गोडवा तिळगुळाचा

+1

#गोडवा_तिळगुळचा

संध्याकाळी ऑफिस मधून येतानाच तिला राधाताईंचा फोन आला .
आईंचा फोन!! मला? स्वतःलाच प्रश्न विचारत तिनं तो उचलला .
हॅलो नेहा.. आई बोलतेय गं
बोला आई
एक काम होतं गं तुझ्याकडे!
आई… किती वेळा त्या विषयावर बोलणं झालंय आपलं!!
तुम्हाला वाटतं तसं नाही होऊ शकत.
अगं मी काय म्हणतेय उद्या संक्रांत आहे गं! खूप हौसेनं तुझ्यासाठी काळी पैठणी घेऊन ठेवली होती. हलव्याचे दागिने मी स्वतः घडवलेत!! फक्त उद्याचा एक दिवस येशील का गं? ती पैठणी नेसलेलं दागिने घातलेलं तुझं ते रूप मला बघायची फार इच्छा आहे गं!!
मागच्या वर्षी तुमचा पहिलाच सण संक्रांत आला म्हणून नाही करता आला ना? आणि पुढच्या चार महिन्यात तुम्ही वेगळे झालात. आता काही दिवसांत तुम्ही कायद्यानेच वेगळे व्हाल. पण तो पर्यंत तू अजूनही माझी सून आहेस ना??
आईsss
बाळा मी वाट बघते हं.
आणि फोन बंद झाला.
ती विचारात पडली यांना कसं समजवायचं?
दुसऱ्या दिवशी सकाळी इच्छा नसताना ती गेली खरी.
ती येताच राधाताईंचा चेहरा आनंदाने उजळून निघाला.
ये ये ,बस
तुझ्या आवडीचा खास मसाला चहा केलाय घे.
तिची नजर घरभर फिरत होती. तिची शोधक नजर राधताईंना कळली आणि त्या म्हणाल्या अगं तो नाहीये , सकाळी लवकरच गेलाय ऑफिस ला.
चहा घेऊन झाल्यावर राधाताई तिला खोलीत घेऊन आल्या आणि म्हणल्या हे घे पैठणी!! आणि हे दागिने!
रूम मध्ये येताच तिला रूमचे पालटलेले रूप जाणवल्याशिवाय राहिले नाही. तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत राधाताई म्हणाल्या तू गेल्यापासून खूप बदल झालाय गं त्याच्यात , सगळ्या वस्तू जगच्या जागी असतात , बेडवरचा ओला टॉवेल उचलायला हल्ली त्याला सांगावं लागत नाही बरका!! आणि त्या मित्रांसोबत लागलेल्या वाईट सवयी पण आता बंद झाल्यात बरं!!
घरी तर लवकर येतोच पण मला घरकामात मदत देखील करतो!! तू गेल्यावर खरी किंमत कळली गं तुझी त्याला ,पण कुठल्या तोंडाने येणार आता परत तुझ्याकडे?

ती साडी नेसून दागिने घालून राधाताईंसमोर आली , राधाताईंनी तिला देवासमोर तिळगुळ आणि वाणवसा ठेऊन सुगडांची पूजा करायला सांगितली. तीही त्या सांगतील तसं करत गेली.
पूजा झाल्यावर तिला स्वतःच्या हातानी तिळगुळ भरवत म्हणाल्या तिळगुळ घे आणि गोड गोड बोल.
आईsss तुमच्या हातचा तिळगुळ जगात भारी!! मला पण शिकवा ना!!
अगं विशेष काही नाही गं सगळे करतात तसाच मी पण करते.काय लागतं माहितीय का मनातला गोडवा , आणि आपल्या माणसासाठी प्रेमानं करण्याची असलेली इच्छा. तो गोडवा गूळात आणि मायेची ऊब तीळात उतरते आणि ही चव तयार होते.
किती छान दिसतीयस गं तू !! थांब हं दृष्टच काढते तुझी!!
आई निघू मी ऑफिस ला उशीर होतोय
हो हो नीघ नीघ! हा घे डबा गूळ पोळी दिलीय .
आणि आता तो बदललाय गं!! तू ही तुझा विचार बदललास तर??? नातं घट्ट होण्यासाठी त्याचे धागे विखुरू द्यायचे नसतात गं!! एकाने तरी त्याची वीण बांधावी लागते ना!!
एक संधी त्याला देशील का गं? माझ्यासाठी??

आई मी नीघू?
बरं..
दार उघडून ती बाहेर पडताच तो समोर उभा होता.
दोघांची नजरा नजर झाली आणि त्याच्या मनातले भाव तिने त्याच्या डोळ्यात वाचले. त्याची नजर सांगत होती तिला तू गेल्यापासून तुझ्या मनाप्रमाणेच वागतोय बरं मी. त्यादिवशी रागाच्या भरात बोललो तुला मी नको ते ,त्याचा खूप पश्चाताप होतोय गं आता मला! माझी चूक कळली गं!
ती देखील नजरेतून बोलत होती मी ही जरा जास्तच राग केला रे एवढ्या तेवढ्या गोष्टींचा!! आणि सारख्याच सूचना करत होते मी तुला, ते तुला आवडत नव्हतं ना? म्हणून तू बाहेर बाहेर राहत होतास सारखा ,माझंही चुकलंच जरा!!
मागे उभ्या राहिलेल्या राधाताई तिला म्हणाल्या आगं उशीर होतोय ना ऑफिस ला ?
आणि तू गेला नाहीस ऑफिस ला? बरं असेच दारात उभे राहून एकमेकांना बघत बसणार आहात का?
हो आई निघालेच , ती म्हणाली.
बरं बरं उशीर झालाय ना तुला?
त्यावर तो म्हणाला चाल मी सोडतो.
तीही पटकन तयार झाली आणि म्हणाली आई संध्याकाळी लवकरच येते हं, हळदी कुंकाची तयारी करायला!!
ते ऐकून तीळगुळाचा गोडवा राधाताईंच्या चेहऱ्यावर उतरला.

©अपर्णा…(ADP)

+1