स्मृतीगंध
छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंदच जगण्याचा मोठा आधार बनतो.इच्छा आकांशेचं काय त्या तर पदोपदी बदलत असतात.
ट्रेक नंबर ७
वासोटा – नागेश्वर
जगण्याला एक नवीन वळण द्यायचं असेल तर नेहमीच्या व्यापातून थोडं बाहेर निघून ह्या निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला हरवून द्यायचं हेच मनाशी ठरवून २७ डिसेंबर २०२० ला ह्या भटकंतीला सुरुवात झाली.त्यावेळी मनात आलेले विचार… निसर्गाबद्दल वाटलेलं मत सार कसं लिखाणातून व्यक्त केलं होत.आलेला हा पहिला सुखद अनुभव तुमच्या समोर मांडताना सुखाची एक वेगळीच लहर मनामध्ये उलटली होती……खरंच वासोट्याचा तो रम्य अनुभव कधीच न विसरणारा होता.पण त्यावरून पाहताना दूरवर दिसणारी एक टेकडी नागेश्वर असल्याचे समजले होते…..वेळेचं बंधन असल्याने तिकडे जाणे जमणार नाही ही खंत मनात ठेवूनच खर तर वासोट्यावरून पाय उतार झालो होतो.
त्यांनतर सुरू झालेली ही नियमित भटकतींची सवय मनाला नव्याने उभारी देत होतीच…..पण सर्वात जास्त मनात हाच विचार असायचा की काही तरी अपूर्ण सोडून पुढचा प्रवास चालला आहे….मग ते अपूर्णत्व होते….ते म्हणजे स्वयंभु नागेश्वराचे न झालेलं दर्शन…….जवळपास ३ महिन्यांचा काळ गेला आणि तो सुंदर क्षण आलाच जिथे मला नागेश्वरासमोर नतमस्तक होवून आशीर्वाद घेण्याचा योग आला…..
खरंच योग येतात का…..? खरंच इच्छा पूर्ण करण्याची उमेद अंगी येते का….? सुरू केलेला प्रवास हा नक्कीच काही नवे आणि सुखद अनुभव देतो का….? हरवल्या गेलेल्या गोष्टींचा खरंच शोध लागतो का….? की ह्या नव्या गोष्टींमध्ये स्वतःला हरवून जातो….? नक्की आपल्या मनाचा शोध लागतो….की मनाला काही नवीन शोध लागतात….? गुंतलेल्या मनाला विसावा मिळतो… की विसावलेल्या मनात काही गुंता होतो…..? प्रश्नांची उत्तरं मिळतात…की उत्तरात ही प्रश्न निर्माण होतात….? ही सारीच कशी एकमेकांत गुंतलेली कोडी आहेत.. ह्या कोड्यांना कधी सोडवायचं नसतं… तर फक्त अनुभवायची असते मनाला मोहून टाकणारी निसर्गाची किमया…आणि त्यातून शिकायचं असतं….सोबती कोणीही असलं तरी परिस्थितीशी झुंज ही स्वतःलाच द्यावी लागते….मर्यादे पलीकडे स्वतःला खेचता आलं तरच अमर्याद सुख मनाला मिळणार असतं.
अशाच काही आनंदाच्या क्षणांना मनात साठवून ठेवायचे ह्याच विचाराने स्वयंभु नागेश्वर प्रवास सुरू झाला…..पण ह्या भटकंतीचे अजुन एक वैशिष्ट्य कायम मनात राहील ते म्हणजे आपले विचार,कृती,आवड,सवयी….ह्या जशा असतील तसाच जनसंपर्क आपल्याला मिळतो …..नेहमीच्या असणाऱ्या आमच्या ग्रुप सोबत ह्या वेळी अजुन एक व्यक्ती जोडली गेली की ज्याने सह्याद्रीच न्हवे जवळ जवळ १५ देश भ्रमंती केली आहे….ह्या फिरण्यातून…आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही मातब्बर गिर्यारोहकांकडून त्यांना मिळालेलं ज्ञान….तसेच सांगली – जत वरून आलेले काही धारकरी विचारसरणीचे तरबेज दुर्गवेडे…ह्यांच्या सोबत घालवलेला दिवस त्यांचे ऐकलेले अनुभव….विचार…..आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन ह्यातून स्वतः मध्ये असणारी उणीव…आणि ती भरून काढण्याच्या वाटा सारेच उमगत गेले…..प्रश्नातून उत्तर आणि उत्त्तरामधून प्रश्न असा संमिश्र अनुभव मनाला एका वेगळ्याच उंचीवर घेवून जातो हा प्रत्यक्ष अनुभव ह्याच प्रवासात मिळाला.
