मनाच्या गाभाऱ्यात जाताना……
किशोर बोराटे @
मनुष्याला जन्माला घालताना देवाने खरंच काय विचार केला असेल? रामायण, महाभारत हे आपले आदर्श ग्रंथ. मानवाची विविध रुपं दाखवणारे. एकीकडे मर्यादा पुरुषोत्तम राम, तर दुसरीकडे शिवभक्त रावण. दोन्हीही मानवाचीच रुपं. पण रामाला सकारात्मक प्रसिद्धी मिळाली, तर रावणाला शिवभक्त असूनही नकारात्मक प्रसिद्धी मिळाली. रामाला प्रेम मिळाले. तर रावणाच्या नशिबी फक्त द्वेष आणि दहनच आले. एवढी वर्षे रावणाच्या ताब्यात अशोकवनात राहून आल्यावर रामाने सीतेची अग्निपरीक्षा घेतली. पण एवढी वर्षे सीता रावणाच्या अशोकवनात राहूनही त्याने तिला साधा स्पर्शही केला नाही. मग मोठा कोण?
मोठे तर दोघेही आहेत. रामही मोठा आहे आणि रावणही मोठा आहे. रामा पुढे रावण उभा ठाकला, म्हणून राम अजरामर झाला. ही दोन्हीही मानवाचीच प्रतिकं आहेत. यात कोण मोठा आणि कोण छोटा याचा शोध घेत गेलो तर आपला मानसिक गोंधळ उडेल. त्यापेक्षा या दोघात जे काही चांगलं आहे ते घेतलं तर ते आपल्यासाठी चांगलं होईल. नाण्याला दोन बाजू असतात. तशाच प्रत्येक गोष्टीला, घटनेलाही दोन बाजू असतात. त्या पाहण्याची आणि त्या खोलात जाण्याची व्यापक क्षमता, इच्छाशक्ती आणि एकाग्रता आपल्याकडे हवी.
महाभारतात अर्जुनाला सकारात्मक प्रसिद्धी मिळाली. पण कर्ण हा अर्जुना इतकाच किंबहुना त्यापेक्षाही कांकणभर सरस असूनही तो मात्र कायम उपेक्षितच राहिला. महाभारतातील युद्धात पांडवांच्या पेक्षाही कौरवांची ताकत मोठी होती. स्वतः गंगापुत्र भीष्म, द्रोणाचार्य, विदुर, गदाधारी दुर्योधन, धनुष्यधारी कर्ण, अश्वत्थामा यांच्यासह अनेकजण होते. तर पांडवांच्याकडे पाच पांडव, त्यांची सेना आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण होते. फरक हाच होता की हे युद्ध जरी भाऊबंदकीतील वाटत असले तरी प्रत्यक्षात हे युद्ध हे धर्म विरुद्ध अधर्मातील होते. नीती विरुद्ध अनितीतील होते.
आपण फक्त एकच बाजू पाहतो. रामाविषयी भरभरून बोलतो, तेंव्हा रावणाचे कर्तृत्त्व लक्षात घेत नाही. अर्जुनाचा अभिमान बाळगतो, तेंव्हा कर्णाचा त्याग लक्षात घेत नाही. प्रत्येक घटनेला अनेक संदर्भ असतात. ते तपासण्याचे आपण टाळतो. अमृतवेल वाचताना नंदाचा प्रियकर शेखर याचा विमान अपघातात मृत्यू होतो. त्यामुळे ती पूर्णपणे कोलमडून पडते. जीव देण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरते. जसजशी पुढे जाते तसतशी तिला तिच्यावरील जबाबदारीची जाणीव होऊ लागते. थोरली बहीण आक्का हिने मरताना मिलिंदला नीट सांभाळ असे सांगितलेले असते. त्याची आठवण तिला येते. आक्काच्या अकाली मृत्यूनंतर माई आणि दादांना या वयात एवढे मोठे दुःख देऊन जाणे योग्य नसल्याची तिला जाणीव होते आणि ती आयुष्याला सामोरे जाण्यासाठी माघारी फिरते. दुःख माणसाला अंतर्मुख करते हे खरेच आहे.
