स्मृतीगंध…
प्रवास नेहमीच नवी ऊर्जा देत असतो….जगण्याची…आणि आयुष्य पुन्हा नव्याने बघण्याची.
ट्रेक नंबर ४
चकदेव..
नमस्कार आज पुन्हा आपल्या सगळ्यांशी काही नवीन अनुभव सांगण्याचा योग आला.काल रविवार ….म्हणजे सुट्टीचा दिवस….सुट्टीचा दिवस…आणि निसर्गाच्या प्रेमात पडलो म्हणजे त्यासोबत वेळ घालवणे हे आलेच….
दीड महिन्यापूर्वी जेव्हा वासोटा पाहणे ठरले….आणि घडले.तेव्हाच एक वेगळी ऊर्जा मनाला मिळाली होती.त्याच कोयनेच्या पाण्यातून बोटीने जेव्हा परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हाच चकदेव ने मनाला साद घातली होती.
त्या सादेला प्रतिसाद देण्याचा योग काल आला……मग असा सुंदर अनुभव अनुभवता यावा हे स्वप्न थोडी माझ्या एकट्याचे असणार…….सोबतीला असणारे निसर्ग वेडे….त्यांनी कालचा दिवस अगदी अविस्मरणीय बनवला…..
एखादी गोष्ट करायची म्हणजे…नियोजन आलेच….पण फसलेल्या नियोजनातून देखील जेव्हा तुम्ही तुमचा हेतू साध्य करता तेव्हा चेहऱ्यावर उमटणाऱ्या आनंदाला शब्दात बांधणे म्हणजे कठीणच.
सोबती कोण येणार …..कोण नाही येणार ….ह्याचे येणे रद्द….तो येवू इच्छितो…. अशा सगळ्या घडामोडीत ठरलेले नियोजन कसे बिघडत होते कसे ठरत होते हे सांगणे अवघडच….पण जेव्हा काही अविस्मरणीय गोष्टी आयुष्यात सुख आणि समाधान घेवून येणार असतील तर अशा गोष्टी त्यापुढे अगदी नगण्य होवून जातात.
चकदेव…..ह्या ठिकाणी जायचे म्हणजे आधी एक दिवस तुम्हाला बामणोली बोटिंग जवळ सांगावे लागते.कारण सकाळी ७ वाजता तिथून बोट निघणार असते.वासोटा जाणाऱ्या बोटी ८ नंतर सुरू होत असतात……मग काय आधी न कळवणे थोडे महागात पडले होते.काही जाणकार तर म्हणाले जर ८ ना नंतर जाणार म्हणजे होवूच शकत नाही……नियोजन रद्द करा…आणि पुन्हा कधी तरी जाण्याचे ठरवू…..पण ज्या प्रकारे म्हणतो ना आपण एखादी भेटीची वेळ आणि दिवस ठरवतो…मग तो कामासाठी दिलेला वेळ असो नाहीतर प्रेयसीला दिलेला….तो पाळणे हेच त्या नात्यातील गोडवा वाढवायला पूरक असते…..मग काय तर काही झाले तरी जायचे आणि जो १- २ तासाचा उशिरा जाण्याचा फरक पडतो तो फरक गतीने चालून पूर्ण करायचा हेच सर्वांनी मनाशी ठरवून सकाळी ८ वाजून १०मिनिटांनी बोटीने प्रवासाला सुरुवात झाली.
चकदेव बद्दल जे थोडे बहुत वाचले होते त्यातून एकच समज होता मनात की खूप मोठा प्रवास आहे…चालावे खूप लागते….. बस एवढीच माहिती डोक्यात घेवून निघालो होतो.
