कॉफी पिता पिता..
डॉ.अनिल कुलकर्णी
सकाळच्या सूर्यप्रकाशात झाडे पहुडली होती, छान न्हाऊन निघत होती, सोबतीला वारा नव्हता म्हणून नि:शब्द,निश्चल पणाचा अनुभव घेत होती.
झाडांना पर्याय नसतो निसर्ग जे देईल ते घेण्यावाचून.
माणसे निसर्गानं जे दिले ते निमूटपणे स्वीकारतंच नाहीत,तर निसर्गात ढवळाढवळ करणे त्याचा फडशा पाडणे हेच माणसाचं काम अव्याहत चालू असतं.
‘ठेवीले अनंते तैसेची राहावे’ हे झाडाकडून शिकायला हवं. समाधानाचे थांबे आपल्याला विश्रांती देतात, घडवतात हे आपण मान्यच करत नाही.
तसे चिंतन-मनन हे थांबे आता आयुष्यातून नामशेषच झाले आहेत.
कुणालाच विचार करायला वेळ नाही. प्रत्येकाला आपलं उद्दिष्ट गाठायचं आहे, पण ते गाठत असताना कोणालाही माणसांची मनें सांभाळायची नाहीत, निसर्ग पाहायचा नाही, शांती अनुभवायची नाही. अनेक माणसे यशापर्यंत पोहोचूनही पुन्हा नैराश्याच्या खाईत ढकलली जातात. माणसें स्वतःचा सेल्फी काढण्यात इतके गर्क झालेत, की या सेल्फी काढण्याच्या नादात त्यांचा कधी कडेलोट नैराश्याच्या गर्तेत होतो हे त्यांनाही कळत नाही.
माणसे सहजासहजी बदलत नाहीत, सहजासहजी एकमेकांना स्वीकारत नाहीत त्यांच्या मनात पूर्वापार चालत आलेला विचारांचा पगडा असतो मग तो परंपरेचा असो वा संस्कृतीचा असो, तो अनावश्यक असला तरी त्याचं ओझं ते गाढवासारखं वाहत राहतात, नको त्या परंपरेला गोचीडा सारखं चिटकून राहतात आणि म्हणून मग बदल अपेक्षित होत नाहीत. माझं, मी काहीही करेल या उन्मत्त विचारात माणसे एकमेकाबद्दल आढी ठेवतात, मनातल्या मनात जळत राहतात.
इतक्यात कुणीतरी आल्याचा आवाज आला. आमच्या सौ.आल्यामुळे माझ्या मनातील विचार चक्र अचानक थांबले.
ती-कसला विचार करतांय. काय अजून काल भेटलेलीचाच विचार करताय कां?
मी-नाही गं
मी-“पण मला ती आवडली असं मी म्हटलं याचा तू इतका बाऊ का करतेस”?
आपल्याला चित्र आवडतं, आपल्याला निसर्ग आवडतो, आपल्याला एखादं फुल आवडतं, आपण त्याचा वास घेतो, त्याला कोणीच काही आक्षेप घेत नाही.
ती-“तुझं खरं आहे पण प्रत्येक नात्यालाही एक लक्ष्मणरेषा असावी लागते”
“आवडत्या व्यक्तीचा सहवास आवडणं ठीक आहे पण कोणात किती रत व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असलां तरीही त्याला काहीतरी बंधन समाजात वावरत असताना पाळयलाच हवं”
“मला माहित आहे माणसं सहवास शोधतात, सहवासात आली की पुढच्या चाली खेळतात हे आम्हास ठाऊक असतं”.
“प्रेमाचे गुणोत्तर आणि वासनेचं गुणोत्तर यात फरक आहे.”
“प्रत्येक प्रेमाला एक flavour, texture असतं आणि त्याला न्याय द्यायचा असतो”
आईचं प्रेम वात्सल्यसिंधू असतं, जिथे सागरा धरणी मिळते तिथे प्रेमिकांचे प्रेम असतं.
“प्रेमाची लक्ष्मणरेषा ओलांडली की रावण व्हायला वेळ लागत नाही”.
“स्वप्नात सगळं चालतं पण वास्तवात नाही चालंत”.
“स्वप्न फक्त दिलासा देतात दिलासा यावर वास्तव चालत नाही”.
