स्मृतीगंध……ट्रेक नंबर ११…….नळदुर्ग

स्मृतीगंध

प्रवास होता दूरचा की स्वप्न होती दूर
धावलो किती तरीही लागत न्हवते सुर
दूरच्या त्या काळोखात भरला होता एकांत
की हा एकांत घेवून जात होता त्या काळोखात
मनाच्या ह्या उधळत्या घोड्याचं कोणतंच असं गाव नाही
स्वप्नांच्या अमर्याद भावनेला कोणतंच असं नाव नाही
बेफाम इच्छाशक्तीने भरलेल्या मनाच्या ह्या स्वाराला स्वैर भटकू द्यावे
कारण दिगंताच्या ह्या प्रवासाला लगाम कुठे आहे.

ट्रेक नंबर ११

नळदुर्ग

२४ ऑक्टोबर २०२१

नमस्कार,महाराजांची दूरदृष्टी…योजना आणि त्यावर योग्य तो अंमल….सतर्कता….आणि निर्णय क्षमता…ह्यामुळेच ते एक युगप्रवर्तक ठरले.
महाराज समजून घेताना त्यांचे शत्रू आधी समजून घेतले…त्यांची ताकत समजून घेण्याचा प्रयत्न केला तर राजांचे मोठेपण सहज दिसून येतं.
चौदाव्या शतकात दक्षिण भारतात मुहम्मद तुघलक याचं साम्राज्य चांगलच पसरलेले आढळते.त्याचे काही क्रूर निर्णय ,जाचक अटी ह्यामुळे इ.स.१३२७ पासून त्याच्याविरुद्ध बंडाळी होण्यास सुरुवात झाली.कित्तेक ठिकाणी आपल्या युद्धनितीच्या,फौजेच्या आणि कपटाच्या जोरावर त्याने फतेह मिळवली होती.पण त्याच दरम्यान अमीर यांनी इ.स.१३४७ साली युद्धनिपुण हसन गंगू ह्याला पुढे करत दौलताबाद येथे त्याचा राज्याभिषेक केला.हसन गंगू हा पूर्वी एका ब्राम्हण व्यक्तीकडे गुलाम म्हणून काम करत होता.पण पुढे त्या ब्राम्हणाने त्याला सेवेतून मुक्त केलं…मग अशाच छोट्या मोठ्या लढाया….आणि आपले युद्ध कौशल्य….ह्या जोरावर त्याने स्वतःला सिध्द केलं आणि अबुल मुजफ्फर अल्लाउद्दीन बहमनशाह नाव धारण करून बहामनी साम्राज्य ऊभं केलं.
बहुतेक एक दोन युद्ध सोडून सर्वच मोहिमेत स्वतः भाग घेवून जवळ येणारे अडथळे,होणाऱ्या बंडाळ्या त्याने मोडीत काढल्या.आपल्या साम्राज्याचे ४ सुभे तयार करून त्यावर स्वतंत्र अधिकारी नेमले.पुढे इ.स.१३५८ मध्ये त्याचा मृत्यू झाला.पण त्याची मुले आणि असणारे सरदार ह्यांनी आपली हुकूमत चालूच ठेवली.
त्याकाळी दक्षिणेत हरिहर आणि बुक्क यांनी स्थापन केलेलं विजयनगर साम्राज्य हे हिंदूंचे मोठे साम्राज्य म्हणून ओळखले जात होतं.अनेक वेळा स्वतः तुघलकने हल्ला करून ही त्याला यश येत न्हवतं.पण कायम दयाशील असणाऱ्या ह्या विजयनगर साम्राज्याने स्वतः आक्रमण कधी केले नाहीत.
काळ उलटून जात होता तसे बहामनी साम्राज्य देखील मोठे होत होते.आणि साम्राज्य जसं मोठं होत गेलं तसे अंतर्गत कलह देखील वाढत गेले.आणि पुढे इ.स.१५३८ मध्ये त्यातून स्वतंत्र ५ शाह्या उदयास आल्या.