बोट चे चालक हेच गाईड म्हणून सोबत येणार पण त्यांना देखील जास्त माहिती न्हवती.पण आमचे नशीब पण एवढे चांगले की आरव मध्ये बोट थांबल्या नंतर तिथे वास्तव्यास असणारे श्री कोंडीबा माने यांनी आम्हाला सोबत द्यायचे ठरवले.मग काय तर त्याच मातीत लहानाचा मोठा झालेला ५६ वर्षाचा हा तरुण आमच्या सोबत चालू लागला.त्यांनी तिथल्या अगदी लहान लहान गोष्टींपासून सारे सांगायला सुरुवात केली.त्यांचे वडील वयाची शंभरी पार केली तरी अजुन ही ठणठणीत बरे आहेत.गेल्या कित्येक वर्षात तिथे जेवढ्या बाळांनी जन्म घेतला त्यांच्या आईची अगदी नॉर्मल डिलिव्हरी झाली आहेत.ना कसली औषधे ना कसले डाएट……क्वचित तसा प्रसंग आलाच तर त्या पेशंटला पायी चालत घेवून ४०किमी प्रवास करत खेड गाठणे…हे ऐकल्यावर मन सुन्न झाले. खरे…..आपण आज म्हणत आहोत २१ वे शतक…..एवढी प्रगती केली….. पण ह्या लोकांना आजही ४० वर्ष मागे असणारी सगळी परिस्थिती जगत दिवस काढावे लागत आहेत…..पण एक विशेष असे पण की…..ह्यांना त्याचे वाईट ही वाटत नसावे हेच नवल…..अगदी मजेत…. हसत जगणारी ह्या लोकांची जीवनशैली पाहिली की आपलीच आपल्याला लाज वाटल्या शिवाय राहत नाही……माझ्याजवळ हे नाही …ते नाही…ह्याने हे घेतले….ते घेतले…मलाच देव त्रास देतो…..मला कसले सुख नाही….एवढे कष्ट करून नशिबी निराशा…..ह्या सगळ्या भ्रमातून क्षणात बाहेर काढणारा हा प्रवास नक्कीच जीवनाला वेगळी कलाटणी देवून गेला.
मनात प्रश्न आला आणि त्यांना विचारले……तात्या…आम्ही त्यांना तात्या हेच नाव दिले आणि तशी बोलायला सुरुवात केली….तुम्ही सगळे ह्या गोष्टी स्वीकारून जगत आहात मान्य आहे….पण नव्या पिढीचे…मुलांचे काय…त्यांची शिक्षणं…..तेव्हा त्यांनी सांगितले गावात शाळा होती पण बंद पडली…..मग लगेच त्यांना पुढचा प्रश्न केला… मग आता…? अगदी रांगड्या भाषेत त्यांनी सांगितले ….. आणला की एक गुरजी धरून…..तो काय करतो इथली पोरं शिकवतो….आणि ती मोठी पोरं….पुन्हा बारक्या पोरांना शिकावत्यात…..मग आम्हाला पण नक्की हे जाणून घ्यायचं होत नक्की काय आहे हे गणित….
तेव्हा समजले तिथे शाळा बंद पडली…..तेव्हा तिथल्या वलवण, शिंदी,चकदेव,आरव,मोरणी,म्हाळुंगे ह्या सहा गावांनी एकत्र येवून विचार केला आत्ता जर इथून शाळा गेल्या तर पुन्हा आपल्या पोरांना शिकण्याचे मार्ग बंद होतील…आणि बघा ना…गावांची एकी….आणि त्यांच्या मदतीला धावून आलेले एक वेगळेच व्यक्तिमत्त्व…..महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद शाळांना ज्यांनी सेमी इंग्लिश प्रोजेक्ट जोडून दिला…..आणि तब्बल ५२८ शाळांमध्ये तो सुरू ही करण्यात आला….सर्वात जास्त पदव्या (१२ पदव्या त्यात वकिलीची सनद देखील समाविष्ट) असणारे एकमेव प्राथमिक शिक्षक…..ज्यांनी २८००० शिक्षकांना इंग्लिश आणि गणित कशाप्रकारे ह्या शाळांमधून शिकवावे…ह्याचे प्रशिक्षण मोफत दिले…..