स्वतःचे दुःख पाठीवर टाकून जगायचे असे नंदा ठरवते. वर्ग मैत्रीण, गोड गळ्याची गायिका असलेल्या आणि लग्नानंतर जहागिरदारीण झालेल्या वसुंधराला एका care taker ची आवश्यकता आहे असे समजल्यावर ती तिकडे जायचे ठरवते. तिच्याकडे जाताना वसू विषयी अनेक कुतुहूल तिच्या मनात असते. गोड गळ्याची वसू आता श्रीमंत झालीय. ती आता खूप सुखात असेल. सर्व सुखं तिच्या पायाशी असतील. गेल्यानंतर तिला ए वसू, कॉलेजमध्ये असताना म्हणत होतीस ते ओ सजना बरखा बहार आयी…. हे गाणे म्हण ना. अशी गळ तिला घालायची अशा अनेक कल्पना करत ती तिथे पोहोचते. पण तिथे गेल्यावर तिला नेमकं याच्या उलट चित्र पाहायला मिळतं. वसू आणि तिचा नवरा देवदत्त हे एकमेकांच्या पासून वेगळं राहतात हे तिला समजतं. मग ती वसुकडून याबाबत माहिती घेते. तेंव्हा तिला देवदत्त यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण होतो. ज्या वर्ग मैत्रिणीला आपण जहागीरदारीण समजत होतो ती फक्त पैशानेच श्रीमंत आहे. बाकी आतून ती पूर्णपणे उद्धवस्त झाली असल्याचे आणि याला देवदत्त जबाबदार असल्याचे समजल्यावर तिला खूप संताप येतो. वसूच्या दुःखात ती आपले दुःख काही काळ विसरते.
जेंव्हा तिची आणि देवदत्त यांची भेट होते. तेंव्हा नंदाला देवदत्ताचे एक वेगळे व्यक्तिमत्त्व पाहायला मिळते. ती त्याला ऐकते, समजून घेते. तेंव्हा वसूचे ऐकून देवदत्त यांना खलनायक ठरवणाऱ्या नंदाला देवदत्ताच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे पैलू माहिती पडतात. मानवी आयुष्य काय आहे? वसूचे ऐकले, तेंव्हा नंदाला वसू विषयी सहानुभूती वाटली. पण जेव्हा तिने देवदत्त यांना ऐकले त्यावेळी नंदाला देवदत्त त्यांच्या ठिकाणी योग्य वाटले. नंदाच्या मनाची ही अशी अवस्था का झाली? नंदाच काय? पण आपलीही अनेकदा अशीच अवस्था होते. नंदा काय? वसू काय? देवदत्त काय? ही मानवाचीच प्रतिकं आहेत. देवदत्त जेंव्हा स्वतःच्या आईच्या बाहेरख्याली वृत्तीबाबत नंदाला सांगतात, तेंव्हाही नंदाच्या मनात देवदत्त यांच्या आईबाबत घृणा निर्माण होते. हॅम्लेटची आई आणि देवदत्तची आई या एकाच प्रवृत्तीच्या आहेत असे तिला वाटते.
पण शेवटी देवदत्तच्या आईचे पत्र जेंव्हा नंदाच्या हाती लागते. तेंव्हा त्या आईच्या एका वेगळ्या आयुष्याचा पैलू समोर येतो. तो आपण नाकारू शकत नाही. राम काय? रावण काय? पांडव काय? कौरव काय? नंदा काय? वसू काय? देवदत्त काय? त्यांची आई काय? हॅम्लेट काय आणि त्याची आई काय? ही सगळी मानवाचीच प्रति रुपं आहेत. आजही ही व्यक्तिमत्त्व या जगात आहेत. भळभळती जखम घेऊन आजही अश्वत्थामा भटकतोय. आजही आपल्यात राम आहे, रावण आहे, कृष्ण आहे, अर्जुन, दौपदी, भीष्म, धर्म, धृतराष्ट्र, दुर्योधन, वसू, नंदा, देवदत्त, त्याची आई, हॅम्लेट एवढेच काय त्याची आई सुद्धा आहे. चांगल्या वाईट प्रवृत्त्या आहेत. फक्त त्यांचे चेहरे बदलले आहेत. यात कोण चांगले आणि कोण वाईट? असे काही नाही. जो तो विधिलिखित जी आपली भूमिका आहे ती तो निभावतोय. आपल्याला ते ओळखता यायला हवे. आपण मात्र एकच बाजू पाहून कोण चूक? कोण बरोबर? कोण चांगला? कोण वाईट? कोण नायक? कोण नालायक हे ठरवत असतो. पण आपण एक लक्षात घ्यायला हवं की आपलं असणं हे आपल्या हातात नसतं. ते त्या विधात्याने ठरवलेले असते म्हणून आज आपण इथं आहे आणि रस्त्यावरचा भिकारी रस्त्यावर आहे. त्या विधात्याचे आपल्यावर उपकार आहेत. याची जाण ठेवून आपण नेहमी वागायला हवे आणि त्याला धन्यवाद द्यायला हवेत.
धन्यवाद
-किशोर बोराटे