तिसरा डोळा भाग- ९६
स्वामी
किशोर बोराटे @
परवा कॉलेजच्या एका मित्राचा फोन आला. किशोर कसा आहेस? काय चाललंय? लग्न केलेस का? वहिनी कशा आहेत? मुलं किती आहेत? केवढी आहेत? तू सुधारलास की अजून तसाच आहेस? नुसता प्रश्नांचा भडीमार. जवळपास २० वर्षांनी आमचे बोलणे झाले. पण ते ही फक्त फोनवरच झाले. प्रत्यक्ष गाठभेट नाही. शेवटचा प्रश्न सोडला, तर त्याचे सर्व प्रश्न वस्तुस्थितीला धरून होते. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. पण शेवटच्या प्रश्नाचे मी काय उत्तर द्यायला हवे होते? नाही म्हणजे तू सुधारलास की अजून तसाच आहेस? पहिल्या प्रश्नाचे उत्तर, दुसरा प्रश्न होऊ शकत नाही. तरीही सुधारायला मी बिघडलो कधी होतो हे प्रथम सांग? असे विचारावे असे माझ्या मनात आले. पण फक्त मनातच. हो माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या मनात अनेक प्रश्न असतात. पण निम्मेअर्धे तरी ते मनातच राहतात. मग लगेच त्याचे चालू झाले काय ते दिवस होते? माणसाला जुन्या आठवणीत रमायला हे एक वाक्य पुरेसे पडते. मग त्याने आम्ही कॉलेजमध्ये असताना काय काय प्रताप केले हे अगदी तोंडपाठ असल्यासारखे फाडफाड बोलून सांगितले. त्यातल्या काही गोष्टी मला आठवताहेत. तर काही काळाच्या ओघात विसरून गेल्या होत्या.
उंची तशी बेताचीच, केस अर्धे अधिक अकालीच सफेद झालेले, ते ही तेल लावून चपचपीत बसवलेले. गळ्यात माळ, कपाळावर गंध आणि मुखी अभंग. चित्रपटाच्या पोस्टरवरील कमी कपड्यातील एखाद्या नटीचे चित्र पाहिले तरी ती तोंड फिरवायचा. या अशा व्यक्तिमत्त्वाचा मुलगा कॉलेजला येईल यावर तुम्ही किती विश्वास ठेवाल? किंबहुना त्याने तरी का यावे? मग अशा व्यक्तिमत्त्वाला मी स्वामी हे नाव पाडले. कॉलेजमध्ये पुढे त्याचे हेच नाव फेमस झाले. स्वामी तसा अध्यात्मिक विचारांचा होता. त्यावेळी आम्ही जे काही करू, ते त्याच्या चौकटीत बसणारे नव्हते. पण तरीही तो आमच्या ग्रुपमध्येच असायचा. ग्रुपमधील काही मुलं सिगारेट ओढायची, गुटखा खायची. कुडाळ सारख्या एका ग्रामीण भागातील शाळेतून आलेलो मी, माझ्यासाठीही हे सर्व धक्कादायक होते. पण कॉलेजला हे असेच असते हे मी ही अनेकांच्याकडून ऐकल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पण स्वामी फार चिकट. गुटखा, सिगारेट याचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात हे तो दिवस दिवस त्यांना सांगत बसायचा. पोरंही कुणी सिगारेटचे झुरके घेत, तर कुणी गुटखा खाऊन थुंकत-थुंकत त्याचे ते विचार ऐकायचे. म्हणजे फक्त ऐकायचेच. त्याचा स्वभाव म्हणजे अतिशय साधा-भोळा, कुणी काही बोलले की पटकन विश्वास ठेवणारा. मित्रांचे दोष काढणारा, पण त्यांच्यातच रमणारा. कधी आम्ही पिक्चरला जायचे ठरवले तर नाक मुरडणारा. अरे तो अमुक अमुक पिक्चर खूप छान आहे. रविनाचे आणि अक्षयचे पावसातले गाणे आहे. रविना खूपच सेक्सी दिसलीय रे त्यात. आपण जाऊ या पाहायला. कुणीतरी असे त्याच्या देखत बोलायचे की स्वामी कोणत्या तरी अभंगाच्या चार ओळी आमच्या समोर पुटपुटायचे. त्यावेळी काय मोबाईल नव्हते. त्यामुळे जग फार पुढे गेलेले नव्हते. एखादी भिजलेली रविना, सोनाली बेंद्रे जरी आम्हाला दिसली तरी आम्ही स्वतःला धन्य समजायचो. त्याने विरोध केला की मग आम्हाला भलताच चेव यायचा.