ज्यांनी आय कॅन स्पीक इंग्लिश नावाचे पुस्तक लिहून ग्रामीण भागातील मुलांमध्ये इंग्लिशची भीती घालवून त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल हे प्रयत्न केले…कसल्या ही फायद्याचा विचार न करता करणारे….श्री विजय सावंत सर ह्यांचे अगदी मनापासून आभार….. खरचं त्यांनी फक्त शाळा उभीच केली नाही तर….तिथे सोबत काम करणारे…श्री मनोज सावंत आणि श्री राजेन्द्र जाधव…..ही फक्त २१ -२२ वयाची मुलं….अगदी मनापासून तिथं ज्ञानदानाचे काम करत आहेत….त्यांना थोडा मासिक भत्ता हा देखील ह्याच ६ गावातील ग्रामस्थ मिळून देत आहेत……मिळणारे वेतन तुटपुंजे असेल तरी दिवस रात्र मेहनत करण्याची ह्या सर्वांची तयारी जर बघितली तर लक्षात येत आपण साधे गूगल पेमेंट केले तरी किती बक्षीस मिळालं हे जेवढ्या उत्सुकतेनं पाहतो….मिळालं तर खुश नाहीतर तेवढेच नाराज होणारे आपण….काय लायकी आपली ह्या लोकांपुढे…ह्या ३ शिक्षकांसोबत… माळी मॅडम देखील आहेत….काल आम्ही गेलो तो वार रविवार….म्हणजे शाळेच्या सुट्टीचा दिवस….पण तरीही शाळा सुरू…..पाहून आश्चर्य वाटलं….अगदी उघड्यावर….९ विद्यार्थी…आणि शिक्षक शिकवत होते….तसे ५ वी ते ९वी ची आणि ही १०ची मुलं असे एकूण २९ विद्यार्थी आहेत. ही १०वी ची मुलं आहेत…ह्यांच्या परीक्षा होणार बीड ला…मी उत्सुकतेने राजेंद्र सरांना विचारले…. जर खेड जवळ आहे….सातारा जवळ आहे….मग बीड कडे का न्यायचे ह्यांना…..?तेव्हा जे उत्तर मिळाले त्यावरून दूरदृष्टी काय असते ह्याचा परिचय आला…..
त्यांनी सांगितले….ह्यांना बीड कडे परीक्षेला घेवून गेलो की तिथली लोकं १ – २ महिने पूर्ण काळजी घेतात मुलांची…राहणे खाणे…सर्व….आणि तिथं जी ऊस तोडी करणारी….आणि इतर गरीब लोकं आहेत…जी शिक्षण आणि सुविधा ह्यापासून वंचित आहेत…..त्यांना ह्या मुलांना पाहून आनंद होईल…आत्मविश्वास निर्माण होईल आणि ती त्यांची मुलं….अगदी विश्वासाने आमच्याकडे पाठवतील….
पुन्हा बाहेर आलो तर भाज्यांची शेती केलेली पाहिली…त्यावर विचारले हे कशासाठी…? ही मुलं तर इथचं राहणारी मग ह्या भाजी कोणासाठी…? त्यावर ते बोलले …आमचं नियोजन हे आहे की बीड ची मुलं इथे आता शिकायला येणार…इथे राहणार…मग त्यांच्या जेवणाला लागणाऱ्या भाज्या आपण स्वतः इथेच पिकवणार आहोत…खरंच ते ऐकून आठवण आली ती कर्मवीर भाऊराव पाटील यांची….माझे शिकणं साताऱ्यातील महाराजा सयाजीराव विद्यालय इथेच झाले…..तेव्हा तिथेच समाधी परिसर पाहताना विचार यायचा….त्याकाळी मुले कशी काम करून शिकली असतील….काम करा आणि वर मार खा… शिका….कशाला एवढे व्याप केले असतील….?पण खरच आता कळतेय…कर्मवीर अण्णांनी किती प्रेमाने शिकवून किती सुरेख संस्कार दिले असतील..तरच आणि त्यामुळेच आज रयतचा हा वटवृक्ष एवढा बहरलेला दिसतो….