नग्नतेच्या एक्स-रेने संपूर्ण शरीर पाहता येतं.
तो-चंद्र आवाक्यात नसला तरीही चंद्राकडे पाहूनच आपण जगतो, प्रेम करतो,आयुष्य सुसह्य करतो, कविता करतो.
मग सौंदर्याकडे पाहून थोडे जीवन सुसह्य केलं तर काय हरकत आहे.
ती-एकाच वेळेस आपल्याला अनेक जण आवडत असतात पण आवडलं तरी आवडीलाही लक्ष्मण रेषा घालावी लागतें नाही तर फार कठीण होऊन जातं.
स्वातंत्र्य सगळ्यांनाच मान्य असतं आणि स्वैराचार कोणालाच मान्य होत नाही. स्वातंत्र्यात बंध रेशमाचे असतात. स्वैराचाराचे वेटोळे आयुष्यचे वाटोळे करतात.
सौंदर्य कोळून प्यायचं नसतं गाळून प्यायचं असत.
आपल्यासमोर कोणतं सौंदर्य आहे याचं भान ठेवायला हवं, छोट्या बाळाचे सौंदर्य वेगळे, निरागस मुलीचे सौंदर्य वेगळं, वयात आलेल्या तरुणीचे सौंदर्य वेगळेच, वार्धक्यात आलेल्या बाईचं सौंदर्य वेगळंच. प्रत्येकाला न्याय, सन्मान द्यायलाच हवां, त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार.
परस्त्री मातेसमान वाटायला जिजाईचे संस्कार हवेत.
जाहिरातीपासून ते सगळ्याच क्षेत्रात स्त्री च्या नग्नतेचा वापर व वावर इतक्या मोठ्या प्रमाणात केला जातोय की नग्नतेची सोनोग्राफी केली जाते आहे.
माणसे आहेत तशी कधीच सादर होत नाहीत,आहेत तशी कधीच व्यक्त होत नाहीत, त्यामुळे सगळे प्रश्न निर्माण होतात.
मनाचा थांगपत्ता लागला की शरमेने सगळेच माना खाली घालतील अशी परिस्थिती आहे,अर्थात काही अपवाद सोडून.
मुखवट्यात सगळेच सभ्य आहेत. चेहऱ्यात सगळेच भेसूर आहेत, हे वास्तव आहे.
तो-माणसाचं मन चंचल आहे ना,मी तुझ्याशी बोलतोय पण माझ्या मनात दुसरेच विचार असू शकतात.
तुझ्याशी मी जे बोलतो ते तुला खरं वाटतं पण वास्तवात मी बरोबर किंवा खोटं खोटं ते बोलत असतो ते तुला नसतं कळत.
समोरचा खरं बोलत असेल एवढंच आपण विश्वास ठेवू शकतो.डोळ्याच्या हावभावा वरून कळतं, पण ते सुद्धा कधीकधी फसवे असतात.
डोळे हे जुलमी गडे उगीच नाही म्हटलं.
समोरासमोर माणसे फक्त माझ तुझ्यावरच प्रेम आहे असे जरी म्हणत असले तरी, वास्तवात वेगळं असु शकतं.
वेळ मारून नेण्यात माणसे पटाईत असतात.
ठीक आहे प्रेम करण्यापासून कुणी कुणाला परावृत्त करू शकत नाही. प्रेम कधीही होतं कुठेही होतं, व कुणांवरही होतं.
आपण शिकलेले लोक फार विचार करतो नाही, आपण खूप विवाहबाह्य संबंध पाहतो, नवीन ब्रेकअप चा अभ्यासक्रम पूर्ण करतो,प्रेमाच्या कविता वाचतो, प्रेमाच्या कादंबऱ्या वाचतो, प्रेमाचे चित्रपट पाहतो, आपण सदैव प्रेमातच बुडालेले असतो प्रेमाचा विचार करतो, पण प्रेम करतोच असं नाही?
ज्या प्रमाणात आपण प्रेमाचा विचार करतो, त्याप्रमाणात आपण प्रेमाचा आचार करतो का? विचार वेगळा आचार वेगळं असं का?
आपण प्रेमाचे संदर्भ घेतो, पाहतो आणि निष्कर्ष काढतो संशोधन करतो पण आपण त्यात असतों कां?