आदिलशाही…निजामशाही…. कुतुबशाही….बरीदशाही…. इमादशाही….ह्यातील बरीदशाही आणि इमादशाही लवकर संपुष्टात आली.पण बाकी तिन्ही शाह्यानी पुढे बरेच राज्य केलं.त्यांची क्रूरता ,अत्याचार ह्यामुळे पुढे सहसा त्यांना कोणी विरोध केलेलं…त्यांच्या तोडीस असेल असं कोणते हिंदू साम्राज्य दिसून येत नाही.तब्बल २०० वर्ष त्यांचं हे साम्राज्य वृंधिगत होतानाच दिसते…..त्याला खिंडार पडले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच.
जरी शत्रू म्हणून ह्या शाह्यांबद्दल मनात चीड असली तरी त्यांच्या काळात त्यांनी उभारलेल्या काही वास्तू…आणि त्या वास्तू उभारणाऱ्या कारागिरांचे कौतुक करणे आपण नाही रोखू शकत.
त्यापैकीच एक असा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील…..तुळजापूर तालुक्यात असणारा……नळदुर्ग……
होय….अभेद्य असा हा नळदुर्ग……
आख्यायिकेनुसार चालुक्य राजवटीतील नळ राजाने बांधलेला हा किल्ला असल्याने त्यास नळदुर्ग हे नाव पडले असे म्हणले जाते. तुळजापुर पासून साधारण ३५किमी अंतरावर असणारा हा दुर्ग नक्कीच पहायला आवडेल असा आहे. साधारण १२६ एकर मध्ये ( २.५०किमी व्यासात) पसरलेला हा दुर्ग आजही चारही बाजूंनी भक्कम तटबंदी असलेला पहायला मिळतो.
११४ बुरुज आणि सभोवती खंदकात बोरी नदीच्या पाण्याचा वेढा,आतून तटबंदी आणि नदीच्या पलीकडच्या भागाचे तासून केलेले उंच कडे यावरून त्याची अभेद्यता सहज दिसून येते.किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत.पहिला लागतो तो भलामोठा हत्ती दरवाजा……तिथून आत गोल वळून गेल्यावर लागतो तो हुलमुख दरवाजा….. हुलमुख चा अर्थ असा की शत्रूला हुल देण्यासाठी वळुन प्रवेश असणारी रचना….. स्वराज्यात असणाऱ्या अशा प्रकारच्या दरवाजांना आपण गोमुखी बांधणीचा दरवाजा असे म्हणतो.
हुलमुख दरवाजातून आत आल्यावर आपल्याला लागतो तो हत्तीखाना…आणि अंबारखाना….अतिशय भव्य असे हे बांधकाम आजही सुस्थितीत आहे.डागडुजीचे काम एका खाजगी कंपनीकडे असल्याने बऱ्याच ठिकाणी जिथे पडझड झाली आहे तिथे सिमेंट चा वापर करून वास्तू टिकवली आहे.
हत्तीखाना पाहून पुढे आल्यावर आपल्याला दिसते ते मुंसिफ कोर्ट….ब्रिटिशांच्या काळात कलेक्टर तिथूनच सगळा कारभार चालवत असे….. मुन्सिफ कोर्ट मध्ये एका दगडावर उर्दू भाषेत असणारा एक लेख…..लांब अशी एक तोफ…आणि कार्यालय पाहायला मिळते.
तिथून बाहेर आल्यावर आपल्याला जामा मज्जीद पाहायला मिळेल…जवळच बारदरी ही साधारण १५ फूट उंच अशी इमारत पहायला मिळेल जिथे पुढे जावून ब्रिटिश अधिकारी राहत असल्याचे वाचनात आढळून येते.समोरच जुन्या भिंती…पडलेला दरवाजा….वाढलेली गवताची गर्दी…ह्यात जुन्या काळात वस्तीचे ठिकाण असणार हे कळून येते.
