच्या शिखराकडे जाण्यासाठी म्हणून ते आपल्याला लिफ्ट देतात. आयुष्याच्या प्रवासात कुठे आपल्या गाडीचे चाक रुतलेले, अडकलेले असते. तेंव्हा या नवले बापूंच्या सारखी लोकं आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या गाडीला धक्का देऊन ते रुतलेले चाक काढतात. तर काहीजण रस्ताही दाखवतात. आपण सर्व काही मिळवतो. पण त्यांना काय मिळतं? त्यांना हवं तरी काय असतं?
तुमच्या पैशात, तुमच्या प्रतिष्ठेत, तुमच्या इस्टेटीत त्यांना काही रस नसतो. पण तुम्ही मोठे होताय हे पाहून त्यांना आनंद होत असतो. तुमच्याकडून त्यांना फक्त प्रेम, आपुलकी, आदर आणि मायेचा ओलावा हवा असतो. यातच ते भरून पावतात. भौतिक किंवा विकतच्या सुखात त्यांना रस नसतो. या अशा श्रीमंतीकडे आपण आकृष्ठ होतो. पण ही माणसं मनानेच खूप श्रीमंत असतात. फुलं वाटणाऱ्या हातांना नैसर्गिकच सुगंध असतो. त्या फुलांची आपल्या आयुष्यावर ते उधळण करतात आणि आपल्या आयुष्यात रंग भरतात. त्यासाठीच ते आपल्या आयुष्यात आलेले असतात. आपल्याला फक्त ते ओळखता यायला हवे. आज बापू हयात नाहीत तरी पण अंतःकरणापासून त्यांना धन्यवाद म्हणावे वाटते. पण मी म्हणणार नाही. काही ऋण ही फेडता येत नसतात आणि काही फेडायचीही नसतात. त्या ऋणात राहण्यात देखिल एक सुख असते. बरोबर ना? तुम्हाला काय वाटते?
-किशोर बोराटे
Khup chan lihale ahe… Kharokar Navale Bapu na prtyaksha bhetalya sarkhe vatale