मैत्री पर्यावरणाशी

*मैत्री पर्यावरणाशी*

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री ही अगदी सहजतेने होत असते. मैत्रीत कोणतीही गोष्ट ओढून ताणून करावी लागत नाही. दृढ होत गेलेली मैत्री जीवनात कायमच आनंदाच आणि विश्वासाचं नाते निर्माण करते. म्हणूनच माणसाच्या आयुष्यात मैत्री एक सुगंधित फुला सारखी असते.एखाद्या फुलाला ज्या प्रमाणे आजूबाजूच्या वातावरणात जाणून-बुजून सुगंध पसरविण्याची आवश्यकता भासत नाही त्याच प्रमाणे आपला हा परिसर अगदी सहज ,साधा आणि सोपा आहे.त्यासाठी जाणून-बुजून वेगळं काही करण्याची आवश्यकता भासत नाही. निसर्गातील प्रत्येक गोष्ट अगदी सहजतेने घडत असते. जसे कालचक्राच्या गतीप्रमाणे चंद्र,सूर्य, तारे आपले कार्य सहजगत्या करत असतात. त्याच जमिनीत एखादे बीज रुजते आणि त्याचे रोपटे बनून त्याला आपोआपच पाने,फुले व फळे येतात.
निसर्गातील प्रत्येक घटकांनी हा परिसर तयार होतो आणि याच परिसरात ह्या सृष्टीतील प्रत्येक जीव फुलत असतो. ह्या संपूर्ण विश्वातील कुठल्याही घटकाला, जीविताला जगण्यासाठी जाणून-बुजून कोणतेही कार्य करावे लागत नाही.निसर्ग नियमाने तो घटक,तो जीव उत्पन्न होतो व तो आपले कार्य निर्विकारपणे करत राहतो. हाच सृष्टीचा साधा -सोपा नियम आहे आणि ह्या भूमंडळावर जो परिसर आहे, जो निसर्ग आहे ते म्हणजेच पर्यावरण. आपल्या ग्रह मालेतील एकमेव ग्रह ज्याच्यावर जीवन अस्तित्वात आहे. फक्त आणि फक्त पृथ्वीवरच जीव सृष्टीची निर्मिती होऊ शकते हे सत्य सर्वानाच ज्ञात आहे. निसर्ग जर सहज आहे आजूबाजूचा परिसर सहजतेने जर मार्गक्रमण करीत असतो तर मग आज पर्यावरणाच्या इतक्या समस्या का निर्माण झाल्या आहेत? पृथ्वीवरील जे वातावरण आहे त्या वातावरणातील नैसर्गिक साधन सामग्री, हवामान,भौगोलिक सुगमता इत्यादी अनेक घटकांनी मिळून मनुष्यप्राण्याची
जडणघडण सुलभतेने होत असते. मग पर्यावरणाचा प्रश्न का निर्माण होतो? हवामानाचे कोडे का नाही उलगडता येत? ह्या सृष्टीने इतके सुंदर आयुष्य जे बहाल केले आहे ते इतके जटिल आणि दिवसेंदिवस कटकटीचे का बनत चालले आह?
ह्या प्रश्नांचे एकच मूळ आहे ते म्हणजे एकीकडे वरदहस्ताने भरभरून देणारा निसर्ग आहे आणि दुसरीकडे भरभरून आणि मुक्तहस्ताने निसर्गाला ओरबडणारा मनुष्यप्राणी आहे. मग सहजतेने चालणारे निसर्गचक्र ह्या मनुष्यामुळेच बिघडू लागते आणि असंतुलित पर्यावरणाच्या समस्या निर्माण होऊ लागतात मग ह्याच पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी पर्यावरणशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. ‘पर्यावरण संवर्धन’, ‘पर्यावरण संगोपन’ हे सारे अवघड शब्द आपल्याला पर्यावरण जागरूकते पासून दूर घेऊन जातात आणि सर्व सामान्य माणसाला हे सारं क्लिष्ट आणि आपल्या आवाक्याबाहेरचे वाटू लागते कारण साधी गोष्ट आहे जेंव्हा मनुष्य ह्या ज्या वातावरणात श्वास घेतो, जगतो,उठतो-बसतो.त्या पर्यावरणचा अभ्यास करावयाची वेळ त्याच्यावर येते तेंव्हा मात्र ते जीवन त्याला जटिल वाटू लागते मग मात्र ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता घेता मनुष्याची दमछाक होते आणि त्याला हे जीवन कटकटीचे वाटू लागते. म्हणजे उदा:एखाद्या माणसाला सामोसा खायला आवडतो. मग लहर आली की तो त्याच्या वर मनसोक्त ताव मारतो आणि आनंद घेतो कारण खाणं ही प्रक्रिया अगदी सहज आणि सोपी आहे पण तेच खाताना मनुष्य असा नाही विचार करत की आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन कसे होते?आपला जठराग्नी कसा काम करतो?अन्नाचे रक्तात रूपांतर कसे होते? पण मनुष्याने चुकीच्या पद्धतीने जर अन्न खाल्ले तर मात्र पचनसंस्थेत बिघाड होतो आणि मग त्याचा उपाय शोधण्यासाठी मग शरीरशास्त्राकडे त्याला वळावे लागते.मग त्या शरीरशास्त्राचा अभ्यास करताना जीवन जटिल आणि कटकटीचे वाटू लागते.
सृष्टीवरील ह्या निसर्गाचे देखिल हेच तत्त्व आहे. निसर्गक्रमाने अगदी सहजतेने सर्व घटना घडत असताना त्या वातावरणात काही ढवळा-ढवळ केली तर काही समस्या उद्भवतात मग अश्या समस्या सोडवण्यासाठी मनुष्य आपल्या बुद्धीच्या जोरावर अजून लुडबूड करू लागतो आणि हळूहळू आपल्या लहरीप्रमाणे जीवन सुखकर बनविण्याचा अट्टाहास करत राहतो. खरतर आयुष्य हे खूप जटिल नसते तर मनुष्य आपल्या वर्तुवणुकीमुळे जास्त गुंतागुंतीचे करून ठेवतो व पचतावतो. म्हणूनच हा गुंता सोडवण्यासाठी निसर्गाशी मैत्री हा सर्वात सोपा उपाय आहे. सहजते जगूयात, सहजतेने निसर्गाला आपला सखा, जिवलग मानुयात आणि त्याच्या सानिध्यात आपले जीवन सुखकर करूयात.

लेखिका:
सायली दिवाकर,पुणे
(10 वी व 12 वी च्या बोर्डाच्या मुलांसाठी काम)