आयुष्याचे तत्वज्ञान मात्र तो आम्हाला नेहमी सांगत बसायचा. ग्रुपमध्ये सगळ्या प्रकारची मुलं होती. त्यांचे दोष दाखवून त्यांना सुधरवू पाहणारा हा सात्विक माणूस, मुलींच्यापासून मात्र दोन हात लांबच असायचा. माझा बोलका स्वभाव असल्याने माझा दोन्हीकडे मुक्त वावर असायचा. कोणत्या मुलीशी बोलताना पाहिले की हा माझे नाव तिच्याशी जोडून मोकळा व्हायचा. दिवसभरात जर ८-१० मुलींशी बोललो तर हा माणूस अरे कोणतीतरी एकच पकड रे. हे असे १०-१० मुलींशी बोलणे योग्य नव्हे. मी म्हटलं अहो स्वामी ही just friendship आहे. पांडुरंग, पांडुरंग जमाना भलताच बदललेला आहे. तुम्हाला दोष देऊन उपयोग नाही. लाजा तर त्यांनी सुद्धा सोडल्या आहेत. मग आम्हालाही चेव चढायचा. वर्गातली एखादी त्यातल्या त्यात एखादी डॅशिंग मुलगी पकडायची आणि तिला मेनका बनवून या विश्वामित्राची तपश्चर्या कशी भंग होईल याचे आम्ही प्लॅन करत बसायचो. ए, शुभांगी ऐक ना, काय? स्वामी येतोय समोरून. मग मी काय करू? काही नाही फक्त त्याच्याकडे जा, त्याच्याशी गोड गोड बोलून त्याला फक्त कँटीनमध्ये चहा प्यायला ने. हवं तर चहाचे पैसे मी देतो. नको रे, का? तो माळकरी विश्वामित्र आहे. अगं म्हणून तर तुला मेनका बनून पाठवतोय. आम्हाला त्याला एखाद्या मुलीबरोबर किमान चहा पिताना तरी त्याला पकडायचे आहे. Ok किश्या वडापाव देणार का? त्याची तपश्चर्या लगेच भंग करते. त्याकाळी आम्ही पासावर प्रवास करायचो. त्यामुळे खिशात फार फारतर १०-२० रुपये असायचे. वडापाव एक-दीड रुपयाला मिळायचा. आम्हाला ते १०- २० रुपये पण खूप वाटायचे. मी म्हणालो १००% देणार. आमच्या या असल्या उचापती चालायच्याच. पण स्वामी कधी त्या वाटेला गेल्याचे काही आठवत नाही. पण कुणीतरी एकदा म्हटल्याचे आठवते की त्याला कोणी एक मुलगी आवडते आणि तिच्यासाठी म्हणून हा स्वामी मैं कही कवी ना बन जाऊं, तेरे प्यार में ए कविता…. हे गाणे गुणगुणत असतो. त्यावरून मग मी त्याला प्रचंड पिडले होते. पण गड्याने कधी थांगपत्ता लागू दिला नाही. आमच्या वर्गात एक कविता होती, मी थेट तिला जाऊन विचारले की स्वामींचे आणि तुझे काही आहे का? तिला काय राग आला. तिने मला हातातल्या सॅकने बदडले होते. मग तो विषय तिथेच संपला.
या असल्या उचापती करायला आम्हाला तेंव्हा फार आवडायचे. काळ पुढे सरकत गेला. आम्हीही त्याच्याबरोबर सरकलो. गेल्या आठवड्यात आमच्या हॉस्पिटलमध्ये स्वामींचा धाकटा भाऊ ऍडमिट होता. त्यानेच मला मी स्वामींचा भाऊ असल्याचे सांगितले. मग त्याने माझा नंबर घेऊन स्वामींना दिला. त्याचा फोन आला. अनेक मित्रांची नावं तो घेत होता. आता २४-२५ वर्षे झाली. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर माझा फारसा कुणाशी संपर्क राहिला नाही. स्वामी मात्र सर्वांच्या संपर्कात होता. त्याने अनेकांची/ अनेकींची नावं घेतली. हा इथे असतो, तो इथे असतो. आम्ही भेटलो की तुझा विषय हमखास निघतो. तुझे ते किस्से आठवले की आम्ही खूप हसतो. वगैरे सांगितले. पण एका हरामखोराला कधी फोन करावा वाटला नाही याचे शल्य माझ्या मनात आत्ता या क्षणीही आहे. स्वामी पूर्णपणे भूतकाळात रमले होते. मी म्हटलं अरे भेटल्यावर बाकीचे बोलू. तू सर्वांचे नंबर घे आणि आपला ग्रुप तयार कर. मग आपण ग्रुपवर बोलू. सहज मनात आलं म्हणून विचारले. त्या वाटेला तो जाईल असे कधीच वाटले नाही पण तरीही मी विचारलेच स्वामी तुम्ही लग्न…….. वगैरे, हो, केले ना, दोन मुलं आहेत. मग मात्र मी डोक्यावर हात मारून घेतला. मुलींच्या सावलीलाही उभा न राहणारा हा माणूस चक्क लग्न करून मोकळा झाला? वर दोन मुलंही आहेत? हे कोरोना नसता तर सरळ त्याच्या घरी गेलो असतो आणि त्याची कॉलर पकडून त्याला विचारले असते का रे, तू लग्न कसे केलेस? पण तूर्तास तरी हा कार्यक्रम मी पुढे ढकलला आहे. पण मी निश्चितच जाईन. तसे किस्से खूप आहेत. पण या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून द्यायला एवढे पुष्कळ आहे. परत कधीतरी आमचे किस्से असेच मी याच लेखाचा भाग दोन लिहून तुम्हाला सांगेन. तूर्तास इथेच थांबतो. आता त्याला आणि वहिनींना भेटून येईन आणि मगच पुढचा भाग लिहीन.
धन्यवाद
-किशोर बोराटे
खुपच छान