स्मृतिगंध
जरा कळवळू दे….थोडं हळहळू दे…..
उरातील आक्रोशाने मनालाही तळमळू दे
अंधारल्या वाटा जरी… चारी दिशा ह्या मोकळ्या….
नटलेल्या निसर्गावर मला थोडं भाळू दे
राजगड
१२ सप्टेंबर २०२१
पहायला गेलं तर हा दिवस म्हणजे एक रविवार…सुट्टीचा दिवस…एवढंच.पण इतिहासाकडे जरा सखोल नजरेनं पाहिलं की समजतं काय दडलंय ह्या तारखेत.
औरंगजेबाची सर्वात मोठी हार म्हणजे राजांची आग्ऱ्याहून सुटका….. जिथं मुंगीलाही स्वतःची वाट ठरवता येत नसेल,पक्षांनाही स्वैर फिरता येत नसेल,मातब्बर योध्यांना स्वतःच्या मर्जीने मान देखील वर काढता येत नसेल अशा नरकाला हुल देवून महाराज सुटले कसे….? हीच तर विलक्षण शक्ती…दूरदृष्टी…आणि वेगळेपण आपल्या राजांमध्ये होतं म्हणून तर आजही आणि उद्याही राजे प्रत्येक मनावर राज्य करत राहतील.
फौजेच्या जोरावर राज्य गाजवणं वेगळं आणि मूठभर मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्य उभं करणं, प्रत्येक रक्तात स्वराज्यप्रेम निर्माण करणं हे वेगळं….हाच फरक सांगतो की फौजेचा एवढा ताफा असताना मुघलांना गुढघे टेकायला का लागत होते…..कारण फक्त एकच….ह्या निर्भिड…संयमी….चाणाक्ष राजांनी प्रत्येक मनात पेटवली होती स्वराज्याची मशाल…..त्या मशालीला पेटतं ठेवायला स्वतःच्या रक्ताची आहुती देणं….हसत हसत मरणाला कवटाळणं…..स्वतःच्या जीवापेक्षा राजाचं रक्षण करणं….हीच ती स्वामिनिष्ठा…..हेच ते स्वराज्यप्रेम.
स्वतःला दगाफटका होणार हे माहित असताना औरांगजेबाच्या दरबारात ताठ मानेनं जाणाऱ्या राजांनी स्वतःच्या डामडौलात मश्गूल असणाऱ्या त्या आलमगीराला मान खाली घालायला लावणारा प्रसंग म्हणजेच राजांची आग्ऱ्याहून सुटका.
पण हे तर सर्व तुम्हाला माहीत आहे….मग ह्या विषयावर आज मी का बोलावे….? काय कारण असावं…?कारण फक्त एकच..
१२ सप्टेंबर…..हो हाच तो दिवस…१२ सप्टेंबर १६६६ ह्याच दिवशी राजे आग्ऱ्याहून सुटका झाल्यावर राजगडावर आपल्या काही निवडक सरदारांना घेवून पोहोचले होते.त्या घटनेला ३५५ वर्ष झाली तरी पराक्रमाची ही ज्योत अशीच अखंड तेवत आहे आणि पुढेही राहणार.
मनात फक्त एकच भावना आहे की राजांनी उभारलेल्या ह्या स्वराज्याची…गडकोटांची धूळ जन्मभर माथी लागत रहावी.आणि बघा ना देव पण कसे योग जुळवून आणतो.आमचे मित्र….सातारा जिल्ह्याचे ग्रंथालय अधिकारी श्री.संजय ढेरे सर….गेली एक वर्ष म्हणत होते की राजगड ट्रेक करू.पण कधी त्यांना वेळ नसणे किंवा कधी आमचा वेळ ह्यात सारे नियोजन लांबत गेले होते.आणि नेमका योग जुळून आला तो दिवस म्हणजे १२ सप्टेंबर २०२१.श्री ढेरे साहेब त्यांचे सहकारी श्री.प्रवीण देसाई साहेब,सह्याद्रीच्या कुशीत हिंडणारा,रांगडा गडी…डॉ झुंजारराव,आणि माझे मोठे बंधू गुरू बाबर आणि मी.आम्ही ५ जणांनी आजच्या ह्या अविस्मरणीय दिवशी सर केला बालेकिल्ला.