इ.स.१३५१ ते १४८० ह्या बहामनी काळात पुढे १५५८ मध्ये आदिलशहाच्या काळात ह्या गडाची तटबंदी बांधली गेली.पुढे दुसरा इब्राहिम आदिलशहाच्या काळात इ.स.१६१३ मध्ये बोरी नदीवर ९० फूट उंच,२७५ मीटर लांब आणि ३१ मीटर रुंद धरण बांधले गेले.की जे आजच्या काळातील बांधकामांना लाज आणेल इतके भव्य आहे.त्यात असणारा राणी महाल….पाणी महाल हा ४ मजले खाली उतरून जावे लागते असा आहे….त्यावरील नक्षीकाम….त्यातच कलाकुसरीने बनवलेले २ कृत्रिम धबधबे की जे नर आणि मादी धबधबा म्हणून ओळखले जातात हे पाहून त्याकाळातील स्थापत्यशास्त्राचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच.
बोरी नदीचे पाणी अडवून जे दोन धबधबे बनवले त्यातील मादी धबधब्यातून पाणी सरळ खाली सोडले आहे.तर नर धबधब्याची उंची थोडी वाढवून पुन्हा खाली उतार केला आहे.दिसताना ही गोष्ट खूप लक्ष वेधून घेते कारण केलेल्या ह्या बदलामुळे वाहणारा धबधबा एक विलक्षण अनुभूती देतो.मादी धबधब्यातून वाहणारे पाणी सरळ येत असल्याने त्याचा रंग हिरवा दिसतो तर थोड्या उंचीवरून वाहणारे नर धबधब्याचे पाणी फेसाळून पांढरे दिसते.हे मनमोहक दृष्य पहायचे असेल तर फक्त पावसाळ्यातच इथे फिरायला यावे.पाण्याचा ओघ कमी झाल्यावर पुढे नर धबधबा वाहताना दिसत नाही.
बोरी नदीची दिशा बदलून पाण्याला बऱ्याच ठिकाणी बंधारे घालून तटबंदी भोवती कायम पाणी टिकून राहावे हे सुरेख नियोजन त्याकाळी केलेलं होतं हे आपल्याला पाहायला मिळते. तसा दुष्काळी भाग असल्याने तिथे नदीचे पाणी उन्हाळ्यात नक्कीच आटत असणार.पण भोवताली असणारे पाणी संपू नये म्हणून केलेले हे नियोजन युद्घनिती आणि संरक्षणनीतीचे उत्तम उदाहरण आपण म्हणू शकतो.राणीमहलच्या आणि नदीच्या पलीकडे पण आपल्याला तटबंदीने भक्कम असणारा भाग दिसेल त्याला रणमंडळ म्हणून ओळखले जाते.त्या काळी ह्या भागात सैनिकांना युद्ध प्रशिक्षण देण्यासाठी हा भूभाग वापरला जात असावा तसेच शत्रूला चकवा देण्यासाठी गडाचा उपभाग असलेला हा रणमंडळ भाग…. गडाचा मुख्यभाग म्हणून दर्शविला जात असावा.जेणेकरून मुख्य किल्ल्यास कोणती हानी न होता ह्याच भागात आक्रमण थोपवून मुख्य भागात राहणारी माणसे,संपत्ती ह्याच रक्षण व्हावं.ह्यातून पण आपल्याला उत्तम युद्घनीतीचा अंदाज लावता येवू शकतो.
किल्ल्याचे मुख्य आकर्षण असणारा हा राणीमहल…पाणीमहल…पाहून माघारी फिरून आल्यावर आपल्याला समोर दिसेल तो उंचच्या उंच असा उफळी बुरुज…..गडावर असणाऱ्या ११४ बुरुजांपैकी हा सर्वात उंच असून गडाच्या चारी बाजूंना ह्यावरून लक्ष ठेवता येते.त्यावर चढून जाण्यासाठी एकूण ७७ पायऱ्या असून बुरुजाची उंची साधारण ६० ते ७० फूट असेल.
ह्या पायऱ्या चढून तुम्ही वर गेलात की तुम्हाला पहिल्यांदा दिसेल ती मगर तोफ,त्यावर खवल्यांची असणारी नक्षी लगेच तिचे नाव दर्शवते.ही तोफ लांबीने थोडी कमी असून त्या पुढे असणारी भव्य अशी हत्ती तोफ देखील तुम्हाला पाहायला मिळेल.
