अरविंद त्रिवेदी (रावण) यांची गोची

त्याचं झालं काय की, अरविंद त्रिवेदी साहेब एकदा हनुमानाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. अयोध्येतील हनुमान गढी मंदिर म्हणजे सुविख्यात मंदिर. रामायण सिरीयल सुरू असावी किंवा नुकतीच दूरदर्शन वर प्रसारित झाली असावी तो काळ. त्यामुळे त्रिवेदी साहेब लोकप्रियतेवर आरूढ असावेत.

त्यांच्या लोकप्रियतेच्या फुग्याला हनुमान मंदिराच्या रेवती बाबा नामक पुजारी बुवांनी मोठीच टाचणी लावली त्या दिवशी. अरविंद त्रिवेदी स्वतः मोठे रामभक्त. जरी त्यांनी पडद्यावर खणखणीत रावण साकारला असला तरी त्यांच्या मनात मात्र राम वसलेला!

अर्थातच हे पुजारी बुवांना माहीत असण्याचे कारण नव्हते. त्यांनी यांना टीव्हीवर रावणाच्या भूमिकेत बघितलेला, त्यात प्रत्यक्ष हनुमानाला आणि श्रीरामाला काहीबाही बोललेला हा माणूस हे एवढेच माहीत! आणि असे असताना हा चक्क मंदिरात घुसतोय म्हणजे काय! त्रिवेदी साहेब मंदिरात जाऊ लागले तर त्यांना आत जाऊच देईना तो. कारण काय तर, अशा व्यक्तीला जर मंदिरात सोडले तर ते मंदिराचे पावित्र्य भंग करणारे ठरेल.

मोठा पेचप्रसंग उभा ठाकला! मंदिराचे ट्रस्टी वगैरे आले पण भटजीबुवा काय मानायला तयार नव्हते. ट्रस्टी त्रस्त झाले. इकडे त्रिवेदी साहेब ताटकळत उभे… शेवटी पुजारी बुवांच्या पुढे त्यांना मान तुकवावी लागली आणि रामाचे दर्शन न घेताच ते परतले. पुजारी बुवांचे पुढे काय झाले माहीत नाही, परंतु त्रिवेदींवर नाही म्हटलं तरी मोठाच प्रभाव पडला या प्रसंगाचा, इतका की त्यांचे शूटिंगमध्ये मन लागेना! मनाने कुठे दुसरीकडेच असायचे ते.

खरं तर अरविंद त्रिवेदी स्वतः मोठे रामभक्त होते, त्यामुळे आपण सिरीयल मध्ये डायलॉग म्हणून काय काय बोलतोय याची टोचणी मनाला लागली असावी त्यांच्या. प्रायश्चित्त म्हणून त्रिवेदी साहेबांनी आपल्या घराच्या सगळ्या भिंतींवर दोहे, चौपाई वगैरे लिहून घेतले, घराचे नाव बदलून “श्रीराम दरबार” केले… दरवर्षी घरामध्ये रामायणाचे पाठ सुरू केले…तेव्हा कुठे मनाला शांतता मिळाली त्यांच्या.

गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये प्रक्षेपित झालेली रामायण सिरीयल बघताना त्यांचा व्हिडीओ देखील सर्वत्र बघितला गेला. रावणाचे पात्र म्हणजे प्रचंड खल वृत्तीचे पात्र. त्याला त्रिवेदिनी आपल्या ठळक अभिनयाने उत्तम रंग भरले आणि भारतीय चित्रपट इतिहासातील कदाचित सर्वश्रेष्ठ रावण साकारला. त्यामागे त्यांची अभिनयक्षमता होतीच पण एक रामभक्ताला (भूमिकेत राहताना) होणाऱ्या अनंत यातना देखील होत्या! अरविंद त्रिवेदी द लेजंड!

#रामभक्त

© Ashutosh Ratnaparkhi.

श्रीकृष्णार्पणमस्तू