आपण कायम ह्याच कथा वाचत राहतो…की मोठ्या लोकांनी काय केलं…कसे मोठे झाले..पण मी असे म्हणेन की अशा धाडसी आणि वयाने कमी असणाऱ्या व्यक्तींना भेटून पण जो आत्मविश्वास तुमच्या मध्ये येईल तो इतर स्फूर्तिस्थान आणि मोठ्या व्यक्तींना वाचून… भेटून मिळेल तेवढाच किंवा त्याहून नक्कीच जास्त असेल…
खरं तर हेच ते सुख जे अनपेक्षितपणे आम्हा सर्वांना मिळाले.ह्याच आठवणी आणि विचार घेवून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला.मनात हाच विचार येतोय ह्या ध्येयवेड्या शिक्षक,अडाणी गावकरी,उद्याची स्वप्न पाहणारी मुलं,ह्यांच्यात आणि आपल्यात काय तुलना….कायम साऱ्या सुविधा मिळून असमाधानी आपण…आणि कसल्याही सुखसुविधा शिवाय आनंदी आयुष्य जगणारी ही सारी मंडळी…
पुढचा प्रवास करत आम्ही गाठले श्री शैल्य चौकेश्वर मंदिर…साधरण २ ते ३ किमी डोंगर प्रवास करुन त्या मंदिरात प्रवेश केल्यावर मनाचा आणि शरीराचा थकवा कसा क्षणात दूर झाला कळले नाही.तिथे पुजारी असणारे श्री शंकर जंगम काका …. वय ६६ पण पाहून वाटणार नाही असे तेज होते त्यांच्या चेहऱ्यावर…..त्यांनी पुढे खेड कडे उतरणारा शिडी मार्ग पाहायला मिळेल हे सांगितले…. आणि तो पाहायला आणि अनुभव घ्यायला आम्ही पुढे गेलो.तेव्हा पाहिले एका खाली एक अशा ३ शिड्या होत्या तिथे पहिली शिडी थोडी लहान आहे ….पण त्यांनतर असणाऱ्या २ शिड्या काळजाचा ठोका चुकावतात.साधारण १०० फूट दरी मध्ये उतरत जाण्याचा हा अनुभव नक्कीच मनाला आनंद आणि थरार देवून गेला.
आज एवढे सांगण्याचं कारण म्हणजे एकच….ज्या गोष्टीची, ठिकाणची माहिती असते तिथेच लोकांचे जाणे होत असते….आज मितीला पाहिले तर एकाच ठिकाणाहून सकाळी १०० पेक्षा जास्त बोटी वासोटा जातात तर फक्त आमची १ बोट चकदेव कडे जाते…..ह्याचा अर्थ हा नाही की लोकांना तिकडे जाणे आवडणार नाही…..याचा अर्थ एकच की कोणत्याही मीडिया वरून…ह्याची जास्त माहिती प्रसिद्ध झालेली दिसत नाही.
पण माझे मत हेच राहील की….जर ट्रेक चा एक वेगळा अनुभव आणि मनात काही अविस्मरणीय आठवणी साठवून घ्यायच्या असतील तर नक्कीच हा प्रवास करावा…..
आम्ही निवडलेला मार्ग हा बोटीतून होता..पण त्यातून हे पण समजले जर कमी वेळात…हा ट्रेक करावा वाटत असेल तर सातारा ते तेटले मार्गे जावून तिथून तरफ्यातून तुमची वाहने पलीकडे तापोळ्यात घेवून जावू शकता….तिथून सरळ…आरव…आणि मग वलवण…तिथे गाडी लावून ट्रेक ला सुरुवात करू शकता…..
जर राहण्याचे नियोजन असेल तर आरव मध्ये श्री कोंडीबा माने उर्फ तात्या (आमचे सर्वात मनमिळावू मार्गदर्शक मोबाईल – ९४२३९३६७८२) चकदेव चे पुजारी श्री शंकर जंगम काका(मोबाइल -९९६९६१३८०२ / ९१३६५६४८७८)
सरते शेवटी आम्ही ही परतीचा प्रवास केला आणि वाटेत दिसली ती नागाची कात….मग काय आयुष्यात पुढे जाण्यासाठी….जसे जुनी मरगळ सोडून उमेदीने साप देखील प्रवास करतात…तसेच काही नकारात्मक विचारांना मनातून काढून आम्ही नव्या उमेदीने माघारी परतलो.
शब्दसारथी
निलेश बाबर