त्यांची तिथे एकामागे एक अशी केलेली रचना पाहून तुम्ही सहज अंदाज लावू शकता की शत्रू दूरच्या अंतरावर असताना ह्या लांब पल्ल्याच्या हत्ती तोफेचा तर तो मारा चुकवून पुढे आलेल्या जवळच्या शत्रूला मारण्यास मगर तोफेचा वापर केला जात असावा.ह्या बुरूजावरुन पुढे खाली पाहिले असता एक हौद दिसून येतो.तर जवळच दारूगोळ्याचे कोठार दिसते.
किल्ल्याच्या उत्तर – पूर्व भागात असणारा परांडा बुरुज,दक्षिण – पूर्व बाजूस आण्णाराव बुरुज,पूर्वेस तूऱ्या बुरुज,उत्तरेला संग्राम बुरुज असे एकूण ११४ बुरुज आपल्याला पहायला मिळतील.त्यातील अजुन एक आणि स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असणारा बुरुज म्हणजे नवपाकळी बुरुज…..एकास एक लागून अशा नऊ पाकळ्या बाहेरील बाजूस आणि आतून ७ पाकळी असणारा हा बुरुज सुरक्षेच्या दृष्टीने बनवलेला उत्तम नमुना म्हणावा लागेल.बाहेरील बाजू ही चिलखत असल्या सारखी आहे जी बुरुजाच्या आतील भागाचे रक्षण करते. आणि त्या आतील भागात असणारी तोफ शत्रूला धडकी भरवणारीच आहे.
नदीचे पाणी खंदकातून आत आणले आहे आणि आत छोटासा तलाव केला आहे.विशेष म्हणजे हे पाणी भुयारी मार्ग करून आत आणले आहे.तुम्हाला तिथे एक उंच मनोरा असल्या सारखे दिसेल की जो ह्या साठी आहे की पाणी आत आणल्यावर हवेचा दाब तिथून बाहेर काढता यावा.ही त्याकाळी केलेली रचना पाहून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.नवपाकळी बुरुज पाहून माघारी येताना तुम्हाला बाजूला रंगमहाल पहायला मिळेल…..की जिथे त्याकाळी नृत्यकला…आणि मनोरंजनाचे कार्यक्रम केले जात होते.
गडावर अनेक छोट्या मोठ्या अशा इमारती आहेत…..बरेच काही पाहता येण्यासारखे आहे…..ज्या गोष्टी जास्त उल्लेखनीय आहेत…त्यावरच थोडे बहुत लिहिले आहे.पण प्रत्यक्ष पाहून जे सुख मिळेल ते वर्णन नाही करता येणार.
हे सर्व वैभव पाहिले आणि मनात विचार आला ती छत्रपती शिवाजी महाराजांचा……!
२०० वर्षाहून जास्त काळ सत्ता……अमाप संपत्ती……प्रचंड घोडदळ…पायदळ….. शस्त्र….. मात्तबर सरदार…..कुशल कारागीर…..अनेक युद्घनीतीनिपुण सल्लागार…..एवढं सगळे असणारी ही आदिलशाही….तसेच निजामशाही… कुतुबशाही…..ह्यांना देखील डोईजड जाणारे आपले राजे किती कलागुण संपन्न असतील.
मोजकी संपत्ती….थोडाफार शस्त्रसाठा… मूठभर मावळे…..ह्यांना हाताशी घेवून….प्रसंगी माघार…..पण जशी माघार …..त्याहून पुढे जावून घातक प्रहार…..असे हे युगप्रवर्तक राजे अगदी मुघली सैन्याला पण पुरून उरले.
औरंगजेबाने दक्षिणेत पाऊल टाकले आणि इ.स.१६८६ साली आदिलशाहीचा पाडाव केला.एवढे मोठे साम्राज्य धुळीस मिळवले. इ.स.१६८० मध्ये छत्रपती शिवाजी राजांचे निधन झाले, इ.स.१६८९ मध्ये छत्रपती संभाजी राजांची औरंगजेबाने क्रूरपणे हत्या केली….तरीही अभेद्य असे हे स्वराज्य औरंगजेबला संपवता आले नाही….कारण एकच…..आदिलशाह…निजामशाह…ह्यांनी फक्त आपले वैभव उभे केले…त्यांचा पाडाव झाला की त्यांचे सारे अस्तित्वच संपले…..तर राजांनी मनामनात स्वराज्य उभे केले……हाच तो फरक की ज्याने औरंगजेबास पण जेरीस आणले.
