स्मृतीगंध …..ट्रेक नंबर २……कमळगड

स्मृतीगंध…

हरण्याची भीती सोडून…..थोडं स्वतःला निसर्गात हरवणं जमलं ना की …. यशाचे नवे मार्ग शोधायला नव्याने प्रयत्न नाहीत करावे लागत…एकांत आपोआपच स्वतःचे विचार एका वेगळ्या उंचीवर नक्कीच घेवून जातो…..

ट्रेक नंबर २
कमळगड

नमस्कार… रविवार एक सुट्टीचा दिवस….आणि…. त्यात संकष्टी चतुर्थी….. मग काय दिवसाची सुरुवात पण तशी छानच झाली….ती म्हणजे वाईच्या श्रीगणेशाचे दर्शन घेवूनच…..
मग पुढे ठरल्या नियोजनानुसार कमळगड चा प्रवास सुरू झाला….कमळगड…..सह्याद्रीला सुशोभित करणारा अजुन एक विशाल दुर्ग…ह्या गड मोहिमेचे थोडे विश्लेषण करण्यापूर्वी काही गोष्टी सांगू वाटत आहेत….. हा गड बांधला गेला नाही त्यामुळे चढाई थोडी अवघड वाटते…. पण येणारा अनुभव हा नक्कीच सुखद आहे…..मग मनात थोडा विचार आला.राजांनी किती विचार करून.. किती कुशाग्रतेने…शत्रूला पोहोचण्यास अवघड….त्यास रोखण्यास सोपे….आणि चौफेर असणारा प्रदेश पाहता येईल असेच दुर्ग बांधले…..म्हणजे आज आपण सहज चढून जाणारा रायगड असो…सिंहगड असो किंवा राजगड….हे दुर्ग बांधण्यापूर्वी किती रुद्र असतील हे आज कमळगड चढताना जाणवले….हा दुर्ग बांधला नाही….त्यामुळे चढाई करताना होणारी दमछाक सांगून जाते की त्या काळी मावळ्यांना किती मेहनत घ्यावी लागली असेल…..किती प्राणपणाने कामे केली असतील…..एवढे भव्य दुर्ग उभारले…. ते सांभाळले….ते जपले….ते आजही दिमाखात उभे आहेत….आजही त्यांच्या गौरवाची….त्यांच्या कीर्तीची साक्ष देत आहेत. राजे खरंच तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत…तुम्ही जे निर्माण केले ते साधे फिरून पाहताना एवढी दमछाक व्हावी ह्यावरून एक गोष्ट कळतेय की ह्या निसर्गापुढे आम्ही किती खुजे आहोत…. आणि ह्याच निसर्गाला योग्य हाताळून तुम्ही किती दूरदृष्टीने सगळे बघत होता…सगळे घडवत होता…. आणि आपल्या कीर्तीचा अथांग सागर तुम्ही देवून गेलात. राजे तुम्हाला जेवढे जाणुन घ्यायचा प्रयत्न करतोय…जेवढं ह्या निसर्गात त्या पावलांची चाहूल घ्यायचं ठरवतोय तेवढे अनेक प्रश्न उभे राहत आहेत…..नक्की काय असेल ती प्रेरणा….? काय असेल ती जिद्द….? कसे असेल एवढे निसर्ग हाताळण्याचे ज्ञान….? हे कोडे न उलघडणारेच.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांसोबत शपथ घेतलेल्या रायरेश्वरावरून जेव्हा ह्या कमळगडाकडे पाहिले तेव्हाच मनाने ठरवले की इथे जायचेच.धोम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धोम धरणाच्या बाजूने जाणारी वाट ही देखणीच.
कमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत…अवघड असा तुपेवाडी कडून जाणारा मार्ग….सोपे असे परतवाडी आणि वासोळे मार्ग…आणि एक म्हणजे नांदगणे मार्ग…..नांदगणे मार्गाने जाताना एक पायवाट असणारा रस्ता आहे जिथून तुम्ही सहज गडावर जावू शकता…..पण खरंच ट्रेक चा विलक्षण आणि हटके आनंद घ्यायचा असेल तर मी सांगेन नेहमीच्या रस्त्याने न जाता दोन टेकडी पलीकडून चढाईला सुरुवात करावी.
पायथ्याला असणाऱ्या विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेतले की एक भक्कम अशी काठी पहिली शोधावी….सुरुवातीलाच तिचा वापर प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावणाऱ्या श्वान महाशयांना रोखण्यास होईल…मग पुढे असणारे चढण हे खूपच अवघड आहे….म्हणजे ३ ते ५ फुटापर्यंत वाढलेले गवत…आत्ता ते सुकले असल्याने त्यावरून पाय घसरत आहेत…आणि त्यावर त्यांना निसर्गाने दिलेले शस्त्र (कुसळं) हल्ला करणार नाही हे शक्य आहे का…? मग त्यातून मार्ग काढताना येणारी मजा ही वेगळीच…