ह्या साऱ्या झाल्या मनातील विचारांच्या कथा आणि व्यथा….पण बोलणे राहिले ते ह्या ठिकाणा बद्दलचे….बामणोली मार्गे वासोटा पायथा गाठला….वनविभागाची रीतसर परवानगी घेवून….नियमाचे पालन करत निसर्गाची सफर सुरू झाली…..हनुमान आणि श्री गणेशाचे दर्शन घेवून….सरळ पुढे जाणारा रस्ता हा वासोटा किल्ल्यावर नेवून पोहोचवतो….पण आम्ही निवडला तो ओढ्याने जाणारा….नागेश्वर सुळक्याकडे जाणारा मार्ग….वाढत्या उन्हाने वाहणारे पाणी अगदी डबके बनून काही ठिकाणी साठलेले दिसते…पण सरळ त्या ओढ्यातील दगड गोटे तुडवत पुढचा प्रवास करावा लागतो….निसरडे…गुळगुळीत अशा ह्या दगडांवरून जाताना थोडी कसरत होते खरी… एकाच दगडावर पाय रोवून…पुढं पाऊल टाकण्याचा विचार करताना नक्कीच तुमचा तोल जातो….पायाची गती रोखली की स्वतःला सावरणे कठीण होवून जातं कारण एकच गोटा तुम्हाला जास्त वेळ नाही झेलू शकत….मग पर्याय असतो तो एकच …..पायाखाली येणारा गोटा हलण्याआधी तुम्ही पुढचं पाऊल उचलणे गरजेचं असतं…..आता तुम्हाला वाटेल की हा काय आम्हाला चालायला शिकवतो की काय…? तर नक्कीच असे नाही.मला ह्यातून एकच सांगायचं आहे की…कोणत्याही प्रकारच्या संकटात बोजा एकच गोष्टीवर देत बसलो…एकच विचार करत बसलो तर तुम्ही स्वतःचा तोल कधी सावरू शकत नाही….तुम्हाला जीवनाचा प्रवास देखील असाच करावा लागतो…सगळीच कोडी सोडवत बसलो तर कोड्यांच्या पुढे असणारी जीवनाची गोडी अनुभवेपर्यंत….वेळ निघून गेलेली असते.अशा रस्त्यातून पटकन मार्ग काढताना भले काही गोष्टी सुटतील….पण त्यात गुरफटून सर्व गमावून बसण्यापेक्षा पुढील क्षितिजावर असणारी यशाची किरणे अंगावर घ्यायला….स्वतःला पुढे झोकून द्यावेच लागते.
खरतर हे नागेश्वरचे प्रवास वर्णन मला खऱ्या प्रवाहातून बाजूला घेवून….जीवनाच्या लाटांवरील प्रवाहात खेचत आहे…पण भावनांना थोडा बांध घालून…मी आता मांडत आहे ते ह्या प्रवासातील काही गोष्टी….
ओढ्यातून पुढे जात असताना ….मध्ये साठलेल्या पाण्यात आम्हाला दिसला तो मृत सांभराचा सापळा….नक्कीच पाण्याच्या ओढीने
पाणवठ्यावर आलेल्या ह्या जीवाला त्याच्या जीवावर आपले पोट असणाऱ्या कोणत्यातरी जीवाने शिकार केली असणार…जंगली कुत्रे असतील…नाहीतर बिबट्या….त्या सापळ्याकडे पहात असच काही विचार करत पुढचा प्रवास सुरू केला….ह्या आधी फक्त काही सिनेमाची गाणी…नाहीतर फक्त ॲनिमेशन ह्या मध्ये पाहिलेलं दृश्य म्हणजे फुलपाखरांचा थवा…हो थवाच… एकाच ठिकाणी हजारो पाखरे हवेत स्वच्छंदी उडताना पाहून ती क्षणचित्रे कैद करण्याचा मोह नाही आवरू शकलो….
असच मजेत निसर्ग पहात कधी जलकुंडावर पोहोचलो समजले नाही…तिथे त्या थंड पाण्याने हात पाय डोके धुवून शरीर पुन्हा थंड आणि ताजेतवाने झाले….मग त्याच ताज्या मनाने प्रवेश केला तो स्वयंभु नागेश्वर मंदिरात…..कातळात ….तयार झालेली गुफा…..त्यावर जवळपास १०० फूट असणारा डोंगर म्हणजे जणू त्या मंदिराचा कळस…ते दृश्य मनात साठवून शांतपणे त्या पिंडिसमोर नतमस्तक होवून मनाला मिळणारी शांतता ही अवर्णनीय…..तेव्हा तिथे जाणवले …जे दिसले ते एक अद्भुत आणि अनाकलनीय दृश्य….ते म्हणजे त्या कातळाच्या चिरांतून बरोबर पिंडीवर पडणारा पाण्याच्या थेंबाचा अभिषेक…
हे सारे मनात साठवून…..आम्ही पुढील प्रवास केला तो मधून येणाऱ्या मार्गे वासोटा…. वाटेत लागणारे घनदाट जंगल…..त्यात आवाज देणारे…जंगली कोंबडे…त्यांचे आवाज ऐकत….गडउतार झालो…
पुन्हा योग आला तो वासोटा ट्रेक वेळी सोबत असणाऱ्या श्री मोहन जाधव काकांना भेटण्याचा…६५ वर्षाचे हे तरुण ह्यावेळी एका दुसऱ्या बोटीचे चालक होते..त्यांना भेटलो आणि समजले आमच्या बोटीचे असणारे किसन जाधव नाना हे त्यांचे पुतणे…असा हा त्यांचा घरगुती व्यवसायच जणू…पण ह्या दोघांमध्ये पण एक साम्य जाणवले म्हणजे गरजा खूप कमी…ना कसला मोह…ना जास्तीची अपेक्षा….रोजचा दिवस आनंदात जगायचा…आनंद वाटायचा…ह्याच धर्तीवर चालणाऱ्या काका पुतणे….ह्या दोन पिढ्या एकाच वेळी अनुभवल्या….
सरतेशेवटी सांगणे एकच…आनंद शोधण्यासाठी..कोणती मोठी सुखवस्तू नाही तर काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख अनुभवत गेलो की आपोआप जीवनात आनंदाची सुंदर नगरी उभी राहते
शब्दसारथी
निलेश बाबर