औरंगजेब म्हणतो देखील की ” माझ्या जीवनातील दोन सर्वात मोठ्या चुका म्हणजे शिवाजीची आग्ऱ्याहून सुटका…आणि संभाजीची हत्या…..कारण शिवाजी सुटला म्हणून त्याच्या लोकांचे धैर्य वाढले…..आणि स्वराज्य वाढत गेले….आणि ते संपेल ह्या आशेने …..स्वराज्यात भीती निर्माण होईल ह्या हेतूने संभाजीला क्रूरपणे मारले….पण उलट त्याची माणसे अजुन पेटून उठली….आणि मला दख्खन फतेह करता नाही आला”
शत्रूचे हतबल होवून आलेले हे उदगार दाखवून देतात की राजे किती महान होते.
सह्याद्रीच्या रांगा पहात मधून शत्रुची ठिकाणे पण पहात गेलो तर इतिहास समजणे अजुन सोपे होईल असे मला वाटते.म्हणून तुम्हीही नळदुर्ग अवश्य भेट द्या.
आम्ही शनिवारी दुपारी साताऱ्यातून निघालो.रात्री पंढरपूर दर्शन घेवून……पुढे तुळजापूर मध्ये मुक्काम केला. रात्री ११.३० वाजता तिथे पोहोचलो.तर सकाळी ४ वाजता आवरून आई तुळजभवानीच्या दर्शनाला गेलो……तिथे मोफत आणि पैसे देवून (₹२००/-) असे दोन्ही प्रकारचे पास आहेत.आम्ही मोफत असणारे पास घेवून साधारण १ तास रांगेत उभे राहिलो.दर्शन अगदी छान झाले.तिथून निघालो ते नळदुर्ग दिशेने…..३५ किमी अंतर पार करून तुम्ही पोहोचता नळदुर्ग जवळ.तिथे नगरपालिकेची ₹२०/- ची पावती घेवून आत गेले असता….. आपल्या ४ चाकी गाडी पार्किंग चे ₹ ४०/- देवून मुख्य दरवाजा जवळ आलो की लहान मुलाना ₹ ११/- तर मोठ्यांना ₹.२१/- फी देवून आत फिरता येते.वयस्क व्यक्ती किंवा ज्यांना जास्त चालता येत नाही त्यांना आत फिरवण्यासाठी गाडीची सोय आहे त्याचे चार्जेस वेगळे द्यावे लागतात…तसेच उंट…घोडा…ह्यावर देखील रपेट मारता येते….बोरी नदीतून नौका विहाराचा देखील अनुभव आपण घेवू शकता…सध्या ते बंद आहे….
माघारी येताना अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ मठ ,मंदिर ….याचे दर्शन घेवून…..तिथल्या एसटी स्टँड जवळ असणारे आशिया खंडातील सर्वात मोठे शत्रागार…..राजे फतेहसिंग भोसले यांनी जमा केलेली शत्र…त्यात तलवारी… भाले….ब्रिटिश कालीन बंदुका…..१२फुटी बंदुका…. बाण…..चिलखत….जिरेटोप…. वाघ, मगर,चित्ते,अस्वल, गवा ह्याच्या शिकारी, गजासन(हत्तीचे पाय बसवलेले सिंहासन) हे सारं पाहायला मिळेल.तिकीट नाममात्र ₹५ /- असून माहिती सांगणारा ₹३० घेवून प्रत्येक गोष्टीची छान माहिती सांगतो.
ते पाहून झाल्यावर परतीचा प्रवास करत सोलापूर मध्ये आले की तिथे देखील सोलापूरचा भुईकोट किल्ला… सिद्घरामेश्र्वर मंदिर पाहून….माघारी सातारा येवू शकता.

शब्दसारथी
निलेश बाबर