जर अवघड असा वाटणारा वासोटा….चढाई मार्गाने केलेला सिंहगड…असे तुम्ही केले असेल तर ह्या मार्गाने जाताना खूप सुंदर अनुभव नक्कीच येईल.स्वतःच्या पायावर उभे आहात असे वाटत असेल तर इथून जाताना हाताने रांगावे लागते की नाही ते नक्की अनुभवा.गड चढाईच्या साधारण २५% प्रवास हा असा असेल जिथे तुम्ही चालाल तीच पायवाट असे स्वतः निर्माण केलेल्या वाटांवरून चालण्याचा अनुभव येईल.पुढे पायवाट आहे…तिथून मग अगदी सोपा आहे मार्ग…..मध्ये गोरक्षनाथांचे मंदिर…मग छोटेसे पाण्याचे टाके….आणि मग येतो पुन्हा पठारी भाग…. तिथे पाहून जर आश्चर्य नाही झाले तर नवलच….तिथे आजही ४ कुटुंब राहत आहेत.पठारावर गहू ,तांदूळाची शेती केली जातेय….हीच ती अजब माणसे आहेत जी रोज गड चढ उतार करत आहेत.त्यांच्याबद्दल काही सांगायचं आहेच पण त्याआधी आपण गडाच्या पुढील चढाई बद्दल बोलू.
तिथून पुढे साधारण १५ मिनिटांची चढाई आहे.जी पार केल्यावर दिसते ते सुंदर पठार आणि त्यावर दिसते एक अशी जागा जी पाहताना नक्कीच डोळे विस्फारले जातील.साधारण ५० -६० फूट खोल अशी घळ आहे.ज्यात उतरताना पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहोत असाच अनुभव येतो….घामाने ऊफाळलेलं शरीर त्या गर्भात कसे थंड होवून जातं…आणि दिसू लागतात आपल्या अंगातून निघणाऱ्या वाफा….
मग पठारावरून खाली पाहताना दिसणारी दाठ झाडी…. केंजळगड…रायरेश्वर…हे दुर्ग पाहून मनाला जे समाधान मिळेल ते तुम्ही स्वतः अनुभवा.
आता पुन्हा विषय येतो त्या तिथे शेती करून राहणाऱ्या कुटुंबांचा….तिथे तुम्हाला भेटतील शंकर विठोबा कचरे नावाचे वयाची पन्नाशी पार केलेले तरुण….अगदी आदराने,आपुलकीने बोलणे….आणि काय खाणार का हा त्यांचा मृदू स्वर….खरंच जी आपुलकी त्या व्यक्तीकडे पाहून वाटायला लागते त्यातून ते कोणी परके आहेत अनोळखी आहेत असे वाटतच नाही.आम्ही स्वतःचे डबे घेवून गेलो होतो.तरी तिथलं पिठले ,भात आणि ताक घेतलेच….मग आम्ही पैशाचं विचारले…..तर उत्तर काय…? द्या तुम्हाला वाटेल तेवढे….! मनात विचार आला एक रुपयाचा देखील हिशोब ठेवणारे आणि मागणारे आपण….कायम व्यवहार प्रथम असे समजून जगणारे आपण….ह्या व्यक्तीपुढे किती छोटे होवून जातो.
अगदी रोज गड उतरून दुधाचा व्यवसाय करणारे…..गडावर येणाऱ्यांची जेवणाची सोय करणारे…अगदी शाकाहार ,मांसाहार दोन्ही.अशा ह्या कचरे आणि डोईफोडे कुटुंबाचे कौतुक करावे तेवढे कमीच.
जे गेले असतील त्यांनी हा अनुभव घेतला असेलच.पण जे गेले नाहीत आणि जाण्याचा विचार करत आहेत त्यांना सांगणे एकच.जाताना फक्त पाणी घेवून जावे सोबत.तुमच्या भरपेट जेवणाची सोय करणारी आपलीच माणसे आहेत तिथे.माहितीसाठी त्यांचा नंबर मी इथे देत आहेच. मोबाईल नंबर – ९८३४८८५३५४ / ९४०४८७८१६३.
काहींना असेही वाटत असेल ना की जर ना कसली वाट…. ना कसल्या प्राचीन इमारती…..ना प्रत्यक्ष त्या गडावर राजांचा काही इतिहास….मग का करावी अशी सफर….मला त्यासाठी फक्त एकच सांगू वाटते की…..कधी वाट सापडली….तर कधी वाट तर लागली नाही ना येवून अशा संमिश्र प्रवासाच्या ह्या ट्रेक मध्ये स्वतःची परीक्षा घ्यायला काय हरकत आहे…? साधारण २.३० ते ३तास क्षणचित्रे काढत चढाई…आणि मग येताना १.३० ते २ तासाचा उतरणीचा प्रवास…एकूण ४.३० ते ५किमी चढाई असणारा हा कमळगड…
ह्या मोहिमेच्या आधी बरेच जण येतील हेच ठरवून केलेलं नियोजन…. शेवटी दोघांना जावे लागले….पण कायम पाठीशी उभा असणारा भाऊ….अशा मोहिमेत भक्कम भिंत बनून पुढे उभा होता….मग कशाची भीती…आणि कशाची चिंता….. ठरवलं…..सुरुवात केली….आणि गोळा केल्या काही अविस्मरणीय अशा आठवणी.

शब्दसारथी
निलेश बाबर