पैसा भौतिकता आणि प्रेम याच्यात माणसाला सारखी भर घालावी वाटते, आहे तिथे माणसें समाधानी राहतच नाहीत.
ती-दिवसभर श्रम करून रोजीरोटीला प्राधान्य देणारे, प्रेमाचा कुठे एवढा विचार करतात, पण प्रेम करतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
झोपडीही प्रेम फुलतं. आनंदासाठी मनाचा गुलमोहोर व्हायला हवा. भौतिक सुखात मन शोभेचे निवडुंग होतं.
प्रत्येकाला फक्त यशोशिखर हवंय, पण पायथ्याशी समाधानाचे विश्रांती स्थान असतात हे ते विसरतात.
तो-मी एका सौंदर्यवती कडे पाहिलं हे ठिक आहे पण या जन्मावर शतदा प्रेम करावे, या सौंदर्यावर शतदा प्रेम करावे चांगल्या विचारावर चांगल्या आचारावर, चांगल्या मनावर शतदा प्रेम करावे असेच म्हणावे लागेल.
अनेक गोष्टी आपल्याला आवडतात पण प्रत्येकाची श्रेणी ठरवणे आवश्यक आहे हे मला मान्य आहे.कधी कधी बदल म्हणून केलेल्या गोष्टी विरंगुळा असतात.
ती-आपण जरा कॉफी घेऊया कां?
तो-हो मला चालेल.
कधीकधी तत्वज्ञान फार रूचत नाही, म्हणूनही रूजत नाही,मध्ये मध्ये थोडा विरंगुळा हवाच.
ठीक आहे तत्त्वज्ञान पुस्तकांतच चांगलं दिसतं. मानसशास्त्र मनातच ठेवायचं व समाजशास्त्र समाजात ठेवायचं, असे केले की त्रास नाही होत.
तो-कॉफी ने थोडा बदल होईल आणि बदल हा आवश्यकच असतो.
जिथे मन तिथे बदल हवांच. प्रत्येकाचे बदलाचे थांबे वेगवेगळे आहेत. जिथे तुला थांबाव वाटेल तिथे मला कंटाळा येऊ शकतो.
ती-प्राण्यांना कुठे बदल हवा असतो?
मनाचे चोचले आपण जेवढे पुरऊ तेवढे मन चंचल होतं.
बदल म्हणजे कशाचाही हव्यास धरणं याचा परवाना नाही.
फार शिकलो, फार वाचलं की प्रत्येक गोष्ट आपण तात्विक चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो.
काही माणसे वास्तवात इतके छान संवाद,शब्दरचना पेरतात की असं वाटतं त्याची नोंद कुठे तरी व्हायला हवी.
प्रत्येक संवादाला आयुष्याच्या कादंबरीत जागा मिळत नाही, काही संवाद हवेतच विरून जातात.
बर जाऊ द्या आता मुलं यायची वेळ झाली त्याच्याआत मला
ती सिरीयल पाहावी लागेल.
मुलासमोर नको ती दृश्य तो प्रणय, ते डोळे मिचकावणे, कपटीपणा.
तो-पण आजकालच्या मुलांना हे नवीन नाही ते टीव्हीवर नाही पाहिलं तरी समाजात पाहतात, अवतीभवती पाहतात, घरात पाहतात.
माझं मत मात्र या बाबतीत वेगळं आहे, मुलांना टीव्ही पाहू द्या, नाते संबंध काय असतात हे त्यांना कळू द्या. कुटुंबात भावनिक पालन-पोषण नाही तर निदान भावनिक पोषण कसं हे काही चांगल्या मालिकांतून त्यांना कळेल तरी. पारदर्शकता लहानपणापासूनच मुलांच्या अंगी बाळगायला हवी.
ती-कोणत्या सिरीयल मधून प्रेम, संस्कार बिंबवले जातात?
तो-मी म्हणतो सगळं त्यांच्या वयानुसार मुलांनी पहावं, त्याला कळायला पाहिजे काय चांगलं काय वाईट त्यांना कळायला हवं. अश्लील न पहाण्यासाठी मात्र लक्ष ठेवायला हवंं.
सिरीयल मधल्या पात्रांची चर्चा, काळजी घरातले सगळेच करतात, उद्या काय होणार?