निसर्गाने पण जणू एक वेगळीच चाहूल दिली होती….ठरलेल्या नियोजनानुसार साताऱ्यातून प्रवास सुरू झाला.आणि निरा नदी पार करताना दिसले ते अर्ध गोलाकार इंद्रधनुष्य…ती निसर्गाची किमया कॅमेऱ्यात कैद करून पुढे निघालो. जरी गडांवर फिरण्याचे हे वेड असले तरी आपला अभ्यास…. वाचन…किती तोटके आहे हे ढेरे साहेबांच्या संगतीत प्रकर्षाने जाणवले.पूर्ण प्रवासात राजांच्या…त्यांच्या सहकाऱ्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी…शत्रूच्या चाली…त्यावर केलेली मात ह्यावर चर्चा करत प्रवास सहज पार झाला.
खरचं ह्या इंटरनेटच्या जगात सारं काही शोधणं…. वाचणं…शक्य असताना आपण कोणत्या विश्वात हरवलेलो असतो कोण जाणे…मला तर एवढही माहित न्हवतं राजगडाच्या वरती अजुन एक गड आहे तो म्हणजे बालेकिल्ला…..आजवर बालेकिल्ला म्हणजे हक्काचा मतदारसंघ हेच वाटत असणारा मी आज प्रत्यक्ष त्या गडावर पोहोचलो होतो.
राजगडावर चोर दरवाजामार्गे वरती प्रवेश केल्यावर लागतो तो पहिला पद्मावती तलाव….तिथून पुढे आल्यावर लागते ती राणी सईबाई यांची समाधी….आणि पद्मावती देवीचे मंदिर….जवळच पिण्याच्या पाण्याचा तलाव आणि मग रामेश्वराचे मंदिर….
जोरदार पाऊस आणि गर्द धुके ह्यात एक वेगळाच आनंद मनाला भेटत होता…निसर्गाच्या बऱ्याच छटा डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न करत होतो.पण धुक्याची असणारी चादर आणि सतत पडणारा पाऊस यामुळे त्या मनमोहक दृष्यांना कॅमेऱ्यात कैद करणं जरा अवघड जात होत.
पद्मावती माची,सुवेळा माची,संजीवनी माची,मधोमध बालेकिल्ला,पद्मावती तलाव,चंद्र तळे, अंबरखाना,राजसदर, राजवाड्याचे अवशेष,तोफा,आणि चौफेर घनदाट जंगल हे पाहून मनाला खूप आनंद झाला.
स्वराज्याची पहिली राजधानी….राजगड…..१२ कोस पसरलेला विस्तीर्ण डोंगर…..उंच कडे…खोल दरी…..गर्द झाडी ह्यात विस्तारलेला राजगड….स्वराज्याची साक्ष देत दिमाखात उभा आहे.
खर तर बालेकिल्ला चढणे,उतरणे हे प्रशिक्षित ट्रेकर शिवाय बाकीच्यांना अशक्यच….पण वनविभागाने लोखंडी गजांच्या मदतीने बनवलेल्या मार्गामुळे आपल्या सारख्या सामान्य माणसांना देखील तिथं पोहोचणं शक्य होतेय.नाहीतर राजगडावरून स्वतःची वाट शोधू शकते ते फक्त वाहणारे पाणी आणि भिरभिरणारा वारा.बाकी आपण सर्व कस्पटासमान.
पावसाळ्यात इथे फिरायला येणे जरा अवघडच.म्हणजे चिखल त्यामुळे झालेला घसरटपणा,पाऊस आणि धुके ह्यामुळे सर्व झाकोळले जाते.अगदी ४ फुटपालिकडे पाहणे पण अशक्य.त्यामुळे बेलाग पसरलेल्या माच्या पाहणे जरा अवघडच.माझ्या मते साधारण नोव्हेंबर ते जानेवारी मध्ये इथे येण्याचे नियोजन अगदी योग्य.
राज्यांच्या आयुष्याची बरीच वर्ष जिथे गेली,जिथे अनेक मोहिमांची नियोजनं ठरली असतील,जिथून स्वराज्याचा बराच कारभार पाहिला गेला अशा ह्या राजगडाला अवश्य भेट द्यावी
शब्दसारथी
निलेश बाबर