स्मुतीगंध…. ट्रेक क्रमांक १ रायरेश्वर

स्मृतीगंध….
वाट भूतकाळाची….प्रवास भविष्याचा……स्वप्न उद्याची….पण…नाद इतिहासाचा…

ट्रेक नंबर १
रायरेश्वर

आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली इतिहासाच्या वाटांवर चालण्याची…गेली २ आठवडे केलेलं नियोजन ह्या ना त्या कारणाने मोडत होते.म्हणतात ना बऱ्याचदा चांगल्या कामाला विघ्न ही येतातच.अगदी तसेच झालं असं समजा…..आज मंगळवार …..कामाला सुट्टी न्हवतीच.पण माझे बंधू गुरुनाथ(भाऊ), आमचे मेणवली गावचे मित्र सागर आणि नव्याने ओळख झालेला मित्र अथर्व आम्ही अचानक नियोजन केले की रायरेश्वर पहायचाच.
मग काय तर सोबत यायला माझा ८ वर्षाचा पुतण्या पण लगेच तयार. म्हणतात ना आपण ज्या प्रकारे संस्कार करू तशीच ओढ लहानग्यांना लागणार.नियोजन पूर्ण झालेच न्हवतेच तोपर्यंत पुतण्याने म्हणजेच आमच्या दिव्यांशने इतिहास सांगायला केली ना सुरुवात…..काका मला माहितेय तिथे शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती.त्यांनी तिथे बोट कापून घेतले होते….मला त्याचं रक्त बघायच आहे….मला पण न्या…
क्षणभर थोडा विचारात पडलो ह्याला अजुन स्वतःचे सगळे पाहुणे ओळखताना गोंधळ होतो.पण आपल्या आराध्य दैवताने काय शपथ घेतली …कसे तिथे गेले…काय ठरवले… हे तो असं सांगत होता जणू हा त्या घटनेचा समक्ष साक्षीदार होता.
बघा ना हेच ते वय ह्याच वयात जर आपल्या इतिहासाची बीजं बाल मनात रुजवता आली तर इतिहास पण किती बोलका होतो.
आज पण हा लिखाणाचा प्रपंच इतिहास सांगण्यासाठी नाहीच…आपल्या राजांचा इतिहास….स्वराज्याची शपथ….आणि पुढे गाजवलेला पराक्रम ह्यावर मी काय सांगणार….आपल्या नसानसांत भिनलेलं हे स्वराज्याचं वारं …….आपोआपच आपल्याला बोलक करत असतं‌ की.
पण मनात आलेलं थोड लिखाणातून उतरवू वाटलं….खरंच किती विलक्षण गोष्ट आहे ना…किती भाग्यवान आहोत आपण की आपल्या सभोवती विस्तारलेला हा सह्याद्री नुसता भक्कम उभाच नाही तर तो आपल्या राजांनी आणि मावळ्यांनी कित्तेक वर्षापूर्वी केलेला पराक्रम… अतुल्य धाडस…शौर्य…त्याग…निष्ठा….आणि… बलिदान सारं कसं जसेच्या तसे नजरेसमोर उभं करत आहे.
थोडा इतिहास डोळ्यापुढे आणून बघा….आपल्या छत्रपती शिवाजी राजांनी जो इतिहास घडवला आहे…जेवढे किल्ले जिंकले…आयुष्यात जेवढा प्रवास केला जेवढं स्वराज्य निर्माण केलं.हा इतिहास नक्कीच प्रेरणादायी आहे….पण त्याचा भूगोल पण बघा ना ओ जरा…..आज प्रवासाची एवढी साधने आहेत की क्षणात मैलांचा प्रवास शक्य आहे.मग असे काहीच नसताना फक्त घोडे आणि पायी चालत कसे उभारले असेल हे स्वराज्य…? काय असेल ती जिद्द……? कसा असेल तो स्वतःवरील आणि सवंगड्यांवरील विश्वास…..? धण्यावरील निष्ठेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे ते मावळे आणि अशी निष्ठा जपून सर्वांशी आपुलकीने वागणारे राजे हे वेगळंच समीकरण होतं…. यापुढे मोघलशाहीला पण झुकावे लागलेच.