पण घरच्या लोकांशी चर्चा, काळजी कुणीच करत नाही
हे बरोबर आहे कां? आणि घरातले लोक तोंड उघडतच नाहीत, संवाद करत नाहीत, बोलत नाहीत मनातलं खरं सांगत नाही, त्यांच्या मनात काय चाललंय ते कळत नाही.सिरीयल मधले सगळे बोलकें ,मन मोकळं करतात तसं घरात नाही, घरात सगळे बोलणं, सगळ्या इच्छा आकांक्षा मनातच मारून टाकणं असतं. व्यक्त न होणं हेच दुःख कुटुंबाचं आहे.
सिरीयल पाहायला सगळ्यांना वेळ आहे मन लावून पाहतात मन लावून ऐकतात, सिरीयल चा एपिसोड बुडायला नको असं त्यांना वाटतं पण किती माणसे किती जणांशी घरात बोलतात, ना आई मुलाशी बोलते न मुलगा आईशी बोलतो, ना वडील मुलांशी बोलतात ना मुलगा वडिलांशी बोलतो, कसलेच संवाद नाहीत कारण मनातल्या मनात प्रत्येकाची वेगळे नियोजन चालू असते.
कुटुंब म्हणजे हो किंवा नाही एवढंच उत्तर देणारीजागा ठरली आहे. काही विचारावं तर हो किंवा नाही उत्तर देऊन पुढचा सवांद संपतो.काय चाललय, मस्त म्हणल्यावर कोणीही त्याच्या वाटेला जात नाही पण खरा तो आतून किती पोखरलेला असतो हे त्याचे त्यालाच माहीत असतं.
आपलं दुःख माणसं फार क्वचित माणसांजवळ व्यक्त करतात. प्रत्येकाचं वागणं म्हणजे हिमनगाचे टोक असतं,तळाशी बरच काही साचलेलं असतं. आपण सगळे एकमेकांना हिमनगाच्या टोका प्रमाणे पाहतो आणि खूष होतो की त्याचे ठीक चाललंय आणि ईथेच सगळे चुकतं.
तुझं बाहेर प्रेमप्रकरण नाही नाही नां, म्हणल्यावर नाही म्हणलं जातं आणि त्याचं प्रकरण चालू असतं.
सगळा खोटेपणा, विसंवाद काही कुटुंबात दाटलेला आहे तो मोकळा व्हायला हवां.
पारदर्शकता आपल्यालाबद्यल कुणालाच नको वाटते.
आपल्या जखमेवर फक्त इतरांनी ही फुंकर घालावी, पण खपली काढू नये असं प्रत्येकाला वाटतं,
फुंकर घालून जखम बरी होत नसते.
माणसे जखमा घेऊन जगतात कुणाच्या जखमा सुगंधी असतात कुणाच्या शारीरिक कोणाच्या मानसिक.
मुलांचा स्क्रीन टाईम आपल्या हातात नाही, मुलांचा टाईम आपल्या हातात नाही.
रिमोट मुलांनी स्वतःच्या हातात घेतला आहे किती कार्टून्स पहावेत, किती मारामारीचे चित्रपट पाहावेत, काय पहावं काय नाही ही मुलेच आता ठरवू लागली आहेत
कुटुंबातले वाद-संवाद मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतात.
ती-चला आता आपण जरा मुलांना घेऊन लांब फेरफटका मारून जरा निसर्गाच्या सान्निध्यात राहून, त्यांना ही निसर्ग दाखवू निसर्ग ऐकवू किती मुलांनी निसर्गातील हिरवे हिरवेगार गालिचे पाहिलेत, मोराचं थुईथुई नाचणं, कोकिळेचा आवाज ऐकलाय.
सूर्योदय आणि सूर्यास्त कसा पाहायचा कुठे पाहायचा हे आपण मुलांना शिकवू.
आपल्याला वाटतं आपल्या मुलांनी सगळं चांगलं पाहून चांगलं वागावं,पण त्यासाठी लवकर उठायला हवं, सूर्यास्त पहायचा असेल तर लवकर उठायची चांगली सवय अंगीकारणे आवश्यक आहे,पण नाहीच ते उशिराच उठणार.
तो-पालकांचं मुले ऐकत नाहीत, आम्ही आमच्या पालकांचं निमूटपणे ऐकत होतो शिस्तीत राहत होतो. आमची हिंमत नव्हती उलट बोलण्याची म्हणून आज आणि थोडेफार तरी रूळावर आहोत.
खरंतर आम्हालाच बदल हवानय म्हणून आम्ही नको ते घरात आणलं आम्ही भोगत आहोत.
ठीक आहे पण प्रत्येक पिढीच्या तोंडी हेच वाक्य आपण ऐकतो, आजकालची पिढी बिघडली आहे, आमच्या वेळेस असं नव्हतं, पण हळूहळू कालांतरानं नवीन संदर्भ, नवीन पायंडे पडत जातात आणि ते अंगवळणी पडतात आणि तो इतिहास होऊन जातो.
बरं आपण आज फारच तात्त्विक बोलत आहोत पण काही का असेना आपला संवाद तरी होतो आहे. मतभेद असतील पण मनभेद नको. ठीक आहे सगळच काही कादंबरी प्रमाणे आयुष्यात घडत नसतं. सुखद शेवट होत नसतो. सगळंच काही कवितेप्रमाणे चटका लावणार नसतं, आनंद देणारं नसतं याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.
तो -कधी कधी मी तत्त्वज्ञ सारखं बोलतो कां?
आपल्या व्यक्तिमत्त्वातच तत्वज्ञान अनुवंशिकतेनं आपल्यात सामावलेलं असतं, आपण फक्त ते व्यक्त करतो आणि काही गोष्टी परिस्थिती आपल्याला शिकवते तेही आपण व्यक्त करतो.
माणसे अनुभवातून बोलतात, व्यक्त होतात निरीक्षणातून व्यक्त होतात.
प्रत्यक्षातलं युद्ध आणि कुटुंबातलं शीतयुद्ध संपायला हवं,ते संपत नाही कारण माणसे स्वतःअस्तित्व दाखवतात. मी असा आहे आणि मी असाच वागणार माझ्या प्रमाणे तुम्ही वागायला हवं. या स्वभावाला औषध नाही. दुःखाला कुरवाळण्यात माणसाचा संबंध वेळ जातो. दुःख व्यक्त करण्याच्या जागा ज्याच्या त्याच्या ठरलेल्या असतात. जिथे विश्वास आहे जिथे आपल्या दुःखाचं पोस्टमार्टम होणारं नाही, तिथेच माणसे मोकळी होतात, आणि दुःख व्यक्त करतात.
काही माणसे कविता करतात, कविता जगत नाहीत.
काही माणसे लेख लिहितात पण त्यांच्या लेखी आपल्या माणसाची कदर नसते.काही पेपरमधली कोडी सोडवतात पण घरातलं कोडं सोडवू शकत नाहीत, हीच आजच्या कुटुंबाची शोकांतिका आहे.
तत्त्वज्ञान जगणाऱ्यापेक्षा तत्त्वज्ञान सांगणाऱ्याचा गट समाजात जास्त सक्रिय आहे. उपदेश करायला सगळ्यांनाच आवडतं पण उपदेश ऐकायला कोणी तयार नसतं.
माझ्या मनात एक विचार आला मी इतकं आयुष्य जगलो, खूप काही तरी करायचं राहिलं.
मृत्युचे विचार येतात, शेवटी हेच आयुष्याच संचित. माणसे जातात इस्टेटीची विभागणी करून जातात पण विचारांची सुद्धा विभागणी कां करता येत नाही?.
ती -आपण प्रवासाला ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जाताना वाहन कसं आहे, रस्ता कसा आहे हेच पाहतो.तसं आयुष्य जगताना सुद्धा मृत्यू जरी अटळ असेल तरीही मृत्यू येईपर्यंत कसं ,किती आपण जगणार हे आपण ठरवू शकतो. नैराश्याच्या थांब्यांवर न थांबता आपण आशेची ठिकाणं शोधायला हवेत ,आनंदाचे झरे हुडकायला हवेत, उत्साहाचे झरे शोधायला हवेत.
बरं आता खूप झालं आता आपल्याला आपापली कामे आहेत.
होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा कॉफी..
डॉ.अनिल कुलकर्णी
९४०३८०५१५३
३७/१सहजानंद सोसायटी कोथरूड पुणे ४११०३८ anilkulkarni666@gmail.com@gmail.com