साताऱ्यातून फक्त ६०किमी अंतरावर असणाऱ्या ह्या रायरेश्वराच्या जवळ जायला आयुष्याची तिशी ओलांडली.त्याच मनाला थोड दुःख वाटत असलं तरी आज आलेला अनुभव हा खूप काही शिकवून गेला.
आज कार्याचा शुभारंभ झाला तो वाई गणपतीच्या दर्शनाने.आणि खऱ्या अर्थाने ह्या नवीन स्वप्नांचा श्रीगणेशा झाला.
शंभू महादेवाच्या ज्या पिंडीवर स्वतः शिवाजी राजांनी आणि मावळ्यांनी स्वतःच रक्त सांडून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली त्याच पिंडीसमोर बसून अभिषेक करण्याचा योग आणि भाग्य आज माझ्या नशिबी आले याहून वेगळं सुख काय असू शकतं.
गडावर ज्या शिवा जंगम ह्या पुजाऱ्यानी राजांना शपथ दिली त्यांचीच पिढी …वंशावळ..आजही गडावर वास्तव्य करत आहे.गडावर ३५-४० कुटुंब आजही छान सुखात जगत आहेत.आजही त्याच भक्तिभावाने रायरेश्वराची रोज पुजा होत आहे.
राजांना भेटले ते शिवा जंगम आणि आज त्यांचेच वंशज असणारे श्री आबाजी जंगम (पुजारी) ह्यांनी आमच्या जीवनात तोच क्षण जागा केला.आज आमच्या कडून त्याच पिंडीचा अभिषेक करण्याचं भाग्य आम्हाला लाभल.
त्यांच्याकडून समजलं ते ऐकून छान वाटलं की प्रत्येक शनिवार – रविवार भेट देणारे एवढे येतात की रांगा दिवसभर संपत नाहीत.पण मी म्हणेन जर ह्या ठिकाणी जाण्याचं ठरवत असाल तर हे दिवस सोडून नियोजन केलं तर मंदिराचं छान दर्शन आणि पुन्हा पांडवलेणी हे खूप आरामात पाहू शकाल.
गडाच्या पायथ्या पर्यंत गाडी जात असल्याने चढण जास्त नाही.त्यामुळे कोणीही आरामात तिथे जावू शकतं.जे गेले आहेत त्यांनी हा विलक्षण अनुभव घेतला असेलच पण जे गेले नाहीत त्यांना सांगणे एकच की जवळ असणारा केंजळगड हा देखील एकाच दिवसात पाहून होवू शकतो.
शेवटी काय तर इतिहासाच्या वाटांवरून प्रवास करायचा असेल तर मनात फक्त एकच ध्यास हवा की राजांनी आणि मावळ्यांनी उभारलेलं हे स्वराज्य पाहताना स्मरणात कायम तोच इतिहास आणि तेच संस्कार असावेत.भले वाडे पडले असतील… पण ते भक्कम विचार आजही प्रेरणा देतात…भले बुरुज ढासळले असतील….पण ते पाहिले की नक्कीच तुमचा ढासळलेला विश्वास भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही….तुटलेल्या दारांकडे पाहिले तरी…तुटलेली स्वप्ने पुन्हा नव्याने पाहण्याची नक्कीच उमेद तयार होईल….भले चढाईच्या वाटा बदलल्या असतील….पण गडांवर घेवून जाणाऱ्या वाटा ह्या आयुष्याला नक्कीच चांगली दिशा देणाऱ्या ठरतील……भले पाण्याची टाके शेवाळलेली असतील….पण तुमच्या मनावरील शेळपट विचार निघाल्याशिवाय राहणार नाहीत…….कारण फक्त एकच…..
हा इतिहास एका राजाचा नाही……हा इतिहास आहे माणूस रुपात जगलेल्या…..आराध्य दैवताचा. ……छत्रपती शिवाजी राजांचा……छत्रपती संभाजी राजांचा…..जिजाऊ मासाहेबांचा….आणि जीवाची पर्वा न करणाऱ्या निष्ठावान मावळ्यांचा…

निलेश बाबर
शब्दसारथी